ग्रॉस आयलेट; वृत्तसंस्था : इंग्लंडने वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० क्रिकेट मालिकेत शुक्रवारी तीन विकेटनी विजय साकारला. इंग्लंडचा हा सलग तिसरा विजय असून याबरोबरच इंग्लंडने पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.
या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजला ८ बाद १४५ धावांत रोखले. विंडीजचा निम्मा संघ पॉवर-प्लेमध्ये ३७ धावांत गारद झाला होता. त्यानंतर कर्णधार रोव्हमन पॉवेल आणि रोमारिओ शेफर्ड यांनी सहाव्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी रचत विंडीजचा डाव सावरला. पॉव्हेलने ४१ चेंडूमध्ये ३ चौकार व ४ षटकारांसह ५४, तर शेफर्डने ३० धावा केल्या. हे दोघे बाद झाल्यानंतर पुन्हा विंडीजच्या धावसंख्येस ब्रेक लागला. इंग्लंडकडून साकिब महमूद आणि जेमी ओव्हर्टन यांनी प्रत्येकी ३ विकेट घेतल्या.
विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडच्याही पॉवर-प्लेमध्ये ३ विकेट गेल्या होत्या, मात्र विल जॅक्स, सॅम करन आणि लियाम लिव्हिंगस्टन यांनी महत्त्वपूर्ण खेळी करून इंग्लंडचा विजय निश्चित केला. करनने २६ चेंडूंमध्ये ३ चौकार व एका षटकारासह ४१, तर लिव्हिंगस्टनने २८ चेंडूंमध्ये प्रत्येकी २ चौकार व षटकारांसह ३९ धावा फटकावल्या. विंडिजच्या अकिल होसेनने ४ विकेट घेतल्या.
संक्षिप्त धावफलक : वेस्ट इंडिज – २० षटकांत ८ बाद १४५ (रॉव्हमन पॉवेल ५४, रोमारिओ शेफर्ड ३०, अल्झारी जोसेफ नाबाद २१, साकिब महमूद ३-१७, जेमी ओव्हरटन ३-२०) पराभूत विरुद्ध इंग्लंड – १९.२ षटकांत ७ बाद १४९ (सॅम करन ४१, लियाम लिव्हिंगस्टन ३९, विल जॅक्स ३२, अकिल होसेन ४-२२, गुडकेश मोती १-२२).