मुंबई : विशेष प्रतिनिधी : राज्याचे माजी अपर मुख्य सचिव दिनेश वाघमारे यांनी राज्य निवडणूक आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी त्यांचे स्वागत केले. गेल्या ४ महिन्यांपासून हे पद रिक्त होते.(dinesh waghmare)
वाघमारे यांची पाच वर्षांसाठी राज्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. त्यासंदर्भातील अधिसूचना २० जानेवारीला प्रसिद्ध झाली होती. त्यानुसार त्यांनी आज राज्याचे सातवे राज्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. यू. पी. एस. मदान यांचा कार्यकाळ गेल्यावर्षी ४ सप्टेंबरला संपल्यापासून हे पद रिक्त होते.(dinesh waghmare)
वाघमारे यांनी इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकीमध्ये बीटेक् केले आहे. आयआयटी खरगपूरमधून त्यांनी संगणकशास्रात एमटेक तर यूकेमधून ‘विकास व प्रकल्प नियोजन’ या विषयात एमएस्सी केले आहे. १९९४ च्या तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी असलेल्या वाघमारे यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली आहे.
रत्नागिरीचे सहायक जिल्हाधिकारी म्हणून त्यांच्या कारकीर्दीला सुरुवात झाली होती. वाशीम आणि यवतमाळ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर त्यांनी बुलढाण्याचे जिल्हाधिकारीपद भूषविले होते. ते नागपूर सुधार प्रन्यासचे अध्यक्षही होते. विविध शासकीय महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, सदस्य सचिव; तसेच नवी मुंबई व पिंपरी- चिंचवड महानरपालिकेचे आयुक्त म्हणूनही ते कार्यरत होते. अमरावतीचे विभागीय आयुक्त म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. वैद्यकीय शिक्षण विभागासह सामाजिक न्याय, ऊर्जा, गृह इत्यादी विभागांतही त्यांनी विविध पदे भूषविली आहेत.
हेही वाचा :
मुंबईत पेट्रोल, डिझेल वाहनांवर बंदी!
‘इस्रो’ शतक मारण्याच्या तयारीत