राज कुलकर्णी
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील अर्धा मसला गावतील मशिदीत गेल्या आठवड्यात जिलेटीनच्या साह्याने बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला. यात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. कारण स्फोट पहाटे केला गेला. यातील दोन संशय़ित विजय रामा गव्हाणे ( वय 22 वर्षे) आणि श्रीराम अशोक सागडे (24 वर्षे) यांना पोलिसांनी विविध कलमांतर्गत अटक केली असून ते सध्या कोठडीत आहेत. (Beed Mosque Blast)
जिलेटीन ही स्फोटके त्यांनी त्यांच्या खाणकामासाठी विकत घेतली होती. त्याचाच वापर त्यांनी मशिदीत स्फोटासाठी केला आहे. ही मशीद सय्यद बादशाह दर्ग्यापासून जवळ आहे. या दर्ग्याचे सध्या जिर्णोद्धाराचे काम चालू असून या दरम्यान हा स्फोट केला गेला. याची नेमकी कारणे काय होती यांवर पोलिस पुढील तपास करत आहेत.
औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा
महाराष्ट्रात सध्या मुघल बादशाह औरंगजेबची कबर उद्ध्वस्त करण्याची चर्चा सत्ताधारी राजकीय वर्तुळात चालू आहे. संशयितांनी त्यापासून प्रेरणा घेऊन स्थानिक स्तरावर आपणही काही करावे म्हणून हे कृत्य केले असण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे हा स्फोट करण्यापूर्वी संशयितांनी हातात जिलेटीनच्या कांड्या घेऊन एक रील बनवून ते समाज माध्यमात प्रकाशित केले होते. अशी माहीती समोर आली आहे. आपणच करत असलेल्या गुन्ह्याचे चित्रीकरण करण्याचा अजब शिरस्ता बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांमध्ये वाढला आहे. तो ते कुठून शिकले, हे कळायला मार्ग नाही. पण अनेक दहशतवादी वा त्यांच्या संघटना ज्याप्रमाणे गुन्हेगारी घटनेची स्वत:हून जबाबदारी घेतात तसा हा काहीसा प्रकार आहे. ज्यात स्वत:ची दखल घ्यावी हा हेतू असतो. त्याचबरोबर आपले हे गुन्हेगारी कृत्य गौरवास्पद आहे हे दर्शवण्याचाही हा प्रकार असतो.
पोलिस याचा पूर्ण तपास करतील ही अपेक्षा. संशयितांनी हे कृत्य स्वत:हून केले की ते केवळ प्यादे होते? त्यांच्याकडून हे कृत्य कोणी करवून घेतले काय? याबद्दल योग्य तो अहवाल चार्जशीट स्वरूपात न्यायालयात मांडतील. आणि आरोपींना न्यायालय योग्य ती शिक्षा देईल, अशी आशा करूया. (Beed Mosque Blast)
खरे गुन्हेगार वेगळेच
अशा घटना घडल्यावर सरकारने काय करायला हवे, काय केले, काय केले नाही वगैरे नंतर बघू. आधी विचार या दोन युवकांचा करूया. दोघांनीही वयाची पंचविशीही ओलांडलेली नाही. ज्या वयात काही उमेदीने आयुष्य घडवून आई वडिलांना सुखी करण्याची स्वप्ने पहायची असतात त्या वयात गुन्ह्यात अटक झाली आहे. त्यामुळे या दोन्हीही मुलांचे भविष्य अंधःकारमय झाले आहे. उत्तम शिक्षण घेऊन चांगले करिअर घडवायचे सोडून ही मुले या मार्गाला का लागली? गुन्ह्याची शिक्षा त्यांना मिळेल. पण, मुलांच्या बाजूने विचार केला तर जाणवते की, ही मुले देखील पीडित आहेत खरे गुन्हेगार आहेत कट्टर धर्मांधतेतून या मुलांच्या मनात मुस्लिम द्वेषाचे विष ओतणारे लोक.
