पणजी : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील ‘छावा’ सिनेमा करमुक्त करण्याचा निर्णय गोवा सरकारने घेतला आहे. तशी घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली. (Chhaava Tax Free)
हा सिनेमा करमुक्त करण्याची घोषणा करणारे मध्यप्रदेशपाठोपाठ गोवा हे दुसरे राज्य ठरले आहे. विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेल्या ‘छावा’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. १४ फेब्रुवारीला हा सिनेमा प्रदर्शित झाला. त्याआधीपासून हा सिनेमा चर्चेत आहे. सिनेमाच्या ट्रेलरने सिनेरसिकांची उत्सुकता ताणली होती. प्रत्यक्ष प्रदर्शित झाल्यानंतर तर देशभरातील सर्वच शो फुल्ल चालले आहेत.
छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य आणि स्वराज्यासाठी दिलेल्या बलिदानाची आठवण या सिनेमाच्या निमित्ताने उजागर केली आहे.
सिनेमा करमुक्त केल्याची घोषणा गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एक्स पोस्टवर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, ‘छावा’ हा चित्रपट संभाजी महाराजांच्या अतुलनीय धैर्याला आदरांजली आहे. मुघल आणि पोर्तुगीजांविरोधात त्यांनी दिलेला लढा हा एक प्रेरणास्त्रोत आहे.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनीही हा सिनेमा करमुक्त करण्याची घोषणा आधीच केली आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांचा वारसा जास्तीत जास्त लोकांनी समजून घ्यावा, त्यातून विशेषत: तरुण पिढीला प्रोत्साहन मिळावे हा या कर सवलतीचा उद्देश असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आहेत. मॅडॉक फिल्म्स आणि दिनेश विजनची निर्मिती असलेल्या या सिनेमात विकी कौशलने संभाजी महाराजांची भूमिका अत्यंत ताकदीने साकारली आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना यांच्याही सिनेमात प्रमुख भूमिका आहेत.
या ऐतिहासिक आणि भव्य चित्रपटासाठी ए. आर. रहमान यांनी तितकेच अप्रतिम संगीत दिले आहे. इर्शाद कामिल आणि क्षितिज पटवर्धन यांनी यातील गाणी लिहिली आहेत.
हेही वाचा :
कोल्हापूर चित्रनगरीत लवकरच वस्तुसंग्रहालय