मुंबई : प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना टीव्हीवरही जाहिरात बंधनकारक असल्याचे देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी शनिवारी स्पष्ट केले. तसेच निवडणुका एका टप्प्यात होणार की दोन टप्प्यात होणार हे आम्ही योग्य वेळी जाहीर करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेत ते म्हणाले, ‘‘ज्या उमेदवारांवर तीन गुन्हे दाखल असतील त्या उमेदवारांना प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये जाहिरात प्रसिद्ध करावी लागेल. त्याबाबत डिक्लरेशन द्यावे लागेल. याशिवाय संबंधित राजकीय पक्षांनाही अशा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवाराला तिकीट का दिले, याबाबतची जाहिरात द्यावी लागेल. तब्बल तीन दिवस प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये अशी जाहिरात प्रसिद्ध करावी लागेल. अन्यथा संबंधित उमेदवारावर कारवाई करण्यात येईल.’’
दरम्यान, राज्यातील विधानसभा निवडणुका दिवाळीनंतरच घेण्यात येणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. निवडणूक कार्यक्रम जाहीर करताना दसरा, दिवाळी आणि सुट्ट्यांचा अंदाज घ्यावा, अशा सूचना राजकीय पक्षांनी केल्या आहेत. त्यांचा विचार करण्यात येईल, असे ते म्हणाले.
महाराष्ट्र
कोल्हापूर : प्रतिनिधी
करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मंदिरातील गाभाऱ्याची स्वच्छता शनिवारी पूर्ण झाली. त्यानंतर संध्याकाळपासून नियमीत दर्शन सुरू झाले. येत्या दोन ते तीन दिवसांत मंदिर परिसरातील स्वच्छतेचे काम पूर्ण होईल. मंदिराच्या आवारात गरुड मंडपाची प्रतिकृती उभारण्याचे काम सुरू झाले आहे.
मंदिरातील चांदीच्या पालखीची स्वच्छता करण्यात आली. देवीच्या खजिन्यातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांची स्वच्छता सुरू आहे. ते काम रविवारी, २८ सप्टेबरला पूर्ण होणार आहे. मंदिराच्या पूर्वेला दर्शनरांग उभारण्यात आली आहे. ऊन आणि पावसाची लक्षात घेऊन या ठिकाणी पंखे, इलेक्ट्रिक सुविधा आणि मॅट टाकण्यात येणार आहे. माहिती कक्ष, लाडू प्रसाद सुविधा देण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. उत्सवकाळातील भाविकांची गर्दी लक्षात घेऊन तातडीने गरुड मंडपाच्या जागी छत उभारण्यात आले आहे. त्याचे उर्वरित काम एक-दोन दिवसांत पूर्ण होईल.
टेंबलाई मंदिर परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा
दरम्यान, टेंबलाई मंदिर परिसरात सुरक्षेच्यादृष्टीने सीसीटीव्ही यंत्रणा उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्यावतीने हे काम सुरू आहे. नवरात्रोत्सवात ललित पंचमीचा उत्सव टेंबलाई मंदिरात होतो. त्यादृष्टीने या यंत्रणेचा उपयोग पोलिस प्रशासन व देवस्थान समितीला होणार आहे.
कोल्हापूर : प्रतिनिधी
जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशैक्षणिक कामांचा बोजा कमी करावा व कंत्राटी शिक्षक नेमणुकीचा आदेश तत्काळ रद्द करावा, या प्रमुख मागण्यांसह हजारो शिक्षकांनी शुक्रवारी, दि. २७ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. जिल्हयातील शैक्षणिक संघटनांनी शाळा बंद ठेवून यात सहभाग घेतला.
कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ व मुख्याध्यापक संघ, शिक्षण संस्था चालक संघ, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हा महामोर्चा काढण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन देण्यात आले.
शिक्षणाचे कंत्राटीकरण रद्द करा, अशैक्षणिक कामे रद्द करा, शिक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, शिक्षण क्षेत्र उद्ध्वस्त करू नका, शिक्षणावरील बजेट वाढविलेच पाहिजे, आदी घोषणांनी मोर्चाचा मार्ग दणाणून गेला. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. या सभेत एस. डी. लाड, दादा लाड, अनिल लवेकर, भरत रसाळे, राजाराम वरुटे, प्रसाद पाटील, रवी पाटील, आर. वाय. पाटील, आदींची भाषणे झाली. सूत्रसंचालन उमेश देसाई यांनी केले.
या प्रसंगी चेअरमन राहुल पवार,बाळ डेळेकर, बी. जी. बोराडे, सुधाकर निर्मळे, खंडेराव जगदाळे, बाबा पाटील, प्रा. सी. एम. गायकवाड, सुधाकर सावंत, उमेश देसाई, उदय पाटील, के. के. पाटील, राजेंद्र कोरे, संतोष आयरे, गौतम वर्धन, मिलींद बारवडे आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.
शिक्षकांच्या प्रमुख मागण्या
अन्यायकारक संच मान्यता शासन आदेश रद्द करावा, कंत्राटी शिक्षक नियुक्तीचा आदेश तत्काळ रद्द करावा, जुनी पेन्शन योजना सर्वांना लागू करावी. विना अनुदानित शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे टप्पावाढ आदेश त्वरित काढावेत, आधारकार्ड आधारित शिक्षक पद निर्धारण धोरण रद्द करावे, शिक्षकांवरील अशैक्षणिक कामे कमी करावीत, प्राथमिक शाळेला अंगणवाडी जोडावीत, उपक्रमांचा भडीमार बंद करावा, पदवीधर शिक्षकांना वेतणश्रेणी लागू करा टप्पा अनुदान शाळांना पुढील अनुदानाचे टप्पे तत्काळ मिळावेत, शिक्षकांची अशैक्षणिक कामे बंद करावीत.
वारणानगर : प्रतिनिधी
जातीवंत म्हैशीच्या पैदाशीसाठी मेहसाना आणि मुऱ्हा म्हैशी वारणा दूध संघामार्फत खरेदी करण्यात येणार आहेत. तसेच संघाच्या कार्यस्थळावर विक्री केंद्रही सुरू केले जाईल. या केंद्रातून म्हैस खरेदी करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना ४२ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा संघाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी केली. देशातील असे पहिलेच केंद्र असल्याचे त्यांनी सांगितले. दूध संघाला ५९ कोटींचा ढोबळ नफा झाल्याचे सांगून कोरे यांनी पुढील वर्षी पशुवैद्यकीय आणि डेअरी टेक्नॉलॉजी कॉलेज सुरू होणार असल्याची माहिती दिली.
वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघाच्या ५६ व्या वार्षिक सभेत डॉ. कोरे बोलत होते.
डॉ. कोरे म्हणाले, म्हैस आणि गाय दूधात प्रचंड तफावत आहेत. म्हैशीच्या दुधाचीच उत्पादने बनवली जातात. त्यामुळे वारणानगर येथील केंद्रावर सुमारे ४०० ते ५०० म्हैशींचा गोठा तयार करण्यात येणार आहे. परराज्यातूंन मेहसाना आणि मुऱ्हा जातीच्या म्हैशी संघामार्फत खरेदी केली जाणार आहेत. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना म्हैशी खरेदी करण्यासाठी लागणारा वेळ, वाहतूक खर्च आणि होणारी फसवणूक टळणार आहे.
वारणा संघाचे दूध भारतीय सैन्यदलात, आदीवासी समाजातील मुलांना सुगंधी दूध पुरवठा, मेट्रो, शताब्दी, राजधानी व वंदे मातरम एक्स्प्रेस या रेल्वेमध्ये वारणाची उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध केली आहेत. मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात दूध पुरवठा करण्याचे टेंडरही संघाला मिळाले आहे. रिलायन्स, डी मार्ट या मॉलच्या माध्यमातून १९ कोटींची विक्री झाल्याचेही कोरे यांनी सांगितले.
कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी स्वागत केले. वारणा समूह विद्यापीठ मंजूर झाल्याबद्दल आमदार डॉ. कोरे यांचा सत्कार करण्यात आला. सहकारमहर्षि तात्यासाहेब कोरे यांना पद्मभूषण पुरस्कार मिळण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे प्रस्ताव पाठवावा, असा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला.
