काश्मीर… म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्ग. इथली हवा प्रेमानं भरलेली आहे, इथलं पाणी एकतेची गाणी गातं. पण कधी कधी, या स्वर्गाला आव्हान दिलं जातं. इथं येणा-या लोकांच्या मनात भीती पेरली जाते. इथं राहणा-या लोकांच्याबद्दल संशय निर्माण केला जातो. तरीसुद्धा, काही माणसं अशी असतात, जी या स्वर्गाला पुन्हा एकदा प्रेम आणि विश्वासाने उजळून टाकतात. (Kashmiriyat)
-विजय चोरमारे
द्वेषानं खदखदणाऱ्या जगातल्या झुळझुळ वाहणाऱ्या झऱ्यांसारखी असतात काश्मिरची माणसं. काही लोकांना… काही का आता त्यांची संख्या बरीच झालीय. त्यांना प्रेमाची अलर्जी आहे. त्यांचा देह आणि मन द्वेषावर पोसलंय. त्यामुळं तुम्ही कितीही प्रेमाची भाषा करा, ते त्यांचा द्वेषाचा धर्म सोडत नाहीत.
पेहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देश हादरून गेला. काश्मिर खोरे हादरले. देशाच्या एकात्मतेसाठी प्रार्थना करणारा, प्रयत्न करणारा सामान्य माणूस हादरला.
दहशतवादी हल्ल्याच्या अनेक कथा अनेकांनी अनेक त-हेनं सांगितल्या आहेत. त्याकडं बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा आहे. परंतु एक वर्ग असा आहे, ज्याला मेलेल्या माणसांशी देणंघेणं नसतं. घडलेल्या घटनेशी देणंघेणं नसतं. त्यांना आपल्या पक्षाचं राजकारण साधायचं असतं. आपल्याला आठवत असेल. हल्ला झाल्यानंतर तासाभरातच सगळीकडं एक नरेटिव्ह पसरवण्यात आलं. दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या. त्यांनी जात नव्हे धर्म विचारला….. हे नरेटिव्ह प्रचंड वेगानं पसरवण्यात आलं. या हल्ल्याची कारणं, सरकारचं अपयश लपवण्यासाठी त्याचा वापर करण्यात आला. द्वेषानं पछाडलेली माणसं त्यात अनेक स्त्रियाही आहेत, त्यात आघाडीवर आहेत. कुणी मानवतेची, माणुसकीची भाषा केली की लगेच फुत्कारतात…. २६ लोक मरण पावले त्यात आमचे २५ हिंदू होते आणि तुम्हाला मानवता, माणुसकी आठवते का…. (Kashmiriyat)
दहशतवाद्यांच्या आणि त्यांच्या सूत्रधारांचा जो हेतू होता, तो नेमका साध्य झाला होता. आणि हिंदूंचा कैवार घेतलेले लोक दहशतवाद्यांची लाइन पुढं चालवत होते.
एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. दहशतवाद्यांनी धर्म विचारून लोकांना ठार केलं. त्यामागचं षङ्यंत्र लक्षात घ्यायला हवं. महिलांच्या, मुलांच्या डोळ्यादेखत धर्म विचारून गोळ्या घातल्या. म्हणजे हिंदूंना गोळ्या घातल्या. संबंधित महिला आणि मुलांनी पोलिसांना, प्रसारमाध्यमांना, भेटायला आलेल्या नेत्यांना ते सांगितलं. त्यामुळं झालं काय की अलीकडच्या काळात भारतात हिंदू-मुस्लिम विव्देष पसरवण्यासाठी अनेक हिंदू व्यक्ती आणि संघटना सक्रीय आहेत. नितेश राणे हे आपल्याकडचं एक नाव. असे १७६० राणे भाजप आणि संघाने पाळले आहेत. त्यांनी विष पेरलंच आहे. परंतु त्यावर काही जोमदार पीक येईना. दहशतवाद्यांच्या कृतीमुळं ते पीक वाढण्यास मदत झाली. भाजपच्या गावपातळीवरच्या