Home » Blog » Hazare Trophy : महाराष्ट्र उपांत्य फेरीत

Hazare Trophy : महाराष्ट्र उपांत्य फेरीत

पंजाबवर ७० धावांनी विजय; कर्नाटकचीही आगेकूच

by प्रतिनिधी
0 comments
Hajare Trophy

बडोदा : महाराष्ट्र क्रिकेट संघाने विजय हजारे करंडक वन-डे स्पर्धेमध्ये उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. अर्शिन कुलकर्णीचे शतक आणि गोलंदाजांच्या प्रभावी कामगिरीमुळे महाराष्ट्राने उपांत्यपूर्व सामन्यात पंजाबचा ७० धावांनी पराभव केला. दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात कर्नाटकने बडोद्याला ५ धावांनी हरवून उपांत्य फेरी गाठली. (Hazare Trophy)

बडोद्याच्या कोटांबी स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीस आमंत्रित केल्यावर माहाराष्ट्राने ६ बाद २७५ धावसंख्या उभारली. सलामीवीर अर्शिन कुलकर्णीने १३७ चेंडूंमध्ये १४ चौकारांसह १०७ धावांची खेळी केली. अंकित बावणेने ८५ चेंडूंमध्ये ७ चौकारांसह ६० धावा करून अर्शिनला उपयुक्त साथ दिली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसह १४५ धावांची भागीदारी रचली. अखेरच्या षटकांतील निखिल नाईकच्या फटकेबाजीमुळे महाराष्ट्राला पावणेतीनशे धावांचा टप्पा गाठता आला. निखिलने २९ चेंडूंमध्ये प्रत्येकी ३ चौकार व षटकारांसह नाबाद ५२ धावा फटकावल्या. पंजाबच्या अर्शदीप सिंगने ३, तर नमन धीरने २ विकेट घेतल्या. (Hazare Trophy)

महाराष्ट्राच्या आव्हानासमोर पंजाबचा डाव ४४.४ षटकांत २०५ धावांत गडगडला. पंजाबच्या एकाही फलंदाजास अर्धशतकी मजल मारता आली नाही. अनमोल सिंगने ४८, तर अर्शदीपने ४९ धावा करून थोडाफार प्रतिकार केला. महाराष्ट्राकडून मुकेश चौधरीने ३, तर प्रदीप दाढेने २ विकेट घेतल्या. (Hazare Trophy)

दुसरा उपांत्यपूर्व सामना बडेद्याच्या मोतीबाग स्टेडियमवर रंगला. अखेरच्या षटकापर्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यामध्ये कर्नाटकने विजयासाठी ठेवलेल्या २८२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बडोद्याचा डाव २७६ धावांत आटोपला. कर्नाटकतर्फे सलामीवीर देवदत्त पडिक्कलने ९९ चेंडूंमध्ये १५ चौकार व २ षटकारांसह १०२ धावांची शतकी खेळी करून विजयात मोलाची भूमिका बजावली. बडोद्याचा सलामीवीर शाश्वत रावतचे शतक व्यर्थ ठरले. त्याने १२६ चेंडूंत ९ चौकार व एका षटकारासह १०४ धावा केल्या. (Hazare Trophy)

  • संक्षिप्त धावफलक :
  • १. महाराष्ट्र : ५० षटकांत ६ बाद २७५ (अर्शिन कुलकर्णी १०७, अंकित बावणे ६०, निखिल नाईक ५२, अर्शदीप सिंग ३-५६, नमन धीर २-२९) विजयी विरुद्ध पंजाब – ४४.४ षटकांत सर्वबाद २०५ (अनमोलप्रीत सिंग ४८, अर्शदीप सिंग ४९, मुकेश चौधरी ३-४४, प्रदीप दाढे २-३१).
  • २. कर्नाटक : ५० षटकांत ८ बाद २८१ (देवदत्त पडिक्कल १०२, केव्ही अनीश ५२, कृष्णन श्रीजीत २८, राज लिंबानी ३-४७, अतित शेठ ३-४१) विजयी विरुद्ध बडोदा – ४९.५ षटकांत सर्वबाद २७६ (शाश्वत रावत १०४, अतित शेठ ५६, कृणाल पंड्या ३०, श्रेयस गोपाळ २-३८, वासुकी कौशिक २-३९).

हेही वाचा :

 

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00