रश्मी शुक्लांना हटवा; काँग्रेस शिष्टमंडळाची निवडणूक आयोगाकडे मागणी
मुंबई : प्रतिनिधी, विधानसभेच्या आगामी निवडणुका निष्पक्षपातीपणे पार पाडण्यासाठी वादग्रस्त आणि सरकारी पक्षाला मदत करणारे अधिकारी हटवले पाहिजेत. (Maharashtra Politics) राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची कारकीर्द संशयास्पद आणि वादग्रस्त आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांना धमकावणे, विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोन टॅपिंग करण्यासारखे प्रकार त्यांनी केले आहेत. त्यांच्यावर गुन्हेही दाखल झाले आहेत. त्यामुळे निवडणुका पारदर्शक आणि निष्पक्षपातीपणे पार पडण्यासाठी शुक्ला यांना हटवावे, अशी मागणी काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली.
वादग्रस्त आणि सत्ताधारी पक्षाला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही हटवावे
महाराष्ट्र दौऱ्यावर असलेले देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची काँग्रेसच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. त्यांना निवेदन देण्यात आले. शिष्टमंडळात प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मुनाफ हकीम आणि डॉ. गजानन देसाई यांचा समावेश होता. शुक्ला यांच्यासह वादग्रस्त आणि सत्ताधारी पक्षाला मदत करणाऱ्या इतर अधिकाऱ्यांनाही हटवावे, अशी मागणी आम्ही आयोगाकडे केल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले, ‘‘ शुक्ला यांची सेवा समाप्त झाली असतानाही भाजप-युती सरकारने त्यांना दोन वर्षांची मुदतवाढ दिली आहे. सरकारला अनुकूल भूमिका घेऊन त्या मदत करतात. असे वादग्रस्त व संशयास्पद अधिकारी निवडणूक काळात नसावेत अन्यथा निवडणूक निष्पक्ष होणार नाही, याकडे निवडणूक आयुक्तांचे लक्ष वेधले आहे. त्यावर निवडणूक अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.’’
महाराष्ट्रात कायदा–सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे : पटोले
महाराष्ट्रात कायदा–सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. मंत्रालयातील गृहमंत्र्यांच्या कार्यालयाची एका महिलेने तोडफोड केली. राज्याचे गृहमंत्रीच सुरक्षित नसतील तर जनता कशी सुरक्षित असेल, असा प्रश्न पटोले यांनी उपस्थित केला. भाजपा युती सरकारने विकासाच्या नावावर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली आहे, विकास कुठेच दिसत नाही पण निवडणुकीच्या तोंडावर जनतेमध्ये सरकारची स्वच्छ व विकास केल्याची प्रतिमा मीडियातून दाखवण्यासाठी एका आयएएस अधिकाऱ्यामार्फत मीडियाच्या प्रमुख व्यक्तींना बोलावून टार्गेट दिले जात आहे. यासाठी एमएसआरडीसी, एमएमआरडीए, म्हाडा,
पावसामुळे राज्यातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. गेल्या तीन चार दिवसांत ३३ हजार हेक्टरवरील पिके पाण्यात गेली आहेत. शेतकरी संकटात आहे पण सरकारने अद्याप मदत दिलेली नाही. मुंबईतील नालेसफाईच्या कामात जातीने लक्ष घातल्याने मुंबई तुंबणार नाही, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळी एका कार्यक्रमात केला आणि संध्याकाळी झालेल्या पावसात मुंबई तुंबली, मुंबईचे जनजीवन ठप्प झाले. अवकाळी पावसासारखे भाजपा युती सरकारही अवकाळीच आहे, असा टोलाही पटोले यांनी लगावला.
Maharashtra Politics : खाजगी जागेतील मतदान केंद्र रद्द करा
यावेळी बोलताना काँग्रेस सरचिटणीस मुनाफ हकीम यांनी खासगी सोसायट्यांमध्ये मतदान केंद्र सुरु करण्याला काँग्रेस पक्षाचा विरोध आहे. मतदान हे सरकारी इमारतीतच झाले पाहिजेत. तसेच मतदानाची आकडेवारी देणारे 17 C फॉर्म मतदानानंतर लगेचच मतदान प्रतिनिधींना देण्यात यावेत, अशी भूमिकाही मांडल्याचे सांगितले.
हेही वाचा
कोल्हापूर; प्रतिनिधी : धुळ्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री रोहिदास चुडामण पाटील (वय ८४) यांचे आज (दि.२७) सकाळी धुळे येथे निधन झाले. काँग्रेसचे धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांचे ते वडील होत. त्यांच्यावर उद्या (दि.२८) सकाळी धुळ्यातील एस.एस.व्ही.पी.एस. कॉलेजच्या मैदानात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ( Rohidas Patil )
गेल्या फेब्रुवारी महिन्यात रोहिदास पाटील ( Rohidas Patil ) त्यांच्या कोल्हापुरातील मुलीला भेटण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांची प्रकृती अचानक बिघडली होती. त्यांना उपचारासाठी तत्काळ खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना फुप्फुसाचा आजार असल्याचे निदान झाले होते. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. उपचारानंतर धुळ्याला परतले होते. मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नव्हती. त्यांच्यात पश्चात पुत्र, आमदार कुणाल पाटील आणि विनय पाटील, मुलगी स्मिता पाटील असा परिवार आहे. कोल्हापुरातील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर पाटील यांचे ते सासरे होत.
आभाळ कोसळले!!
आमचे वडील आदरणीय दाजीसाहेब आज आपणा सर्वांना सोडून गेले.🥺 सातत्याने ५ दशके येथील माती आणि माणसे समृध्द व्हावी म्हणून मांडलेला लोकसेवेचा झंझावात आज शांत झाला आहे. उत्तर महाराष्ट्र आणि धुळे जिल्ह्याला आकार प्राप्त व्हावा यासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले.
आदरणीय… pic.twitter.com/6g3FU9sFvI
— Kunal Patil (@Kunal_R_Patil) September 27, 2024
हेही वाचा :
सतीश घाटगे
कोल्हापूर:
भाजपचे चाणक्य आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बुधवारी, २५ सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांनी कमळाबरोबरच ज्या मतदार संघात मित्रपक्षांना जागा जाईल त्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान केले पाहिजे, असे बजावले. घड्याळ आणि धनुष्यबाणाला मतदान केले नाही तर आपले सरकार सत्तेवर येणार नाही, याची जाणीव ठेवली पाहिजे, या शब्दांत त्यांनी भाजपचे प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांसमोर भूमिका स्पष्ट केली. त्यांची ही भूमिका राज्यातील प्रमुख मित्रपक्ष शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट यांना आश्वस्त करणारी ठरली आहे.
भाजपचा पश्चिम महाराष्ट्र कार्यकर्त्यांचा मेळावा कोल्हापुरात पार पडला. यावेळी अपक्ष आमदार प्रकाश आवाडे आणि त्यांचे पुत्र राहुल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे भाजपने पश्चिम महाराष्ट्रात बाजी मारल्याचे मानले जात आहे. विधानसभा तोंडावर असताना आवाडेंच्या प्रवेशाने इचलकरंजीसह हातकणंगले मतदारसंघात भाजपचे बळ वाढणार आहे.
मेळाव्यात अमित शहा यांनी कार्यकर्त्यांच्या मनातील नैराश्य घालवून त्यांना आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न केला. लोकसभा निवडणुकीत भाजपचा ‘४०० पार’चा नारा होता. मात्र भाजपला २३८ जागा मिळाल्या. त्यामुळे काही प्रमाणात कार्यकर्ते नाराज होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा विक्रम केल्याचे कार्यकर्त्यांच्या मनावर ठसवून देण्याचा प्रयत्न शहा यांनी केला. गेल्या दहा वर्षात मोदींच्या नेतृत्वाखाली जगात भारताचा दबदबा वाढला आहे. लोकसभा निवडणुकीवेळी विरोधकांनी घटना बदलणार, आरक्षण जाणार, असा अपप्रचार केला. त्यामुळे आपल्या जागा घटल्या. पण विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हला लोकोपयोगी योजनांतून विधानसभा निवडणुकीत उत्तर देण्याचे आवाहन शहा यांनी कार्यकर्त्यांना केले. गेल्या तीन लोकसभा निवडणुकांमध्ये मिळून काँग्रेसला जेवढ्या जागा मिळाल्या त्यापेक्षा जास्त जागा २०२४ च्या निवडणुकीत भाजपला मिळाल्या, याकडे शहा यांनी लक्ष वेधले. निवडणूक जिंकण्यासाठी भाजप लढत नाही. भारताला महासत्ता बनवण्यासाठी, आत्मनिर्भर बनवण्यासाठी भाजप लढतो, याचा पुनरुच्चारही केला.
