-
प्रा. अविनाश कोल्हे
पुरवणी
प्रा. अविनाश कोल्हे
विसाव्या शतकाच्या सुरूवातील भारतीय राजकारणातील दोन महत्त्वाच्या घटना म्हणजे ऑक्टोबर १९२५ मध्ये नागपुर येथे स्थापन झालेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि २६ डिसेंबर १९२५ रोजी कानपूरमध्ये स्थापन झालेला भारतीय कम्युनिस्ट पक्ष. आता कम्युनिस्ट पक्षाचे शताब्दी वर्ष सुरू झाले आहे. त्याकाळी देशातील कामगार चळवळीचे केंद असलेल्या कानपूरमध्ये २५ ते २७ डिसेंबर दरम्यान देशाभरातील डाव्या विचारसरणीचे कार्यकर्ते एकत्र आले होते. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जगाच्या इतिहासावर दूरगामी परिणाम करणारी घटना म्हणजे ऑक्टोबर १९१७ मध्ये लेनिनच्या नेतृत्वाखाली कम्युनिस्टांनी रशियात केलेली कामगार क्रांती! रशियात झालेली कामगार क्रांती फक्त रशियापुरती मर्यादित राहिली नाही. यातून जगभरच्या तरुणांनी प्रेरणा घेतली आणि जगातील अनेक देशांत कम्युनिस्ट पक्ष स्थापन झाले. भारत याला अपवाद नव्हता. कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापनेबद्दल वाद आहेत. काही अभ्यासकांच्या मते भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना ताश्कंद येथे १७ ऑक्टोबर १९२० रोजी झाली. (हे ताश्कंद लालबहादुर शास्त्रीजींच्या मृत्यूमुळे भारतीयांना माहिती असते). यात एम एन रॉय, अबानी मुखर्जी, मोहम्मद अली मोहम्मद शफाक वगैरे होते. असे असले तरी २६ डिसेंबर १९२५ ही तारीख ढोबळमानाने मान्य झालेली आहे. (Communist Party of India)
रशियन क्रांतीनंतर जगभर उत्साह
आज ज्याला जगभर ‘कम्युनिझम’ म्हणून ओळखले जाते, त्या तत्त्वज्ञानाचा जनक म्हणजे जर्मन तत्त्वज्ञ कार्ल मार्क्स (१८१८-१८८३). त्याने २१ फेब्रुवारी १८४८ रोजी ‘कम्युनिस्ट जाहीरनामा’ प्रसिद्ध केला. (आज हा जाहीरनामा जगातल्या जवळजवळ सर्व भाषांत उपलब्ध आहे.) रशियन क्रांतीचा नेता लेनिन (१८७०-१९२४) फक्त राजकीय नेताच नव्हता तर विचारवंत होता. त्याने अनेक महत्त्वाची पुस्तकं लिहिली. त्यातील Marxism and Revisionism (1908), Imperialism the Highest state of Capitalism (1916) ही पुस्तकं फार महत्त्वाची समजली जातात. १९१७ साली रशियात क्रांती झाल्यानंतर जगभरच्या डाव्या शक्तींत उत्साह संचारला.
लोकमान्य टिळक यांच्यासारखे नेते जगभरच्या घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून असायचे. प्रा. जे. व्ही. नायक यांच्यासारख्या अभ्यासकांच्या मते जानेवारी १८८१ मध्ये टिळकांनी ‘म-हाठा’ या त्यांच्या इंग्रजी साप्ताहिकात परदेशात मार्क्सवर प्रसिद्ध झालेले लेख पुनर्मुद्रित केले होते. खरं तर ह्या घटनेच्या कितीतरी अगोदर खुद्द मार्क्सने भारतातील स्थितीबद्दल १८५३ ते १८६१ दरम्यान अमेरिकेतील ‘न्यूयॉर्क डेली ट्रिब्यून’ मध्ये लेखमाला लिहिली होती. (Communist Party of India)
कॉम्रेड डांगे यांचे योगदान
भारतातील सुरुवातीच्या कम्युनिस्ट चळवळीचा विचार करताना श्रीपाद अमृत डांगे (१८९९-१९९१) यांच्या योगदानाची तपशीलात चर्चा करावी लागते. भारतीय समाजाला डावा विचार समजावा म्हणून त्यांनी भरपूर लेखन केले. त्यांनी १९२१ साली प्रसिद्ध झालेले ‘गांधी विरुद्ध लेनिन’ हे पुस्तक लिहून गांधीविचारांच्या मर्यादा अधोरेखित केल्या. १९२२ साली डांगेंनी ‘सोशॅलिस्ट’ हे वृत्तपत्र सुरू केले. नंतर १९२७ ‘क्रांती’ हे साप्ताहिक सुरू केले. त्यांचे तात्त्विक विवेचन करणारे ‘प्राचीन इतिहासाची रूपरेषा’ हे पुस्तक १९४९ साली प्रसिद्ध झाले होते.
पार्टीने तेलंगण भागात १९४७ साली सशस्त्र उठावाचा प्रयत्न केला. मात्र उठावावरून पार्टीत तीव्र मतभेद निर्माण झाले. पी सी जोशींसारखे नेते ‘उठाव मागे घ्यावा आणि सनदशीर मार्गाने शेतक-यांचे प्रश्न सोडवावे’ या मताचे होते. पण तेव्हाचे पार्टीचे सचिव बी टी रणदिवे सशस्त्र उठाव चालू ठेवण्याच्या बाजूचे होते. एवढेच नव्हे तर तेलंगणातील यशापासून स्फूर्ती घेऊन हा सशस्त्र लढा देशभर न्यावा, अशी त्यांची इच्छा होती. दोन्ही गटांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. शेवटी १९४८ साली पार्टीचे सचिव झालेल्या रणदिवेंना १९५० साली हटवून चंद राजेश्वर राव यांना सचिवपदी नेमले. एप्रिल १९५१ मध्ये आचार्य विनोबा भावेंच्या मध्यस्थीमुळे सरकारने अटक केलेल्या पार्टीच्या अनेक कार्यकर्त्यांना सोडले. (Communist Party of India)
भारतातील पहिल्या सार्वत्रिक निवडणूका २५ ऑक्टोबर १९५१ ते २१ फेब्रुवारी १९५२ दरम्यान संपन्न झाल्या. या निवडणुकांत अपेक्षेप्रमाणे काँग्रेसने दणदणीत यश मिळवले. या पक्षाला एकुण ४९९ जागांपैकी ३६४ जागा जिंकल्या होत्या. दुसरा कमांक कम्युनिस्ट पक्षाचा होता. पक्षाला १६ जागा मिळाल्या होत्या. तिस-या कमांकावर समाजवादी पक्ष होता. या पक्षाला १२ जागा मिळाल्या होत्या. भारतीय जनसंघाला तीन जागा मिळाल्या होत्या.
केरळमध्ये कम्युनिस्टांचे यश
यानंतर १९५७ साली दुस-या सार्वत्रिक निवडणूका आल्या. याही निवडणूका भारताने यशस्वीपणे जिंकल्या. यातसुद्धा काँग्रेसने सत्ता कायम राखली. मात्र दक्षिण भारतातील केरळ या चिमुकल्या राज्याने इतिहास घडवला. या राज्यात भारतीय कम्युनिस्ट पार्टी सत्तेत आली. जगाच्या इतिहासात असे प्रथम घडत होते. जगात कम्युनिस्ट जेथे जेथे सत्तेत होते तेथे तेथे त्यांनी सशस्त्र कांती करूनच सत्ता हस्तगत केली होती. या सरकाने गरीबांसाठी अनेक कार्यकम राबवले. त्यामुळे हे सरकार प्रचंड लोकप्रिय झाले. यामुळे नेहरू सरकार घाबरले आाणि जुलै १९५९ मध्ये कलम ३५६ वापरून राज्य सरकार बडतर्फ केले.