जगातील सर्वच धर्मसंस्थांनी धर्मासाठी मरण किंवा बलिदान, धर्मासाठी सुखी जीवनाचा त्याग या संकल्पनांचा प्रचार केला. यातून मध्यपूर्वेत ‘क्रूसेड्स’सारखी धर्मयुद्धांसाठी निष्ठावंतांची फौज उभी राहिली. यासाठीच कदाचित अब्राहमने आपल्या मुलाचाच बळी देण्याची तयारी दाखवली असेल! आपल्या परंपरेतील विविध ग्रंथांत राजासाठी, धर्मासाठी बलिदानाच्या कथा आहेत. तरुणांना भडकवण्यासाठी आकर्षक मुलामा देऊन ही उदारणे वापरली जातात. वातावरण निर्मिती केली जाते. त्यामुळेद्वेषाच्या भावनेने झपाटलेले तरूण धर्मासाठी, कधी जाणतेपणे तर कधी अजाणतेपणाने स्वत:च्या जीवनाची राखरांगोळी करतात.
स्वधर्म प्रेमातून परधर्म द्वेषाकडे
स्वधर्मप्रेम परधर्मद्वेषाकडे, स्वदेशप्रेम परदेशाविषयीच्या शत्रुत्वभावनेकडे घेऊन जाते. याने आपलाच घात होत आहे, हे समजेपर्यंत खूप उशीर झालेला असतो. मग मिसरूडही न फुटलेला अजमल कसाब स्वत:चा, आपल्या आई-वडिलांचा विचार न करता निरापराध लोकांना मारण्यासाठी आणि स्वत: मरण्यासाठी तयार होतो. धर्मांध लोक कसाबसारख्यांचे उदात्तीकरण करतात. विद्वेषाचे आणखी आत्मघातकी बळी तयार करतात. धर्मांधांना ना या तरूणांच्या जीवनाची काळजी ना या तरूणांनी ज्यांचे जीवन उद्ध्वस्त केले आहे त्यांची. कारण मुळात हे धर्मांध मानवी जीवनाचेच द्वेष्टे असतात. नथुरामने गांधीजींना मारले त्यावेळी त्याने चाळिशीही ओलांडलेली नव्हती. त्याला ना गांधीजीच्या जिवाचे मोल कळले, ना स्वत:च्या. (Beed Mosque Blast)
लाहोरच्या इल्मुद्दीनचे प्रकरण
स्वातंत्र्यपूर्व भारतात घडलेल्या इल्मुद्दीन खटल्याची ही घटना. लाहोरमध्ये १९२६ च्या आसपास एका उर्दू दैनिकात एका धर्मांध मुस्लिमाचे सीतामातेबद्दल आक्षेपार्ह लेखन प्रकाशित झाले. त्याला विरोध म्हणून कृष्णप्रसाद प्रताप यांनी ‘चंपूपती’ या टोपण नावाने प्रेषित महंमदाबद्दल त्याच पद्धतीचे आक्षेपार्ह पुस्तक लिहिले. ते लाहोरमधील राजपाल नावाच्या प्रकाशकाने प्रकाशित केले. इल्मुद्दीन हा लाहोरला राहणारा अवघ्या १९-२० वर्षांचा सुतारकाम करणारा मुलगा.
घरासमोरील मशिदीत या पुस्तकाचा निषेध करण्यासाठी जमलेल्या गर्दीतली मुल्ला मौलवींची विखारी, भडकवणारी भाषणे-घोषणा ऐकून इल्मुद्दीनने, पुस्तक न वाचताच, राजपालला ठार मारण्याचे ठरवले. सहा सप्टेंबर १९२९ ला इल्मुद्दीनने राजपालची हत्या केली. न्यायालयाने त्याला मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली. त्यावेळी इल्मुद्दीनच्या समर्थनार्थ अनेक मिस्लीम विचारवंतांनी लेख लिहिले. प्रेषितांची बदनामी करणाऱ्या व्यक्तिला ठार मारण्याचा अधिकार प्रत्येक मुसलमानाला आहे. इतकेच नव्हे तर अशा व्यक्तीला ठार मारणे, हे त्याचे आद्य कर्तव्यच आहे असा त्या लेखांचा सूर होता!
