नवी दिल्ली : मतदारयाद्यांमध्ये फेरफार करण्यात निवडणूक आयोगही सहभागी असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने सोमवारी (३ मार्च) केला. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला राजकीय फायदा मिळवून देण्यासाठी डुप्लिकेट मतदार ओळखपत्र क्रमांकांचा वापर करण्यात आल्याचा आरोपही पक्षाने केला. पक्षाच्या एम्पॉवर्ड अॅक्शन ग्रुप ऑफ लीडर्स अँड एक्सपर्ट्स (ईगल) ने हे आरोप केले आहेत. यानिमित्ताने देशाच्या लोकशाहीसमोर गंभीर धोके निर्माण झाल्याचा आरोप पुन्हा एकदा करण्यात आला आहे.(Congress alleges EC)
‘आता या प्रकरणाचा पर्दाफाश झाला आहे. सत्ताधारी भाजप निवडणूक आयोगाशी संगनमत करून मतदार यादीत फेरफार करून निवडणुका जिंकतो किंवा जिंकण्याचा प्रयत्न करतो. म्हणूनच निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीची प्रक्रिया नरेंद्र मोदी सरकारसाठी महत्त्वाची वाटते. त्यामुळे त्यांनी निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्यासाठी संतुलित समिती स्थापन करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयही उलथवून टाकला,’ असे काँग्रेसने ‘एक्स ’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे. (Congress alleges EC)
देशातील निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवणे आणि निवडणूक आयोग मुक्त आणि निष्पक्ष वातावरणात निवडणुका पार पाडतोय की नाही, यावर लक्ष ठेवण्यासाठी काँग्रेसने गेल्या महिन्यात आठ सदस्यांची ‘ईगल’ टीम स्थापन केली होती. या पॅनेलमध्ये काँग्रेस नेते अजय माकन, दिग्विजय सिंह, अभिषेक मनु सिंघवी, प्रवीण चक्रवर्ती, पवन खेरा, गुरदीप सिंह सप्पल, नितीन राऊत आणि चल्ला वंशी चंद रेड्डी यांचा समावेश आहे. (Congress alleges EC)
ईगलच्या निवेदनानुसार, एकाच मतदारसंघात आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये एकाच मतदार ओळखपत्र क्रमांकाखाली अनेक मतदार नोंदणीकृत असल्याचे आढळून आले. म्हणजे एकाच क्रमांकाखाली अनेक वाहनांची नोंदणी करण्याचा हा प्रकार आहे. हे निवडणूक अखंडतेचे अभूतपूर्व उल्लंघन असल्याचे पक्षाने म्हटले आहे.
२०२४ मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत, निवडणूक आयोगाने अवघ्या पाच महिन्यांत आश्चर्यकारकपणे ४० लाख नवीन मतदारांची नोंदणी केली आहे. जी मागील पाच वर्षांच्या (२०१९-२०२४) काळात झालेल्या ३२ लाख नवीन मतदार नोंदणींपेक्षा खूपच जास्त आहे, असा दावा काँग्रेस सातत्याने करत आला आहे. (Congress alleges EC)
या नवीन मतदारांनी संशयास्पदरित्या महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीला मोठ्या प्रमाणात मतदान केल्याचे दिसून येते. त्यामुळे निवडणूक निकालांवर त्यांच्या बाजूने मोठा परिणाम झाला. सत्ताधारी भाजपने निवडणूक आयोगाच्या सहकार्याने निवडणूक प्रक्रियेत फेरफार करून विजय मिळवला आहे, असा आरोप काँग्रेसने केला.
हेही वाचा :
‘महाराष्ट्र मे दो गुंडे, कोकाटे और मुंडे …!