भारतीय कम्युनिस्ट पक्षात फूट
भारतीय कम्युनिस्ट पक्षात १९६४ साली फूट पडली. ऑक्टोबर १९६२ मध्ये साम्यवादी चीनने भारतावर अचानक हल्ला केला. यामुळे भारतातील कम्युनिस्टांची पंचाईत झाली. तेव्हा कम्युनिस्ट पक्षाच्या सचिवपदी श्रीपाद अमृत डांगे होते. १३ जानेवारी १९६२ रोजी पक्षाचे सचिव अजय घोष यांचा मृत्यू झाला. त्यांच्यानंतर डांगे सचिव झाले. डांगेंना हा हल्ला म्हणजे आक्रमण वाटत होते. पक्षातील एक गट या भूमिकेबद्दल नाराज होता. या गटाने डांगेच्या भूमिकेला आव्हान दिले. यातून शेवटी पक्षात १९६४ साली फूट पडली आणि ज्योती बसू, प्रमोद दासगुप्ता, बसवपुनैय्या, नंबुद्रीपाद वगैरे बाहेर पडले आणि त्यांनी नोव्हेंबर १९६४ रोजी ‘मार्क्सवादी भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माकप) स्थापन केली. या फुटीला आंतरराष्ट्रीय राजकारणाचा एक आयाम होता. डांगे गटाला म्हणजे भारतीय कम्युनिस्ट पक्षाला (भाकप) ढोबळ मानाने ‘रशियावादी म्हणत तर माकपला ‘चीनवादी’ म्हणत. म्हणून माकपच्या अधिवेशनात माओचे फोटो हमखास आढळतात. (Communist Party of India)
सोविएत युनियनचे विघटन
१९९० साली सोव्हिएत युनियनचे विघटन झाल्यापासून जगभर डाव्या चळवळीची पिछेहाट झाली. याला भारत अपवाद नाही. जून २०२४ मध्ये अस्तित्वात आलेल्या लोकसभेत माकपाचे चार तर भाकपाचे दोन खासदार आहेत. केरळ राज्यात आज माकपच्या नेतृत्वाखाली डावी आघाडी सत्तेत आहे. हा एकमेव अपवाद वगळता हे पक्ष भारतीय संघराज्यातील इतर कोणत्याही राज्यांत सत्तेत नाही. भारतीय डाव्यांची महत्त्वाची मर्यादा डॉ. आंबेडकरांना जाणवली होती. बाबासाहेबांना भारतीय मनाची धर्माची भूक माहिती होती. म्हणूनच त्यांनी ‘धर्मांतर केले, ‘धर्मत्याग’ नाही. मात्र त्यांना डाव्यांची आर्थिक मांडणीसुद्धा मान्य होती. म्हणूनच त्यांनी ‘भारतातील सर्व जमीन सरकारच्या मालकीची असावी, अशी मागणी केली होती. बाबासाहेबांनी १९३६ साली स्थापन केलेल्या पहिल्या राजकीय पक्षाचे नाव होते- स्वतंत्र मजुर पक्ष.
असे असले तरी हा पक्ष, कम्युनिस्ट विचारधारा कालबाह्य झालेली नाही, होणार नाही. जोपर्यंत जगात अन्याय-अत्याचार आहे, शोषण आहे: तोपर्यंत डावा विचार या ना त्या आकारात समोर येत राहील. जगाचा इतिहास साक्ष देतो की आधुनिक काळात मार्क्सवाद ही एकमेव विचारधारा आहे, जी उघडपणे, ठसठशीतपणे गोरगरीबांची, दुर्बलांची बाजू घेते आणि त्यांच्या न्याय्यहक्कांसाठी लढते.
आता म्हणजे एकविसाव्या शतकातल्या नव्या पिढीच्या डाव्या नेत्यांनी भारतीय समाजाच्या आकलनात बदल केलेला आहे. आता त्यांना जातीव्यवस्थेचे अस्तित्व आणि तिच्या भयानक परिणामांचा अंदाज आला आहे. जुलै २०२४ पासून भाकपने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जातनिहाय जनगणना परिषद आयोजित करून जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे, ही मागणी रेटून धरली आहे. एवढेच नव्हे तर सहा सप्टेंबर २०२४ रोजी या मागणीसाठी कोल्हापूरला राज्यव्यापी परिषद घेतली होती. हे बदल स्वागतार्ह आहेत. (Communist Party of India)
हेही वाचा :
-
डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर
सनातन मंडळी एक मजेशीर खेळी खेळतात. परिवर्तनाच्या चळवळीतील नेते मंडळींना प्रथम ते उपेक्षेने संपविण्याचा प्रयत्न करतात. ते तसे संपले नाहीत, तर त्यांना उपहासाने संपविण्याचा प्रयत्न करतात. तसे ते संपले नाहीत तर त्यांना छानपणे कापून आपल्या ‘चौकटीत बसवतात! मग तुम्हाला पटवून देतात, ‘या महामानवांनी जे सांगितले, तेच आम्ही सांगतोय!’ वर सांगितलेले तीन मुद्दे आपण लक्षात घेऊया. सनातनी पुण्याने महात्मा फुलेंना प्रथम उपेक्षेने संपविण्याचा प्रयत्न केला. पण हे प्रकरण हाताबाहेर जातंय असे वाटल्यावर चिपळूणकरांनी आपल्या ‘निबंधमाले’त लिहिले, ‘या जोतीला निबंध म्हणजे काय हे तरी माहीत आहे का? आणि हा म्हणे निबंध लिहितोय! लिहू देत बापडा, कारण हा जोती म्हणजे मोहरीचे दोन दाणे. या पारड्यात पडले काय आणि त्या पारड्यात पडले काय, त्यामुळे काय फरक पडणार आहे?’ (Swami Vivekananda)
आज लोक ‘निबंधमाला’ विसरलेत. काही जणांना निबंधमाला आणि चिपळूणकर आठवले तरी हे विधान विष्णुशास्त्री चिपळूणकरांचे की कृष्णशास्त्री चिपळूणकरांचे हे सांगता येणार नाही. पण आज परिवाराच्या समरसता मंचावर एका बाजूला गुरू गोळवलकर दुसऱ्या बाजूला डॉक्टर हेगडेवार आणि मध्यभागी महात्मा फुले अशा प्रतिमा ठेवलेल्या असतात. ज्यांनी महात्मा फुले वाचलेले नसतील त्यांना वाटते गुरू गोळवलकर आणि डॉ. हेडगेवार, महात्मा फुले यांनी जे विचार मांडले होते तेच विचार आज प्रत्यक्षात आणताहेत! अर्थातच महात्मा फुले यांच्याबाबत तसे काही होत नाही. कारण आपणाला महात्मा फुले आणि त्यांचे विचार माहीत असतात.
विवेकानंद आणि मुसलमान
परंतु आपणाला जर महामानवाचे फक्त नावच माहीत असेल, तर त्यांची ही खेळी मोठ्या प्रमाणात किंवा पूर्णपणे यशस्वी होते. स्वामी विवेकानंदांबाबत असे झालेय. या मंडळींनी ‘विवेकानंदांनी हिंदू धर्माचा झेंडा त्रिखंडात मिरवला,’ हे आपल्या मनावर वज्रलेप करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्यानंतर भारतभर सर्वत्र लावलेल्या भित्तिपत्रकातून त्यांनी घरोघरी विवेकानंदांचा एक संदेश पोहोचवला. विवेकानंद म्हणालेत, ‘भारतातील सर्व मुसलमानांना अरबी समुद्रात बुडवा!’
या दोन्ही गोष्टी शतप्रतिशत खोट्या आहेत. खरी गोष्ट अशी आहे की विवेकानंदांनी सनातनी ब्राह्मणी हिंदू धर्मावर घणाघाती प्रहार केले. सनातनी हिंदू धर्माने त्यांना अपरंपार यातना दिल्या. आणखी एक गोष्ट म्हणजे विवेकानंदांनी इस्लामचा गौरव केलाय. ‘या देशाचा अभ्युदय करायचा असेल तर हिंदू-मुसलमान सहकार्य नव्हे तर समन्वय हवा आणि ती सन्मवयाची प्रक्रिया या देशात सुरू झाली आहे. धर्मांध शक्ती त्यात व्यत्यय आणणार नाहीत ते पहा.’ असे सांगितलेय. या देशाचे नवनिर्माण कसे करता येईल, याबद्दल त्यांनी सांगितलेली रचना आपणाला आजही अचंबित करते. त्याच वेळी ते कृतिशील विचारवंत आहेत. धडपडत, पडत, अडखळत त्यांनी पहिली पावले टाकली. महात्मा गांधी यांच्या स्वातंत्र्यलढ्याचा आराखडा विवेकानंदांनी सांगितलेला आहे. विवेकानंदांनी जगातल्या सर्व धर्मांवर घणाघाती प्रहार करत असतानाच या सर्व धर्मांमधील गाळ काढून टाकला तर ते मानवी जीवनात, मानवी समाजरचनेत संप्रेरक (म्हणजे आजच्या मराठीत कॅटॅलिस्ट!) म्हणून उपयोगी येतील हे सांगितलेय. देशाच्या सीमा संपल्या पाहिजेत. मी समाजवादी आहे. पण समाजवादाला आपली मांडणी नव्याने करावी लागेल, म्हणून सांगितलेय. आपण यातील एकेक गोष्ट नीटपणे लक्षात घ्यावयास हवी. (Swami Vivekananda)
हिंदू धर्मावर कठोर टीका
महात्मा फुले आणि भारतरत्न आंबेडकर यांच्यापेक्षा अधिक भेदक टीका विवेकानंदांनी हिंदू धर्मावर केली आहे. वयाच्या २६व्या वर्षी म्हणजे ७ ऑगस्ट १८८९ रोजी पूज्यपाद यांना पत्र पाठवून त्यांनी कळविले. ‘आपल्या देशातील प्राचीन मतानुसार जाती विभाग हा वंशगत मानलेला आहे याबाबत माझी खात्री झालेली आहे. त्याचप्रमाणे स्पार्टा देशातील लोकांनी तेथील गुलामांवर अथवा अमेरिकेतील गोऱ्या लोकांनी तेथील निग्रोंवर जेवढे अत्याचार केले आहेत, त्यापेक्षा जास्त अत्याचार आपण आपल्या देशातील शूद्रांवर केले आहेत. ‘
१७ ऑगस्ट १८८९ रोजी पूज्यपादांना पाठविलेल्या पत्रात विवेकानंद त्यांना सांगतात, ‘आपले वेद म्हणजे देववाणी. मात्र आज खगोलशास्त्रातील अगदी साध्या गोष्टी त्यांना पूर्णपणे चूक ठरवते. पृथ्वी त्रिकोणी आहे आणि ती वासुकीच्या मस्तकावर ठेवलेली आहे, हे त्यांचे ज्ञान बरोबर घेऊन आपण आज जगात कसे काय जगणार?’
