दुबई : गोलंदाजांच्या प्रभावी कामगिरीला विराटच्या नाबाद शतकाची जोड मिळाल्यामुळे भारताने रविवारी चॅम्पियन्स ट्रॉफी वन-डे स्पर्धेमध्ये पाकिस्तानला ६ विकेटनी नमवले. पाकने विजयासाठी ठेवलेले २४२ धावांचे आव्हान भारताने ४ विकेटच्या मोबदल्यात ४५ चेंडू राखून पूर्ण केले. या स्पर्धेतील भारताचा हा सलग दुसरा विजय असून याबरोबरच भारताचे उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित झाले आहे. यजमान पाकसमोर मात्र सलग दुसऱ्या पराभवामुळे साखळीतच आव्हान संपुष्टात येण्याचे सावट आहे. (India Win)
विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्माने सुरुवातीच्या पाच षटकांमध्येच ३ चौकार, एका षटकारासह आश्वासक सुरुवात केली होती. तथापि, पाचव्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर शाहीन आफ्रिदीने यॉर्करवर त्याचा त्रिफळा उडवला. त्यानंतर, शुभमन गिल आणि विराट कोहली यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचत अठराव्या षटकात संघाचे शतक धावफलकावर लावले. याच षटकामध्ये अबरारने शुभमनला त्रिफळाचीत केले. शुभमनने ५२ चेंडूंमध्ये ७ चौकारांसह ४६ धावा केल्या. त्यानंतर विराटने श्रेयस अय्यरसोबत तिसऱ्या विकेटसाठी ११४ धावांची भागीदारी रचली. (India Win)
श्रेयस ६७ चेंडूंमध्ये ५ चौकार व एका षटकारासह ५६ धावा करून परतला. पंड्याही केवळ ८ धावा करू शकला. विराटने अखेरपर्यंत नाबाद राहत वन-डेतील ५१वे शतक साजरे केले. त्याने १११ चेंडूंमध्ये ७ चौकारांसह नाबाद १०० धावा करताना ४३ व्या षटकात चौकार मारून भारताचा विजय साकारला. या सामन्यात विराटने वन-डे कारकिर्दीतील १४,००० धावांचा टप्पाही ओलांडला. ही कामगिरी करणारा तो केवळ तिसरा फलंदाज असून त्याने सर्वांत कमी सामन्यांत हा टप्पा गाठण्याचाही विक्रम नोंदवला. त्याने २८७ डावांमध्ये १४,००० वन-डे धावा पूर्ण करताना सचिन तेंडुलकरला मागे टाकले. सचिनने ३५० डावांमध्ये हा टप्पा ओलांडला होता. (India Win)
तत्पूर्वी, गोलंदाजांच्या प्रभावी कामगिरीमुळे भारताने पाकिस्तानला २४१ धावांत रोखले. या सामन्यात पाकने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पाकच्या सलामी जोडीने ८ षटकांत संघाला ४० धावांची सलामी दिली. नवव्या षटकात हार्दिक पंड्याने बाबर आझमला बाद करून पाकला पहिला धक्का दिला. पुढच्याच षटकात अक्षर पटेलच्या अचूक थ्रोमुळे इमाम-उल-हक धावबाद झाला. दोन्ही सलामीवीर परतल्यानंतर सौद शकील आणि कर्णधार महंमद रिझवान यांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचून पाकच्या डावास आकार दिला. या दोघांनी ३३ व्या षटकात संघाचे दीडशतक धावफलकावर लावले. त्याच्या पुढच्याच षटकात अक्षरने रिझवानचा त्रिफळा उडवला. रिझवानने ७७ चेंडूंमध्ये ३ चौकारांसह ४६ धावा केल्या. ७६ चेंडूंमध्ये ५ चौकारांसह ६२ धावा करणाऱ्या शकीलला पंड्याने बाद केले. त्यानंतर ठरावीक अंतराने पाकचे फलंदाज बाद होत राहिले. कुलदीपने ४३ व्या षटकात लागोपाठच्या चेंडूंवर सलमान आघा आणि शाहीन शाह आफ्रिदीची विकेट घेतली. मात्र, त्याला हॅट्ट्रिक साधता आली नाही. अखेरच्या षटकात राणाने खुशदिल शाहला बाद करून पाकचा डाव संपवला. भारताकडून कुलदीपने सर्वाधिक ३, तर हार्दिकने २ विकेट घेतल्या.
कोहलीने टाकले अझरना मागे
या सामन्यात विराट कोहली हा भारतातर्फे वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणारा क्षेत्ररक्षक ठरला. या सामन्यात दोन झेल घेतल्यामुळे कोहलीच्या नावावर आता २९९ सामन्यांमध्ये १५८ झेल आहेत. त्याने भारताचे माजी कर्णधार अझरुद्दीन यांना मागे टाकले. अझर यांच्या नावावर ३३४ सामन्यांत १५६ झेल होते. आंतरराष्ट्रीय वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणाऱ्या क्षेत्ररक्षकांत विराट तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. श्रीलंकेचा माजी कर्णधार माहेला जयवर्धने या यादीमध्ये अग्रस्थानी असून त्याच्या नावावर २१८ झेल आहेत. दुसऱ्या स्थानी असणारा ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगच्या नावावर १६० झेल आहेत.
धावफलक : पाकिस्तान – इमाम उल हक धावबाद १०, बाबर आझम झे. राहुल गो. पंड्या २३, सौद शकील झे. पटेल गो. पंड्या ६२, महंमद रिझवान त्रि. गो. पटेल ४६, सलमान आघा झे. जडेजा गो. कुलदीप १९, तय्यब ताहीर त्रि. गो. जडेजा ४, खुशदिल शाह झे. कोहली गो. राणा ३८, शाहीन शाह आफ्रिदी पायचीत गो. कुलदीप ०, नसीम शाह झे. कोहली गो. कुलदीप १४, हारिस रौफ धावबाद ८, अबरार अहमद नाबाद ०, अवांतर १७, एकूण ४९.४ षटकांत सर्वबाद २४१.
बाद क्रम – १-४१, २-४७, ३-१५१, ४-१५९, ५-१६५, ६-२००, ७-२००, ८-२२२, ९-२४१, १०-२४१.
गोलंदाजी – महंमद शमी ८-०-४३-०, हर्षित राणा ७.४-०-३०-१, हार्दिक पंड्या ८-०-३१-२, अक्षर पटेल १०-०-४९-१, कुलदीप यादव ९-०-४०-३, रवींद्र जडेजा ७-०-४०-१.
भारत – रोहित शर्मा त्रि. गो. आफ्रिदी २०, शुभमन गिल त्रि. गो. अबरार ४६, विराट कोहली नाबाद १००, श्रेयस अय्यर झे. इमाम गो. खुशदिल ५६, हार्दिक पंड्या झे. रिझवान गो. आफ्रिदी ८, अक्षर पटेल नाबाद ३, अवांतर ११, एकूण ४२.३ षटकांत ४ बाद २४४.
बाद क्रम – १-३१, २-१००, ३-२१४, ४-२२३.
गोलंदाजी – आफ्रिदी ८-०-७४-२, नसीम ८-०-३७-०, हारिस ७-०-५२-०, अबरार १०-०-२८-१, खुशदिल ७.३-०-४३-१, सलमान २-०-१०-०.
हेही वाचा :