फुले दाम्पत्याने कर्मकांड, ब्राह्मण्यवाद याविरोधात केलेला संघर्ष नाकारणे, म्हणजे आपण घाबरलेले आहोत, हे सांगणे आहे. सामाजिक सुधारणा करताना, महिलांना शिक्षण देताना सावित्रीमाईंना विरोध झाला, हे आपण नाकारू कसे शकता? याच्या ऐतिहासिक नोंदी कागदपत्रांसह उपलब्ध आहेत.(Awhad’s criticism)
– डॉ. जितेंद्र आव्हाड
भारतीय इतिहासात चातुर्वर्ण्य, कर्मकांड आणि ब्राह्मण्यवाद हे सत्य नाकारणे म्हणजे मूर्खपणा आहे. ज्यांना ज्यांना चातुर्वर्ण्याचे चटके बसले आहेत. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजदेखील आहेत. या कर्मकांडामुळेच महाराजांना, ‘तुम्हाला राज्याभिषेक करता येणार नाही,’ असे उन्मादात्मक आदेश देणारे कोण होते, हे पडताळून पाहण्याची आता गरज आहे. संभाजी महाराजांची हत्या करण्याचा कोणाचा कट होता? याची चर्चा झालीच पाहिजे. बरं झालं, महात्मा फुले या सिनेमाला काही लोकांनी विरोध केला. त्यामुळे काही सत्य पुन्हा समाजासमोर येईल अन् झोपलेल्या बहुजनांना किमान हलवता तरी येईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वर्गाबाहेर बसविणारे कोण होते, त्यांना का वर्गात बसू दिले जात नव्हते? बुद्धी आणि ज्ञानावर कोणा एका समाजाचा पगडा असूच शकत नाही. ज्ञान आणि बुद्धिमत्तेवर विशिष्ट एकाच समाजाची पकड असावी, ही हजारो वर्षांची तथाकथित परंपरा सर्वांत आधी मोडीत काढणारे जे कोणी असतील त्यामध्ये सर्वांत पहिले नाव महात्मा फुले यांचेच आहे. (Awhad’s criticism)
जातीव्यवस्था, भेदभाव आणि स्त्रियांना दिली जाणारी दुय्यम वागणूक यांविरोधात महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीमाई यांनी केलेले कार्य अजरामर आहे. त्यांचे हे कार्य कोणा एका जातीसाठी नव्हे तर सबंध मानवजातीला न्याय देणारे होते. ब्राह्मण्यवादातूनच एखाद्या महिलेचा पती वारल्यानंतर तिच्या डोक्यावरचे केस उपटून काढले जायचे; ही अतिशय विकृत पद्धत समाजातील एका घटकात रूढ झाली होती. त्याला विरोध महात्मा फुले यांनीच केला. त्या जातीतील महिलांना न्याय देण्यासाठीच त्यांची ही लढाई होती. स्त्रियांना शिक्षण द्यायचेच नाही, हा कर्मकांडातील आदेश होता, त्याला पहिला हादरा फुले दाम्पत्यानेच दिला. स्त्री ही कोणत्याच जातीची नसते तर ती आई, बहीण, पत्नी असते. हा विचार करून त्यांनी शिक्षणाचे दरवाजे उघडले. आज ज्या स्त्रिया पुढारलेल्या दिसत आहेत, त्यांचा देव हा महात्मा फुले आणि सावित्रीमाई हेच आहेत. (Awhad’s criticism)
फुले दाम्पत्याने कर्मकांड, ब्राह्मण्यवाद याविरोधात केलेला संघर्ष नाकारणे, म्हणजे आपण घाबरलेले आहोत, हे सांगणे आहे. सामाजिक सुधारणा करताना, महिलांना शिक्षण देताना सावित्रीमाईंना विरोध झाला, हे आपण नाकारू कसे शकता? याच्या ऐतिहासिक नोंदी कागदपत्रांसह उपलब्ध आहेत. पेशवेकाळात येथील जातव्यवस्थेत जो शेवटचा घटक होता, ज्याला अतिशूद्र म्हटले जायचे, त्यांना गावात रहायला बंदी होती, गावात घर बांधायला बंदी होती. त्यांचा जमीन-जुमला व्यवस्थेने ताब्यात घेतला होता. त्यांच्या कमरेला झाडू आणि गळ्यात मडके बांधले होते. त्याच व्यवस्थेला झुगारून देण्यासाठी १८१८ चे भीमा कोरेगाव युद्ध झाले अन् त्यामध्ये पेशव्यांचा दारूण पराभव झाला. हे युद्ध म्हणजे तत्कालीन समाजव्यवस्थेने केलेल्या अन्यायाविरूद्धचा राग होता. तो राग आजही लोकांच्या मनात आहेच, हा राग का नसावा; आपल्या पूर्वजांना सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी पिऊ दिले जात नव्हते, गावात राहू दिले जात नव्हते, मंदिरात जाऊ दिले जात नव्हते. आपल्या पूर्वजांच्या स्पर्शाचाही विटाळ होता. इतका टोकाचा भेदभाव जगाच्या पाठीवर कुठल्याही मानवजातीत नव्हता. तो या देशात होता.