विवेकानंदांनी ३० मे १८९७ रोजी श्री. प्रमदादास मित्र यांना पाठविलेले पत्र महत्त्वाचे आहे. कारण प्रमदादास सनातन हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्यासमोर उभे आहेत आणि या पत्रानंतर त्यांचा आणि विवेकानंदांचा पत्रव्यवहार थांबला. त्या पत्रात विवेकानंद त्यांना सांगताहेत, ‘स्मृती आणि पुराणे हे ग्रंथ सामान्य बुद्धिमत्तेच्या लोकांनी रचले असून ते तर्कदोष, चुका, भेदभावना, द्वेषभावना यांनी ओतप्रोत भरलेले आहेत. रामानुज, शंकराचार्य हे पुरुष संकुचित हृदयाचे निव्वळ पंडित होते. त्यांच्या ठायी शूद्रांचे, गरिबांचे दुःख पाहून कळवळणारे हृदय कोठे दिसत नाही. दिसते ती पंडितांची शुष्क विद्वत्ता! माझ्या मते जातिव्यवस्था हा मोठा विभाजक घटक आहे. परोपकार हाच धर्म आहे. विधी-अनुष्ठाने या गोष्टी निव्वळ खुळेपणा आहेत.’ (Swami Vivekananda)
देवा माझ्या देशाचे रक्षण कर
- विवेकानंदांनी जून १८९० मध्ये वराहनगर मठ सोडला आणि परिव्राजक म्हणजे भटका संन्यासी म्हणून तीन वर्षे सारा भारत उभा-आडवा पिंजून काढला. त्या कालखंडात २२ ऑगस्ट १८९२ रोजी हरिदास बिहारीलाल देसाई यांना मुंबईहून पाठविलेल्या पत्रात ते म्हणतात, ‘खाणेपिणे आणि स्नान या गोष्टींबाबतचे लोकभ्रमाचे गाठोडे म्हणजे धर्म हीच इकडील लोकांची समजूत आहे. अप्रामाणिक, ढोंगी पुरोहित जे शिकवतील, जी लटपटपंची करतील तोच धर्म असे ते समजतात. कलियुगात ब्राह्मणांच्या रूपाने हिंडणाऱ्या या राक्षसांच्या हातून देवा माझ्या देशाचे रक्षण कर.’
धर्म आहे की सैतानाचे तांडव ?
२० ऑगस्ट १८९३ रोजी विवेकानंद अमेरिकेत होते. सर्वधर्मपरिषदेला अजून तीन आठवडे होते. आमंत्रण नसताना आले म्हणून त्यापूर्वी स्वागतकक्षातून त्यांची खिल्ली उडवून त्यांना परत पाठवलं गेलं. आपण ते आमंत्रण मिळवूच हा विश्वास होता. पण ते तसे मिळाले नाही, तर काय होईल आणि तुम्ही काय करा हे त्यांनी २० ऑगस्ट १८९३ या दिवशी त्यांचा शिष्य आलासिंगा पेरुमल यांना पत्रातून कळवले. पत्रात ते लिहितात, ‘हिंदू धर्माइतका इतर कोणताही धर्म, अगदी ओरडून, ‘सारे मानव एक’ असे सांगत नाही आणि हिंदू धर्म गरीब आणि खालच्या जातीच्या लोकांना जेवढे पायाखाली तुडवितो तेवढा जगातील इतर कोणताही धर्म तुडवीत नाही! या दूरच्या देशात उपासमारीने किंवा भयंकर थंडीने कदाचित मला मरण येईल. पण माझ्या प्रिय तरुणांनो मी तुमच्यासमोर ‘दलित आणि गरीब यांच्या उन्नतीसाठी’ प्राण पणाला लावून प्रयत्न करण्याचा वारसा ठेवून जात आहे.’
सर्वधर्मपरिषदेनंतर विवेकानंद सव्वा तीन वर्षे इंग्लंड आणि अमेरिकेत होते. त्या कालखंडात त्यांनी लिहिलेली तीन पत्रे फार महत्त्वाची आहेत. त्यातील पहिले पत्र त्यांनी १९ मार्च १८९४ रोजी त्यांचा वराहनगर मठातील गुरुबंधू शशी यांना पाठवले. शशी श्रीरामकृष्णांचे फार जवळचे होते म्हणून त्यांना रामकृष्णानंद असेही म्हणतात. त्या पत्रात विवेकानंद लिहिताहेत, ‘दक्षिण भारतात उच्च जातींकडून खालच्या जातींवर होणारा महाभयानक अत्याचार मी पाहिला आहे. आपला धर्म हा धर्म या नावाला तरी पात्र आहे का? आपल्या देशातील दारिद्र्य आणि अज्ञान पाहून मला रात्र रात्र झोप येत नसे. कोट्यवधी लोक अर्धपोटी आहेत किंवा पालापाचोळा खाऊन जगतात आणि त्यांना धर्मज्ञान देतो आहे असे सांगणारे काही लाख साधूसंन्यासी व काही ब्राह्मण कायम मिष्टान्न खातात. हा काय देश आहे की नरक? हा काय धर्म आहे की हे आहे सैतानाचे तांडव ?’
२७ ऑक्टोबर १८९४ रोजी त्यांचा शिष्य आलासिंगा पेरुमल यांना पत्र पाठवून त्यांनी सांगितले, ‘जो धर्म वा जो देव विधवांचे अश्रू पुसत नाही, अनाथ बालकांच्या मुखात अन्नाचा घास घालत नाही, त्या धर्मावर व त्या ईश्वरावर माझा विश्वास नाही.’ १८८५ मध्ये विवेकानंदांनी त्यांचा गुरुबंधू ब्रह्मानंद यांना पत्र पाठवून सांगितले, ‘आज आठ वर्षांच्या कोवळ्या मुलीचा तीस वर्षांच्या घोडनवऱ्याशी विवाह होतोय. त्या विवाहाबद्दल आई-वडिलांना आनंद होतोय. आम्ही त्याला विरोध केला तर तुम्ही आमचा धर्म बुडवत आहात, असे म्हणतात! अरे मुलगी वयात येण्यापूर्वी तिला आई बनवायला निघालेल्या समाजाला कसला आलाय धर्म ?’
सनातन ब्राह्मणी हिंदू धर्माकडून मरणप्राय यातना
१८९७ मध्ये विवेकानंद बेलूर मठाची स्थापना करण्यात गुंतले होते. त्या वेळी ५ मे १८९७ रोजी धीरामाता यांना पत्र पाठवून त्यांनी सांगितले, ‘आजचा हिंदू धर्म जो अनेक घृणास्पद गोष्टींनी भरलेला आहे, तो दुसरे तिसरे काही नसून अवकळा प्राप्त झालेला बौद्ध धर्म आहे. हे आपण हिंदूंना पटवून देऊ शकलो, तर फारशी खळखळ न करता तो सोडून देणे हिंदूंना शक्य होईल.’
हे असे विचार मांडणाऱ्या विवेकानंदांना सनातन ब्राह्मणी हिंदू धर्माने मरणप्राय यातना दिल्या. विवेकानंद अमेरिकेत भाषणे देत होते, त्या वेळी ‘युनिटी ऑफ द मिनिस्टर’ या ब्राह्मो समाजाच्या मुखपत्राने लिहिले, ‘बाबू नरेंद्रनाथ दत्त तथा स्वामी विवेकानंद यांना आम्ही कलकत्ता येथील नववृंदावन थिएटर या नाट्यसंस्थेतील रंगभूमीवर काम करणारा एक नट म्हणून ओळखतो.’ ‘इंडियन रिव्ह्यू’ यांनी लिहिले, ‘हा माणूस ब्राह्मण नाही, शूद्र आहे. याला हिंदू धर्मावर बोलण्याचा काहीही अधिकार नाही.’
जानेवारी १८९७ मध्ये विवेकानंद भारतात परत आले. या देशातील सर्वसामान्य माणसांनी त्यांचे देवदुर्लभ असे स्वागत केले. मात्र त्याच वेळी महामहोपाध्याय गोपाळशास्त्री कराडकर यांनी वेदशास्त्रसंपन्न त्र्यंबकशास्त्री वैद्य यांना पत्र पाठवून सांगितले, ‘हा माणूस शूद्र आहे. त्यातून हा समुद्रप्रवास करून आलाय. प्रायश्चित्त देऊनही याला शुद्ध करता येणार नाही.’ विवेकानंद कलकत्त्याला पोहोचले. तेव्हा ‘बंगवासी’ने लिहिले, ‘हा माणूस शूद्र आहे. हिंदू धर्मावर बोलण्याचा आणि संन्यास घेण्याचा याला अधिकार नाही.’ २८ फेब्रुवारी १८९८ रोजी विवेकानंद भगिनी निवेदिता यांना बरोबर घेऊन श्री रामकृष्ण परमहंस यांची जयंती साजरी करायला दक्षिणेश्वरच्या मंदिरात गेले. मंदिराच्या पुजाऱ्यांनी त्यांना मंदिरात प्रवेश करण्यास मज्जाव केला. विवेकानंदांना दारातूनच परत फिरावे लागले. १४ सप्टेंबर १८९९ रोजी लंडनमधील वेदान्त सोसायटीचे प्रमुख, त्यांचे मित्र ई. टी. स्टर्डी यांना पत्र पाठवून त्यांनी कळविले, ‘भारतात पाय ठेवल्यावर या लोकांनी मला मुंडन करून कफनी घालावयास लावले. या अशा अनेक गोष्टींमुळे मधुमेहापासून संधिवातापर्यंतचे माझे सारे आजार बळावले आहेत. या अशा अनेक गोष्टींमुळे मला तीव्र वेदना होत आहेत. मात्र त्यामुळे मला आयुष्यातील एक फार मोठा अनुभव मिळाला आहे. तो मला पुढील वाटचालीत नक्कीच उपयोगी पडेल. ‘
जात हे देशातील खरे दुखणे, धर्म नव्हे!
