Home » Blog » मुंडेंच्या राजीनाम्याने सरकारवरील रक्ताचे डाग धुऊन निघणार नाहीत…

मुंडेंच्या राजीनाम्याने सरकारवरील रक्ताचे डाग धुऊन निघणार नाहीत…

0 comments
Dhananjay Mude

अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा अखेर राजीनामा झालेला आहे. प्रश्न असा उरतो की, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे सरकारच्या चारित्र्यावरचे संतोष देशमुख यांच्या रक्ताचे डाग धुऊन निघणार आहेत का? (Dhananjay Munde)

नऊ डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या झाली. त्या नंतर महाराष्ट्रभर प्रचंड प्रमाणात असंतोष व्यक्त होत आहे. ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या झाली, ज्या क्रूरतेने संतोष देशमुख यांना मारण्यात आले त्याचे वर्णन सुरुवातीपासून अनेक माध्यमातून लोकांच्या समोर येत होते. त्यावेळी आपल्याला आठवत असेल की सुरूवातीच्या काळात धनंजय मुंडे यांना या संदर्भात विचारलेले होते.(Dhananjay Munde)

खंडणीप्रकरणी संतोष देशमुखांचे अपहरण, संतोष देशमुखांची, कामगारांची हत्या आणि त्यानंतर बीडचा बिहार झाला आहे की काय अशी चर्चा होती. असा प्रश्न उपस्थित केला जात होता. त्यावर धनंजय मुंडे म्हणले होते की, खून सगळ्या जिल्ह्यात होत असतात. गुन्हेगारी सगळीकडे घडत असते. मग प्रत्येक जिल्ह्याला तुम्ही बिहार झाला असं म्हणता का? मग बीडचा बिहार झाला असं म्हणून तुम्ही बीडची बदनामी का करता? धनंजय मुंडे यांना सगळे माहीत होते. धनंजय मुंडे यांच्या आश्रयाखाली, धनंजय मुंडे यांच्या संरक्षणाखाली गेली काही वर्षे, म्हणजे २०१९ पासून बीड जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीचे वर्चस्व आहे.

वाल्मिक कराड नावाचा क्रूरकर्मा संपूर्ण जिल्ह्यातली सूत्रे हलवतो. जिल्ह्याचे प्रशासनवालेही कराडच्या इशाऱ्यावर चालत होते. जिल्ह्याची पोलीस यंत्रणा वाल्मिक कराडच्या इशाऱ्यावर चालत होती आणि जिल्ह्यातले सगळे उद्योजक सुद्धा कराडच्या शब्दाबाहेर नव्हते. अत्यंत क्रूरपणे, हुकूमशाही पद्धतीने बीड जिल्ह्यातला विशेषतः परळी आणि परिसरातला सगळा कारभार चाललेला होता. या सगळ्याला धनंजय मुंडे यांचे संरक्षण होते हे लपून राहिलेले नाही. पंकजा मुंडे यांनी, ‘ज्यांच्या शिवाय धनंजय मुंडे यांचे पानही हलत नाही असे वाल्मिक कराड,’ असे जाहीर सभेत केलेले एक वक्तव्य आपल्याला माहिती आहे. एकूणच धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे दोन नाहीत. ते एकच आहेत. वाल्मिक कराडच्या प्रत्येक कृत्यांत धनंजय मुंडे यांचा सहभाग आहे असे म्हटले जाते.(Dhananjay Munde)

फडणवीस, अजित पवारांचे लज्जास्पद वर्तन

मुंडे, कराड दोघेजण बिझनेस पार्टनर आहेत. त्यामुळे जे वाल्मिक कराडने केले त्याला तितकेच धनंजय मुंडे जबाबदार आहेत. कारण वाल्मिक कराड हा स्वतःच्या बळावर काही करू शकत नाही. त्याला सत्तेचे संरक्षण असल्याशिवाय, धनंजय मुंडे यांचा पाठिंबा असल्याशिवाय काही होऊ शकत नाही. असे असतानाही, म्हणजे सगळ्याच गोष्टी धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराडच्या संबंधाच्या गोष्टी, संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणातले लोक त्यांचे वाल्मिक कराडशी असलेले कनेक्शन आणि धनंजय मुंडे यांच्याशी असलेले कनेक्शन. या सगळ्या गोष्टी वारंवार समोर येऊनसुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातत्याने धनंजय मुंडे यांना संरक्षण देण्याची भूमिका घेतली. म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेला लाज वाटावी असे सगळे वर्तन देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी केलेले आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला किती संरक्षण द्यावं याच्या काही मर्यादा असतात.(Dhananjay Munde)

