दुबई : शुभमन गिल आणि महंमद शमी यांच्या प्रभावी कामगिरीमुळे भारताने गुरुवारी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेमध्ये बांगलादेशला ६ विकेटनी हरवून विजयी सलामी दिली. बांगलादेशचा डाव २२८ धावांत संपवून भारताने हे आव्हान ४६.३ षटकांमध्ये ४ विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केले.(India)
बांगलादेशच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी भारताला पॉवर-प्लेमध्ये ६९ धावांची सलामी दिली. दहाव्या षटकात तस्किन अहमदला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात रोहित बाद झाला. रोहितने ३६ चेंडूंमध्ये ७ चौकारांसह ४१ धावा केल्या. त्यानंतर, विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल हे फलंदाज ठरावीक अंतराने बाद झाले. शुभमनने मात्र एका बाजूने किल्ला लढवत लोकेश राहुलच्या साथीने पाचव्या विकेटसाठी नाबाद ८७ धावांची भागीदारी रचली. शुभमनने कारकिर्दीतील आठवे वन-डे शतक ठोकताना १२९ चेंडूंमध्ये ९ चौकार व २ षटकारांसह नाबाद १०१ धावा फटकावल्या. राहुलने ४७ चेंडूंमध्ये १ चौकार व २ षटकारांसह नाबाद ४१ धावा करून गिलला पूरक साथ दिली. सत्तेचाळीसाव्या षटकात राहुलने षटकार खेचून भारताचा विजय साकारला. (India)
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशचा डाव ४९.४ षटकांत २२८ धावांमध्ये आटोपला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या बांगलादेशची सुरुवात वाईट झाली. पहिल्याच षटकात शमीने सलामीवीर सौम्य सरकारला शून्यावर बाद केले. पुढच्याच षटकात कर्णधार नजमूल शांतोही शून्यावर परतला. सातव्या षटकात शमीने मेहदी हसन मिराझला माघारी धाडले. नवव्या षटकाच्या पहिल्या दोन चेंडूंवर अक्षर पटेलने तन्झिद हसन व मुश्फिकुर रहीमची विकेट घेतली. तिसऱ्या चेंडूवर तो हॅट्ट्रिकची संधी असताना रोहितने स्लिपमध्ये जाकेर अलीचा झेल सोडला. त्यामुळे, अक्षरची हॅट्ट्रिक हुकली. (India)
नवव्या षटकात ३५ धावांत निम्मा संघ गारद झालेल्या बांगलादेशचा डाव तौहिद ह्रिदॉय आणि जाकेर यांनी दीडशतकी भागीदारी रचून सावरला. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी १५४ धावांची भागीदारी रचली. अखेर शमीने जाकेरला बाद करून ही जोडी फोडली. जाकेरने ११४ चेंडूंमध्ये ४ चौकारांसह ६८ धावा केल्या. तौहिदने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिलेवहिले शतक झळकावताना ११८ चेंडूंमध्ये ६ चौकार व २ षटकारांसह १०० धावांची खेळी केली. हर्षित राणाने डावाच्या अखेरच्या षटकात तौहिदला बाद करून बांगलादेशचा डाव संपवला. भारताकडून शमीने ५३ धावांत ५ विकेट घेतल्या, तर हर्षितने ३ विकेट घेतल्या. भारताची या स्पर्धेतील पुढची लढत २३ मार्च रोजी पाकिस्तानशी होणार आहे. (India)
धावफलक : बांगलादेश – तन्झिद हसन झे. राहुल गो. पटेल २५, सौम्य सरकार झे. राहुल गो. शमी ०, नजमुल शांतो झे. कोहली गो. हर्षित ०, मेहदी हसन मिराझ झे. गिल गो. शमी ५, तौहिद ह्रिदॉय झे. शमी गो. हर्षित १००, मुश्फिकुर रहीम झे. राहुल गो. पटेल ०, जाकेर अली झे. कोहली गो. शमी ६८, रिशाद होसेन झे. पंड्या गो. हर्षित १८, तन्झिम हसन साकिब त्रि. गो. शमी ०, तस्किन अहमद झे. अय्यर गो. शमी ३, मुस्तफिझूर रहमान नाबाद ०, अवांतर ९, एकूण ४९.४ षटकांत सर्वबाद २२८. (India)
बाद क्रम – १-१, २-२, ३-२६, ४-३५, ५-३५, ६-१८९, ७-२१४, ८-२१५, ९-२२८, १०-२२८.
गोलंदाजी – महंमद शमी १०-०-५३-५, हर्षित राणा ७.४-०-३१-३, अक्षर पटेल ९-१-४३-२, हार्दिक पंड्या ४-०-२०-०, रवींद्र जडेजा ९-०-३७-०, कुलदीप यादव १०-०-४३-०.
भारत – रोहित शर्मा झे. रिशाद गो. तस्किन ४१, शुभमन गिल नाबाद १०१, विराट कोहली झे. सौम्य गो. रिशाद २२, श्रेयस अय्यर झे. शांतो गो. मुस्तफिझूर १५, अक्षर पटेल झे. व गो. रिशाद ८, लोकेश राहुल नाबाद ४१, अवांतर ३, एकूण ४६.३ षटकांत ४ बाद २३१.
बाद क्रम – १-६९, २-११२, ३-१३३, ४-१४४.
गोलंदाजी – तस्किन ९-०-३६-१, मुस्तफिझूर ९-०-६२-१, तन्झिम ८.३-०-५८-०, मिराझ १०-०-३७-०, रिशाद १०-०-३८-२.
हेही वाचा :
शमीचे सर्वांत वेगवान ‘द्विशतक’