विवेकानंदांनी हिंदू धर्मावर ओढलेले आसूड आणि सनातन हिंदू धर्मांनी त्यांना दिलेल्या यातना आपण पाहिल्या. आता विवेकानंदांनी हिंदू-मुसलमान समन्वय या देशात सुरू झालाय आणि धर्मांध शक्ती त्यात अडथळे आणताहेत हे अगदी स्पष्ट शब्दांत सांगितलेय ते समजावून घेऊया. आपल्या मनावर एक विचार वज्रलेप करण्याचा प्रयत्न झालाय. तो विचार सांगतो, ‘अत्याचार करून तलवारीच्या जोरावर हिंदूंना मुसलमान आणि ख्रिश्चन बनवले.’ विवेकानंद हे पूर्णपणे नाकारतात. त्यातील पहिले पत्र त्यांनी २२ सप्टेंबर १८९२ रोजी म्हणजे सर्वधर्मपरिषदेच्या एक वर्ष आधी खेत्रीनिवासी पंडितलाल शर्मा यांना पाठवलेय. दुसरे पत्र सर्वधर्मपरिषदेनंतर एक वर्षाने नोव्हेंबर १८९४ मध्ये दिवाणजी यांना पाठवलेय.
त्या दोन्ही पत्रांत ते सांगताहेत, ‘या देशातील धर्मांतरे तलवारीच्या जोरावर झाली, असे मानणे हे ‘महामूर्खपणाचेच’ आहे. त्यांनी धर्मांतरे केलीत पुरोहितांच्या अत्याचारापासून मुक्त होण्यासाठी, उच्चवर्णीय हिंदू जमीनदारांच्या जाचातून मोकळे होण्यासाठी.’
विवेकानंद आणखीन पुढे गेलेयत. २९ मार्च १८९४ रोजी अमेरिकेतून केरळचे धर्मगुरू सर रेव्हरंड आर ह्युम यांना पत्र पाठवून त्यांनी सांगितले, ‘तू हिंदूंना कॅथॉलिक केलेले नाहीस! तू त्यांना आपापल्या जातीत कॅथॉलिक केलंयस.’ जात हे या देशातील खरे दुखणे आहे, धर्म हे नव्हे! हे आज सच्चर समितीचा अहवाल आपणाला सांगतो. त्याआधी खूप वर्षे हे विवेकानंदांनी सांगितलेय !
मुसलमान राजवट वाईट होती. त्यांनी अत्याचार केले. लुटालूट केली. हे आपल्या मनावर बिंबविण्यात आलेय. ते पूर्णपणे चुकीचे आहे हे विवेकानंद सांगतात. ‘भारताचा ऐतिहासिक क्रमविकास’ या आपल्या निबंधात ते म्हणतात, ‘मोगलांच्या दरबारात जे बौद्धिक वैभव होते, त्याचा अंशमात्रसुद्धा आपल्याला पुण्याच्या आणि लाहोरच्या दरबारात दिसत नाही.’ ‘भारताचा भावी काळ’ या आपल्या भाषणात ते म्हणतात, ‘कोणतीही राजवट ही पूर्णपणे चांगली किंवा पूर्णपणे वाईट नसते. मुसलमान राजवटीचे भारतातील योगदान हे की गरिबांची आणि दलितांची स्थिती सुधारली आणि विशेषाधिकार संपले!’
हिंदू-मुसलमान समन्वयाचा पुरस्कार
हिंदू-मुसलमान सहकार्याची नव्हे तर समन्वयाची एक प्रक्रिया या देशात सुरू झालेली आहे आणि ती जपा, हे विवेकानंद हिंदू आणि मुसलमान या दोघांच्याही लक्षात आणून देतात. १० जून १८९८ रोजी सर्फराज मोहमद हुसेन यांना पत्र पाठवून त्यांनी सांगितले, ‘आमच्या वेदान्तातील सिद्धान्त कितीही सूक्ष्म आणि सुंदर असले, तरी समतेचा संदेश सर्वप्रथम व्यवहारात आणला तो इस्लामनेच. आम्ही व्यवहारातील समता इस्लामकडून शिकतोय.’ मात्र त्याच वेळी हा एकमार्गी प्रवास नाही, तर हे आदानप्रदान आहे, हे त्यांनी सांगितलेय. अमेरिकेत बोस्टन येथे वेंटिथ सेंच्युरी हॉलमध्ये मुलाखत देताना त्यांनी सांगितले, ‘भारतातील इस्लामवर वेदान्तातील उदारमतवादाचा परिणाम झाला आहे. तो सहिष्णू बनलाय आणि जगभराच्या इस्लामपेक्षा वेगळा आहे.’ भगिनी निवेदिता यांनी ‘मला प्रतीत झालेले माझे गुरू’ म्हणून जे पुस्तक लिहिलेय त्यात त्यांनी लिहिलेय, ‘हिंदू-मुसलमान यांच्या समन्वयावरच हा देश उभा राहील, हे त्यांचे मत होते.’ बोलण्याच्या ओघात ते एकदा म्हणाले, ‘या देशात ताजमहालासारखी अलौकिक वास्तू निर्माण करणाऱ्या शहाजहानला तू परकीय आहेस असे म्हणालात तर त्याच्या कबरीतसुद्धा त्याचा थरकाप उडेल !’
विवेकानंदांना हिंदूंनी का स्वीकारले?
आपण आपल्या मूळ प्रश्नाकडे थोडा वेळ परत जाऊया. विवेकानंदांनी हिंदू धर्माचा झेंडा त्रिखंडात मिरवला आहे, असे सांगणे सनातनी शक्तींना शक्य का झाले? आणि विवेकानंदांची धर्मांबाबतची कल्पना काय होती? आज आपणासमोर ठेवले जाते ते सर्वधर्मपरिषदेत ११ सप्टेंबर १८९३ रोजी विवेकानंदांनी दिलेले फक्त आठ मिनिटांचे भाषण !
१८९३ मध्ये कोलंबस अमेरिकेला येऊन चारशे वर्षे पूर्ण होत होती. म्हणून अमेरिकेत वर्षभर फार मोठे साहित्यिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक कार्यक्रम होणार होते. त्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून सर्वधर्मपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते. तीन वर्षे या परिषदेची तयारी सुरू होती. अनेक धर्मगुरूंशी बोलून आणि वेगवेगळ्या समित्या जगभर नेमून प्रत्येक धर्माचा योग्य प्रतिनिधी निवडण्यात आला होता. त्याने त्याच्या धर्माचे वेगळेपण सांगावे, इतर धर्मांपेक्षा तो वेगळा कसा हे सांगावे. त्याचा धर्म जगासमोरचे आजचे प्रश्न कसे सोडवेल आणि इतर धर्मांत आणि त्याच्या धर्मात समन्वय शक्य आहे का? यावरचे आपले विचार मांडावेत अशी रचना होती. निवड झालेल्या प्रत्येक धर्माच्या प्रतिनिधीला जाण्यायेण्याचा खर्च, राहण्याची सोय, भरपूर मानधन या सर्व गोष्टी मिळणार होत्या.
या सर्वधर्मपरिषदेत हिंदू धर्माने आपला प्रतिनिधीच पाठवला नव्हता. कारण अगदी साधे होते. वाटेत हिंदू धर्म बुडविणारा समुद्रप्रवास होता आणि हो परिसंवाद संस्कृत भाषेत नव्हता तर चक्क यवनी भाषेत होता! खिशात दमडी नसताना आणि आमंत्रण नसताना भटका संन्यासी म्हणून भारतभर हिंडणाऱ्या विवेकानंदांनी तिथे जाण्याचे ठरविले. विवेकानंदांची मते सनातन हिंदू धर्माला सहनही होणार नाहीत, अशी आहेत.
२० सप्टेंबर १८९२ रोजी शंकरलाल शर्मा यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटलेय, ‘आपल्या देशाच्या अवनतीचे एक प्रमुख कारण म्हणजे आपण समुद्रप्रवास नाकारला. प्रवास केलाच पाहिजे. दुसऱ्या देशात गेले पाहिजे. आपल्याला जर खरेखुरे राष्ट्र निर्माण करावयाचे असेल, तर अन्य देशांतील विचारप्रवाहांशी आपण खुल्या व मोकळ्या मनाने सतत संबंध ठेवला पाहिजे.’