उद्धव ठाकरेंवर टीका टाळली
अमित शहा यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणे टाळले. दुसरीकडे काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नेहमीप्रमाणे टीकास्त्र सोडले. शरद पवार यांना नेस्तानाबूत केल्यावरच राज्यात भाजपची विजयी मालिका सुरू होणार आहे, असे सांगताना विधानसभा निवडणुकीत शरद पवार हेच लक्ष्य असणार असा सूचक इशारा देण्यासही ते विसरले नाहीत. आगामी हिवाळी अधिवेशनात वफ्फ बोर्डासंबंधी विधेयक मंजूर करणारच. राहुल गांधी यांनी ते रोखून दाखवावे, असे आव्हान त्यांनी दिले.
पवार, ठाकरे गटाचे कार्यकर्ते फोडा
राष्ट्रवादी शरद पवार, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नाराज कार्यकर्ते फोडा, असे जाहीर आवाहन शहा यांनी केले. विरोधी पक्षातील लोक आपल्या पक्षात आले तर भाजप कार्यकर्त्यांचे काय होणार, अशी भीती बाळगू नका. गेली दहा वर्षे आम्ही तुम्हाला काय देऊ शकलो नाही तर विरोधी पक्षातून आलेल्यांना काय देणार, असा प्रश्न त्यांनी केला. शहा यांनी हे वक्तव्य करण्यापूर्वीच आवाडे पितापुत्रांना पक्षात प्रवेश दिल्याने शहा यांचे वक्तव्य कोणासाठी, असा प्रश्नही कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला असावा. आवाडे पितापुत्रांना व्यासपीठावर आणण्याची जबाबदारी माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्यावर देऊन पक्षशिस्त, पक्षनिष्ठा कशी बाळगली जाते, असा उदो उदो सभागृहात केला जात असला तरी ही बाब कार्यकर्त्यांना चांगलीच खटकल्याचे बोलले जात आहे.
पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला जादा जागा मिळतील, असा विश्वास अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. लोकसभेतील नॅरेटिव्ह कमी करुन दलित, आदीवासींसाठी विविध योजना राबवल्याने ते मतदार भाजपकडे वळतील. लाडकी बहीण योजनेमुळे महिलांची मते भरभरुन मिळतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. त्याचवेळी महिला प्रामाणिक असतात तर पुरुष बेईमान असतात, असे वक्तव्य केले. त्यांचे हे वक्तव्य अंगलट येणार की मतदार ते खिलाडूवृत्तीने स्वीकारतील, ते पहावे लागेल.
एकंदरीतच शहा यांनी निवडणुका जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला असला तरी जागावाटप झाल्यानंतर तळागाळातील कार्यकर्ता पक्षाचा प्रचार कसा करणार, यावर भाजपचे यश अवलंबून राहणार आहे.
. . . . . .
- सतीश घाटगे
कोल्हापूर: करवीर नगरीला आता शारदीय नवरात्रोत्सवाचे वेध लागले आहेत. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्री अंबाबाई मंदिरात युद्धपातळीवर उत्सवाची तयारी सुरू आहे. मंदिरातील जुना गरुड मंडप उतरवण्यात येत आहे. पण नवरात्रोत्सवात गरुड मंडपाचा फील येण्यासाठी गरुड मंडपाची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. गणेशोत्सवाची सांगता झाल्यानंतर करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरातील नवरात्रोत्सवाची तयारी जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भातील बैठकांचे सत्र सुरू आहे.
गरुड मंडपाची प्रतिकृती उभारणार
मंदिराच्या पश्चिमेला असलेल्या नक्षीदार कमानीच्या गरुड मंडपातील लाकडी खांबांना वाळवी लागली आहे. तो धोकादायक बनल्याने उतरवण्यात येत आहे. वैशिष्ट्यपूर्ण गरुड मंडपामुळे मंदिराच्या सौंदर्यात भर पडते. दर शुक्रवारी तसेच नवरात्रोत्सवात प्रत्येक दिवशी देवीची पालखी गरुड मंडपातील सदरेवर विराजमान होते.
जीर्ण झालेला गरुड मंडप उतरवण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. असून नवरात्रोत्सवात गरुड मंडपाची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. या ठिकाणीच देवीची पालखी आणि नियमित विधी होणार आहेत.
-शिवराज नायकवडे, सचिव, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती.
महाद्वारात उभे राहिले की गरुड मंडपातून थेट समोर अंबाबाईचे मुखदर्शन घडते. नवरात्रोत्सवात गरुड मंडपाची उणीव भासू नये म्हणून देवस्थान समितीने गरुड मंडपाची हुबेहूब प्रतिकृती उभारण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आठवड्यात सपाटीकरण झाल्यावर नक्षीदार खांब, कौलारु छप्पर असलेला मंडप उभारण्यात येणार आहे. या प्रतिकृतीच्या ठिकाणी उत्सवकाळात अंबाबाईची पालखी विराजमान होणार आहे. शिवाय येथून पूर्वीप्रमाणेच मुखदर्शनाची सोय करता येईल का, याची चाचपणी करण्यात येणार आहे.
यंदा भाविकांची संख्या वाढणार
शनिवार, रविवार आणि सलग सुट्ट्या, दोन शुक्रवार आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदा भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. ते लक्षात घेता गतवर्षी प्रमाणे यंदाही दर्शनरांगेची सोय शेतकरी संघाच्या बझारमध्ये करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. उत्सवकाळात पावसाची शक्यता आणि ऑक्टोबर हिटचा विचार करुन शेतकरी बझारमध्ये दर्शन मंडप उभारण्यासाठी जिल्हा प्रशासन आग्रही आहे.
महापालिकेच्यावतीने मंदिर परिसरातील रस्त्यांच्या डागडुजीचे आणि पॅचवर्कचे काम करण्यात येणार आहे. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन नऊ ठिकाणी पार्किंगची सोय करण्यात येणार आहे. शहरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी रिंगरोडवर वाहने थांबवण्याचा विचार सुरू आहे. केएमटीने भाविकांसाठी शटल सर्व्हिस द्यावी, अशी सूचनाही पुढे आली आहे. भाविकांसाठी ६४ ठिकाणी स्वच्छतागृहांची सोय करण्यात येणार आहे. सुरक्षेच्यादृष्टीने सीसीटीव्हींची संख्या वाढवण्यात येणार आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
अंबाबाई मंदिरात सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यासाठी १५० हून अधिक संस्था आणि कलाकारांचे अर्ज आले आहेत. या अर्जांची छाननी करण्यात येत आहे. नऊ दिवसांत १०० संस्थांना देवीच्या दरबारात आपली सेवा देण्याची संधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे.
कोल्हापूरः डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी बांधकाम क्षेत्रात दिलेले योगदान अतुलनीय आहे. एखादा इंजिनियर किवा आर्किटेक्ट किती गतीने व भव्य काम करू शकतो याची प्रचिती त्यांनी आपल्या कामातून दिली आहे. बांधकाम क्षेत्रासाठी त्यांनी दिलेले योगदान हे कोल्हापूरच नव्हे तर देशभरातील इंजिनिअर्ससाठी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक असल्याचे गौरवोद्गार जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी काढले. असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट अँड इंजनिअर्स कोल्हापूरच्यावतीने हॉटेल सयाजीच्या मेघ मल्हार सभागृहात आयोजित ‘इंजिनिअर्स डे’ कार्यक्रमात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते डॉ. संजय डी. पाटील यांना असोसिएशनचे मानद सदस्यत्व प्रदान करून सन्मानित करण्यात आले. असोसिएशनच्या ५३ वर्षांच्या इतिहासात हा सन्मान मिळवणारे डॉ. पाटील हे तिसरे सन्मानमूर्ती ठरले आहेत.