बुलीबाय प्रकरण
आज भारतात,एखादा धर्मांध मुस्लिम नेता हिंदूंची कत्तल करण्याची वल्गना करतो. तर कोणी धर्मांध हिंदूनेता राष्ट्रनिर्मितीसाठी मुस्लिमांना संपवण्याची प्रतिज्ञा करायला लावतो. अशी भाषणे, वक्तव्ये तरूणांना गुन्हेगार बनवण्याची कारणे ठरत आहेत. आजच्या ‘चोवीस तास राजकारणा’च्या काळात लोकांच्या मनात विशिष्ट धर्माचा, जातीचा द्वेष पेरला जात आहे. विशेषतः, मुस्लिम धर्मीयांच्या विरोधातील कुठल्याही कृत्याचे, गुन्हेगारी कृत्याचेदेखील समर्थन केले जात आहे. कांही वर्षापूर्वी जवळपास शंभर मुस्लिम महिलांचे फोटो निवडून, फोटोशॉपने नग्न करून बुलीबाय नावाच्या अॅपमार्फ त्यांचा लिलाव केल्याचे गुन्हेगारी कृत्य केले गेले होते. (Beed Mosque Blast)
ज्या महिलांचे फोटो वापरले, त्या सरकार दरबारी न्याय मागणाऱ्या किंवा सामाजिक कार्यकर्त्या किंवा पत्रकार तसेच केंद्र सरकारच्या धोरणांना विरोध करणाऱ्या आहेत. त्यातल्या काहीजणी तर पन्नाशी-साठीच्या होत्या. या गुन्ह्यात आरोपी म्हणून अटक झालेले अवघ्या २१ वर्षांचे मयंक रावळ आणि विशाल झा आणि फक्त १८ वर्षांची श्वेता सिंग. त्यावेळेचे बुलीबाय असो आजचे हे बॉम्बस्फोटातील आरोपी. अशा कृत्याचे समर्थन करण्याने नवे तरुण गुन्हेगारीत ओढले जाऊ शकतात, याची त्यांना जाणीवही नाही. या घटने प्रमाणेच शाहीनबागेत बुरखा घालून आंदोलनाला बदनाम करण्यासाठी घुसलेली मुलगी किंवा दिल्लीमध्ये चक्क पोलिसांसमोरच गोळीबार करणारा मुलगा अशी अनेक उदाहरणे सांगता येतील.
धर्मांध राजकारणाचा परिणाम
महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत, शेतकरी आत्महत्या असो वा पीकविमा नि कर्जमाफी, बेरोजगारी असो वा भूसंपादन. पण चर्चा चालते परस्परांची धर्मस्थळे उध्वस्त करण्याची. धर्मांध राजकारणाचा भयानक परिणाम असा की, भारतीय लोक हे ‘भारताचे नागरिक’ राहिलेले नसून ते कुण्या पक्षाचे समर्थक, कार्यकर्ते वा मतदार झालेले आहेत. हे आजचे भयान वास्तव आहे. आपल्या भविष्याचा आपल्या आई-वडिलांच्या अपेक्षांचा अजिबात विचार न करता गुन्हेगारी कृत्य करण्याचे धाडस या मुलांनी केले असेल, तर त्यांच्या मनात इतकी द्वेषाची पेरणी कशी आणि कुठून होते, याचा विचार इतर मुलांच्या पालकांनी करणे आवश्यक आहे
भारत हे नाव महान चक्रवर्ती सम्राट भरतामुळे मिळाले, असे आपण मानतो. त्या सम्राटाच्या कुळातील सर्वच वंशज तरुणपणीच केवळ सूडाच्या नि विद्वेषाच्या आगीने होरपळून नष्ट झाले. सूडभावनेचा शेवट असा आत्मघातकीच होत असतो. हे भारतीय नागरिकांनी लवकर लक्षात घ्यावे. (Beed Mosque Blast)
तरुण मुले हे देशाचे भविष्य असते. पण धर्मांध राजकारण्यांसाठी ही तरुण मुले म्हणजे राजकीय स्वार्थ साधण्यासाठीची निव्वळ शस्त्रे आहेत. प्रत्येक सजग भारतीय नागरीकाने आपल्या येणा-या पिढीतील मुला-मुलींच्या उज्वल भविष्याचे मोल जाणून त्यांना या धर्मांधतेच्या विषापासून, नशेपासून दूर ठेवूया. भारताचे भविष्य घडवूया.