कोल्हापूर; प्रतिनिधी : गेल्या पंधरा वर्षांत शहरात विकासकामांचा डोंगर उभा केला. त्यापूर्वी दहा वर्षे राज्यात विरोधकांची सत्ता होती. कोल्हापूर महापालिका त्यांच्या ताब्यात होती. या काळात त्यांनी काय केले? आगामी काळात शहरातील शंभर टक्के रस्ते सिमेंटचे करण्याचे नियोजन आहे. रस्ता कामाची वर्कऑर्डर झाली नाही म्हणता तर समोरासमोर या वर्कऑर्डर दाखवतो. ती नसेल तर मी संन्यास घेतो अन्यथा तुम्ही संन्यास घ्या, असे आव्हान क्षीरसागर यांनी विरोधकांना दिले.
पापाची तिकटी येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी शिवसेना उपनेत्या जयश्री जाधव, निरीक्षक उदय सावंत, सुजित चव्हाण, आदिल फरास, महेश जाधव आदी उपस्थित होते. क्षीरसागर म्हणाले, आई अंबाबाईची शपथ घेऊन सांगतो आयुष्यात कधी चुकलो नाही आणि चुकणारही नाही. विरोधक अफवा पसरवत आहेत. संभ्रम निर्माण करत आहेत. माझ्या प्रचारसभांना मिळणारा प्रतिसाद पाहून त्यांना धडकी भरली आहे.
आगामी काळात कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ, अंबाबाई तीर्थक्षेत्र, शहराची हद्दवाढ, आयटी पार्क, भव्य फुटबॉल संकुल ही माझ्यासमोर असलेली महत्त्वाची कामे आहेत. कोणत्याही परिस्थितीत ही कामे मार्गी लावली जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी बोलताना आदिल फरास यांनी, काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांच्या पालिकेतील कामाची कुंडली आहे. यामुळे कोल्हापूर महापालिका आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी वाट्टेल ते करणाऱ्या नेत्यांनी क्षीरसागरांवर आरोप करण्यापूर्वी स्वतःचा चेहरा आरशात बघावा, असे आव्हान त्यांनी दिले.
स्वतःला सर्वसामान्य म्हणवणाऱ्या राजेश लाटकर यांनी पालिकेत केलेला कारभार जनतेला चांगलाच ठाऊक आहे. ते सर्वसामान्य आहेत तर मग त्यांच्या कुटुंबाची संपत्ती साडेतीन कोटी रुपये कशी, याचे उत्तर जनतेला द्यावे, असेही फरास म्हणाले.
ऋतुराज क्षीरसागर, बाळासाहेब काळे, आनंदराव माजगावकर, विश्वनाथ सांगावकर, भरत काळे, शिवाजी गवळी, बबन गवळी, संदीप ढणाल, अभिजित गजगेश्वर, सचिन ढणाल, प्रकाश भालकर, अक्षय कुंभार, अरविंद दुर्गुळे, पप्पू रजपूत, आशिष पाडळकर, प्रकाश भोसले, निलेश हंकारे, अवधूत कलकुटकी, राहुल खुपेरकर, सचिन भोळे, नितीन ब्रम्हपुरे, सुमित ब्रह्मपुरे आदी उपस्थित होते.