Home » Blog » Dinman Sahitya Utsav: सांस्कृतिक धारणांमध्ये हस्तक्षेप करण्याची लेखकाची जबाबदारी : पठारे

Dinman Sahitya Utsav: सांस्कृतिक धारणांमध्ये हस्तक्षेप करण्याची लेखकाची जबाबदारी : पठारे

by प्रतिनिधी
0 comments
Dinman Sahitya Utsav

कोल्हापूर : प्रतिनिधी : ‘‘ सांस्कृतिक धारणांमध्ये मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप करणे लेखकाचे काम आणि जबाबदारी आहे. लेखक त्यांच्या वर्तमानाशी जोडला गेला असेल तर तो कायम अस्वस्थ असतो, या अस्वस्थतेतून उत्तम दर्जाचे साहित्य निर्माण होत असते,’’ असे मत ज्येष्ठ साहित्यिक आणि अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष रंगनाथ पठारे यांनी येथे व्यक्त केले. (Dinman Sahitya Utsav)
कोल्हापुरात २४ आणि २५ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र दिनमान आयोजित‘दिनमान साहित्य उत्सव’ पार पडला. या उत्सवात दोन दिवस साहित्यविषयक भरगच्च कार्यक्रम पार पडले. २५ ऑगस्ट रोजी प्रख्यात हिंदी कवयित्री गगन गिल यांच्याहस्ते आणि रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली उत्सवाचे उदघाटन झाले. त्यावेळी पठारे बोलत होते.
ज्येष्ठ साहित्यिक आणि कवी रामदास फुटाणे, हिंदी कवी आणि गीतकार डॉ. बाेधिसत्त्व, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजग गवस यावेळी प्रमुख उपस्थित होते.
महाराष्ट्र दिनमानचा हा साहित्य उत्सव जीवन उन्नत करणारा असल्याचे गौरवोद्गार काढून पठारे म्हणाले, ‘‘सामाजिक मूल्यव्यवस्था जगभर धोक्यात आली आहे. माणूस म्हणून एकमेकांचा सन्मान करावा, असे कुणाला वाटत नाही. कुटुंबव्यवस्थेतही एकाकीपणा वाढला आहे. एक प्रकारची नैराश्यग्रस्तता आली आहे. अशा परिस्थितीत मानवीपण संपत जाण्यातील क्रौर्य मनाला भिडत नाही तोपर्यंत चांगले साहित्य निर्माण होऊ शकत नाही. सजग लेखक-साहित्यिकाची अशावेळी कसोटी लागते.’’(Dinman Sahitya Utsav)

बुद्धिभ्रष्टतेवर लेखकच लस शोधू शकेल : डॉ. राजन गवस
आज संपूर्ण सामाजिक वास्तव बुद्धिभ्रष्टतेने ग्रासल्याचे दिसते, असे निरीक्षण नोंदवून ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस यांनी या भयंकर परिस्थितीत लेखक-साहित्यिकांची जबाबदारी अधोरेखित केली. बुद्धिभ्रष्ट समाजातील नव्या पिढीचे काय होणार, हा महत्त्वाचा प्रश्न आता आपल्यापुढे उभा आहे. बुद्धिभ्रष्टतेच्या रोगावर लस शोधायची असेल तर ती लिहिणरेच शोधू शकतात, असे ते म्हणाले.
‘‘एकेकाळी खूप गंभीर आणि टोकदार समजले जाणारे वापरून वापरून पार गुळगुळीत झाले आहेत. त्या शब्दांमागचे गांभीर्यच हरवलेले आहे. अशा परिस्थितीत लेखकाची जबाबदारी वाढली आहे. नवे धारदार शब्द निर्माण करतो तोच श्रेष्ठ साहित्यिक ठरतो, ’’ असे डॉ. गवस म्हणाले.
‘महाराष्ट्र दिनमान’चे संपादक डॉ. विजय चोरमारे यांनी साहित्य उत्सवामागची भूमिका स्पष्ट केली. (Dinman Sahitya Utsav)
श्रीमती गगन गिल यांचे स्वागत विजिगीषा मीडियाचे संचालक अजिंक्य चोरमारे, डॉ. विनोद कांबळे, डॉ. कुमार कांबळे आणि राहुल मगदूम यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
सूत्रसंचालन डॉ. आलोक जत्राटकर यांनी, तर आभार अजिंक्य चोरमारे यांनी मानले.

‘पुस्तकाच्या अंतरंगात’ या सत्रात ‘मणिपूर समजून घेताना’ या पुस्तकाचे लेखक शाहू पाटोळे आणि ‘महामुद्रा’ या पुस्तकाचे लेखक धनंजय बिजले यांच्याशी संवाद साधताना डॉ. अलोक जत्राटकर.

मुलाखतीची लिंक :

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00