Home » Blog » Hyderabad : हैदराबादचा झंझावाती विजय

Hyderabad : हैदराबादचा झंझावाती विजय

राजस्थान रॉयल्सचा ४४ धावांनी पराभव; किशनचे नाबाद शतक

by प्रतिनिधी
0 comments
Hyderabad

हैदराबाद : झंझावाती फलंदाजीचे प्रदर्शन करत सनरायझर्स हैदराबादने इंडियन प्रीमियर लीग टी-२० स्पर्धेमध्ये रविवारी राजस्थान रॉयल्सचा ४४ धावांनी पराभव केला. हैदराबादने ६ बाद २८६ धावा केल्यानंतर राजस्थानला ६ बाद २४२ धावांवर रोखले. दोन्ही संघांनी एकूण ५२८ धावा फटकावल्याने हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्येचा सामना ठरला. (Hyderabad)

राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारण्याची चूक केली. अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड या सलामीवीरांनी सुरुवातीच्या तीन षटकांमध्येच ४५ धावा फटकावल्या. अभिषेक बाद झाल्यानंतर हेड आणि इशान किशन यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८५ धावांची भागीदारी रचली. हेडने ३१ चेंडूंमध्ये ९ चौकार व ३ षटकारांसह ६७ धावा काढल्या. त्यानंतर, इशानने नितीशकुमार रेड्डी आणि हेन्रिक क्लासेन यांच्यासोबतही अर्धशतकी भागीदाऱ्या रचल्या. इशानने अखेरपर्यंत नाबाद राहत शतक साजरे केले. त्याने ४७ चेंडूंमध्ये ११ चौकार व ६ षटकांच्या साहाय्याने ठोकलेल्या १०६ धावांमुळे हैदराबादला पावणेतीनशे धावांचा टप्पा ओलांडता आला. (Hyderabad)

हैदराबादच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात खराब झाली. सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार रियान पराग हे सुरुवातीच्या दोन षटकांमध्येच बाद झाले. पाचव्या षटकांत नितीश राणा बाद झाला, तेव्हा हैदराबादच्या ३ बाद ५० धावा झाल्या होत्या. त्यानंतर, ध्रुव जुरेल आणि संजू सॅमसन यांनी चौथ्या विकेटसाठी १११ धावा जोडत संघाचा डाव सावरला. संजूने ३७ चेंडूमध्ये ७ चौकार, ४ षटकारांह ६६, तर ध्रुवने ३५ चेंडूंत ५ चौकार, ६ षटकारांसह ७० धावा केल्या. हे दोघे लागोपाठच्या षटकांमध्ये बाद झाल्यामुळे पुन्हा राजस्थानच्या धावगतीस ब्रेक लागला. शिम्रॉन हेटमायर व शुभम दुबे यांनी अखेरच्या षटकापर्यंत फटकेबाजी करत चांगली लढत दिली. परंतु, अखेर त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले. (Hyderabad)

संक्षिप्त धावफलक : सनरायझर्स हैदराबाद – २० षटकांत ६ बाद २८६ (इशान किशन नाबाद १०६, ट्रॅव्हिस हेड ६७, हेन्रिक क्लासेन ३४, तुषार देशपांडे ३-४४, महेश तिक्षणा २-५२) विजयी विरुद्ध राजस्थान रॉयल्स – २० षटकांत ६ बाद २४२ (ध्रुव जुरेल ७०, संजू सॅमसन ६६, शिम्रॉन हेटमायर ४२, शुभम दुबे नाबाद ३४, हर्षल पटेल २-३४, सिमरजित सिंग २-४६).

हेही वाचा :

न्यूझीलंडची विजयी आघाडी

सनरायझर्सची विक्रमांना गवसणी

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00