नेत्यापासून दिल्लीतल्या नेत्यापर्यंत अनेकांनी जात नव्हे, धर्म विचारला असा स्टेटस ठेवला. ते बघून अनेक पोरासोरांनी त्याचाच प्रचार केला. मुस्लिमांवर बहिष्काराची मोहीम तीव्र झाली. आपल्याच धर्माच्या लोकांना त्रास होईल, असं काम कुठला कट्टरवादी करेल…. हे पाकिस्ताननं शिकवून पाठवलेले दहशतवादी होते. त्यांनी मुद्दाम धर्म विचारून गोळ्या घातल्या. त्यांना जास्ती माणसं मारायची नव्हती, तर भारतात हिंदू-मुस्लिम द्वेष वाढवायचा होता. धार्मिक हिंसाचार घडेल असं काही करायचं होते. आणि नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर भारतात कच्च्या मडक्यांची पैदास वाढली आहे. त्यांच्यासाठी ही संधीच होती. दहशतवाद्यांना जर दहशतच पसरवायची असती तर ते अंदाधुंद गोळीबार करून पळून गेले असते. काही मिनिटात अनेक पटींनी माणसं, महिला, मुलांना मारून पळून गेले असते. तसं न करता त्यांनी वेचून माणसं मारली. त्यातून त्यांना द्यायचा होता तो संदेश त्यांनी दिला. जे साध्य करायचं होतं ते केलं. भारतातली विद्वेषाची भिंत मजबूत केली. (Kashmiriyat)
भाजपची प्रचारी मशिनरी आपली सगळी ताकद हिंदू-मुस्लिम द्वेष वाढवण्यासाठी लावत होती. सगळे मुस्लिम देशद्रोही आहेत असा प्रचार सुरू झाला होता. काश्मिर खोऱ्यातले सगळे लोक दहशतवाद्यांचे समर्थक आहेत असाही प्रचार करण्यात येत होता. परंतु देशातील सामान्य लोकांनी त्यांच्या या प्रचाराला सुरुंग लावला. हल्ल्यात ज्यांचे आप्त गमावले होते, त्यांनीही काश्मिरी लोकांच्या सहकार्याबद्दल आभारच मानले. काश्मिरमध्ये अडकलेल्या पर्यटकांनी तिथल्या लोकांच्या माणुसकीची वर्णने केली. एकीकडे भाजपपुरस्कृत विद्वेषाला हवा दिली जात असताना दुसरीकडे राजकारणाशी संबंधित नसलेले सामान्य लोक प्रेमाची भाषा बोलत होते. काश्मिर खोऱ्यातले लोकही दहशतवादाचा स्पष्ट निषेध करीत होते.
या सगळ्याच्या दरम्यान एक महत्त्वाचे पाऊल उचलले ते अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी. दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मिरला अवकळा येत असताना नेमकं काय करायला हवं, हे अतुल कुलकर्णी यांनी जाणलं. आणि ते थेट पहेलगाममध्ये पोहोचले.
हिंदोस्तां की ये जागीर है
के डर से हिम्मत भारी है
हिंदोस्तां की ये जागीर है
के नफ़रत प्यार से हारी है
चलिए जी कश्मीर चलें
सिंधु, झेलम किनार चलें
मैं आया हूँ , आप भी आ जाएँ
असं म्हणून त्यांनी काश्मिरला येण्याचं आवाहन केलं. त्याला मोठा प्रतिसाद मिळू लागला. परंतु त्याचवेळी त्याच्या या कृतीमुळं विद्वेषी प्रचार करणारी मंडळी अक्षरशः पिसाळल्यासारखी करू लागली. अतुल कुलकर्णीला ट्रोल करू लागली. त्याची पर्वा न करता त्यानं कश्मिरचा दौरा केला.
काश्मीर आमचं आहे, तर मला इथे जायलाच हवं. भीतीला हरवायचं असेल, तर प्रेम आणि धैर्य हेच उत्तर आहे… असा संदेश देशवासीयांना दिला. काश्मिर खो-यातल्या लोकांना आत्मविश्वास दिला.
