बडोदा : विजय हजारे करंडक वन-डे क्रिकेट स्पर्धेमध्ये राजस्थान आणि हरियाणा या संघांनी ‘नॉक-आउट’चे सामने जिंकून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. पहिल्या ‘नॉक-आउट’ सामन्यात राजस्थानने तमिळनाडूचा १९ धावांनी पराभव केला, तर दुसऱ्या सामन्यात हरियाणाने बंगालला ७२ धावांनी हरवले.
राजस्थानने तमिळनाडूविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर अभिजित तोमरच्या शतकाच्या जोरावर २६७ धावा केल्या. तोमरने १२५ चेंडूंमध्ये १२ चौकार व ४ षटकारांसह १११ धावांची खेळी केली. कर्णधार महिपाल लोमरोरने ४९ चेंडूंमध्ये ३ चौकार व ४ षटकारांसह ६० धावा करून त्याला उपयुक्त साथ दिली. तमिळनाडूतर्फे वरूण चक्रवर्तीने ५२ धावांत ५ विकेट घेतल्या. राजस्थानच्या आव्हानाचा पाठलाग करताना तमिळनाडूचा डाव ४७.१ षटकांत २४८ धावांत संपुष्टात आला. तमिळनाडूकडून सलामीवीर नारायण जगदीशन वगळता कोणत्याही खेळाडूस अर्धशतकी मजल मारता आली नाही. जगदीशनने ५२ चेंडूंमध्ये १० चौकारांसह ६५ धावांची खेळी केली. राजस्थानकडून अमन शेखावतने ३, तर अनिकेत चौधरी आणि कुकना अजय सिंह यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या. उपांत्यपूर्व फेरीमध्ये राजस्थानचा सामना विदर्भाशी होईल.
दुसऱ्या ‘नॉक आउट’ सामन्यामध्ये हरियाणाने प्रथम फलंदाजी करताना बंगालविरुद्ध ९ बाद २९८ धावा केल्या. हरियाणाकडून पार्थ वत्सने ७७ चेंडूंमध्ये ६ चौकारांसह ६२, तर निशांत सिंधूने ६७ चेंडूंमध्ये ६ चौकार व एका षटकारासह ६४ धावा केल्या. तळातील सुमीत कुमारने ३२ चेंडूंमध्ये ५ चौकार व एका षटकारासह नाबाद ४१ धावांची खेळी केल्यामुळे हरियाणाला तीनशेच्या आसपास पोहोचता आले. भारतीय संघामध्ये पुनरागमन करण्याच्या प्रतीक्षेत असणारा वेगवान गोलंदाज महंमद शमीने बंगालतर्फे ६१ धावांत ३ विकेट घेतल्या. प्रत्युत्तरादाखल बंगालचा डाव ४३.१ षटकांमध्ये २२६ धावांत आटोपला. बंगालतर्फे केवळ सलामीवीर अभिषेक पोरेलने अर्धशतकी खेळी करताना ७८ चेंडूंमध्ये ६ चौकारांसह ५७ धावा फटकावल्या. हरियाणाच्या पार्थ वत्सने ३ विकेट घेत अष्टपैलू कामगिरी नोंदवली. उपांत्यपूर्व फेरीमध्ये हरियाणाचा सामना गुजरातशी होणार आहे.
जगदीशनचे षटकात सहा चौकार
या सामन्यात नारायण जगदीशनने अमन सिंह शेखावतच्या दुसऱ्या षटकात सहाही चेंडूंवर चौकार ठोकले. या षटकात तब्बल २९ धावा वसूल करण्यात आल्या. अमनच्या पहिला चेंडू वाइड होता व हा चेंडू सीमापार गेल्याने ४ धावा ‘बाइज’ मिळाल्या. त्यानंतरच्या सहाही चेंडूंवर नारायणने चौकार मारले.
संक्षिप्त धावफलक
१. राजस्थान – ४७.३ षटकांत सर्वबाद २६७ (अभिजित तोमर १११, महिपाल लोमरोर ६०, कार्तिक शर्मा ३५, वरुण चक्रवर्ती ५-५२, संदीप वॅरियर २-३८) विजयी विरुद्ध तमिळनाडू – ४७.१ षटकांत २४८ (नारायण जगदीशन ६५, विजय शंकर ४९, बाबा इंद्रजित ३७, अमन शेखावत ३-६०, अनिकेत चौधरी २-४०).
२. हरियाणा – ५० षटकांत ९ बाद २९८ (पर्थ वत्स ६२, निशांत सिंधू ६४, सुमीत कुमार नाबाद ४१, महंमद शमी ३-६१, मुकेश कुमार २-४६) विजयी विरुद्ध पश्चिम बंगाल – ४३.१ षटकांत सर्वबाद २२६ (अभिषेक पोरेल ५७, सुदीप कुमार घारमी ३६, अनुस्तूप मजुमदार ३६, पार्थ वत्स ३-३३, अंशुल कम्बोज २-२५).
4⃣wd,4⃣,4⃣,4⃣,4⃣,4⃣,4⃣
29-run over! 😮
N Jagadeesan smashed 6⃣ fours off 6⃣ balls in the second over to provide a blistering start for Tamil Nadu 🔥#VijayHazareTrophy | @IDFCFIRSTBank
Scorecard ▶️ https://t.co/pSVoNE63b2 pic.twitter.com/JzXIAUaoJt— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 9, 2025
हेही वाचा :