मुंबई : विशेष प्रतिनिधी : वक्फ संशोधक सुधारणा विधेयक हे कुठल्याही समाजाच्या किंवा धार्मिक आस्थांच्या विरोधातील नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा अंश त्यांच्यामध्ये बाकी असेल तर ते बिलाला विरोध करणार नाहीत, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे गटाला बुधवारी (२ एप्रिल) लगावला.
संसदेत बुधवारी वक्फ सुधारणा बिल सादर करण्यात आले. त्याला ठाकरे गटाने विरोध दर्शविला आहे. त्याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले की, हे विधेयक कोणत्याही धर्माच्या किंवा समाजाच्या विरोधात नाही. त्यामुळे आस्थेलाही धक्का पोहोचणार नाही. मात्र मागच्या बिलामध्ये ज्या चुका होत्या, त्यामुळे जमिनी लाटल्या जात होत्या. त्याला प्रतिबंध बसणार आहे. या सुधारणा विधेयकामुळे मुस्लिम भगिनींना वक्फ बोर्डात प्रतिनिधित्व मिळणार आहे. त्यामुळे ज्याची ज्याची सद्सद्विवेक बुद्धी जागृत आहे ते या विधेयकाचे स्वागत करतील.
वक्फ बील पूर्णपणे पास होईल असा विश्वास आहे, सेक्युलर शब्दाचा प्रत्यय बिलातून पाहायला मिळत आहे. मात्र विरोधी पक्ष मतांची लाचारी असल्यामुळे, मताच्या लांगुलचालनासाठी बिलाला विरोध करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.
उद्योगपती, धनसम्राट यांच्या घशात जमिनी घालण्याचा हा डाव आहे असा आरोप विरोधक करत आहेत, याकडे लक्ष वेधले असता फडणवीस यांनी आरोप फेटाळले. ते म्हणाले, ‘‘विरोधक या संदर्भातील एकही पुरावा संसदीय समितीपुढे आणू शकले नाहीत, जेव्हा काहीही उरत नाही त्यावेळी अशा गोष्टी मांडल्या जातात. विरोधकांनी छातीवर हात ठेवून विचार केला तर लक्षात येईल की विरोधी पक्ष मताची लाचारी असल्यामुळे विरोध करत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा अंश त्यांच्यामध्ये बाकी असेल तर ते बिलाला विरोध करणार नाहीत. विधेयकाला समर्थन देतील अशी माझी अपेक्षा आहे.’’
हेही वाचा :
एकही गैर-मुस्लिम वक्फमध्ये नसेल
‘कुंभ’मधील मृत्यू लपविण्यासाठी वक्फ विधेयक
वक्फ बोर्डाची मालमत्ता किती?