Home » Blog » मंत्रीमंडळात सातारा जिल्ह्याचा दबदबा

मंत्रीमंडळात सातारा जिल्ह्याचा दबदबा

राज्यात सर्वाधिक मंत्रीपदे; जिल्ह्याच्या अपेक्षा वाढल्या

by प्रतिनिधी
0 comments
Maharashtra Cabinet Expansion

सातारा,प्रशांत जाधव : मुख्यमंत्री  फडणवीस यांच्या मंत्रीमंडळाचा आज (दि.१५ ) विस्तार झाला. सत्तेतील ३९ आमदारांपैकी ३३ आमदारांनी कॅबिनेट तर ६ आमदारांनी राज्यमंत्री म्हणून राज्यपालांकडून शपथ घेतली. राज्यातील सामाजिक व भौगोलीक समतोल राखत नव्या चेहर्‍यांना संधी देण्याच्या धोरणात सातारा जिल्ह्याला तब्बल पाच मंत्रिपदे मिळाली आहेत. सातारा जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एकनाथ शिंदे,   शंभूराज देसाई,  छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले,  जयकुमार भगवान गोरे,  मकरंद पाटील यांच्या रूपाने पाच मंत्रीपदे मिळाल्याने जिल्ह्याचा राज्याच्या मंत्रीमंडळात दबदबा दिसून आला आहे. परिणामी पाचही मंत्र्याकडून जिल्ह्यातील नागरिकांच्या आता अपेक्षा वाढलेल्या आहेत. (Maharashtra Cabinet Expansion)

राज्याच्या राजकारणात पश्‍चिम महाराष्ट्राचा विचार केला तर नेहमीच सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे या जिल्ह्यांचा वरचष्मा दिसून आला आहे. त्यातही सांगली जिल्ह्यात एकाचवेळी जास्त मंत्री असल्याचे अनेकदा दिसून आले होते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात याच सांगली जिल्ह्याला एकही मंत्रीपद मिळाले नाही. त्याउलट कायम एखाद्या मंत्रीपदावर समाधान मानावे लागलेल्या सातारा जिल्ह्याने यावेळी मोठी बाजी मारली आहे. राज्याचे विद्यामान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जरी ठाण्यातून निवडून आले असले तरी मुळचे सातार्‍याचे आहेत. त्यांच्यासह विद्यमान मंत्री  शंभूराज देसाई, सातारा मतदार संघाचे आमदार छत्रपती आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, माणचे आमदार जयकुमार गोरे, वाईचे आमदार मकरंद पाटील असे एकूण पाच मंत्री सातारा जिल्ह्याला मिळाले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात मंत्री जिल्ह्याला मिळाल्याने जिल्ह्यातील पायाभूत सुविधांसह मोठमोठ्या प्रकल्पांच्या पुर्ततेसाठी जिल्ह्यातील नागरिकांच्या त्यांच्याकडून अपेक्षा राहणार आहेत.

शंभूराज देसाई

शंभूराज देसाई हे पाटण मतदार संघाचे चौथ्यांदा आमदार असून लोकनेते स्व. बाळासाहेब देसाई यांचे नातू आहेत. माजी मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांचे अतंत्य जवळचे म्हणून राज्याला त्यांची ओळख आहे. त्यांनी महाविकास आघाडीच्या काळात गृहराज्य मंत्री म्हणून तर एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळात उत्पादन शुल्क विभागाचे कॅबिनेट मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम केले आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना सहकार परिषदेचे अध्यक्षपद देवून राज्याच्या राजकारणात सक्रिय केले होते. (Maharashtra Cabinet Expansion)

छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले

शिवेंद्रसिंहराजे भोसले हे माजी मंत्री स्व.छत्रपती अभयसिंहराजे भोसले यांचे सुपूत्र असून ते सातारा विधानसभा मतदार संघातून सलग पाचव्यांदा निवडून आले आहेत. त्यांचे सातारा जिल्ह्यातील अनेक तालुक्यात वर्चस्व असून सातारा जिल्हा बँकेत त्यांनी अध्यक्षपद भूषविले आहे. २००४ ते २०१४ ते राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडून आले तर २०१९ साली त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला होता.

जयकुमार गोरे

जयकुमार गोरे हे माण मतदार संघातून सलग चौथ्यांदा निवडून आले असून पवार विरोधक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. जयकुमार गोरे हे २००९ साली अपक्ष, २०१४ साली काँग्रेसमधून निवडून आले होते. त्यानंतर २०१९ साली भाजपात प्रवेश करून त्यांनी निवडणुकांमध्ये विजय मिळवला. एक सर्वसामान्य तरूण आणि पाणी प्रश्‍नासाठी धडपडणारा आमदार म्हणून त्यांना देवेंद्र फडणवीस यांचे नेहमीच पाठबळ राहीले आहे. जयकुमार गोरे यांचा सातारा जिल्ह्यातील कराड उत्तर,कोरेगाव,माण,फलटण या मतदारसंघासह माढा लोकसभा मतदार संघातही प्रभाव असून त्यांनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष म्हणून उल्लेखनीय काम केले आहे. (Maharashtra Cabinet Expansion)

मकरंद पाटील

मकरंद पाटील हे स्वर्गीय  खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे सुपूत्र असून ते वाई मतदार संघातून सलग चौथ्यांदा निवडून आले आहेत. २००९ साली ते अपक्ष म्हणून निवडून आले व त्यानंतर ते राष्ट्रवादी काँगे्रसकडून निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर त्यांनी  अजित पवार यांची पाठराखण करण्याचा निर्णय घेतला. लोकसभा निवडणुकीत त्यांनी श्री.छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांचे काम केले होते. त्यांनतर त्यांचे बंधू नितीन पाटील यांना राज्यसभेवर घेण्यात आले होते. सातारा जिल्हा बँकेतही पाटील यांचे वर्चस्व आहे.

हेही वाचा :

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00