भुवनेश्वर : भारतीय महिला हॉकी संघाने मंगळवारी प्रो-हॉकी लीग स्पर्धेच्या भारतातील टप्प्याचा समारोप विश्वविजेत्या नेदरलँड्सविरुद्ध विजय मिळवून केला. निर्धारित वेळेत २-२ असा बरोबरीत राहिलेला सामना भारताने पेनल्टी शूटआउटमध्ये २-१ असा जिंकला. (Hockey Win)
भुवनेश्वरमधील कलिंगा स्टेडियमवर हा सामना रंगला. जागतिक क्रमवारीत नेदरलँड्स महिलांचा संघ अग्रस्थानी असून हा संघ सध्याचा ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता आणि वर्ल्ड कप विजेताही आहे. दुसरीकडे भारतीय महिलांचा संघ क्रमवारीत नवव्या स्थानी आहे. प्रो-हॉकी लीगच्या गुणतक्त्यातही पहिले स्थान पटकावणाऱ्या नेदरलँड्सने सोमवारच्या लढतीत भारतावर ४-२ अशी मात केली होती. या पराभवाची परतफेड भारताने मंगळवारच्या सामन्यात केली. (Hockey Win)
नेदरलँड्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात केलेल्या चुका भारतीय संघाने मंगळवारी टाळल्या. पेनल्टी कॉर्नर मिळवण्याचे प्रयत्न करण्याऐवजी भारताने या सामन्यात वेगवान पासेसना आणि त्यायोगे मैदानी गोल करण्यास प्राधान्य दिले. सामन्याचे पहिले सत्र गोलविना गेल्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये नेदरलँड्सची कर्णधार पिएन सँडर्सने पेनल्टी कॉर्नरवर गोल करून संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. याच सत्रामध्ये २८ व्या मिनिटास फे व्हॅन डेर एल्स्टने मैदानी गोल करत मध्यंतरापूर्वीच नेदरलँड्सची आघाडी २-० अशी वाढवली. (Hockey Win)
मध्यंतरानंतर भारताने गोल करण्यासाठी आक्रमकपणे प्रयत्न सुरू केले. ३५ व्या मिनिटास भारताच्या दीपिकाने डावीकडून आक्रमण करत अप्रतिम मैदानी गोल नोंदवून भारताचे खाते उघडले. त्यानंतर, आठच मिनिटांमध्ये बलजित कौरने भारतातर्फे दुसरा गोल नोंदवून २-२ अशी बरोबरी साधली. अखेरच्या सत्रामध्ये नेदरलँड्सने वारंवार भारताच्या बचावफळीवर दबाव वाढवण्याचे प्रयत्न केले. परंतु, भारताच्या बचावपटू आणि गोलरक्षक सविताने त्यांच्या प्रयत्नांना यश मिळू दिले नाही.
निर्धारित वेळेनंतर २-२ अशी बरोबरी राहिल्यामुळे पेनल्टी शूटआउटचा अवलंब करण्यात आला. शूटआउटमध्ये भारताच्या दीपिका आणि मुमताझ खान यांनी अचूकपणे प्रतिस्पर्ध्यांच्या गोलजाळ्याचा वेध घेतला. नेदरलँड्सकडून मात्र केवळ मॅरिजिन व्हीनलाच गोल करता आला. ३०१ वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणारी भारताची अनुभवी गोलरक्षक सविताने नेदरलँडच्या चार पेनल्टी अडवून संघाचा २-१ असा विजय निश्चित केला. या विजयामुळे भारताने बोनस गुण वसूल केला असून ८ सामन्यांअखेर भारतीय संघ ९ गुणांसह सहाव्या स्थानी पोहोचला आहे. दरम्यान, या विजयाबद्दल हॉकी इंडियाने भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूस १ लाख, तर सहायक वर्गातील प्रत्येकास ५०,००० रुपयांचे पारितोषिक जाहीर केले.
हेही वाचा :
सर्वोच्च न्यायालयाचा लक्ष्य सेनला दिलासा
ब्रायडन कार्स चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर