कोल्हापूर : जाधव गुरूजींच्या निरूपणाने तुकाराम गाथेच्या अभ्यासाची परंपरा समृध्द केल, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ.सदानंद मोरे यांनी येथे केले. (SU Awards)
शिवाजी विद्यापीठाच्या संत तुकाराम अध्यासनाच्यावतीने पहिला पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील पुरस्कार आणि सद्गुरू डॉ.गुरूनाथ मुंगळे आध्यात्मिक तत्वज्ञान साहित्य पुरस्कार वितरण सोहळा विद्यापीठाच्या राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात झाला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मोरे बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के उपस्थित होते. प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील यांची विशेष उपस्थिती होती. (SU Awards)
डॉ. मोरे म्हणाले, मारूतीराव जाधव (तळाशीकर) गुरूजींच्या गाथेचे प्रकाशन होणे ही फार मोठी आणि महत्वाची गोष्ट आहे. या गाथेचे प्रचार आणि प्रसार हळूहळू संपूर्ण राज्यभर होणार आहे, ही सुखावणारी गोष्ट आहे. महाराष्ट्राबाहेर उत्तर प्रदेशातील कानपूरमधील आय.आय.टी.सारख्या आधुनिक वैज्ञानिक संस्थेमध्ये कार्य करीत असताना तुकोबांच्या अभंगाचा सखोल विचार करून डॉ.समीर चव्हाण यांनी खंड प्रकाशित करून पुरस्कार प्राप्त केलेला आहे. संत नामदेव, संत तुकोबा, संत एकनाथ महाराज यांनी संत परंपरा कायम ठेवली. (SU Awards)
तुकाराम महाराज हयात असतानाच त्यांच्या अभंगाचा महाराष्ट्रावर फार मोठा प्रभाव पडला होता. पुढे बहिणाबार्इंनी वारसा सुरू केला. गेली साडेतीन ते चारशे वर्षे तुकोबांच्या अभंगाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न चालू आहे. सर्व प्रथम ब्रिटीशांनी तुकोबांच्या अभंगाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. तद्नंतर, प्रार्थना समाजाच्या लोकांनी अठराशे अभंगाचा अर्थ लावलेला खंड प्रकाशित केला. त्या परंपरेमध्ये समाविष्ट होणारे तळाशीकर गुरूजी आणि सद्गुरू डॉ. मुंगळे यांच्या कार्याची दखल शिवाजी विद्यापीठाने घेतली हे अधिक कौतुकास्पद आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.
सुरूवातीस पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील पुरस्कार स्व. तळाशीकर गुरूजी यांच्यावतीने श्रीमती आनंदी मारूतीराव जाधव यांनी स्वीकारला. तर, सद्गुरू डॉ.गुरूनाथ मुंगळे आध्यात्मिक तत्वज्ञान साहित्य पुरस्कार आय.आय.टी.कानपूर उत्तर प्रदेश येथील प्रा.समीर चव्हाण यांना ज्येष्ठ विचारवंत डॉ.सदानंद मोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. (SU Awards)
याप्रसंगी गौरी कहाते (सोलापूर), डॉ. अरूण जाधव (तळाशी), डॉ.समीर चव्हाण (कानपूर) आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास माजी खासदार प्रा.संजय मंडलीक, डॉ. प्रतापराव माने, अरूण डोंगळे यांच्यासह अधिकार मंडळाचे सदस्य, तळाशीकर गुरूजी यांचेवर प्रेम करणारे तळाशीकरवासी, सद्गुरू डॉ.गुरूनाथ मुंगळे आणि पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे कुटुंबीय मोठया प्रमाणात सभागृहात उपस्थित होते.
संत तुकाराम अध्यासनाचे प्रमुख डॉ.नंदकुमार मोरे यांनी प्रास्ताविक केले. डॉ.रणधीर शिंदे यांनी परिचय करून दिला. प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले. कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले.
हेही वाचा :
भवाळकरांकडून लोकसाहित्य संशोधनाला व्यापक आयाम
जयप्रभा स्टुडिओचे संवर्धन होणार