डॉ. संजय डी. पाटील यांचे कार्य अतुलनीयः जिल्हाधिकारी
यावेळी बोलताना डॉ. संजय डी. पाटील यांच्या कार्याचा गौरव करताना जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, डॉ. संजय डी. पाटील यांनी केलेल्या कामाचे कॅल्क्युलेशन केले असता त्यांनी आजपर्यंत एक हजार एकर एरिया कव्हर करेल एवढे प्रचंड बांधकाम केले आहे. त्याशिवाय आणखी पाचशे एकर एरिया व्यापेल असे काम सुरू आहे. हे सर्व काम बघता त्यांनी किती तास काम केले असेल? या सर्वातून किती मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून दिला याचा विचार केला तर हे सर्व काम अतुलनीय असेच आहे.
कोल्हापुरातील पर्यटन विकास असो की पूरस्थिती किंवा नागरिकांच्या कोणत्याही समस्या सोडविण्यासाठी आर्किटेक्ट अँड इंजिनिअर असोसिएशनचे नेहमीच मोठे योगदान असते. कोल्हापूरच्या विकासात संघटनेचे मोठे योगदान आहे. जिल्ह्याच्या प्रगतीसाठीच्या कोणत्याही प्रकल्पात तांत्रिक सहाय्य व अन्य मदतीसाठी असोसिएशन नेहमीच अग्रभागी राहिले आहे. यापुढेही असोसिएशनचे असेच सहकार्य राहील याची खात्री असल्याचे जिल्हाधिकारी येडगे यांनी सांगितले.
मेडिकल कॉलेजच्या सर्वाधिक उंच इमारतीचे काम हाती
डॉ. संजय पाटील म्हणाले, शिक्षण क्षेत्राबरोबरच बांधकाम क्षेत्राची सुरुवातीपासूनच प्रचंड आवड असल्याने आर्किटेक्ट आणि इंजिनिअर्स यांच्याशी नेहमीच अटॅचमेंट आहे. या संघटनेचा भाग होण्याची संधी यानिमित्ताने मिळाली आहे. गेल्या चाळीस वर्षांत अडीच हजाराहून अधिक सिव्हील इंजिनिअर्स आणि दोन हजाराहून अधिक आर्किटेक्ट आमच्या संस्थेतून पास आउट झाले आहेत. आर्किटेक्चर विभागाचा निकाल नेहमीच १०० टक्के लागत असून १६ विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल मिळवले आहे. आमच्या माजी विद्यार्थ्यांचे कन्स्ट्रक्शन क्षेत्रात मोठे योगदान आहे. कोल्हापूरच्या विकासात आणि प्रगतीत असोसिएशनचे मोठे योगदान असून यापुढेही कोल्हापूरच्या विकासात सदैव पुढाकार घेईल याची आपल्याला खात्री आहे.
प्रत्येक कन्स्ट्रक्शनमध्ये यापुढे रेन वाटर हार्वेस्टिंग सिस्टीमचा वापर करावा, अशी सूचना डॉ. पाटील यांनी दिली.
कोल्हापूरमध्ये मेडिकल कॉलेजची सर्वाधिक उंच इमारत बांधण्याचे काम हाती घेतले आहे. त्याचबरोबर हॉटेल सयाजीचे विस्तारीकरणही सुरु केले आहे. कोल्हापूरमध्ये खूप टलेंट असून हॉटेलच्या २३ मजली इमारतीच्या कामासाठी आर्किटेक्ट काम कोल्हापूरची सुरुची संभाजी पाटील ही मुलगी करत असल्याचा सार्थ अभिमान असल्याचेही त्यांनी सांगितले.
असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे यांनी प्रास्ताविकात असोसिएशनच्या कामाची माहिती दिली. यावेळी वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही व्ही कार्जींन्नी यांनी इंजिनियर्स डे निमित्त विशेष व्याख्यानात डॉ.एम विश्वेश्वरय्या यांनी अभियांत्रिकी क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कृष्णात जमदाडे यांनी केले तर आभार असोसिएशनचे उपाध्यक्ष विजय चोपदार यांनी मानले. यावेळी असोसिएशनचे सचिव राज डोंगळे, अल्ट्राटेक सिमेंटचे शीतलराज सिंदखेडे, अविनाश जेऊरकर, सागर छांगनी यांच्यासह आर्किटेक्ट अँड इंजिनियर्स असोसिएशनचे संचालक आणि सदस्य उपस्थित होते.
-
श्रीरंग गायकवाड
बिहार केडरचे मराठी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी अचानक पोलीस सेवेचा राजीनामा देण्याची घोषणा केल्यामुळे बिहारसह महाराष्ट्रात खळबळ उडाली. यासंदर्भातील माहिती शिवदीप लांडे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून दिली. सुमारे १८ वर्ष पोलीस खात्यात सेवा देणा-या शिवदीप लांडे यांना बिहारमधील सिंघम म्हणून ओळखले जाते. त्यांनी अचानक राजीनामा का दिला? याबाबत अद्याप माहिती समोर आली नसली तरी आपण बिहारमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट केल्यामुळे ते निवडणूक लढवणार का, अशी चर्चाही सुरू झाली आहे.
शिवदीप लांडे यांची फेसबुक पोस्ट
“जय हिंद! माझ्या प्रिय बिहार, गेली १८ वर्षे शासकीय पदावर सेवा दिल्यानंतर आज मी या पदाचा राजीनामा दिला आहे. एवढ्या वर्षात मी बिहारला माझ्या आणि माझ्या कुटुंबापेक्षा वरचढ मानले आहे. माझ्या सरकारी नोकरीच्या कार्यकाळात काही त्रुटी राहिल्या असतील तर त्याबद्दल मी माफी मागतो. आज मी भारतीय पोलीस सेवेचा (आयपीएस) राजीनामा दिला आहे. परंतु, मी बिहारमध्येच राहीन आणि भविष्यातही बिहारच माझी कर्मभूमी असेल.”
ट्रेनिंगचा पहिला दिवस
शिवदीप यांना आठवतो ट्रेनिंगनंतरचा तो पहिला दिवस.. त्या दिवशी देशातील वेगवेगळ्या भागातून आलेल्या त्यांच्या आठजणांच्या बॅचला विचारण्यात आलं, तुम्हाला बिहारमधल्या कोणत्या जिल्ह्यात पोस्टिंग हवं आहे? कुणी मागितलं भागलपूर, कुणी पाटणा तर कुणी मुजफ्फरपूर. ही सगळी मोठी शहरं. शिवदीप म्हणाले, ‘मला कुठंही पाठवा!’ इतरांना त्यांचा चॉईस मिळाला. शिवदीप यांना मिळाला मुंगेर जिल्हा. हेडक्वार्टरहून गाड्या निघतानाच ड्रायव्हर म्हणाला, ‘साहब, आपने मुंगेर क्यूँ चुना? बहोत खराब जगह है साहब. शांतीसे ट्रेनिंग पूरा करके बचके निकलो…’ शिवदीप सांगतात, “मला आठवतं,पाटण्यापासून मुंगेर १९० किलोमीटरवर आहे. मुंगेर जसजसं जवळ येईल तसतशी सर्वांच्या चेहऱ्यावरची भीती गडद होत होती. पुढं गेल्यावर तर ड्रायव्हरनं गाडीवरचा लाल दिवाही काढून टाकला. पाटी झाकून टाकली. गावात पोहोचलो तेव्हा संध्याकाळ झाली होती. सर्वत्र विचित्र शांतता पसरलेली होती. एकदम शुकशुकाट. मला घ्यायला आलेल्यांच्या चेहऱ्यावर भेदरलेपण स्पष्ट दिसत होतं. मग मला एका स्मशानशांतता असलेल्या किल्ल्यासारख्या सर्कीट हाऊसवर नेण्यात आलं. तिथं फक्त कावळ्यांची काव काव ऐकू येत होती. मी जेवण करून झोपलो बिनधास्त.
