कोल्हापूर : प्रतिनिधी : पाटाकडील तालीम मंडळ ब संघाने सम्राटनगर स्पोर्टस् संघाचा सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत टायब्रेकरवर ४-२ अशा फरकाने विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला. पूर्णवेळेत सामना १-१ असा बरोबरीत होता. पाटाकडील तालीम मंडळाने आयोजित ही स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर खेळवली जात आहे. (Football match)
पाटाकडील आणि सम्राटनगर यांच्यात झालेल्या सामन्यात पूर्वार्धात दोन्ही संघांनी प्रत्येकी एक गोल केला. सम्राटनगर स्पोर्टस् च्या अभिषेक सिंगने सातव्या मिनिटाला गोल केला. गोलची परतफेड करण्यासाठी पाटाकडील संघाने सुत्रबद्ध चढाया केल्या. ३७ व्या मिनिटाला पाटाकडील संघास बरोबरी साधण्याची संधी मिळाली. त्यांच्या ओंकार देवणे याने डी बाहेरुन मारलेल्या वेगवान फटक्यावर गोल केला. मध्यंत्तरास सामना १-१ असा बरोबरीत होता.(Football match)
उत्तरार्धात दोन्ही संघांनी गोल नोंदवण्याचे जोरदार प्रयत्न केले. पण कोणीच आघाडी घेऊ न शकल्याने पूर्णवेळेत सामना १-१ असा बरोबरीत राहिला. मुख्य पंचांनी टायब्रेकरचा अवलंब केला. त्यामध्ये पाटाकडील ब संघाने बाजी मारली. त्यांच्या वैभव देसाई, श्रेयस मुळीक, ओंकार देवणे, अजिंक्य मरळकर यांनी गोल केले. गौरव माळीचा फटका बाहेर गेला. सम्राटनगरकडून निलेश सावेकर आणि लवप्रितसिंगने गोल केले. ओंकार जाधव आणि निलेश खापरे यांचे फटके गोलरक्षक अविराज पाटीलने रोखले. पाटाकडीलने टायब्रेकरवर ४-२ अशा फरकाने जिंकून पुढील फेरीत प्रवेश केला. या सामन्यात पूर्वार्धात सम्राटनगरचा मसूद मुल्ला आणि पाटाकडीलचा रोहित देवणे यांनी मैदानावर मारामारी केल्यांनी पंचांनी त्यांना रेडकार्ड दाखवले. पाटाकडीलचा गोलरक्षक अविराज पाटील याची सामनावीर म्हणून निवड झाली.
सोमवारचा सामना : खंडोबा तालीम मंडळ वि. प्रॅक्टिस फुटबॉल क्लब, दुपारी ४.०० वा.
हेही वाचा :