सिहोर : ईडीच्या अधिकाऱ्यांनी घर आणि कार्यालयावर छापा टाकल्यानंतर मध्यप्रदेश राज्यातील सिहोर जिल्ह्यातील आष्टा येथील उद्योजक आणि त्यांच्या पत्नीने गळफास लावून आत्महत्या केली. मनोज परमार आणि नेहा परमार असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. त्यांच्या मुलाने राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत राहुल यांची भेट घेऊन पिगी बँक भेट दिली होती. (Businessman commits suicide)
पाच डिसेंबर रोजी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) परमार यांच्या इंदोर आणि सिहोर येथील त्यांचे कार्यालय, व्यवसायाचे ठिकाण आणि घरावर छापे टाकले होते. त्यांच्या बँक खात्यातील साडेतीन लाख रुपयेही गोठवले होते. पंजाब नॅशनल बँकेतील सहा कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे ते भीतीच्या छायेत होते. (Businessman commits suicide)
मनोज परमार यांना जिया, जतीन आणि यश अशी तीन मुले आहेत. गुरुवारी रात्री मनोज परमार पत्नी आणि मुलांसह देवदर्शनाला गेले होते. देवदर्शन करून ते घरी आले. त्यांची दोन घरे असून एका घरात मुले रहात होती तर दुसऱ्या घरी मनोज परमार आणि नेहा झोपायला गेले. शुक्रवारी सकाळी मुलगा जतीन आईवडिलांच्या घरी गेला असता त्याला घराचा दरवाजा उघडा दिसला. त्याने घरात प्रवेश केला असता आईवडिलांनी गळफास लावून घेतल्याचे दिसून आले. त्यांनी आत्महत्येची माहिती नातेवाईकांना दिली. पोलिसही घटनास्थळी आले.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी दबाव आणल्याने आईवडिलांनी आत्महत्या केली असा आरोप त्यांच्या मुलांनी केला आहे. काँग्रेस पक्षानेही ईडीच्या कारवाईमुळे परमार दाम्पत्याने आत्महत्या केल्याचा आरोप केला आहे.
आत्महत्येच्या ठिकाणी पाचपानी सुसाईड नोटही मिळाली आहे अशी माहिती एसडीओपी आकाश अमळकर यांनी दिली.
हेही वाचा :