मुंबई : विशेष प्रतिनिधी : राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासंदर्भात घडलेली घटना दुदैवी आहे. त्यांना ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संबंधित आरोपी महिला, यु ट्युबर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे, रोहित पवार, प्रभाकर देशमुख यांच्या संपर्कात होते. त्याबाबतची चौकशी करण्यात येत आहे, अशी धक्कादायक माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. (CM alleges Sule)
अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना त्यांनी विरोधकांनी केलेल्या विविध आरोपाबाबत सविस्तर खुलासा केला. तसेच सत्ताधारी पक्ष व त्यांनी केलेल्या अनेक सूचनांची अंमलबजावणी करण्याची ग्वाही दिली.
फडणवीस म्हणाले, ‘कुणाला आयुष्यातून उठवण्याच्या उद्देशाने राजकारण होत असेल तर ते चुकीचे आहे. जयकुमार गोरे यांच्यावर विनयभंगाचे आरोप करणाऱ्या महिलेला पोलिसांनी खंडणीच्या आरोपाखाली अटक केली आहे. त्यांच्यासंदर्भातील केस २०१६ घडली, २०१९ मध्ये त्यांची निर्दोष मुक्तता देखील झाली होती. त्यानंतर अचानक हे प्रकरण उकरून काढले गेले.’ (CM alleges Sule)
अशा प्रकरणांमध्ये कुटुंबात, समाजात अपमान होईल या भीतीपोटी प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र मी जयकुमार गोरे यांच्या हिमतीची दाद देतो. त्यांना ज्यावेळी लाचेची मागणी झाली त्यावेळी त्यांनी पोलिसात तक्रार केली. तेव्हा ट्रॅप लावण्यात आला. सगळी मागणी, संवाद टेप झाला. पोलिस विभागाची खात्री पटल्यानंतर सापळा रचून कॅश देताना आरोपीला पकडण्यात आले. त्यामुळे हा ब्लॅकमेलिंगचाच प्रकार होता, असे सांगून ते म्हणाले,’ पोलिस तपासात असे निदर्शनास आले की हे एक नेक्सस होते. ही महिला, युट्युबर तुषार खरात आणि अनिल सुभेदारसह काही लोकांचे रॅकेट असल्याचे आढळले आहे. या लोकांनी जो कट रचला याचे सगळे पुरावे सापडले आहेत. यांचे अनेक फोन आहेत, ते सगळे सापडले आहेत. दुदैवाची गोष्ट म्हणजे या सर्वांशी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते थेट संपर्कात दिसत आहेत. (CM alleges Sule)
प्रभाकर देशमुख यांच्याशी आरोपी बोलत होते असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, त्याहीपेक्षा वाईट वाटते की सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचे कॉल्स तुषार खरातसोबत झाले आहेत. तसेच आरोपींनी तयार केलेले व्हिडीओही त्यांना पाठवण्यात आले आहेत. याबाबत सगळे पुरावे सापडले आहेत. त्यांचे व्हॉट्सअपवरचे संभाषणही सापडले आहे. त्यांचे दीडशे फोन झालेले आहेत आता याची चौकशी केली जाणार आहे.
मी माझा फोन तपासासाठी द्यायला तयार : सुप्रिया सुळे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपावर खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या, त्यांनी मला नेता बनवल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. त्यांनी माझे नाव घेतले, मी माझा फोन तपासासाठी द्यायला तयार आहे.
हेही वाचा :
मुंबई पोलिसांच्या मदतीने ‘आयपीएल’मध्ये बेटिंग