– प्रा. प्रशांत नागावकर
जाणीव चॅरिटेबल फाउंडेशन, कोल्हापूर यांनी राज्य नाट्य स्पर्धेमध्ये ‘कोंडमारा’ हे नाटक सादर केले. मूळ चेकोस्लोव्हाकियन लेखक वॉस्लोव्ह हावेल यांच्या ‘लार्गो डेसोलाटो’ या नाटकाचे अरुण नाईक यांनी कोंडमारा हे मराठी रूपांतर केले आहे. (Drama Competition 2024)
वॉस्लोव्ह हावेल हे चेकोस्लोव्हाकियाचे शेवटचे अध्यक्ष आणि चेक प्रजासत्ताकचे पहिले अध्यक्ष. त्यांना २००३ मध्ये भारत सरकारने गांधी शांतता पुरस्काराने सन्मानित केले होते. एक राजकारणी आणि लेखक म्हणून ते प्रसिद्ध होते. तसेच ते नाटककार म्हणूनही जगभर ओळखले जातात. ॲब्सर्ड शैलीतील त्यांची नाटकं युरोपात खूप नावाजली गेली. १९८४ मध्ये तुरुंगातून सुटल्यानंतर हावेल यांनी हे नाटक लिहिल्याचे सांगितले जाते. ‘लार्गो डेसोलाटो ‘हे सर्व काळातील १५ महान नाटकांपैकी एक म्हणून टेलिग्राफमध्ये सूचीबद्ध होते.
‘लार्गो डेसोलाटो’ हे अर्ध-आत्मचरित्रात्मक नाटक आहे. मराठी रूपांतरामध्ये दि. पु. गोरे हा या नाटकाचा नायक आहे. एक प्राध्यापक, तत्त्वज्ञ आणि लेखक म्हणून तो लोकप्रिय आहे; तथापि, सतत प्रस्थापित व्यवस्थेने पाळत ठेवणे आणि येऊ घातलेल्या तुरुंगवासाची भीती यामुळे तो एक न्यूरोटिक एकांतवासी बनला आहे. गोरेने काहीतरी प्रक्षोभक विधान केलेलं आहे. संपूर्ण नाटकात एक दहशतीचं वातावरण आहे. यामुळे त्याचे मित्र, चाहते आणि सहकारी यांच्याकडून वाढत्या दबावाचा सामना करावा लागतो; या दबावांबरोबरच राज्यव्यवस्थेने पाळत ठेवल्यामुळे त्याला पुढे काहीही लिहिता आलेले नाही.
त्याचे मित्र आणि सहकारी हे सतत त्याच्या शरीराच्या आणि मनाच्या आरोग्याची काळजी घेत असतात. सुजाता ही त्याची पत्नी असूनही तिच्यासोबतचे त्याचे नाते कधीच स्पष्ट होत नाही. सुजाता दिपूच्या मित्राशी नाते जोडून असल्याचे ध्वनित होते. लता ही त्याची मैत्रीण आहे. मात्र गोरेच्या भावनिकरित्या व्यक्त होण्याच्या किंवा सार्वजनिकरित्या दोघांमधील नातेसंबंधाची कबुली देण्याच्या असमर्थतेमुळे निराश आहे. मार्गारेट ही तत्त्वज्ञानाची विद्यार्थिनी सल्ल्यासाठी दिपुकडे येते व ती त्याला मोहित करते.
रात्री उशिरा त्याला दोन पोलीस भेटायला येतात आणि गोरेने आक्षेपार्ह लेखाचे लेखक नसल्याचा दावा करणाऱ्या कागदावर स्वाक्षरी केल्यास त्याला सर्व आरोपांपासून मुक्त करण्याची ऑफर देतात. तो विचार करण्यासाठी वेळ मागतो आणि त्याला वेळ दिला जातो, पण त्याचदरम्यान त्याची मानसिक स्थिती बिघडते आणि तो त्याच्या सहकाऱ्यांपासून दूर जातो. यादरम्यान, दोन पेपर मिल कामगार त्याला कागद आणि कर्मचाऱ्यांच्या चोरलेल्या फायली आणून देतात आणि यामुळे गोरे लिहिण्यास प्रेरित होईल, असा विचार ते करतात.
