Home » Blog » Delhi Capitals : दिल्लीची विजयाची हॅट्ट्रिक

Delhi Capitals : दिल्लीची विजयाची हॅट्ट्रिक

चेन्नईवर २५ धावांनी मात करून गुणतक्त्यात अग्रस्थानी

by प्रतिनिधी
0 comments
Delhi Capitals

चेन्नई : आयपीएलच्या यंदाच्या मोसमात अपराजित असणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सने शनिवारी चेन्नई सुपरकिंग्जचा २५ धावांनी पराभव करून सलग तिसरा विजय नोंदवला. या विजयासह दिल्लीचे ६ गुण झाले असून गुणतक्त्यात दिल्लीचा संघ अग्रस्थानी पोहोचला आहे. (Delhi Capitals)

चेपॉक स्टेडियम या चेन्नईच्या घरच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. दिल्लीचा सलामीवीर जेक फ्रेझर-मॅकगर्क पहिल्याच षटकात शून्यावर बाद झाला. त्यानंतर, लोकेश राहुल आणि अभिषेक पोरेल यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी रचली. पोरेल २० चेंडूंमध्ये ३३ धावा करून बाद झाल्यानंतर ठरावीक अंतराने दिल्लीच्या विकेट पडत राहिल्या. परंतु, राहुलने एक बाजू लावून धरत संघाला पावणेदोनशे धावांचा टप्पा ओलांडून दिला. राहुलने ५१ चेंडूंमध्ये ६ चौकार व ३ षटकारांसह ७७ धावांची खेळी केली. अखेरच्या षटकांत ट्रिस्टन स्टब्जने १२ चेंडूंमध्ये नाबाद २४ धावा फटकावल्या. चेन्नईकडून खलील अहमदने २ विकेट घेतल्या. (Delhi Capitals)

दिल्लीच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईने पॉवर-प्लेमध्येच रचिन रवींद्र, कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉन्वे यांच्या महत्त्वाच्या विकेट गमावल्या. शिवम दुबे आणि रवींद्र जडेजाही स्वस्तात बाद झाल्यामुळे अकराव्या षटकात चेन्नईची अवस्था ५ बाद ७४ अशी झाली होती. त्यानंतर, विजय शंकर आणि महेंद्रसिंह धोनी यांनी चेन्नईचा डाव सावरत विकेट टिकवून खेळण्याची दक्षता घेतली. परंतु, हे करताना अपेक्षित धावगती मात्र त्यांना राखता आली नाही आणि दिल्लीचे आव्हान त्यांच्यासाठी आवाक्याबाहेर गेले. (Delhi Capitals)

शंकरने ५४ चेंडूंमध्ये ५ चौकार, एका षटकारासह नाबाद ६९, तर धोनीने प्रत्येकी एका चौकार, षटकारासह नाबाद ३० धावा केल्या. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी रचली. चेन्नईकडून सहाव्या विकेटसाठीच्या सर्वोच्च भागीदारीचा हा विक्रम ठरला. दिल्लीच्या विपराज निगमने २ विकेट घेतल्या. चेन्नईचा हा सलग तिसरा पराभव असून गुणतक्त्यात चेन्नईचा संघ आठव्या स्थानी आहे. (Delhi Capitals)

संक्षिप्त धावफलक : दिल्ली कॅपिटल्स – २० षटकांत ६ बाद १८३ (लोकेश राहुल ७७, अभिषेक पोरेल ३३, ट्रिस्टन स्टब्ज नाबाद २४, खलील अहमद २-२५, रवींद्र जडेजा २-१९) विजयी विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज २० षटकांत ५ बाद १५८ (विजय शंकर नाबाद ६९, महेंद्रसिंह धोनी नाबाद ३०, विपराज निगम २-२७, मिचेल स्टार्क १-२७, मुकेश कुमार १-३६).

हेही वाचा :
भारताच्या सिफत कौरला सुवर्ण
न्यूझीलंडचे निर्भेळ यश

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00