मुंबई : प्रतिनिधी : बुलडोझर घेऊन घरावर चाल करणाऱ्यांच्या घरी टोपी घालून ‘सौगात-ए-मोदी’ या उपक्रमातून भाजप घरोघरी जाऊन भेटवस्तू देणार आहे. शिवसेनेने हिंदुत्व सोडले म्हणून टीका करणाऱ्या भाजपने आता हिंदुत्व सोडल्याचे जाहीर करावे, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.(Uddhav slams BJP)
भारतीय जनता पक्षाच्यावतीने रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर देशभरातील ३२ लाख मुस्लिमांना ‘सौगात-ए-मोदी’ या उपक्रमाद्वारे भेटवस्तूचे वाटप करणार आहे. भाजपच्या या उपक्रमाचे ठाकरे यांनी स्वागत केले आहे. त्याचवेळी बिहार, उत्तर प्रदेश राज्याच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप ‘सौगात-ए-सत्ते’साठी ‘सौगात-ए-मोदी’ या उपक्रमाचे आयोजन केले आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. (Uddhav slams BJP)
लोकसभा निवडणुकीत ‘एक है तो सेफ है’, ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘हिंदू महिलांच्या मंगळसूत्राचे रक्षण’ करण्यासाठी भाजपने मते मागितली. देशभर हिंदू-मुस्लिम अशी विभागणी करुन धार्मिक विष पेरले. एकीकडे विष पेरून दुसरीकडे अन्न दिले जात आहे. हे सर्व सत्तेसाठी चालले आहे, याकडेही ठाकरे यांनी लक्ष वेधले.
होळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिमांविरोधात शिमगा करायचा आणि आता त्यांना पोळी द्यायची. मुस्लिमांच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आले. त्यांची घरे पेटवली जातील अशी स्फोटके विधाने केली. आता टोपी घालून ‘सौगात ए मोदी’चे वाटप करत आहेत, अशी टीकाही ठाकरे यांनी केली. (Uddhav slams BJP)
शिवसेनेने हिंदुत्व सोडले अशी टीका भाजपकडून केली जात आहे. आता टोप्या घालून मुस्लिमांच्या घरी ‘सौगात-ए-मोदी’मधून भेटवस्तूंचे वाटप करणाऱ्यांनी हिंदुत्व सोडल्याचे जाहीर करावे असेही ठाकरे म्हणाले.
विरोधी पक्ष हे संवैधानिक पद
एकीकडे विधानसभेत संविधानावर विशेष चर्चा केली जात आहे, दुसरीकडे सहा महिने विधानसभेतील विरोधी पक्षपद रिक्त आहे. हे पद रिक्त ठेवता येत नाही याकडे ठाकरे यांनी लक्ष वेधले. संख्याबळ हा विरोधी पक्षपदासाठी निकष नाही हे स्पष्ट झाले आहे. संख्याबळ हा निकष असेल तर ते लिहून द्यावे, अशी मागणीही ठाकरे यांनी केली.
राष्ट्रपुरुषांच्या बदनामीबद्दल गप्प का ?
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज या राष्ट्रपुरुषांबद्दल कोरटकर, सोलापूरकर, कोश्यारी वादग्रस्त वक्तव्ये करतात तेव्हा हे गप्प असतात. सरकारही चोर-पोलिस असा खेळ करत कारवाई टाळण्याचा प्रयत्न करते. जे गद्दार आहेत त्यांच्यावर टीका झाली की तोडफोड होते. राष्ट्रपुरुषांच्या बदनामीच्यावेळी महायुतीतील भाजप, शिंदे गट गप्प का राहतात, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला. (Uddhav slams BJP)
अरबी समुद्रातील स्मारकावर पाणी सोडले का?
औरंगजेबाची कबर, वाघ्या कुत्र्याच्या समाधीवर जोरात चर्चा होते. वाघ्या कुत्र्याच्या समाधीवर निर्णय घेण्यासाठी सरकारने इतिहास संशोधक अभ्यासकांची मते विचारुन घेऊन निर्णय घ्यावा, पण अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. त्यावेळी मीही उपस्थित होतो, पण या स्मारकांबाबत कोणीच विचारत नाही. त्यांनी स्मारकावर पाणी सोडले का, शिवछत्रपतींच्या स्मारकाबाबत स्मरणपत्र पाठवण्याची वेळ आली आहे का असा प्रश्नही त्यांनी केला.
शिवसेनेने हिंदुत्व सोडले अशी टीका भाजपकडून केली जात आहे. आता टोप्या घालून मुस्लिमांच्या घरी ‘सौगात-ए-मोदी’मधून भेटवस्तूंचे वाटप करणाऱ्यांनी हिंदुत्व सोडल्याचे जाहीर करावे.
उद्धव ठाकरे, शिवसेना पक्ष प्रमुख
- उद्धव यांचा भाजपवर भडीमार…
- मुस्लिमांच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आले, आता ‘सत्तेसाठी सौगात’
- औरंगजेबाची कबर, वाघ्या कुत्र्याची चर्चा करता शिवस्मारकाच्या कामाची चर्चा का नाही?
- कोरटकर, सोलापूरकर, कोश्यारी आदींच्या वादग्रस्त वक्तव्यावर गप्प का?
हेही वाचा :