अतुल कुलकर्णी यांनी फक्त काश्मीरला भेट दिली नाही, तर तिथल्या लोकांच्या हृदयात आशेचा दीप लावला. त्यांनी सांगितलं, ‘काश्मीर आमचं आहे, आणि आम्ही येणारच!'”(Kashmiriyat)
दिल्लीतलं राजकारणही जोरात होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाच्या दौ-यावरून तातडीनं आले. लोकांना वाटलं काश्मिरला जातील. तिथल्या लोकांच्या जखमेवर फुंकर घालतील. पण ते बिहारमध्ये गेले. तिथं सभा घेतली. कारण लवकरच तिथं विधानसभा निवडणूक होतेय. सर्वपक्षीय बैठकीलाही पंतप्रधान उपस्थित राहिले नाहीत.
या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मिरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचं विधानसभेतलं भाषण विशेष लक्षवेधी ठरतं. एखादा नेता कसा प्रगल्भ होत जातो, याचं उदाहरण म्हणून उमर अब्दुल्ला यांच्याकडं पाहता येतं. गुजरातच्या २००२च्या दंगलीनंतर वाजपेयी सरकारमधून उमर अब्दुल्ला बाहेर पडले होते. तेव्हापासूनचा त्यांचा प्रवास राजकारणाच्या पलीकडं जाऊन अभ्यासण्याचा विषय आहे.
पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे एका दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते. यावेळी सर्वपक्षीय सदस्यांनी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आणि मृतांना श्रद्धांजली वाहिली. आपल्या २७ मिनिटांच्या भाषणात मुख्यमंत्री उमर अब्दुला यांनी संपूर्ण सभागृहाचेच नव्हे तर देशवासीयांची मने जिंकली. त्यांच्या वाक्यांना सत्ताधारी तसेच विरोधी सदस्ये बाके वाजवून अनुमोदन देत होते. त्यावेळी हा बाके वाजविण्याचा नव्हे, तर निषेधाचा आणि एकोपा दाखविण्याचा क्षण असल्याचे अब्दुल्ला यांनी शांतपणे सांगितलं. ‘‘दहशतवादाच्या धोक्याविरोधात जनतेचा संघर्ष मजबूत करण्यासाठी आपले सरकार काम करेल. हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरची जनता उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरली ही बाब आशेचा किरण आहे. त्याच वेळी हल्ल्यानंतर केल्या जाणाऱ्या कारवाईदरम्यान जनता दूर लोटली जाईल अशी पावले उचलणे टाळावे,’’ असे आवाहन त्यांनी केंद्र सरकारला केले.
आपण पर्यटकांना काश्मीरमध्ये येण्याचे आवाहन केले होते, पण त्यांचे रक्षण करू शकलो नाही, मुख्यमंत्री म्हणून हे आपले अपयश असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. जम्मू-काश्मीरची सुरक्षा ही आपल्या सरकारची जबाबदारी नसली तरी आपण या हल्ल्याचा वापर संपूर्ण राज्याचा दर्जा मागण्यासाठी करणार नाही, असेही अब्दुल्ला यांनी स्पष्ट केले.
“पहलगामच्या हल्ल्याने आपलं मन दुखावलं आहे. पण काश्मीर फक्त पर्वत आणि खोऱ्यांचं नाही, काश्मीर म्हणजे इथली काश्मीरियत! आपण सगळे एक आहोत. हा हल्ला आपल्या एकतेवर हल्ला आहे, आणि आपण एकजुटीने त्याला उत्तर देऊ! असे आवाहनही त्यांनी केले.
त्यांनी प्रत्येक भारतीयाला सांगितलं, काश्मीर तुमचं घर आहे. “काश्मीर म्हणजे फक्त निसर्ग नाही, काश्मीर म्हणजे माणुसकी. ३७० कलम हटवल्यानंतर काश्मिरमध्ये जमिनी घेण्याची आणि काश्मिरी मुलींशी लग्न करण्याची भाषा करणारी जमात आता काश्मिरींचा द्वेष करू लागली आहे. त्यांना दहशतवादी ठरवू लागली आहे. तिथं गेलेल्या, जाणा-या पर्यटकांनी जसा त्यांचा अजेंडा हाणून पाडला. यापुढंही तसंच कृतीतून उत्तर द्यायला पाहिजे. कश्मिरमध्ये पुन्हा माणसांचं नंदनवन फुलू दे. काश्मिरचा अवकाश प्रेमानं भरून जाऊ दे. भीतीला हरवून एकतेचा संदेश जगभर पसरू दे…. अशी प्रार्थना करूया.