अमेरिकेत पोहोचल्यावर विवेकानंदांनी अधिक स्पष्ट शब्दांत २७ ऑक्टोबर १८९४ रोजी आलासिंगा पेरुमल यांना पत्र पाठवून सांगितले, ‘ज्या क्षणी हिंदूंनी म्लेंछ हा शब्द शोधून काढला आणि इतर व्यक्तींशी, राष्ट्रांशी आणि धर्माशी असलेला आपला संबंध तोडून टाकला त्या क्षणीच भारताच्या कपाळी सत्यानाश लिहिला गेला.’
सर्वधर्म परिषदेतील भाषण
ते असो! असे खणखणीत विचार असलेले विवेकानंद अमेरिकेला पोहोचले. आमंत्रण नसताना आले म्हणून त्यांची तिथे खिल्ली उडवली गेली. प्रचंड आत्मविश्वास, अथक चिकाटी आणि अद्भुत स्मरणशक्ती याच्या जोरावर विवेकानंदांनी हे आमंत्रण सन्मानपूर्वक मिळविले. सर्वधर्मपरिषद ११ सप्टेंबर १८९३ रोजी सुरू झाली. मात्र ही सर्वधर्मपरिषद सतरा दिवस सुरू होती. ११ सप्टेंबरला सर्वधर्मच्या प्रतिनिधींनी आठ-दहा मिनिटांत आपला धर्म समजावून द्यावयाचा होता. आलेल्या प्रतिनिधींपैकी फक्त बावीस जणांना ही संधी मिळाली. विवेकानंदांचे ते आठ मिनिटांचे भाषण सबंध सभागृहाला संमोहित करून गेले. वक्ता म्हणून विवेकानंदांचे अलौकिक मोठेपण अमेरिकेला समजले हे खरे. मात्र आपण एक गोष्ट लक्षात घेत नाही. पुढील सोळा दिवसांत विवेकानंदांनी धर्म म्हणजे काय हे जगभरातून आलेल्या धर्मगुरूंना समजावून दिले! हिंदू धर्माच्या मर्यादा तिथे पण सांगितल्या! २६ सप्टेंबरच्या संध्याकाळच्या सत्रातील विषय होता ‘बौद्ध धर्म’. वक्त्यांमध्ये अर्थातच विवेकानंदांचे नाव नव्हते. बहुतेक वक्त्यांनी ‘बौद्ध धर्म भारतात जन्माला येऊन जगभर पसरला. भारतातून मात्र तो हद्दपार केला गेला याचा उल्लेख केला.’ धर्मपाल यांनी तर ‘विवेकानंदांनी आमच्या मांडणीचा प्रतिवाद करावा’ असे आवाहन केले. अध्यक्षस्थानी असलेल्या आल्फ्रेड मॉमरी यांनी विवेकानंदांना विनंती केली, ‘तुम्ही आपली प्रतिक्रिया व्यक्त करणे गरजेचे आहे.’
विवेकानंद म्हणाले, ‘खरंतर तुम्ही मला वक्ता म्हणून बोलवावयास हवे होते. कारण मी स्वतः बौद्ध आहे! येशू ख्रिस्त आणि बुद्ध नक्की काय होते हे मानवजातीला समजलेले नाही. येशू ख्रिस्तांना ‘जुन्या करारातील’ अपूर्णता दूर करावयाची होती. त्याचप्रमाणे आमचे बुद्धदेवही हिंदू धर्मातील कालबाह्य तत्त्वे, रूढी आणि काळाच्या प्रवाहात त्यात आलेले दोष दूर करण्यासाठी आले होते. जातिव्यवस्था ही कालबाह्य सामाजिक व्यवस्था आहे. जातिव्यवस्था म्हणजे काही जणांना विशेषाधिकार देणे. याउलट सर्व प्रकारचे विशेषाधिकार नाहीसे करणे, हे नीतीचे आणि नीतितत्त्वावर आधारलेल्या कोणत्याही धर्माचे प्रमुख ध्येय आहे. बौद्ध धर्माने सांगितलेला करुणेचा आणि समतेचा संदेश बरोबर नसेल, तर आमचा किंवा कोणत्याच धर्माचा निभाव लागणार नाही.’
सतरा दिवस चाललेली सर्वधर्मपरिषद २८ सप्टेंबरला संपली. ३० सप्टेंबर १८९३ रोजी ‘बोस्टन इव्हिनिंग ट्रान्सक्रिप्ट’मध्ये आलेली बातमी आहे. ‘सर्वधर्मपरिषदेपुढे झालेले विवेकानंदांचे भाषण आकाशासारखे व्यापक स्वरूपाचे होते व त्यात सर्व धर्मांतील सर्वोत्कृष्ट तत्त्वांचा समावेश होता. सर्व मानवजातीविषयी दया, शिक्षेच्या वा बक्षिसाच्या आशेने नव्हे, तर ईश्वरावरील प्रेमासाठीच सत्कृत्याचे आचरण या तत्त्वांचा या भाषणात अंतर्भाव होता आणि त्यालाच त्यांनी उद्याचा विश्वधर्म असे म्हटले.’ ‘अनेक शतकांच्या प्रवासात सर्व धर्मांमध्ये गाळ साठलेला आहे. तो काढून सर्व धर्म शुद्ध स्वरूपात मानवजातीपुढे ठेवून, ते सर्व एकच आहेत हे समजावून देणे हे माझे जीवितकार्य आहे,’ असे सांगणाऱ्या विवेकानंदांनी सर्व धर्मांना याची जाणीव करून दिली आहे.
२१ मार्च १८९५ रोजी न्यूयॉर्कमधून श्रीमती सारा ओली बुल यांना पाठविलेल्या पत्रात ते म्हणतात, ‘ख्रिश्चन, हिंदू, मुसलमान ही नावे माणसांच्यात बंधुभाव निर्माण करण्याऐवजी दुरावा किंवा वैर निर्माण करताहेत. या सर्व धर्मांमधील शुभ शक्ती आता नाहीशा होऊन त्या आता हानिकारक स्वरूपात भोवताली आहेत आणि त्यांच्या प्रभावामुळे अगदी चांगली माणसेसुद्धा अगदी सैतानासारखी वागताहेत. आटोकाट प्रयत्न करून आपल्याला यश मिळवायचंय.’
हेच विचार अगदी ज्वालाग्राही शब्दांत त्यांनी ७ जून १८९६ रोजी मागरिट नोबेल म्हणजे नंतरच्या भगिनी निवेदिता यांना सांगितले. ‘आजचे जगातील सर्व धर्म हे निर्जीव विडंबनाच्या रूपाने उरलेले आहेत.’
धर्माची विज्ञानाशी सांगड
लंडन येथे ‘धर्माची आवश्यकता’ या विषयावर त्यांनी जे भाषण दिले त्यात त्यांनी हे अगदी स्पष्ट शब्दांत सांगितले, ‘एक धर्म खरा ठरला तर सर्व धर्म खरे ठरतात आणि एक धर्म खोटा ठरला तर सारे धर्म खोटे ठरतात आणि कोणताही धर्म न मानणारी पण खऱ्या अर्थाने धार्मिक असलेली माणसे आपल्या भोवताली असतात हे पण आपण लक्षात घ्यावयास हवे. आपणाला आज नवा धर्म हवा आहे. आज जगात जे काही चांगले आहे, त्या सर्वांचा समावेश या धर्मात असेल. पण हा धर्म विज्ञानावर आधारित असेल. त्यामुळे तो स्थितिशील नसेल तर गतिशील असेल. सारांश, धर्म आणि आधुनिक भौतिक विज्ञान यांच्यात समन्वय घडून यावयास हवा. हा समन्वय होण्यासाठी या दोघांनाही एकमेकांना काही सवलती द्याव्या लागतील. हे अत्यावश्यक आहे पण हे कठीण आहे, याची मला जाणीव आहे.’
विवेकानंद धर्माकडे संप्रेरक म्हणून पाहतात. कोणतीही फार अवघड रासायनिक प्रक्रिया त्यात आपण चिमूटभर योग्य संप्रेरक टाकला तर सुतासारखी सरळ होते आणि ती रासायनिक प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्या चिमूटभर संप्रेरकामध्ये कोणताही बदल न होता पुन्हा तसाच उरलेला असतो. पुढील प्रक्रियेतसुद्धा आपण तो वापरू शकतो. मात्र अनेक वेळा वापरल्यावर तो विषारी बनतो. तो बदलावा लागतो. माणसाला आणि मानवी समाजाला स्वयंशासन देणारा धर्म हा विवेकानंदांच्या मनातील संप्रेरक आहे. त्यांच्या मनात हे अगदी पक्के बसले होते. एक गोष्ट लक्षात घ्या. विवेकानंद समाजवादी आहेत. त्यांनी अगदी स्पष्ट शब्दांत १ नोव्हेंबर १८९६ रोजी मेरी हेल यांना पाठविलेल्या पत्रात लिहिलेय, ‘प्रिय मेरी, मी समाजवादी आहे. ज्या वेळी एखाद्या देशात हा समाजवाद येईल त्या वेळी गरिबांची व दलितांची सामाजिक आणि आर्थिक स्थिती सुधारेल. शिक्षणाचा सार्वत्रिक प्रसार होईल. पण या समाजरचनेत एक धोका दिसतो. या समाजरचनेत मानवी स्वातंत्र्याचा लोप होईल आणि असामान्य प्रतिभावान माणसे निर्माण होणार नाहीत! त्यामुळे ही रचना पण येईल आणि जाईल त्या वेळी आपणाला त्यातील त्रुटी समजतील.’ त्यानंतर तीन महिन्यांनी म्हणजे फेब्रुवारी १८९७ मध्ये मद्रासमध्ये ‘हिंदू’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले, ‘सगळ्या समाजवादी सिद्धान्तांना आणि रचनेला अध्यात्म्याची जोड द्यावी लागेल.’ त्यानंतर १० जून १८९८ रोजी मोहमदानंद यांना पाठविलेल्या पत्रात आपली रचना सांगताना त्यांनी सांगितले, ‘जिथे वेद नाहीत, कुराण नाही आणि बायबलही नाही अशा ठिकाणी आपणाला मानवजातीला घेऊन जायचंय. आपल्याला हे काम वेद, कुराण आणि बायबल यांचा आधार घेऊनच करावे लागेल!’
