- महाराष्ट्र दिनमानमार्फत राज्यभरातील पत्रकारांकडून मंत्र्यांचे मूल्यमापन
- फडणवीसांच्या मंत्रिमंडळाची एकूण कामगिरी निराशाजनक
- चंद्रकांतदादा, मुश्रीफ, भरणे, पंकजा मुंडे काठावर उत्तीर्ण
- मंत्रिमंडळातील १९ कॅबिनेट मंत्री नापास
- राठोड, शिरसाट, गोगावले, उईके, जयकुमार गोरे सर्वात सुमार
- सहाही राज्यमंत्र्यांची कामगिरी खराब
महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी १५ डिसेंबर २०२४ रोजी नागपूरमध्ये झाला. मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या कारकीर्दीला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या वर्षभरातील कामकाजाचे मूल्यमापन राज्यातील पत्रकारांमार्फत करून घेण्यात आले. त्यामध्ये बहुसंख्य मंत्र्यांची कामगिरी निराशाजनक असल्याचा निष्कर्ष समोर आला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार आणि उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत या तीन मंत्र्यांचे कामकाज सर्वाधिक चांगले असल्याचे पत्रकारांचे मत आहे. (Maharashtra ministry report card)
राज्यातील पत्रकारांकडून मूल्यमापन
महाराष्ट्र दिनमान या वेब पोर्टल आणि यू ट्यूब चॅनलच्यावतीने संपादक विजय चोरमारे यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या कामकाजासंदर्भातील हा सर्व्हे करण्यात आला. राज्यभरातील पन्नास पत्रकारांच्याकडून माहिती संकलित करण्यात आली. त्यामध्ये काही प्रमुख वृत्तपत्रांचे विद्यमान तसेच ज्येष्ठ संपादक, मंत्रालयात काम करणारे राजकीय पत्रकार, विविध शहरांमध्ये फिल्डवर काम करणारे वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी, राजकीय सामाजिक भान असलेले विविध थरांतले नवे-जुने पत्रकार यांचा समावेश होता. राज्याच्या सर्व विभागातील पत्रकारांचा यामध्ये समावेश होता. विविध पातळ्यांवर काम करणा-या पत्रकारांनी आपापल्या दृष्टिकोनातून केलेले हे मूल्यमापन असल्यामुळे त्याची तटस्थता राखली गेली आहे. (Maharashtra ministry report card)
सहा मुद्द्यांवर सर्व्हेक्षण (Maharashtra ministry report card)
१)मुख्यमंत्र्यांनी आखून दिलेल्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमानुसार वर्षभरातील कामगिरी, २) मंत्र्यांनी स्वजिल्ह्याबाहेर जाऊन राज्यपातळीवर केलेले काम, ३)मंत्र्यांवरील आरोप, त्यांच्या खात्यातील अनागोंदी आणि सार्वजनिक जीवनातील त्यांचा व्यवहार, ४) सर्वसामान्य नागरिकांसाठीची मंत्र्यांची उपलब्धता, ५) मंत्री आणि त्यांच्या खात्याची प्रतिमा आणि ६) मंत्री आणि जबाबदार नेते म्हणून कामगिरी अशा सहा मुद्द्यांच्या अनुषंगाने मंत्र्यांच्या कामकाजाचे मूल्यमापन करण्यात आले. (Maharashtra ministry report card)
बावनकुळे, शेलार आणि सामंत यांच्यासह उत्तम कामगिरी असलेल्या पहिल्या पाच मंत्र्यांमध्ये महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आणि सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचा समावेश आहे. चंद्रशेखर बावनकुळे (४७ टक्के), आशिष शेलार (४५), उदय सामंत (४२.८), आदिती तटकरे (४१.१) आणि प्रकाश आबिटकर (३७.५) असे गुण मिळाले आहेत.
आठ मंत्री जेमतेम उत्तीर्ण

याव्यतिरिक्त ३५ टक्क्यांपर्यंत म्हणजे जेमतेम उत्तीर्ण होणा-यांमध्ये आणखी फक्त आठ मंत्र्यांचा समावेश आहे. त्यात गुणानुक्रमे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील (३७.३ टक्के), परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे (प्रत्येकी ३७ टक्के), पशुसंवर्धन व पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले (प्रत्येकी ३६), वनमंत्री गणेश नाईक (३५.६), वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ (३५.३) आणि कौशल्यविकास मंत्री मंगलप्रभात लोढा (३५.१) यांचा समावेश आहे. मिळालेल्या गुणांनुसार बोलायचे तर उरलेले १९ मंत्री उत्तीर्णही होऊ शकलेले नाहीत, म्हणजे त्यांना किमान ३५ टक्के गुण मिळू शकलेले नाहीत.

जलसंधारणमंत्री संजय राठोड, रोजगार हमी मंत्री भरत गोगावले, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची कामगिरी सर्वाधिक खराब असल्याचा निष्कर्ष आला आहे.
राज्यमंत्र्यांची सुमार कामगिरी
मंत्रिमंडळात सहा राज्यमंत्री असून त्या सहाही मंत्र्यांची कामगिरी समाधानकारक नसल्याचे पाहणीत आढळून आले आहे. कॅबिनेट मंत्र्यांपेक्षा किमान सर्वसामान्यांसाठीची राज्यमंत्र्यांची उपलब्धता अधिक सहज असायला पाहिजे. परंतु सहाही राज्यमंत्र्यांच्या उपलब्धतेबाबतही फारसे समाधानकारक चित्र नाही. (Maharashtra ministry report card)
राज्यमंत्र्यांची कामगिरी निराशाजनक असून एकाही राज्यमंत्र्याला किमान ३५ टक्के गुण मिळू शकलेले नाहीत. राज्यमंत्र्यांमध्ये सर्वाधिक सरस कामगिरी इंद्रनील नाईक यांची असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर अनुक्रमे पंकज भोयर, योगेश कदम, मेघना बोर्डीकर, आशिष जयस्वाल आणि माधुरी मिसाळ यांचा क्रम आहे.

तिघा नेत्यांमध्ये फडणवीस सरस
मंत्रिमंडळाबरोबरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्याही कामगिरीचे मूल्यमापन करून घेण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (४७.५ टक्के) यांची कामगिरी सरस असल्याचा निष्कर्ष आला आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे (४६ टक्के) आणि अजित पवार (४४.६) असा क्रम आहे. देवेंद्र फडणवीस यांची एकूण कामगिरी तुलनेने सरस असली तरी सर्वसामान्यांसाठीची उपलब्धता तसेच खात्यावरील आरोप, खात्यातील अनागोंदी आणि सार्वजनिक जीवनातील त्यांचा व्यवहार याबाबत असमाधान व्यक्त करण्यात आले आहे.

सर्वसामान्यांसाठी असलेल्या उपलब्धतेबाबत एकुणात एकनाथ शिंदे सगळ्यात पुढे असून त्यांच्यापाठोपाठ अजित पवार यांचा क्रमांक आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मंत्रिपदावरील एकूण कामकाजाबाबत असमाधान असले तरी सर्वसामान्यांसाठीच्या उपलब्धतेबाबत मात्र ते पुढे असल्याचे मत व्यक्त झाले आहे. त्यासंबंधीच्या गुणांमुळे त्यांचा उत्तीर्णाच्या यादीत समावेश होऊ शकला आहे. (Maharashtra ministry report card)
छगन भुजबळ, राधाकृष्ण विखे-पाटील, गिरीश महाजन, शंभुराज देसाई या ज्येष्ठ मंत्र्यांची कामगिरी फारशी समाधानकारक नसल्याचे पाहणीत आढळून आले आहे.