मुंडेंची तीन महिने पाठराखण

तीन महिने फडणवीस आणि अजित पवार, धनंजय मुंडे यांची पाठराखण करत राहिले. त्यांचा बचाव करत राहिले. ते दोषी आढळले तर त्यांना सोडणार नाही. मग आज ते (मंगळवार, ४ मार्च) काही दोषी आढळले का? राजीनामा घेतला म्हणजे राजीनामा का, कुठल्या गोष्टी नंतर घेतला? संतोष देशमुख यांच्या हत्येची छायाचित्रे सोमवारी माध्यमांमधून प्रसिद्ध झाली. अंगाचा थरकाप उडवणारी आणि लाहीलाही करणारी आणि एकूण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी अशी ही छायाचित्रे समोर आली. आणि त्यानंतर सुद्धा एक रात्र गेली. दुसरा दिवस, सकाळ उजाडली आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांचा राजीनामा आला आहे. खरेतर ज्यावेळी ही छायाचित्रे प्रसिद्ध झाली त्यानंतर काही मिनिटांत राजीनामा व्हायला पाहिजे होता. धनंजय मुंडे यांची हकालपट्टी करायला पाहिजे मंत्रिमंडळातून, पण त्या नंतरही एक रात्र आणि दहा-बारा-पंधरा तास सरकारने घेतले आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला. मुंडे निर्लज्जपणे काय म्हणतात…? तर मी प्रकृतीच्या कारणास्तव… मला थोडं काम करणं अवघड आहे. त्यामुळे मी राजीनामा दिला आहे. म्हणजे निर्लज्जपणाचा कळस म्हणता येईल असे हे सगळ वर्तन आहे.

फोटो प्रसिद्ध झाले नसते तर…

म्हणजे अखेर हे फोटो प्रसिद्ध झाले. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार त्यानंतर त्या राजीनाम्यासाठी तयार झाले. हे फोटो प्रसिद्ध झाले नसते तर या राजीनाम्याचा प्रश्नच नव्हता. म्हणजे नऊ डिसेंबर २०२४ ला अत्यंत क्रूरपणे संतोष देशमुखांची हत्या करण्यात आली. त्यातलाच वाल्मिक कराड यांचा सहभाग सुरवातीपासूनच स्पष्ट होत होता. विरोधक त्याबाबत मागणी करत होते. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते. मुंडे दोषी असल्याचे आढळून आल्यानंतर कारवाई करण्यात येईल, अशी सारवासारव फडणवीस आणि अजित पवार करत होते. एका टप्प्यावर तर मुंडे यांचा राजीनामा त्यांनी स्वत:च द्यावा. नैतिकतेच्या बळावर मी सुद्धा राजीनामा दिलेला होता आणि तसाच निर्णय मुंडे यांनी घ्यावा, अशी हतबलता अजित पवार यांनी व्यक्त केलेली होती. याचा अर्थ अजित पवारांच्या हातात धनंजय मुंडे यांचा राजीनामा नव्हता. यातले राजकारण पुन्हा लक्षात घ्या. सुरेश धस इतक्या आक्रमकपणे मागणी करत होते, पण ते फडणवीस यांच्याकडे कधीच बोट दाखवत नव्हते. आज सुद्धा एवढे झाल्यानंतर बघा फडणवीसांनी कसा राजीनामा घेतला म्हनतात. म्हणजे धस सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या सोयीचे राजकारण करतायत. देवेंद्र फडणवीस यांनी तीन महिन्यात जो धनंजय मुंडे यांचा बचाव केला त्याला लपवण्याचा प्रयत्न सुरेश धस करताहेत.(Dhananjay Munde)