वर केलेली चर्चा, विवेकानंदांचे विचार तसे परिपूर्ण वाटतात. पण ते अपुरे किंवा एकांगी असू शकतील. कारण फक्त ३९ वर्षांचे आयुष्य, अथक एकाकी धडपड, अनेक व्याधींनी ग्रासलेले शरीर. महत्त्वाचे म्हणजे विवेकानंद जे सांगताहेत ते समजून घेण्याची नव्हे तर ऐकण्याचीसुद्धा कुवत नसलेले शिष्य, गुरुबंधू, भोवतालचा सारा समाज. या अशा परिस्थितीत या देशाला स्वातंत्र्य मिळविण्याची एखादी रचना शोधत त्याची कार्यवाही करण्याचा प्रयत्न अंधारात चाचपडत विवेकानंद करत होते का? या प्रश्नाचे उत्तर विवेकानंदांची हजार-पंधराशे पत्रे, त्यांची सविस्तर पण उत्स्फूर्त भाषणे, त्यांनी अनेकांशी केलेले प्रत्यक्ष संवाद यात अजिबात मिळत नाही. कदाचित रामदासांच्या सांगण्याप्रमाणे ‘मसलतीचे बोलू नये, बोलायचे लिहू नये’ असे काही असू शकेल. पण ते नीटपणे समजून घ्यावयाचे असेल तर विवेकानंदांच्या आतल्या आवाजाच्या काही अंधूक लहरी आपल्याला ऐकू येतात का हे पाहावयास हवे. आजही भोवताली गूढतेचे वलय घेऊन उभ्या असलेल्या आणि पूर्णपणे फसलेल्या १८५७च्या स्वातंत्र्यलढ्यानंतर सहा वर्षांनी विवेकानंदांचा जन्म झाला. त्यांच्या बालवयात आणि कुमारवयात या स्वातंत्र्यलढ्याचे पडसाद त्यांच्या मनावर उमटलेले असणार. विवेकानंद १९ वर्षांचे असताना १८८२ मध्ये बंकिमचंद्र यांची ‘आनंदमठ’ ही कादंबरी प्रसिद्ध झाली. संन्याशांनी कल्पकतेने केलेले संघटन जुलमी राजवट कशी उलथवून टाकू शकेल याचे त्यात वर्णन आहे. त्यानंतर चार वर्षांनी विवेकानंद आणि त्यांच्या मित्रांनी वराहनगर मठ स्थापन केला. त्यापुढील चार वर्षांनी म्हणजे १८९० मध्ये विवेकानंद आणि त्यांचे मठातील गुरुबंधू एकेक करत भारतभ्रमण करावयास बाहेर पडले. पुढील तीन वर्षे विवेकानंदांनी भारत उभा-आडवा पिंजून काढला. ते कचराकुंडीजवळ झोपले, भंग्याच्या घरी राहिले. मुसलमानांच्याही घरी राहिले आणि राजवाड्यातही राहिले. सरदार हरिसिंग हे जयपूर लष्कराचे प्रमुख आहेत. त्यांच्या घरी विवेकानंदांनी दहा-बारा दिवस मुक्काम केला. क्रांतिकारकांच्या चळवळीला सक्रिय मदत व मार्गदर्शन करणारे पंडित शामजी कृष्णा वर्मा त्या वेळी अजमेरला राहत. विवेकानंद अजमेरला गेले त्या वेळी ते मुंबईला गेले होते. विवेकानंद अजमेरला आलेत हे समजल्यावर मुंबईतील आपली कामे सोडून ते परत आले. ते आणि विवेकानंद त्यानंतर दहा-बारा दिवस एकत्र होते.
या सर्व धडपडींतून आणि चिंतनातून विवेकानंदांना त्यांचा आतला आवाज ऐकू आला.
भारतात परत आल्यावर आपल्या शिष्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले, ‘आपले भौतिक सामर्थ्य वापरून आपण इंग्रजांना या देशातून घालवून देऊ असे समजणे म्हणजे हिमालयासमोर उभ्या असलेल्या एखाद्या मातीच्या ढेकळाने मी ताकद कमवेन आणि त्याला बाजूला करेन असे म्हणण्यासारखे आहे! माझा आतला आवाज सांगतोय, आम्ही वेदोक्त धर्माचे गूढ रहस्य पाश्चात्त्य जगात प्रसिद्ध करून त्या बलाढ्य लोकांची श्रद्धा व सहानुभूती संपादित करू. राजकारण हा गौण विषय ठरवून आपण राजकारण करू.’
विवेकानंदांची रचना येथे थांबते. त्यानंतर २५ वर्षांनी दुसरा एक महात्मा आपला आतला आवाज ऐकत ‘ईश्वर अल्ला तेरो नाम’ ही प्रार्थना आणि अहिंसक शांततामय कायदेभंग ही रचना बरोबर घेऊन आपली वाटचाल सुरू करतो.
विवेकानंद आणि गांधी
विवेकानंद आणि गांधीजी यांच्या आतल्या आवाजात आणखी एक साम्य आहे. दोघेही स्वातंत्र्य हे साध्य नव्हे तर एक साधन म्हणून त्याच्याकडे पाहतात. विवेकानंदांनी १९ नोव्हेंबर १८९४ रोजी अमेरिकेतून आपल्या मद्रास प्रांतातील सर्व शिष्यांना ‘माझ्या शूर युवकांनो’ असे संबोधन करत जे पत्र लिहिलेय त्यात त्यांना सांगितलेय, ‘कल्पना करा की इंग्रजांनी सारी सत्ता तुम्हाला दिली, तर परिणाम काय होईल? जे सत्ताधारी होतील ते इतरांना दडपून टाकतील. त्यांच्यापर्यंत काही ती सत्ता, ते स्वातंत्र्य पोहोचू देणार नाहीत. गुलामांना सत्ता हवी असते, इतरांना गुलाम बनविण्यासाठी.’ हे असे होऊ नये यावर फक्त एकच मार्ग आहे, हे विवेकानंद आणि गांधीजी यांना त्यांच्या आतल्या आवाजाने सांगितले आहे. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे दोघांचाही आतला आवाज त्यांना नेमकी एकच गोष्ट सांगतोय.
‘या देशात सुरुवात खेड्यापासून करावी लागेल. प्रत्येक खेडे स्वयंपूर्ण आणि निर्भय बनवले पाहिजे.’ विवेकानंदांची रचना गांधीजींपेक्षा अधिक आक्रमक आणि अधिक गोळीबंद आहे. तीन वर्षे भटका संन्यासी म्हणून सारा भारत उभा-आडवा पिंजून काढल्यावर प्रत्येक खेडे हे अर्धपोटी आणि अर्धनग्न आहे हे पाहून मला रात्र रात्र झोप येत नाही, हे मित्रांना सांगताना या सर्वावरचा एकमेव उपाय त्यांच्या आतल्या आवाजाने त्यांना सांगितला आहे. परंतु अमेरिकेत जाण्यापूर्वी त्यांनी हा आपला आतला आवाज कोणालाही सांगितलेला नाही. सर्वधर्मपरिषदेत विवेकानंद उभे राहिले ते केवळ प्रोफेसर राईट यांच्यामुळे. त्यांना हा उपाय विवेकानंदांनी सांगितला आहे. पण तो उपाय काय हे त्यांनी राईट यांना पाठविलेल्या पत्रातून आपणाला कळत नाही. परिषद संपल्यावर २ ऑक्टोबर १८९३ रोजी राईट यांना पाठविलेल्या पत्रात त्यांनी लिहिलेय, ‘तुमचे माझ्यावर किती उपकार आहेत म्हणून सांगू! मला जगाच्या व्यासपीठावर तुमच्यामुळे आणून ठेवणारी ती परिषद आता संपली आहे.’ त्यानंतर २६ ऑक्टोबर १८९३ रोजी राईट यांना पाठविलेल्या पत्रात त्यांनी म्हटलेय, ‘माझ्या मनातील योजना मांडण्याने जितके लोक येतील त्यापेक्षा केवळ हा मूर्तिपूजक बोलतो तरी काय या कुतूहलाने अधिक लोक येताहेत. माझ्या योजनेसाठी मला आता सर्वस्व ओतून काम करावयाचे आहे. पण तूर्तास ती योजना पुढे न मांडता मी सर्वसामान्य वक्त्याप्रमाणे भाषणे देणार.’ २८ डिसेंबर १८९३ रोजी हरिपद मित्रा यांना पाठविलेल्या पत्रात त्यांनी म्हटलेय, ‘मी या देशात केवळ कुतूहल म्हणून किंवा गंमत पाहण्यास किंवा नाव कमविण्यासाठी आलेलो नाही. मी येथे आपल्या देशातील गरिबांची उन्नती करण्यासाठी काही उपाय सुचतो का, माझ्या रचनेला मदत करणाऱ्या व्यक्ती किंवा रचना येथे आढळतात का हे पाहण्यासाठी आलो आहे.’
