नेपियर : मार्क चॅपमनने झळकावलेल्या शतकाच्या जोरावर यजमान न्यूझीलंडने मालिकेतील पहिल्या वन-डे क्रिकेट सामन्यात पाकिस्तानवर ७३ धावांनी मोठा विजय मिळवला. या सामन्यात न्यूझीलंडने ९ बाद ३४४ धावा केल्यानंतर पाकिस्तानचा डाव २७१ धावांमध्ये संपवला. या विजयासह न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.(Chapman’s Ton)
पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर न्यूझीलंडच्या पहिल्या ३ विकेट ५० धावांमध्येच पडल्या होत्या. त्यानंतर, चॅपमन आणि डॅरेल मिचेल यांनी चौथ्या विकेटसाठी १९९ धावांची भागीदारी रचून न्यूझीलंडच्या डावास आकार दिला. चॅपमनने वन-डे कारकिर्दीतील तिसरे शतक झळकावताना १११ चेंडूंमध्ये १३ चौकार व ६ षटकारांसह १३२ धावा केल्या. मिचेल ८४ चेंडूंमध्ये प्रत्येकी ४ चौकार व षटकारांसह ७६ धावा करून भागीदारीत महत्त्वाचा वाटा उचलला.(Chapman’s Ton)
या सामन्याद्वारे न्यूझीलंडतर्फे आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पण करणारा मूळचा पाकिस्तानचा खेळाडू महंमद अब्बासने अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करत पदार्पणात अर्धशतक फटकावले. त्याने २६ चेंडूंमध्ये ३ चौकार व ३ षटकारांसह फटकावलेल्या ५२ धावांमुळे न्यूझीलंडला साडेतीनशे धावांच्या आसपास पोहोचता आले. न्यूझीलंडकडून इरफान खानने ३, तर अकिफ जावेद व हारिस रौफने प्रत्येकी २ विकेट घेतल्या.
न्यूझीलंडच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानने ३९ व्या षटकापर्यंत ३ बाद २४९ धावा केल्या होत्या. परंतु, बाबर आझम व सलमान आघाची जोडी फुटल्यानंतर पाकने पुढील पाच षटकामध्ये अवघ्या २२ धावांत ७ विकेट गमावल्या. त्यामुळे त्यांचा डाव ४४.१ षटकांत २७१ धावांत आटोपला. पाककडून बाबरने ८३ चेंडूंमध्ये ५ चौकार व ३ षटकारांसह ७८, तर सलमानने ४८ चेंडूंमध्ये ५ चौकार, २ षटकारांसह ५८ धावा केल्या. न्यूझीलंडकडून नॅथन स्मिथने ४, तर जेकब डफीने २ विकेट घेतल्या. या मालिकेतील दुसरा सामना २ एप्रिलला हॅमिल्टन येथे रंगणार आहे. .(Chapman’s Ton)
संक्षिप्त धावफलक : न्यूझीलंड – ५० षटकांत ९ बाद ३४४ (मार्क चॅपमन १३२, डॅरेल मिचेल ७६, महंमद अब्बास ५२, अकिफ जावेद २-५५, हारिस रौफ २-३८, इरफान खान ३-५१) विजयी विरुद्ध पाकिस्तान – ४४.१ षटकांत सर्वबाद २७१ (बाबर आझम ७८, सलमान आघा ५८, उस्मान खान ३९, नॅथन स्मिथ ४-६०, जेकब डफी २-५७).

पदार्पणात वेगवान अर्धशतकाचा विक्रम
लाहोरमध्ये जन्मलेल्या आणि न्यूझीलंडकडून पहिला सामना खेळणाऱ्या २१ वर्षीय महंमद अब्बासने वन-डे पदार्पणात वेगवान अर्धशतकाचा नवा विक्रम रचला. अब्बासने शनिवारी २४ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले. त्याने भारताच्या कृणाल पंड्याचा विक्रम मोडला. कृणालने २०२१ मध्ये इंग्लंडविरुद्ध वन-डे पदार्पण करताना २६ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले होते.
