विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील एक मोठा आणि महत्त्वाचा बदल आपण अनुभवत आहोत. तो म्हणजे चॅटजीपीटी. याचा वापर शाळकरी मुलांपासून ते नोकरदार वर्गांपर्यंत सर्वच वयोगटांतील लोक करताना दिसतात. एखाद्या तंत्रज्ञानाच्या वापराचा फायदा असतो, तसे तोटेही असतात. चॅटजीपीटी हे असे माध्यम आहे, की ज्याच्या मदतीने अनेक प्रश्नांची उत्तरे अगदी सहज मिळवता येतात. हे एक प्रकारचे संगणकीय सॉफ्टवेअर आहे.
या सॉफ्टवेअरच्या वापरकर्त्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. याचा एक प्रतिकूल परिणाम विद्यार्थ्यांवर झालेला दिसून येतो. विद्यार्थी अभ्यास करतेवेळी या सॉफ्टवेअरचा वापर करत असल्यामुळे त्यांच्या लिखाण क्षमतेवर आणि लेखनाच्या पद्धतीमध्ये मोठे बदल झालेले पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे मुलांच्या वैचारिक क्षमतेवर देखील गदा आल्याचे चित्र दिसून येते.
प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी घ्याव्या लागणाऱ्या मेहनतीपासून विद्यार्थी दुरावत चालले आहेत. तसेच या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून अनेक गुन्हेगारी संबंधातल्या प्रश्नांची उत्तरेही सहज मिळत असल्यामुळे विद्यार्थ्यांत गुन्हेगारीसारखे विचार वाढत चालल्याची भीती व्यक्त होत आहे.
फायदे :
वेळेची बचत : चॅटजीपीटीच्या वापरामुळे एखाद्या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी किंवा शोधण्यासाठी लागणाऱ्या वेळेची बचत केली जाते.
एखाद्या प्रश्नाचे उत्तर किंवा एखादा लेख अधिक प्रभावीपणे लिहिण्यासाठीची मदत या जीपीटीच्या माध्यमातून होऊ शकते. तसेच अनेक नवीन मुद्द्यांची, विषयांची ओळख याच्या माध्यमातून करून घेता येते.
चॅटजीपीटी हे शिक्षणासाठीचे एक महत्त्वाचे माध्यम आहे. या माध्यमातून विविध विषयांचा अभ्यास करणे सोपे जाते. त्यानुसार आपल्या लिखाणात आणि विचारात प्रगल्भता आणणे सोयीचे ठरते.
एखाद्या विषयावर अभ्यासपूर्वक बोलण्यासाठीचा एक उत्तम मार्ग म्हणून चॅटजीपीटीकडे पाहिले जाते. बोलण्यासाठी लागणाऱ्या प्रभावी मुद्द्यांची ओळख या माध्यमातून होत असते.
मनोरंजन क्षेत्रातही चॅटजीपीटी वापराचा वाटा वाढला आहे. विविध विषयांवरचे चित्रपटांबद्दलच्या समीक्षा, रिव्ह्यू वाचण्यासाठीचे एक प्रभावी माध्यम म्हणून याकडे बघितले जात आहे.
तोटे :
चॅटजीपीटीच्या वापरामुळे माणूस परावलंबी होण्याचा धोका आहे. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी किंवा लेखनासाठीच्या मुद्द्यांसाठी अवलंबून राहण्याचे प्रमाण वाढले आहे.
मनुष्याकडे संवेदनशीलता असण्याला खूप महत्त्व आहे, पण माणूस असंवेदनशील बनण्यामध्ये चॅटजीपीटीचा मोठा वाटा मानला जात आहे. तसेच या तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे मनुष्याची सर्जनशीलता तसेच वैचारिक आणि मानसिक क्षमता कमी होत चालली आहे हासुद्धा फार मोठा धोका आहे.