फडणवीसांना नामानिराळे ठेवण्याचा प्रयत्न

सुरेश धस यांनी सुरुवातीला हे प्रकरण मांडले, उत्तमपणे मांडले सविस्तरपणे मांडले. तपशीलवारपणे मांडले. त्यामुळे त्याचे गांभीर्य लोकांसमोर आले. हे खरे असले तरीसुद्धा सुरेश धस यांचा भारतीय जनता पक्षाने राजकारणासाठी वापर केला आणि सुरेश धस हे सातत्याने धनंजय मुंडे यांच्या संदर्भात सगळा दोष अजित पवार यांच्यावर टाकून देवेंद्र फडणवीस यांना नामानिराळे ठेवण्याचा प्रयत्न करत होते. म्हणजे आपण प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा देतोय असे धनंजय मुंडे यांचे म्हणणं हे खरेतर अत्यंत निर्लज्जपणाचा कळस आहे असे पुन्हा एकदा म्हणावेसे वाटते. म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर राजीनामा देण्याशिवाय धनंजय मुंडे यांच्यासमोर पर्याय नव्हता हे खरे आहे. पण त्यातून अनेक प्रश्न निर्माण होतायत. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याने सगळे प्रश्न सुटलेत असे नाही. अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. पहिली गोष्ट म्हणजे सोळा डिसेंबरला सुरेश धस यांनी विधानसभेत संतोष देशमुख यांची हत्या कशी झाली? त्यांना किती तास मारहाण करण्यात आली आणि या क्रूरकर्मा गुन्हेगारांनी त्यांच्या सोबत, त्यांच्या मृतदेहासोबत काय काय कृत्य केले? या सगळे वर्णन सुरेश धस यांनी विधिमंडळाच्या सोळा डिसेंबरच्या भाषणात केलेले होते. म्हणजे त्यांनी ज्या गोष्टींचा उल्लेख केला होता त्या सगळ्या गोष्टी हे फोटो समोर आलेले आहेत. त्या फोटो समोर आल्यानंतर स्पष्ट झाल्या आहेत.

यांच्या काळजाला पाझर कसा फुटला नाही?

सुरेश धस यांचे ते भाषण विधानसभेच्या रेकॉर्डवर आहे. कुणीही बघावे. याचा अर्थ सुरेश धस यांनी केवळ फोटोच नव्हे; तर त्या संदर्भातले व्हिडिओ सुद्धा पाहिलेले होते. त्यामुळेच इतक्या खात्रीशीरपणे ते या सगळ्या प्रसंगाचे वर्णन करत होते. त्या नंतर सुरेश धस अनेकदा देवेंद्र फडणवीसांना भेटले आहेत. अजित पवार यांना भेटले आहेत. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी ते आग्रही राहिले याचा अर्थ हे कृत्य किती गंभीर आहे हे दोघांनाही त्यांनी सांगताना हे फोटो त्यांना दाखविले असू शकतील. समजा, सुरेश धस यांनी दाखवले नसतील तर देवेंद्र फडणवीस हे गृह खात्याचे मंत्री आहेत, गृह खात्याचे प्रमुख आहेत. तीन महिन्यांपूर्वीच्या घटनेचे फोटो पोलिसांनी त्यांच्या निदर्शनास आणले असतील. याचा अर्थ अनेक आठवड्यांपूर्वी हे सगळे फोटो प्रत्यक्ष पाहिल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या काळजाला पाझर फुटला नाही. ते शांत राहिले. प्रसार माध्यमातून फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर अख्ख्या महाराष्ट्राची झोप उडाली. हे फोटो व्हिडिओ पाहिल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अनेक काळ अनेक आठवडे त्यासंदर्भात काहीही उच्चार करत नाहीत, त्या संदर्भात कृती करत नाहीत. उलट आपल्या या कृत्यांना संरक्षण देणाऱ्या आपल्या एका मंत्र्याचे संरक्षण करत राहतात.(Dhananjay Munde)

अब्रू पार धुळीला

आपण कुठल्या राज्यात आणि कुठल्या काळात वावरतोय? असा प्रश्न प्रत्येक सुजाण नागरिकाला पडल्यावाचून राहत नाही. सगळे असे असताना फडणवीसांनी अजित पवार, धनंजय मुंडे यांना संरक्षण देत राहिले. अखेर झाले काय? मुंडे यांना राजीनामा द्यायला लागला. परंतु त्याचबरोबर मुंडे तर गेलेच. पण मुंडे जाताना देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची अब्रू पार धुळीला मिळून गेले, हे लक्षात घ्यायला पाहिजे. धनंजय मुंडे यांना संरक्षण देण्याच्या नादात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी स्वत:वर नामुष्की ओढवून घेतली आहे. इतके गेंड्याच्या कातडीचे राज्यकर्ते महाराष्ट्राने यापूर्वी कधीही पाहिले नाहीत. आम्हाला प्रचंड बहुमत मिळाले. या पाशवी बहुमताचा माज कुठल्या थरापर्यंत जाऊ शकतो हे सरकारच्या कृतीतून दिसून आलेले आहे. नाईलाज झाला म्हणून धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला. परंतु त्यांच्या राजीनाम्यामुळे सरकारच्या चारित्र्यावरचे संतोष देशमुख यांच्या रक्ताचे डाग धुऊन निघणार नाहीत.

हेही वाचा :

फडणवीस, अजित पवारांची अब्रू धुळीला मिळवून धनंजय मुंडे यांचा राजीनामा

संतोष देशमुख हत्या ते मुंडेंचा राजीनामा

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00