शेवटी दिपू लेखन नाकारण्यापेक्षा तो तुरुंगात जाणे स्वीकारण्याचा निश्चय करतो. दिपूच्या मनाची स्थिती संपूर्ण नाटकात संवाद आणि कृतीची सतत पुनरावृत्ती करून दाखवली जाते. एक वर्तुळाकार ‘व्हर्लपूल’ प्रभाव सूचित करते. दिपूला राजकीय दबावाव्यतिरिक्त, मित्र आणि प्रशंसकांच्या दबावाचाही सामना करावा लागतो. संपूर्ण नाटकत दिपूची अवस्था अस्वस्थ करून सोडते. नकळतपणे त्याच्याविषयी एक सहानुभूती प्रकट होते. दिपूच्या जगण्याचे प्रयोजन, प्रस्थापित व्यवस्थेचा दबाव, नात्यांमधला पोकळपणा, त्यातून जाणवलेली जगण्यातली निरर्थकता हे सारे अस्वस्थ करून सोडणार आहे. आताच्या भौतिकवादी जगात आणि जाचक राजसत्तेत बुद्धिजीवी माणसाची कशी कोंडी होते, याचं हे एक विदारक चित्रण आहे. (Drama Competition 2024)
दिपूची प्रमुख व्यक्तिरेखा डॉ. आशुतोष देशपांडे यांनी अप्रतिम सादर केली आहे. मूळचे दंत चिकित्सक असणाऱ्या देशपांडे यांनी दिपूची भूमिका तितक्याच चिकित्सकतेने साकारली आहे. मनाचा होणारा कोंडमारा त्यांनी अस्वस्थेने व्यक्त केला आहे. याकरिता शारीर हालचालीचा योग्य वापर केला. सतत वाटणारी भीती व्यक्त करताना शरीर आक्रसून घेत, छातीपर्यंत हात नेत, त्याला थरथरत्या आवाजाची साथ देऊन ती भीती अधिक गडद केली. संवादातील आशय समजून घेत स्वच्छ आणि स्पष्ट उच्चाराने त्यातील नेमकेपणा आधोरेखित केला आहे.
स्वरूपा फडके यांनी लता या व्यक्तिरेखेला चांगला न्याय दिला. आपल्या अभिनयातून त्यांनी साकारलेल्या भूमिकेची समज स्पष्ट दाखवून दिली. भूमिकेला अपेक्षित असलेला ‘बोल्डनेस’ही अत्यंत संयमाने व्यक्त केला. एक सुरेख समतोल त्यांनी अभिनयात साधला होता. सई जाधवने मार्गारेट आपल्या परीने समजून घेत साकारण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. तिच्या अभिनयात कमालीचा आत्मविश्वास जाणवत होता. इतर कलाकारांनी आपल्या भूमिका योग्य रितीने साकारल्या.
संजय हळदीकर या ज्येष्ठ रंगकर्मींनी या नाटकाचे नेपथ्य रचले. नाटकाचा आशय नेपथ्यरचनेतून परिणामकारकतेने अधोरेखित करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. दिपूचा कोंडमारा गज असलेल्या खिडक्यातून स्पष्ट केला गेला. प्रकाशयोजनेत सफाईदारपणा होता. जाणीवपूर्वक निर्माण केलेला अंधारही नाटकाचा आशय गडद करतो. रविदर्शन कुलकर्णी यांनी आपल्या दिग्दर्शनातून अपेक्षित परिणाम नेमकेपणाने साधला. ॲब्सर्ड नाटकाची जातकुळी लक्षात घेऊन दिग्दर्शकाने आपल्या दिग्दर्शनाची शैली निश्चित केली असल्याने नाटकाने कलात्मक उंची सहजपणे गाठली. एकूणच प्रेक्षकाना नाटकाने अस्वस्थ केलेच. पण त्याच खूप चांगल्या ॲब्सर्ड नाटकाची अनुभूती या निमित्ताने त्यांना मिळाली. (Drama Competition 2024)
श्रेयनामावली
नाटक – कोंडमारा
लेखक – अरुण नाईक
दिग्दर्शक – रविदर्शन कुलकर्णी
नेपथ्य – संजय हळदीकर
प्रकाशयोजना – आमोद पटवर्धन
संगीत – विपुल देशमुख, श्रीपाद पाटील
वेशभूषा – डॉ. मीना ताशीलदार
रंगभूषा – सई जाधव, कल्याणी फडणीस, सदा सूर्यवंशी
नृत्य – कल्याणी फडणीस
भूमिका व कलावंत
दि.पू.गोरे – डॉ. आशुतोष देशपांडे
एकनाथ – प्रथमेश गुरव
सुजाता – डॉ. मीना ताशीलदार
सिद्धार्थ १ – आशिष जाधव
सिद्धार्थ २ – विष्णू महाजन
लता – स्वरूपा फडके
भरत – ओमकार साळोखे
इसम १ – अथर्व मंगल
इसम २ – राजेश शिंदे
मार्गारेट – सई जाधव
हेही वाचा :
- कास, महाबळेश्वर, पाचगणीला ‘मे तेरी रानी, तू मेरा…’
- ‘एक राष्ट्र, एक निवडणूक,’ चालू अधिवेशानातच
- बीडचा बिहार झाल्याची विरोधकांची टीका