कोलंबो : श्रीलंकेचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार दिमुथ करुणरत्नेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ३६ वर्षीय करुणरत्ने या आठवड्यामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कारकिर्दीतील शंभरावी कसोटी खेळणार आहे. या कसोटीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांतून निवृत्त होणार असल्याचे करुणरत्नेने मंगळवारी जाहीर केले. (Dimuth Karunaratne)
करुणरत्नेने जुलै, २०११ मध्ये वन-डे, तर नोव्हेंबर २०१२ मध्ये कसोटी पदार्पण केले होते. प्रामुख्याने सलामीला फलंदाजी करणाऱ्या डावखुऱ्या करुणरत्नेने आतापर्यंत ९९ कसोटी सामन्यांत ३९.४० च्या सरासरीने ७,१७२ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर १६ शतके व ३९ अर्धशतके जमा आहेत. याशिवाय, त्याने ५० वन-डे सामन्यांत १ शतक व ११ अर्धशतकांसह १,३१६ धावा केल्या आहेत. मागील दशकभरामध्ये त्याने आंतरराष्ट्रीय कसोटीमध्ये सलामीवीर म्हणून ६,२२६ धावा फटकावल्या असून या कालावधीत तो सर्वाधिक धावा करणारा सलामीवीर आहे. २०१५ पासून सलामीवीर म्हणून सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजांमध्येही तो ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरसह संयुक्तरीत्या अग्रस्थानी आहे. या दोघांच्याही नावावर या कालावधीत प्रत्येकी १५ शतके आहेत. त्याने तीन वर्षी आयसीसीच्या कसोटी संघामध्ये स्थान पटकावले आहे. (Dimuth Karunaratne)
मागील सहा महिन्यात मात्र करुणरत्नेला लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. या काळात खेळलेल्या सहा कसोटींमध्ये त्याला केवळ एक अर्धशतक झळकावता आले आहे. मागील आठवड्यामध्ये मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेल्या कसोटीमध्ये त्याला दोन्ही डावांत अनुक्रमे ७ व ० धावाच करता आल्या होत्या. ‘जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला (वर्ल्ड चॅम्पियनशीप) सुरुवात झाल्यापासून श्रीलंका संघाच्या दुरंगी कसोटी मालिका खूप कमी झाल्या आहेत. एका कसोटीपटूस वर्षातून केवळ ४ सामने खेळण्यासाठी प्रेरित राहणे आणि फॉर्म टिकवणे कठीण आहे. सध्याच्या मालिकेमध्ये मी शंभर कसोटींचा टप्पा पूर्ण करत असल्याने निवृत्तीची हीच वेळ योग्य वाटते,’ असे करुणरत्ने म्हणाला. (Dimuth Karunaratne)
“आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मी जे काही करू शकलो, त्याबद्दल मी समाधानी आहे. १०० कसोटी आणि १०,००० धावा हे कोणत्याही कसोटी फलंदाजाचे स्वप्न असते. मी यांपैकी एक साध्य करू शकलो, याला मी यश समजतो,” असे करुणरत्नेने नमूद केले. श्रीलंका ऑस्ट्रेलिया मालिकेतील दुसरी कसोटी ६ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून श्रीलंकेकडून १०० कसोटी सामने खेळणारा तो सातवा खेळाडू ठरणार आहे. (Dimuth Karunaratne)
हेही वाचा :