त्यानंतर तीन महिन्यांनी, त्यापुढील तीन महिन्यांत हा आतला आवाज अगदी सविस्तर पत्रे लिहून त्यांनी चार जवळच्या मित्रांना कळविला. विवेकानंदांचा आतला आवाज समजावा असे वाटणाऱ्या प्रत्येकाने ती चार पत्रे अभ्यासली पाहिजेत. पहिले पत्र १८ मार्च १८९४ रोजी शशीला (म्हणजे श्रीरामकृष्णानंद) यांना लिहिलेय. दुसरे पत्र २८ मे १८९४ रोजी आलासिंगा पेरुमल यांना लिहिलेय. तिसरे पत्र २० जून १८९४ रोजी हरिदास बिहारीलाल देसाई (म्हणजे जुनागड संस्थानचे दिवाण) आणि चौथे पत्र २३ जून १८९४ रोजी म्हैसूरच्या महाराजांना लिहिलेय. चारही पत्रांतील रचना प्रामुख्याने अशी आहे, ‘आपल्या देशातील ९० टक्के लोक खेड्यांत राहतात. सर्व खेडी अर्धनग्न आणि अर्धपोटी आहेत. आपण साऱ्या जगातील संपत्ती लुटून आणून एका खेड्यात ओतली, तरी ते खेडे पुन्हा एका वर्षात अर्धपोटी आणि अर्धनग्न असेल. याचे कारण त्यांना अनेक शतके ज्ञान, विज्ञान, खरा धर्म यांपासून आपण वंचित ठेवलंय. आपण माणूस आहोत आणि या समाजाचा एक भाग आहोत, हेच ते विसरून गेलेत. खेड्यात शाळा काढून काही फायदा होणार नाही. मोठी माणसे दिवसभर शेतात राबणार. लहान मुले गुरे राखायला जाणार. स्त्रिया दिवसभर पाणी भर, सरपण आण, जेवण कर म्हणून मेटाकुटीला आलेल्या असणार. माझी रचना सांगतो, मला प्रत्येक खेड्यात दोन शिक्षित संन्यासी ठेवायचे आहेत. संध्याकाळी गावातील लोक पारावर जमतात. तिथे ते त्यांना धर्म समजावून देतील. त्यांच्याकडे पृथ्वीचा गोल असेल. भूगोलाच्या मदतीने ते त्यांना इतिहास शिकवितील. त्यांच्याकडे लोहचुंबक आणि काही रासायनिक पदार्थ असतील. त्यांच्याकडे कंदिलाच्या प्रकाशात दाखविता येतील अशी प्रकाशचित्रे असतील. प्रत्येक खेडे असे उभे करावे लागेल. यासाठी मला आज भारतात दहा हजार संन्यासी मिळतील. मात्र भारतातील कंजूस श्रीमंत यासाठी दमडी देणार नाहीत…. आता मी अमेरिकेत भाषणे देईन आणि या कार्यक्रमासाठी पैसे गोळा करीन.’
या चार जणांपैकी तीन जणांनी विवेकानंदांना कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. प्रतिसाद दिलाय तो फक्त त्यांचा सर्वात जवळचा शिष्य आलासिंगा पेरुमल यांनी. त्यांनी पत्रात स्पष्टपणे लिहिलेय, ‘मला असले काही जमणार नाही.’ खरी अडचण पुढची आहे. भाषणे देऊन पैसे मिळवीन हा भ्रम आहे, हे त्यांच्या लक्षात आले. अमेरिकेत भाषणे हा ‘इव्हेन्ट मॅनेजमेंट’ आहे. हे त्यांच्या लक्षात आले. भाषणे ठेवणाऱ्या लोकांनी त्यांना फसवले ही खंत त्यांनी पत्रातून व्यक्त केली आहे. तीन वर्षांनंतर म्हणजे १८९७ मध्ये विवेकानंद भारतात परत आले. त्या वेळी त्यांनी फारसे पैसे बरोबर आणले नाहीत. त्यांच्या मनातील बेलूर मठाच्या उभारणीसाठी भारतातील एकाही धनिकाने वा संस्थानिकाने एक कवडीसुद्धा दिली नाही. त्यानंतर अडीच वर्षांनी अमेरिकेत भाषणे देऊन पैसे मिळवता येतील म्हणून विवेकानंद परत परदेशात गेले. दीड वर्ष ते तिथे राहिले. `परत जाण्याच्या तिकिटाचे पैसेसुद्धा भाषणातून मला मिळत नाहीत. मला भिक्षा म्हणून किमान मी लंडनला पोहोचेन एवढे तिकिटाचे पैसे द्या’ अशी त्यांनी त्यांच्या अमेरिकेतील शिष्यांना विनंती केली आहे! मात्र कोणीही काहीही मदत केली नाही. १७ जून १९०० रोजी मेरी हेल यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटलेय, ‘आज भाषण हे केवळ माझ्या उपजीविकेचे साधन उरलंय.’
विवेकानंदांनी लवकर जगाचा निरोप का घेतला?
‘ज्याची हिंमत हरली नाही, तो कधीच हरत नाही’ हा मंत्र बरोबर घेऊन आजन्म वाटचाल करणारे विवेकानंद लांबलांबचे प्रवास करत १९०१ साल उजाडण्याच्या थोडे आधी भारतात परत आले. या देशाचे नवनिर्माण करण्यासाठी तरुणांना प्रशिक्षित करणारा त्यांचा बेलूर मठ आकार घेतोय. हा आतला आवाज फार विलक्षण आहे. बेलूर मठाचे सभासद होताना तुमचा धर्म, तुमची जात, तुमचा पंथ, तुमचे लिंग आणि तुमचे राष्ट्रीयत्व विचारात घेतले जाणार नव्हते. बेलूर मठात अध्यात्म आणि विज्ञान यांचा अभ्यास करावा लागणार होता. संस्कृत आणि इंग्रजी या भाषांवर हुकमत मिळवावी लागणार होती. विवेकानंदांनी सांगितले होते, ‘आजच्या जगात संस्कृत ही ढाल आणि इंग्रजी ही तलवार म्हणून तुम्हाला वापरायची आहे.’ इंग्रजीत भाषण देण्यासाठी संन्याशांना तयार करावयाचे होते. आपण भाषण देताना आपला चेहरा, आपले हावभाव सुधारावेत म्हणून आरशासमोर उभे राहून भाषणाचा सराव करावयाचा होता. ठरलेल्या वेळेप्रमाणे गोष्टी पार पडल्या नाहीत, तर जेवण मिळणार नव्हते. प्रत्येकाला जमिनीचा एक तुकडा दिलेला होता. त्यात भाजीपाला पिकवून तो जवळच्या बाजारात जाऊन विकायचा होता. थोडक्यात विवेकानंदांच्या आतल्या आवाजाने त्यांना सांगितलेले संन्यासी येथे तयार होऊन प्रत्येक खेड्याचे नवनिर्माण करण्यासाठी तिथे जाणार होते. सनातनी मंडळींच्या आतल्या आवाजाने त्यांना ही रचना भयावह आहे हे सांगितले होते. सर्वप्रथम कलकत्ता महानगरपालिकेने बेलूर मठावर फार मोठा कर बसविला. त्यांचे सांगणे होते, ‘मठ कधी असा नसतो! हे विवेकानंदांचे विश्रामगृह आहे.’ न्यायालयात फेऱ्या मारून, आपली बाजू मांडून विवेकानंदांनी हा निर्णय रद्द करून घेतला. बेलूर मठ आता आकार घेत होता आणि आपल्या कल्पनेतही न मावणारा एक आघात जनसामान्यांवर झाला. एवढ्या लहान वयात ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी का घेतली? तुकाराममहाराज अचानक गरुडावर बसून वैकुंठाला का गेले? त्याचप्रमाणे विवेकानंदांनी अगदी अचानक वयाच्या ३९व्या वर्षी या जगाचा निरोप का घेतला? त्यांचे दोन धाकटे भाऊ महेंद्रनाथ आणि भूपेंद्रनाथ अनुक्रमे ८१ आणि ८७ वर्षे जगले. विवेकानंदांच्या मृत्यूचे कारण आम्हाला समजत नाही, म्हणून कलकत्ता येथील प्रमुख डॉक्टरांनी सांगितले. परंतु त्यांच्या मृत्यूचे कारण सनातनी मंडळींनी दिलेय. त्यांनी सांगितलेय, ‘ही महासमाधी आहे. अशा वेळी प्राण डोळ्यांवाटे बाहेर जातो. त्यामुळे त्यांचे डोळे लाल झालेत.’ खरी गोष्ट एवढीच की, ज्ञानेश्वर, तुकाराम, विवेकानंद यांच्या अचानक, विस्मयकारक प्रकारे झालेल्या महानिर्वाणामुळे त्यांचे आतले आवाज आपल्यापर्यंत पोहोचलेच नाहीत.