- महात्मा फुले सिनेमाला विरोध करणाऱ्यांना ही ऐतिहासिक पार्श्वभूमी माहीत नाही का?
- या ऐतिहासिक पार्श्वभूमीला का विरोध करताय? हे कधी घडलेच नव्हते, असे तुम्हाला म्हणायचे आहे का?
- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला विरोध केला नव्हता का?
- स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचे प्रयत्न झाले नव्हते का?
- संभाजी महाराजांनी पाच मनुवाद्यांना हत्तीच्या पायाखाली दिले हे ऐतिहासिक सत्य तुम्ही नाकारणार आहात का?
- संभाजी राजांच्या मृत्यूला मनुवादी जबाबदार होते, हे सत्य किती दिवस लपवून ठेवणार आहात?
एखाद्या सिनेमातून ऐतिहासिक सत्य सांगणे, हे चूक आहे का, हे आता समाजानेच सांगावे. - महात्मा फुले या सिनेमाच्या निर्मात्याशी आताच माझे बोलणे झाले. येत्या २५ तारखेला हा सिनेमा भारतात प्रदर्शित होणार आहे. ११ तारखेला प्रदर्शित होणारा हा सिनेमा आता २५ तारखेला प्रदर्शित होणार आहे. निर्माते-दिग्दर्शक दबावाला बळी पडले. तो त्यांचा चांगुलपणा आहे. नेहमीप्रमाणे जातीयवाद्यांचा भरणा असलेल्या सेन्सॉर बोर्डाने आपल्या नेहमीच्या सवयीनुसार येथील जातव्यवस्था अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी काय केले आहे, हे मी खाली दिलेल्या तक्त्यामध्ये कळेलच. पण, लक्षात ठेवा, सत्य परेशान हो सकता है, पराजित नही ! (PHULE Cinema)
- पुन्हा एकदा सांगतो, बरं झालं या सिनेमामुळे वाद निर्माण झाला; या सिनेमाला विरोध झाला. निदान लोकांच्या घराघरात तरी हा जातीव्यवस्था, कर्मकांड आणि ब्राह्मण्यवादाची चर्चा सुरू झाली. बहुजनांनो ,तुमच्यावर झालेला अन्याय हा इतिहास आहे अन् हाच इतिहास पुढे तुम्हाला मार्गदर्शन करीत राहील. हा इतिहास पुसण्याचा प्रयत्न म्हणजे तुम्हाला शुद्धीत आणण्यासाठी जे इंजेक्शन, जे सलाईन द्यावे लागते; ते काढून घेण्यासारखे आहे. तुमच्या पूर्वजांना जनावरापेक्षा वाईट वागणूक दिली जात होती, हे विसरून तुम्ही ज्या परिस्थितीत जगत आहात, त्याला येथील मनुवाद, चातुर्वर्ण्य व्यवस्था, जातव्यवस्था कारणीभूत आहे, हे विसरून जाऊ नका! ज्या दिवशी स्वतःचा काळा इतिहास विसराल त्या दिवशी सगळंच संपलेले असेल! पुन्हा एकदा जातीभेदाच्या अंधारात लोटले जाल!! महात्मा जोतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे काही दिलंय ते सांभाळून ठेवूया… निदान एवढी तरी जबाबदारी पार पाडू या !
महात्मा फुले या सिनेमाचे स्वागत करण्यासाठी तयार रहा. २५ तारखेला सिनेमा प्रदर्शित होतोय. हा सिनेमा कुणा एका जातीच्या विरोधात नाही तर तो सिनेमा तत्कालीन जुलमी समाजव्यवस्थेला जी व्यवस्था आजही काम करतेय, त्या व्यवस्थेला उघडं करणारा आहे.