उघड्यावर बंदुकांची दुकानं
सकाळी पोलीस स्टेशनमध्ये हजर झालो. प्रत्येक आयपीएस अधिकाऱ्याला प्रोबेशनच्या काळात संबंधीत पोलीस स्टेशनमध्ये कॉन्स्टेबलपासून ते एसपीपर्यंतच्या भूमिका बजवाव्या लागतात. किमान साडेतीन महिने पोलीस स्टेशन स्वतंत्रपणे हाताळावं लागतं. एसपी म्हणाले, ‘या फिरून गावातून’.. गावात गेलो न् मला देशभर चर्चेचा विषय असलेल्या बिहारच्या गुन्हेगारीचं प्रातिनिधीक दर्शन घडलं. तिथं उघड्यावर बंदुकांची दुकानं मांडलेली होती. गावठी कट्ट्यापासून ते एके ५६ पर्यंत सर्व प्रकारची हत्यारं खेळण्यांसारखी दुकानात टांगली होती. फक्त ऑर्डर करायची! मी सहज विचारलं, ‘या दुकानांना परवाना आहे का?’ तर ते माझ्याकडं पाहून छद्मी हसले. नंतर समजलं, बेकायदेशीर हत्यारं बनवणारा मुंगेर हा बिहारमधला कुप्रसिद्ध जिल्हा आहे. अशी हत्यारं बनवणारी एक मोठी फॅक्टरीही तिथं होती. खरं तर बिहारमध्ये असं खुलेआम हत्यारं बाळगण्याचं कल्चरच आहे. एक वेळ घरी खायला भाकरी नसली तरी चालेल पण बंदूक पाहिजे. एखाद्या लग्नातही गेलं तरी वरातीत सगळे बंदूकवाले हवेत बार काढत नाचत असतात. आपल्या हिंदी सिनेमांमध्ये दाखवतात ना, त्याहीपेक्षाही भारी सीन.. तिथंच मुंगेरचे एसपी के. सी. सुरेंद्रबाबू यांची २००५मध्ये हत्या करण्यात आली होती. दोन डीएसपी तसेच कितीतरी ठाणेदार आणि पोलीस शिपायांना ठार करण्यात आलं होतं. मी ज्या दिवशी ड्युटी जॉईन केली त्याच्या एक महिना आधी ३१ डिसेंबरला आठ पोलिसांना गोळ्या घालण्यात आल्या होत्या. मग सगळा प्रकार लक्षात आला. माझ्या स्वागताला आलेल्यांचे चेहरे भेदरलेले का होते ते…’’
दगडमाफियांविरोधात मोहीम
शिवदीप लांडे यांनी मग हे सारं गांभीर्यानं घेतलं. परिस्थितीचा बारकाईनं अभ्यास केला. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, तिथली इकॉनॉमी या सगळ्याला कारणीभूत आहे. मुंगेरमधलं सगळं अर्थकारण स्टोनमाफिया आणि वाळूमाफिया चालवत होते. मुंगेरच्या रिझर्व फॉरेस्टमधल्या डोंगरांमध्ये दगडाच्या खाणी खोदणं आणि गंगेच्या पात्रातली वाळू बेकायदेशीरपणे उकरणं हे तिथले बेकायदा धंदे. यात अनेकांचे हितसंबंध गुंतलेले होते. सर्वात विशेष म्हणजे देशात कुठंही घडत नाही असला प्रकार तिथं वारंवार व्हायचा. तो म्हणजे पोलिसांवर सर्रास फायरिंग व्हायचं. वाळू किंवा दगड वाहतूक करणाऱ्या ट्रकला पोलिसांनी हात दाखवला की माफिया पोलिसांना सरळ उडवायचेच. लांडेंनी मग पहिल्यांदा तिथं पोलिसिंग सुरू केलं. स्टोन माफियांच्या विरोधात मोहीमच उघडली. हायवेनं जाणारे ट्रक अडवायचे. ड्रायव्हरला खाली ओढून ठोकून काढायचं, असा एककलमी कार्यक्रम लावला. दहशतीला दहशतीनं उत्तर देणं हीच तिथली गरज होती. म्हणून एसपी लांडेंनी रांगडं रूप धारण केलं.
सकाळी निघताना जिप्सीत पाच सहा डंडे घेऊन जायचं आणि ते तुटल्यावरच घरी यायचं, असा काही दिवस नित्यक्रम ठेवला. हळू हळू एसपी लांडे या नावाची परिसरात दहशत निर्माण झाली. पण हे करताना त्यांनी एक गोष्ट अत्यंत जाणीवपूर्वक केली आणि ती म्हणजे सर्वसामान्य माणसांचा विश्वास संपादन केला. पोलीस जे काही करतायत ते आपल्या भल्यासाठीच, अशी जाणीव त्यांच्यात निर्माण केली. त्यांच्या मनातली माफियांविषयीची भीती घालवली. पोलीस संकटात मदतीला धावतात, याचा अनुभव दिला. जिथं ठाणेदार किंवा साध्या पोलीस शिपायाला भेटण्यासाठी लोकांना वारंवार हेलपाटे मारायला लागायचे तिथं एसपी लांडेंनी त्यांचा खासगी मोबाईल नंबर सर्वांसाठी खुला करून दिला. अगदी रात्री बेरात्रीही कुणा नागरिकाचा फोन आला की अगदी पहिल्याच रिंगमध्ये तो उचलायचा. युनिफॉर्म चढवून तातडीनं घटनास्थळी पोहोचायचं. अत्याचार करणाऱ्यांना लगेच भिडायचं, असा शिरस्ता ठेवला.
सर्वसामान्य बिहारींचा तारणहार
त्यामुळं सर्वसामान्य बिहारी माणसांना हा आपला तारणहार आहे, असं वाटू लागलं. लांडेंच्या सहकाऱ्यांमधलीही धास्ती पळाली. ते अलर्ट झाले. कामाला लागले. तरीही जे ढिम्म हलले नाहीत, त्यांना लांडेंनी सस्पेंडचा बडगा दाखवला. यामुळं स्टोनमाफियांना वेसन घातली गेली. गुन्हेगारीला पुरवला जाणाऱ्या पैशाचा ओघ तोडला गेला. मग स्टोनमाफियांनी वेगळाच पवित्रा घेतला. लांडे मराठी असल्याचं भांडवल केलं. ते बिहारींविरुद्धच्या आकसानं हे सगळं करत असल्याचा आरोप करत कोर्टात चार केसेस टाकल्या. कारण त्या वेळी मुंबईत मनसेची बिहारींविरुद्धचं आंदोलन जोरात सुरू होतं.
राज ठाकरे बिहारींना तिथं मारतात आणि हे इथं येऊन बिहारींना मारतात, असं सांगून लोकांना भडकवण्याचा प्रयत्न झाला. तिथल्या मीडियानंही ते उचलून धरलं. कारण साऱ्यांचे आर्थिक हितसंबंध त्यात अडकलेले होते. मुंगेरमधली रोजची दगड, वाळूची एक हजार ट्रक्सची बेकायदा वाहतूक बंद पडली होती. या ट्रक्सचे ड्रायव्हर तर गाडीत बसायलाही तयार होत नव्हते. कारण त्यांना असा पोलिसी प्रसाद मिळाला होता की, त्यांना नीट बुडावर बसताही येत नव्हतं. आपण काही तरी चुकीचं करतोय याची जाणीव त्यांना उठता बसता होऊ लागली. लोकांना भडकावण्याचा प्रयत्न झाला खरा पण बहुदा पहिल्यांदा असं झालं असावं की, लोकांनी ना मीडियावर विश्वास ठेवला ना कोर्टावर. ती केवळ पोलिसी कारवाई राहिली नाही तर ती सामान्य लोकांची चळवळ बनली. कारण तिथं माफिया होते, १० टक्के आणि सामान्य माणसं होती ९० टक्के. त्यांच्यातील आत्मविश्वास जागा केल्यावर काय होऊ शकतं, याचं प्रत्यंतर मुंगेरमध्ये पाहायला मिळालं.
नक्षलवाद्यांशीही मुकाबला
शिवदीप यांना केवळ माफिया आणि गावगुंडांचाच नाही तर जंगलात लपलेल्या नक्षलवाद्यांचाही सामना करावा लागला. तिथं जम्मुई आणि बांका या शेजारच्या जिल्ह्यांमध्ये नक्षलवादी कारवायांचा जोर आहे. हे नक्षलवादी आणि स्टोनमाफियांचं साटं लोटं असतं. कारण नक्षलवाद्यांना लागणारे पैसे हे माफिया पुरवतात. शिवदीप लांडे बेधडक जंगलात घुसून नक्षलवाद्यांच्या मागं लागायचे. दहा दहा दिवस जंगलातच राहायचे. पण नक्षलवाद्यांनी त्यांना उलट टार्गेट केलं नाही. कारण लांडे सर्वसामान्य, गोरगरीब माणसांसाठी झटतायत हे त्यांच्या लक्षात आलं होतं. अर्थात लांडेंच्या शत्रूंनी त्यांना अनेकदा मृत्यूच्या खिंडीत गाठायचा प्रयत्न केला. मुंगेरमध्ये तर ते तीनदा जीवावरच्या संकटातून वाचले.
