मुंबई : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर गेले तीन महिने सुरू असलेल्या गदारोळानंतर अखेर मुख्यमंत्र्यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला. मुंडे गेले, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अब्रू धुळीला मिळवून गेले. (Dhananjay Munde Resignation)
संतोष देशमुख यांच्या हत्येची छायाचित्रे सोमवारी प्रसिद्ध झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाचा आगडोंब उसळला. त्याची परिणती मुंडे यांच्या राजीनाम्यामध्ये झाली. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आणि तो मी स्वीकारला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सकाळी जाहीर केले.(Dhananjay Munde Resignation)
वैद्यकीय कारणास्तव राजीनामा : मुंडे
दरम्यान धनंजय मुंडे यांनी याप्रश्नी एक ट्विट केले. त्यात म्हटले आहे की, बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सद्सदविवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मा. मुख्यमंत्र्यांकडे दिला आहे.
मुंडे यांना संरक्षणाचा प्रयत्न
संतोष देशमुख यांची हत्या नऊ डिसेंबर २०२४ रोजी झाली होती. अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याचे समोर आले होते. धनंजय मुंडे यांचा उजवा हात म्हणून ओळखला जाणारा वाल्मिक कराड हा या हत्येचा सूत्रधार असल्याचे सुरुवातीपासून स्पष्ट होते. त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले नाही, अखेर तो स्वतः पोलिसांत हजर झाला. याप्रकरणी धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांच्याकडून करण्यात येत होती. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार त्याबाबत चालढकल करीत होते.(Dhananjay Munde Resignation)
धनंजय मुंडे दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले जात होते. एका टप्प्यावर तर मुंडे यांच्या राजीनाम्याचा निर्णय त्यांनी स्वतः घ्यावा, असे अजित पवार म्हणाले होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सलग तीन महिने धनंजय मुंडे यांना संरक्षण देण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत होते. संतोष देशमुख यांच्या हत्येचे महाराष्ट्र हादरवणारे फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांचा राजीनामा झाला. (Dhananjay Munde Resignation)
नैतिकतेला धरून राजीनामा : भुजबळ
राजीनाम्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ म्हणाले, मुंडे यांनी राजीनामा दिला आहे, हे मी मीडियावर पाहिलं. यासंदर्भात पक्षाची भूमिका पक्षाचे अध्यक्ष लवकरच जाहीर करतील. कुठल्याही बेकायदेशीर कृत्यांना आम्ही पाठिशी घालणार नाही, मुंडे यांनी नैतिकतेला धरून राजीनामा दिला आहे. (Dhananjay Munde Resignation)
मुंडे यांना सहआरोपी करा : आदित्य
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे म्हणाले, धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारला असला तरी तेवढे पुरेसे नाही. हे सरकार बरखास्त झाले पाहिजे. धनंजय मुंडे यांना सहआरोपी कराराज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. संतोष देशमुख प्रकरणी डिसेंबरपासून हा विषय सुरू आहे. पारदर्शक चौकशीसाठी मुंडे यांची राजीनामा देण्याची मागणी आमच्यासह भाजपचे आमदार करीत होते. मुख्यमंत्र्यांचे हात का बांधले गेले होते, ते मैत्रीच्या नात्याने बांधले होते का, असा प्रश्न पडतो.
मी बोललो तीच वस्तुस्थिती : धस
भाजपचे आमदार सुरेश धस म्हणाले, काल भयानक फोटो पुढे आले आहेत. महाराष्ट्राने कधीही अशी हत्या पाहिली नसेल. अजूनही विचार करू शकत नाही की त्या कुटुंबावर काय प्रसंग ओढवला असेल. हा विषय मस्साजोग गाव, देशमुख कुटुंबीय, केज तालुका बीड जिल्ह्यापुरता मर्यादित नव्हता. महाराष्ट्राच्या मनाला त्यामुळे ठेच पोहोचली होती. विधिमंडळात १६ डिसेंबरच्या भाषणात याचं वर्णन केलं होतं. त्यावेळी मी अति बोलतोय असं काही लोक म्हणत होते. परंतु तीच वस्तुस्थिती असल्याचे फोटोवरून स्पष्ट होत आहे.
धनंजय मुंडे यांच्या सातपुडा बंगल्यावर जी बैठक झाली त्या बैठकीची एसआयटीने चौकशी करावी, अशी मागणीही धस यांनी केली. (Dhananjay Munde Resignation)
राजीनाम्याला विलंब नाही : महाजन
पाटबंधारे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याला कोणताही विलंब झालेला नाही. चौकशीत प्रथमदर्शनी काही बाबी समोर आल्यानंतर राजीनामा घेतला आहे.
हेही वाचा :
दोन महिन्यांपूर्वी फोटो येऊनही फडणवीसांना झोप कशी लागली?