मुंबई : पतीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणे आणि त्याच्यावर विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप करणे तसेच त्याच्या मित्रांसमोर त्याचा अपमान करणे ही पतीवरील क्रूरता ठरेल, असे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. (Cruelty to Spouse)
न्यायाधीश रेवती मोहिते-डेरे आणि डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने असेही म्हटले आहे की, पत्नीने पतीचा त्याच्या मित्रांसमोर अपमान करणे आणि त्याच्या कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करणे म्हणजे पतीला मानसिक त्रास देण्याचाच प्रकार आहे.
‘‘पती हा त्याच्या कुटुंबाच्या व्यवसायाचा एक भाग आहे. पत्नीने त्याच्या कर्मचाऱ्यांसोब गैरवर्तन करणे हा मानसिक त्रासाचाच भाग आहे. त्याचप्रमाणे, त्याच्या मित्रांसमोर त्याला अपमानित करणे हे देखील त्याच्यासाठी ‘क्रूरता’ आहे. शिवाय, त्याच्या विशेष दिव्यांग बहिणीशी उदासीन वर्तन करणे त्याला आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांना नक्कीच त्रास देणारे ठरणारे आहे. याशिवाय शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणे आणि विवाहबाह्य संबंधांचे आरोप करणे हे देखील पत्नीची क्रूरता आहे,” असे न्यायाधीशांनी म्हटले आहे. (Cruelty to Spouse)
२८ नोव्हेंबर २०१९ रोजी पुण्यातील कौटुंबिक न्यायालयाने दिलेल्या निकालाला आव्हान देणाऱ्या एका प्रकरणातील पत्नीने दाखल केलेल्या अपीलावर खंडपीठ सुनावणी करत होते. न्यायालयाने पतीने दाखल केलेल्या अर्जावर घटस्फोटाचा हुकूम मंजूर केला आणि वैवाहिक हक्क परत मिळवण्याची मागणी करणाऱ्या पत्नीची याचिका फेटाळून लावली. (Cruelty to Spouse)
या जोडप्याने १२ डिसेंबर २०१३ रोजी लग्न केले आणि एका वर्षाच्या आत म्हणजे १४ डिसेंबर २०१४ रोजी ते वेगळे झाले. सुरुवातीला एप्रिल २०१५ मध्ये दोन्ही पक्षांनी परस्पर संमतीने घटस्फोट दाखल केला होता. तथापि, जुलै २०१५ मध्ये घटस्फोटाची याचिका दाखल करण्यास भाग पाडले गेल्याचे सांगत तिने तिची संमती मागे घेतली. त्यानंतर तिने पती आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांविरुद्ध स्थानिक पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.