त्यांच्या आठवणीतून एक घटना अजूनही जात नाही. जमालपूरचा धरारा परिसरातील तो मतदानाचा दिवस होता. दिवसभराचं मतदान संपलं होतं. संध्याकाळ झाली होती. सकाळीच नक्षलवाद्यांनी मतदानाला विरोध करणारे काळे बॅनर फडकवले होते. त्या दहशतीच्या वातावरणात शिवदीप यांनी नागरिकांना मतदानाचं आवाहन केलं होतं. त्याला प्रतिसादही चांगला मिळाला होता. ड्युटी बजावून लांडे जिप्सी घेऊन निघाले. एका बाजूला खोल दरी आणि दुसऱ्या बाजूला वाहणारी नदी अशा हेरूदियारा गावाजवळच्या हायवेवरून ते जात होते. नेहमीप्रमाणं स्वत:च जिप्सी चालवत होते. समोरच्या टर्नवर उभा असलेला ट्रक त्यांना दिसत होता. अचानक ट्रक सुरू झाला आणि भरधाव वेगानं समोरून येऊ लागला. दरीच्या कडेनं जाणाऱ्या लांडेंच्या जिप्सीला त्यानं सरळ समोरून जोरदार धडक दिली. आठ नऊ पलट्या खाऊन जिप्सी दरीत कोसळली. लांडेंनी डोळे उघडले तेव्हा त्यांना भोवती लोक जमलेले दिसले.
लांडे सांगतात, “माझ्या छातीवर चेपून दामटी झालेली जिप्सी पडलेली होती. गॉगल वाकडा झाला होता. माझे बाकीचे गार्ड बेशुद्ध अवस्थेत पडलेले होते. मी कपडे झटकत उठलो. साधं खरचटलंदेखील नव्हतं. गार्डना घेऊन आयसीयूत दाखल केलं. मुंगेरमधील सामान्य बिहारी लोकांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असावेत. मी या घटनेची बातमी होऊ दिली नाही. नाही तर ती नॅशनल न्यूज झाली असती. घरी आईला समजलं असतं. त्या निवडणुकीत चांगले उमेदवारच निवडून आले. नक्षलवाद्यांचे उमदवार पडले.”
बदलीनंतर निरोपासाठी अवघे शहर रस्त्यावर
लांडेंची कीर्ती मुख्यमंत्री नीतिशकुमार यांच्या कानावर गेली. त्यांनी राजधानी पाटणाचे सीटी एसपी म्हणून लांडेंची नियुक्ती केली. ज्या दिवशी बदली झाली त्याच दिवशी लांडे यांनी मुंगेर सोडलं. त्यांची जिप्सी रस्त्यानं जात होती तेव्हा रस्त्याच्या दुतर्फा सुमारे सहा किलोमीटर लोक फुलांचे हार घेऊन उभे होते. बायाबापड्या शेतातली कामं सोडून लांडेंना फुलं द्यायला आल्या होत्या. त्यांची जिप्सी फुलांनी भरून वाहत होती. गावाच्या बाहेर पडायलाच त्यांना सहा तास लागले.
राजधानी पाटणात फेरफटका मारल्यावर परिस्थिती लांडेच्या लगेचच लक्षात आली. रोडरोमियोंचा, बाईकर्सचा रोज दारू पिऊन रस्त्यात धिंगाणा सुरू होता. बेकायदेशीर धंदयांना ऊत आला होता. पोलिसांनी कुणाला आत टाकलं तर लगेचच कुणा थोरामोठ्याचा फोन यायचा. रस्त्यावर महिलांची छेडछाड, रिक्षाचालक, फेरीवाल्यांना मारहाण हे तर नेहमीचंच झालं होतं. मग तिथं लांडेंनी जोरदार दबंगगिरी सुरू केली. आपला मोबाईल नंबर सर्वांसाठी खुला केला. तक्रार काहीही असो, थेट फोन करा!रस्त्यावरून जाणाऱ्या मुलींचे फोन येऊ लागले. तीन चार बाईकर्स त्रास देतायत… लांडे विचारायचे, ‘बाई तू कुठं आहेस? त्या हिरोंना सहा-सात मिनिटं गुंगवून ठेव, मी आलोच…’ की, जिप्सी घेऊन एसपी लांडे पाचच मिनिटांत तिथं हजर. पोरांना वाटायचं हे नेहमीचेच पोलीस..यांना काय भ्यायचं..लांडेंकडं असं तुच्छ नजरेनं पाहत असताना, खाडकन् एखाद्याच्या मुस्काटात बसायची. मग काही समजायच्या आत अख्ख्या टोळीची बेदम धुलाई…नंतर पोलीस बोलावून सर्वांची मिरवणूक पोलीस स्टेशनमध्ये. तरीही पोट्टे एकदम कॉन्फिडन्ट.
राजधानीतील गुंडगिरीचा बंदोबस्त
आपल्यासाठी नक्की फोन येणार म्हणून. एक दोन नेत्यांनी फोन लावूनही पाहिले. तर त्यांना झटकाच बसला. ‘ना मै भडवोंकी सुनता हूँ, ना भडवेगिरी करता हूँ.. शेर की तरह बैठा हूँ.. आना हो तो आ जाओ.. नियम के साथ सब हो जाएगा…’, समोरून एसपी लांडेंची अशी डरकाळी ऐकून भल्या भल्या नेत्यांची टरकली. हा बाबा आपल्याला फोनवरूनच भडवा म्हणतोय. प्रत्यक्षात काय करील…कशाला अब्रू दवडा. शिवाय याला आणलाय थेट सीएमनं. उगाच भानगड नको, म्हणून पुढारी गप्प बसले. लांडेंनीही याबाबतीत अकारण शो शायनिंग केली नाही. डोक्यात हवा जाऊ दिली नाही. पोरांना उगाचच मारपीट केली नाही. प्रत्येक वेळी त्यांना सुधारण्याची संधी दिली. त्यांच्यावर एफआयआर नोंदवला नाही. कारण पुढं त्यांना नोकरी मिळण्यात अडचण आली असती. जी परिस्थिती माणसाला गुन्हेगार बनवते ती परिस्थितीच बदलवण्यावर लांडेंचा भरवसा आहे. पोलीस स्टेशनमध्ये या मुलांचे पालक यायचे. लांडे त्यांना समजावायचे. पोरांना तंबी द्यायचे. या पद्धतीचा मोठा सकारात्मक परिणाम झाला. पोरं त्यांची फॅन बनली. ‘यह एसपी पिटता है और मदत भी करता है…किसीके बाप की सुनता नही है..सब कायदे से करता है…’ अशी पाटण्यात त्यांच्याविषयी चर्चा होऊ लागली.
अर्थात यातही माज दाखवणारे सत्ताधारी रगील दोडके होतेच. एका सत्तारुढ आमदाराचा दिवटा त्याच्या मित्रांसोबत स्कॉर्पिओ घेऊन पाटण्याच्या रस्त्यावरून भरधाव जात होता. एक हाफ चड्डी आणि फाटकं बनियन घातलेला, अनवाणी रिक्षावाला त्यांच्या गाडीच्या समोर आला. डाक बंगला नावाचा तो पाटण्यातील वर्दळीचा चौक. ही टप्पोरी गँग गाडीच्या खाली उतरली. आणि त्यांनी त्या बिचाऱ्या रिक्षावाल्याला बेदम मारायला सुरुवात केली. लोक जमले. गर्दीतल्या कुणी तरी लांडेंना फोन लावला… ‘बेचारा बुरी तरहसे पीटा जा रहा है.. देखा नही जाता..’ थोड्याच वेळात लांडे तिथं हजर. तोपर्यंत ते टगे सटकले होते. रिक्षावाल्याने दाखवलेल्या दिशेने लांडे निघाले. वायरलेसवरून संदेश दिला. त्या पोरांना गाठलं. गाडीत घालून पुन्हा त्याच चौकात आणलं. तोपर्यंत चौकात तोबा गर्दी.. मीडियाचे कॅमेरे.. लांडेंनी मीडियावाल्यांना विनंती करून कॅमेरे खाली करायला लावले. टग्यांना त्या रिक्षावाल्याची माफी मागायला लावली. नाही म्हणताच, सर्वांसमोर त्यांना धू धू धुतलं. लांडे म्हणतात,‘त्या क्षणी त्या रिक्षावाल्याच्या डोळ्यातले आधार मिळाल्याचे अश्रू मी पाहिले. मला तेच माझं रिवॉर्ड वाटलं…’
प्रसिद्धीत लालूप्रसाद आणि नीतिश कुमारही मागे
लांडेंनी पाटण्यातले नाना प्रकारचे बेकायदा धंदे उखडून काढले. फेक मेडसीन रॅकेट, सेक्स रॅकेट, ब्युटीपार्लर रॅकेट, सायबर रॅकेट, जेलमधली गुन्हेगारी यांचा बीमोड केला. त्या दहा महिन्यांत लांडे मीडियाचे हिरो बनले. पेपरची चार चार पानं त्यांच्यादबंगगिरीच्या बातम्यांनी सजू लागली. जातील तिथं स्वाक्षरीसाठी तरुणांची झुंबड उडू लागली. खरं वाटणार नाही पण लांडेंनी त्या काळात अगदी लालूप्रसाद आणि नीतिशकुमार यांनाही प्रसिद्धीत मागं टाकलं. विशेष म्हणजे ही प्रसिद्धी आणि क्रेझ अजूनही कायम आहे.
त्यानंतर लांडेंची बदली झाली, अरारिया जिल्ह्यात. जिथं पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी जायला राजी नसतात तो नेपाळ बॉर्डरवरचा धुमसता मुस्लिमबहुल जिल्हा म्हणजे अरारिया! तिथं २८ लाख लोकसंख्येत २२ लाख मुस्लिम आहेत. सामाजिक वातावरण नेहमीच बिघडलेलं. लांडे जॉईन होण्यापूर्वी पोलीस गोळीबारात चार मुस्लिम लोक मारले गेले होते. शिवाय अरारिया हा जिल्हा दुर्गम. भारतातील सर्वाधिक अविकसित जिल्हा असं त्याचं वर्णन करता येईल. पायाभूत सोयीसुविधांचा पत्ता नाही. जिल्ह्यात २४ पोलीस स्टेशन्स. त्यापैकी १४ पोलीस स्टेशन्समध्ये चारचाकी वाहन नाही. पोलीस स्वत:चीच दुचाकी वापरायचे. १६ ठिकाणी तर पोलीस स्टेशनसाठी इमारतच नव्हती. एखाद्या पत्र्याच्या झोपडीत, गोडाऊनमध्ये पोलीस स्टेशने थाटलेली. संपूर्ण जिल्ह्यात फक्त ३९० पोलीस. त्यात महिला पोलीस केवळ चार. शिवाय स्थानिक जनतेत पोलीस विरोधी भावना प्रचंड. थोडं काही झालं तरी तुफान दगडफेक व्हायची. रस्ता जाम व्हायचा. पोलीस गेले तर त्यांची जीप पेटवून दिली जायची. हे ऐकून खरं तर कुणीही हबकून जावं. पण लांडेंनी ते आव्हान पेललं. त्यांच्या लक्षात आलं की इथलं सामाजिक वातावरण पहिल्यांदा सुधारलं पाहिजे. पोलिसांविषयी विश्वास निर्माण केला पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे सरकारी योजना नीट राबवल्या पाहिजेत. उदाहरणार्थ तिथं गरिबांना निवारा मिळवून देणारी इंदिरा आवास योजना होती. या योजनेत दारिद्र्य रेषेखालच्या कुटुंबाला ४५ हजार रुपये मिळत. पण हे पैसे गरजूंपर्यंत पोहोचत नसत. ते पैसे गहाळ करणाऱ्यांवर लांडेंनी सरळ एफआयआर दाखल करायला सुरुवात केली. असे तब्ब्ल ७८ एफआयआर दाखल झाले. त्यात ३००जणांना अटक झाली. त्यापैकी ८९ तर अतिरिक्त जिल्हाधिकारी, बीडीओ, तहसीलदार असे अधिकारी होते. आपला सर्व्हिस रिपोर्ट तयार करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांवर आरोपपत्र दाखल करणारे लांडे पहिलेच पोलीस अधिकारी असतील.
अरारियात महिलांना न्याय
अरारियामध्ये पीडित महिलांची संख्या खूप होती. नवऱ्यानं मारलं, सासरनं टाकलं अशी तक्रार घेऊन बापड्या पोलीस स्टेशनमध्ये यायच्या. एसपी लांडेंनी त्यांना धीर दिला. त्यांना कायद्याची लढाई लढण्यासाठी तयार केलं. उपाशीपोटी, अनवाणी पायांनी पोलीसस्टेशनपर्यंत आलेल्या या महिलांच्या हातात गार्डकरवी लांडे जाण्या-येण्याचं भाडं ठेवायचे. त्यांच्या वकिलाचीही फी द्यायचे. त्यांच्या केस लवकर निकाली काढा म्हणून कोर्टाला विनंती करायचे. त्यामुळं दहा वीस वर्षे चालणारे खटले अगदी दहा दिवसांत मार्गी लागू लागले. तुरुंगात जाण्याच्या भीतीनं पती ताबोडतोब पत्नीला भरपाई देऊ लागले…
अरारियात देहव्यापार करणाऱ्या १०० मुलींची लांडेंनी सोडवणूक केली. त्यांच्या पुनर्वसनासाठी स्वत: खर्च केला. त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलला. त्या राहतात त्या पूर्णिया आश्रमाला मदत केली. लांडे एक अनुभव सांगतात, ‘शन्नो खातूम नावाची एक महिला होती. तिला जुळी मुलं आणि आठ वर्षांची मुलगी होती. शन्नो स्टेशनवर भीक मागायची. पोटासाठी तिनं आपल्या पोटच्या गोळ्याला म्हणजे एका मुलाला १०० मोरंगला (नेपाळचं चलन) विकलं. गरिबी वाईट असते. आम्ही त्या विक्री झालेल्या मुलाचा खूप शोध घेतला. पण तो सापडला नाही. मग आम्ही शन्नोला इंदिरा आवास मिळवून दिलं. त्यातून तिला ५० हजारांची मदत मिळाली. मीही वैयक्तिक दहा हजारांची मदत केली. एक दिवस तिथल्या नरपतगंज पोलीस स्टेशनमध्ये असताना एका शेतकऱ्याचा फोन आला. साहेब, इथं एक विकली गेलेली मुलगी आहे. तिला नेपाळला घेऊन चाललेत. मी जिप्सी घेऊन ३२ किलोमीटरवर गेलो. तिथं अंधारात मुलीची विक्री करणाऱ्या तिघांच्या मुसक्या वळल्या. मुलीची सुटका केली. ती मुलगी मी मदत केलेल्या शन्नोची होती. मला धक्का बसला. पण मुलगी हुशार होती. तिला मी कोर्टाच्या मदतीनं पूर्णिया आश्रमात पाठवलं. तिथं ती आता शिकते आहे. स्वत:च्या पायावर उभी राहते आहे.’
लांडेंनी अरारियामध्ये असं सामाजिक सद्भावनेचं वातावरण तयार केलं. द्वेषाचं विष संपवलं. आजही अरारियामधल्या हजारो घरांमध्ये एसपी शिवदीप लांडेंचा फोटो लावलेला पाहायला मिळतो. गावातल्या लहान मुलांना तुम्हाला मोठेपणी कोण व्हायचंय? असं विचारलं तर ती सांगतात, आम्हाला एसपी शिवदीप लांडे व्हायचंय!
अखेर लांडेंची अरारियामधून बदली झाली. त्या बदलीला विरोध करण्यासाठी अख्खा अरारिया रस्त्यावर उतरला. लांडेंच्या निवासस्थानाला गराडा घालून लोक दोन दिवस झोपून राहिले. पूर्णिया आश्रमातील मुलींनीही दोन दिवस अन्न पाणी घेतलं नाही. हायवेवर जाळपोळ झाली. ट्रेन थांबवल्या गेल्या.
गोरगरिबांविषयी कळवळा
कर्तव्यासोबतच शिवदीप लांडेंमध्ये गोरगरिबांविषयीचा कळवळा आणि एवढं सामाजिक भान आलं कुठून? असं विचारताच ते म्हणतात, “ते आलं माझ्या बालपणातून. दारिद्र्यातून. विदर्भातल्या मागासलेल्या अकोल्याजवळच्या पारस नावाच्या गावातून. अकोल्याहून अवघं २२ किलोमीटरवर असलेलं हे गाव कायमचं दुष्काळी. कोरडवाहू. ४४ अंश सेल्सियस तापमान सोसणारं. आई गीताबाई आणि वडील वामनराव अल्पभूधारक शेतकरी. हा भाग शेतकरी आत्महत्याग्रस्त. शेती आईच्या नावावर असल्यानं वाचली. शेतीचा आणि घराचा गाडा आईच चालवायची. पण शेत आमची गरिबी हटवू शकत नव्हतं. जुनं पडकं घर. त्याला दरवाजाही नव्हता. पावसाळा सुरू झाला की झोप लागायची नाही. कारण सगळं घर गळत राहायचं. रात्रभर भांडी इथं ठेव तिथं ठेव, असं सुरू असायचं. घरात लाईट तर नव्हती. दहावीत असताना अभ्यासासाठी शेजारीपाजारी लाईटचं कनेक्शन उसनं मागितलं. कुणी दिलं नाही. आईला कुणी किराणा सामानही उधार द्यायचं नाही. समाज चालत्या गाडीत बसतो नेहमी!”
आईने दागिने मोडून शिकवलं
बारावीनंतर शिवदीप यांना शेगावला इलेक्ट्रीकल इंजीनिअरिंगसाठी अॅडमिशन मिळालं. वार्षिक फी होती, चार हजार रुपये. म्हणजे चार वर्षांचा किमान ५० हजारांचा खर्च होता. त्यासाठी आईने दागिने मोडले. शेती तर गहाण होतीच. शिवदीप आणि भावंडं दुसऱ्याकडून पुस्तकं उधार घेत जिद्दीनं शिकली. लहान भाऊ आयटीआय झाला. बहिण कान्व्हेंट शाळेत शिक्षिका झाली. सगळ्यांनी आईच्या संसाराला हातभार लावला.
परिस्थितीमुळं लहानपणापासूनच त्यांचा व्यवस्थेसोबत संबंध येऊ लागला. उदा. सातबाऱ्याच्या दहापंधरा रुपयांसाठी तलाठ्यांनं खेटे मारायला लावणं, सरकारी मदतीसाठी बीडीओ ऑफिससमोरच्या रांगेत उभं राहणं, सरकारी मदत, योजना खऱ्या गरजूंना न मिळणं, केवळ वशिल्यावाल्यांची कामं होताना नाईलाजानं पाहाणं हे सगळं शाळकरी वयातच लांडेंनी अनुभवलं. याच काळात त्यांनी एक गंमतीशीर प्रकार पाहिला. तो म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी एखादे वेळी कलेक्टर आला तर अधिकाऱ्यांची मोठी तारांबळ उडायची. त्याच्यापुढं सगळे त त प प करायचे. शेतकऱ्यांनी तक्रारी करू नये याची काळजी घ्यायचे. लांडेंना वाटायचं, आपणही या माणसासारखं ऐटबाज साहेब व्हायला पाहिजे. आठवीत असताना शिक्षकांनी सर्वांना विचारलं, तुम्हाला भविष्यात काय व्हायचं? लांडेंनी उत्तर देऊन टाकलं होतं, ‘मला कलेक्टर व्हायचंय!’ पण त्यांनी पाहिलेले कलेक्टर छोट्या गावांपर्यंत पोहचायचेच नाहीत. त्यामुळं त्यांना लोकांचे खरेखुरे प्रश्न समजायचे नाहीत. लांडे सांगतात, “बिहारमधील मुंगेरी किंवा अरारियामधली छोटी खेडी, त्यात राहणारी गोरगरीब माणसं पाहिली तेंव्हा मला माझं गाव, बालपण, कुटुंब आठवलं. त्यामुळं एखादा माणूस ‘माझी बकरी चोरांनी पळवली’, ‘दहा किलो धान्याची चोरी झालीय’, अशा छोट्या तक्रारी घेऊन आला, तरी त्या मी गांभीर्यानं घेतल्या. त्या सोडवल्या. मी पहिल्यांदा त्यांच्यातलाच माणूस आहे आणि नंतर पोलीस! हे मी कधीच विसरलो नाही. अजूनही मी तक्रार घेऊन येणाऱ्याच्या भूमिकेत जातो. त्याची समस्या माझी होऊन जाते. मग मी पोलिसाच्या भूमिकेत येऊन ती सोडवतो.’’
कॉलेज संपून आयपीएस होईपर्यंत लांडेंना पुन्हा परिस्थितीशी झगडावं लागलं. या संघर्षात पावसाळ्यातलं भिजणं, उहाळ्यातलं तळणं लांडेंच्या कामी आलं. त्यांच्यातलं किलर इन्स्टिंक्ट आणखीच टोकदार झालं. इंजीनिअरिंगला असेपर्यंत त्यांनायूपीएससीच्या तब्बल २२ ऑल इंडिया क्लास वन सर्व्हिसेस असतात हेही माहिती नव्हतं. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी लांडे मुंबईला आले आणि कल्याणला सुनील धाळकर नावाच्या मित्राकडे थांबले. त्यांचं नंतर ज्युनिअर टेलिकॉम ऑफिसर म्हणून सिलेक्शन झालं. खर्च करायला पैसे हवेत म्हणून लांडेंनी डोंबिवलीच्या जोंधळे इंजीनिअरिग कॉलेजमध्ये लेक्चरशिप करायला सुरुवात केली. ते काम त्यांनी दीड वर्ष केलं. पण मग स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाकडं दुर्लक्ष होऊ लागलं. म्हणून ते काम सोडलं. पण पैशांची गरज तर होतीच. मग ते विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन वैयक्तिक कोचिंग घेऊ लागले.
त्यांनी बरेच दिवस ठाणे, कल्याण, मुलुंड, भांडूप या परिसरात इंजीनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचे क्लासेस घेतले. संभाजी काटे नावाचा लांडेंचा एक सहकारी होता. तो म्हणाला, ‘हे क्लासेस घेणं सोड. तुझा अभ्यास कर. मी तुझा खर्च करतो..’ त्याच्यासोबत लांडे ठाण्याच्या वृंदावन सोसायटीत एक वर्षे राहिले. त्यानंतर एसआयसीमध्ये प्रवेश मिळाला. तिथं सगळेच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी. मस्त ग्रुप जमला. अभ्यास सामुदायिक झाला. २००४मध्ये लांडेंचं इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस मध्ये पहिलं सिलेक्शन झालं. चार वर्षे त्यांनी रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये काम केलं. २००६ला आयपीएसला सिलेक्शन झालं. २००८ला हैदराबादचं ट्रेनिंग घेतलं. २०१०ला बिहार जॉईन केलं. तिथं त्यांनी जे काम केलंय ते पोलीस डिपार्टमेंटला भूषणावह आहे. मुख्यमंत्री नीतिशकुमारांनी बिहारमध्ये बोकाळलेली जी गुन्हेगारी आटोक्यात आणली, त्यासाठी शिवदीप लांडेंनी हातभार लावलाय.
शिवदीप लांडे आयपीएस आहेत हे महाराष्ट्रालाच काय पण त्यांच्या गावातही माहिती नव्हतं. ते पाटण्याचे एसपी झाल्यावर नॅशनल मीडियामुळं सर्वांना माहिती झालं.
शिवदीप यांच्या आईला मात्र त्यांच्याबद्दल लहानपणापासूनच प्रचंड कॉन्फिडन्स होता. ती म्हणते, ‘माझा पोरगा जगातला सर्वात जिद्दी पोरगा आहे. लहानपणी तो फोटोच काढू द्यायचा नाही. म्हणायचा, मी माझा फोटो काढून घेणार नाही. लोकच माझे फोटो काढतील. खिशात ठेवतील. घरात लावतील. त्यानं त्याचं म्हणणं खरं केलंय..’
महाराष्ट्राच्या शिक्षणक्षेत्रातले बडे नेते आणि त्रिपुराचे राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांची बिहारचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. तेव्हा राजभवन आणि सरकारमध्ये तणाव होता. त्या पार्श्वभूमीवर सरकार आणि राजभवन यांच्यातील दुवा म्हणून शिवदीप लांडे यांची स्पेशल ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी ती उत्तमपणे पार पाडली. लग्न न करण्याचा निर्धार केलेल्या शिवदीप यांना डॉ. डी. वाय. पाटील यांनी आग्रह करून लग्नासाठी तयार केले आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या मुलीशी त्यांचा विवाह झाला.
……………