हेही वाचा:
Atal Bihari Vajpeyee अटल वारसा!
congress session : बेळगावात काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन
rambhdracharya : भागवत संघाचे नेतृत्व करतात, हिंदू धर्माचे नाही
२२ ऑक्टोबर १९६४ रोजी गुजराती
बनिया कुटुंबात जन्म झालेले,
भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष
आणि विद्यमान गृहमंत्री,
आरेसेसचे माजी स्टॉक ब्रोकर
लय पावरफुल अमित अनिलचंद्र शहा
यांचे चरणी
साष्-टांग नमस्कार वि. वि.
भारतीय राज्यघटनेच्या गौरवार्थ झालेल्या चर्चेत मंगळवारी १७ डिसेंबर २०२४ रोजी राज्यसभेत उत्तर देताना आपण जी बहुमोल सुभाषितमाला संपूर्ण देशाला ऐकवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पांग फेडलेत, त्याची तुलना कोणाशी करणे अशक्य होय. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेणे – आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, म्हणत राहणे ही आता फॅशन झाली आहे. देवाचे एवढे नाव घेतले असते, तर सात जन्म स्वर्गात गेला असता,’ असे विधान करुन आपण ‘साठी बुद्धी नाठी’ या जुन्या म्हणीची आठवण करुन दिल्याबद्दल आपले मानावे तेवढे आभार थोडेच आहेत. आपल्या या दिव्य प्रतिपादनानंतर, आपल्या गौरवार्थ विरोधी पक्षांकडून जी चर्चा सुरु झाली तिने अजून विश्रांती घेतलेली नाही आणि ती यापुढेही सुरु राहील अशी चिन्हे आहेत. ‘पोटात एक आणि ओठात दुसरे’ असा काहीजणांचा स्वभाव असतो. तथापि आपण असे एक दुर्मिळ राजकरणी आहात की ज्यांच्या पोटात असते ते कधीकधी ओठांवर येतेच. त्यामुळे राज्यघटना आणि डॉ. आंबेडकर यांच्याबद्दल आपल्या काय भावना आहेत, हे या निमित्ताने प्रकट झाले. सर्वसाधारणपणे ‘फॅशन’ ही वास्त्रप्रावरणांच्या बाबतीत केली जाते. जसे की राष्ट्रीय स्वयंसेवकांनी आपली खाकी अर्धी चड्डी घालणेची पद्धत सोडून खाकी फुलपॅन्ट घालण्याची नवीन पद्धत सुरु केली – ती फॅशन झाली. देशाचे पंतप्रधान जेव्हा देशात, परदेशात जिथे कुठे गाजावाजा करत सभा घेतात तेव्हा सभा सुरु होण्याआधी मोदी, मोदी, मोदी, मोदी अशा हृदयद्रावक हाका घालण्यासाठी काही लोकांची नेमणूक केली जाते, ती फॅशन नसून पॅशन आहे, हे वेगळे सांगावयास नको. देवाचे नाव घेत राहण्याने स्वर्ग मिळेलच याची हमी तुमचे सरकार देऊ शकत नाही, पण आंबेडकर, आंबेडकर म्हणत राहिल्याने स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुत्वाचा स्वर्ग लाभू शकतो, याची आठवण राज्यघटना करुन देते.
एखादी गोष्ट अंगलट आली की उलट कांगावा करणे, उलट आरोप करणे, प्रति आंदोलने सुरु करणे ही फॅशन राजकारणात अलिकडेच सुरु झाली. भारतीय जनता पक्षाची यातील मास्टरी खरोखरच वादातीत आहे. त्यामुळे केन्द्रीय मंत्री किरेन रीजिजू यांनी आपल्या संसदीय दालनात आपल्या पत्रकारांना चहा पाजत सांगितले की, भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी आंबेडकरांच्या मूल्यांचा आदर आणि श्रद्धा ही नेहमीच कटिबद्धता राहिली आहे. पंतप्रधानांसारख्या सर्वशक्तिमान व्यक्तीला रीजिजूंसारख्या मंत्र्याकडून सर्टिफिकेट घ्यावे लागते हे म्हणजे राहुल नार्वेकर हे नि:पक्षपाती अध्यक्ष आहेत, असे बावनकुळे यांनी सांगण्यासारखे आहे. मोदी आणि भाजपा हे जर आंबेडकरांच्या मूल्यांचा आदर करणारे असतील तर मग गौतम अदानी हे एक स्वच्छ चारित्र्याचे चौकीदार आहेत, असे म्हणावे लागते. (पण आत्तापर्यंतच्या रेकॉर्डवरुन तसे म्हणता येत नाही, हे दुर्दैव आहे.)
माननीय केंद्रीय गृहमंत्री महोदयजी, राज्यसभेचे सभापती अतिमाननीय धनकड शेठ यांनी तर म्हणे आपल्या संबंधित भाषणाचा व्हिडीओ दोनदा पाहिला आणि त्यात त्यांना आपण बाबासाहेबांबद्दल आदराशिवाय दुसरे काहीही व्यक्त केल्याचे आढळले नाही. धनकड यांनी हा व्हिडीओ फक्त दोनदाच पाहून आपल्या निर्दोषत्वाबद्दल निर्वाळा दिलेला असल्याने न्यूज चॅनेलनी तो व्हिडीओ अनेक वेळा दाखवणे चूक होते. त्यामुळे झाले काय की, आपण राज्यघटनेबद्दल आणि तिचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बद्दल तुच्छतेने बोलत आहात, असा लाखो देशवासियांचा समज झाला. रिजीजू आणि धनकड वगैरेंची सर्टिफिकेट कामाला येत नाहीत आणि आपल्या लाडक्या गृहमंत्र्यांबद्दल सर्वसामान्य आंबेडकरी जनताही मोर्चे काढायला लागलीय. हे पाहून दस्तुरखद्द मोदी साहेबांना पुढे यावे लागले आणि ‘एक्स’वर हा विषय वायझेड करण्यासाठी बोलावे लागले की ‘एका कुटुंबाच्या अधिपत्याखालील या पक्षाने (म्हणजे काँग्रेसने) डॉ. आंबेडकरांचा वारसा पुसून टाकण्यासाठी आणि मागासवर्गीय समुदायांना अपमानित करण्यासाठी काय केले, हे भारतातील नागरिकांनी वारंवार पाहिले आहे.’
महोदय, डॉ. आंबेडकरांचा वारसा पुसून टाकण्यासाठी केंद्रिय मंत्रिमंडळातील नीतीशकुमार, चंद्राबाबू नायडू आणि आपण स्वत: व प्रधानसेवक स्वत: समर्थ असताना त्या (वारसा पुसण्याच्या) कामासाठी पुन्हा काँग्रेसला कष्ट घेण्याची खरे तर गरज नाही.
रामदासजी आठवले तर डॉ. आंबेडकरांच्या वारसा पुसणाऱ्यांचा वारसा पुढे चालवत आहेत. ते राज्यघटना विसरले नसले तर त्यांना डॉ. आंबेडकर आठवायला हरकत नाही.
आपल्या एका साध्या विधानावरुन देशभर गदारोळ व्हावा, हे खरेतर आश्चर्यच म्हणायला हवे. काँग्रेसवाले सतत आंबेडकर, आंबेडकर करत असतात आणि दलित व मागासलेल्या समूहांच्या बाजून बोलत असतात. त्याऐवजी त्यांनी देव देव केले, दिवसातून तीनदा संध्या करुन चार वेळा शेंडीवरुन हात फिरवत जय श्रीराम, जय श्रीराम म्हटले तर त्यांना स्वर्गप्राप्ती होईल, हेच तर आपण सांगितले. ह्यात काय चुकले? पण काँग्रेसवाल्यांना एवढ्यात स्वर्गात जावे, असे वाटत नाही, त्याला कोण काय करणार! ते राहुल गांधी तर आता सारखे जातगणना करा, जात गणना करा, असे म्हणू लागले आहेत. आणि ते खर्गे! त्यांना तरी नको का कळायला की आपण आंबेडकर, आंबेडकर करत बसता कामा नये म्हणून! अरे असाल तुम्ही दलित समाजातून पुढे आलेले. म्हणून काय सारखे आंबेडकरांचा नामजप करत मनुस्मृतीला धिक्कारत राहाल?
माननीय अमितभाईजी; बिहार, कर्नाटक, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात आपल्या विरोधात जो आगडोंब उसळलाय, तो विनम्र बालकाला पसंत नाही. आंबेडकर आंबेडकर असा सारखा नामजप करणारे लोक आता सारखी अमित शहा, अमित शहा अशी जपमाळ ओढू लागलेत. त्यामुळे स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुत्वाची फॅशन मागे पडून आता घटना तुच्छतावादाची नवीच फॅशन सुरु होतेय की काय अशी भीती वाटू लागलीय. भारतीय राज्यघटनेच्या गौरवार्थ, देशभर केंद्रीय गृहमंत्र्यांविरोधात निदर्शने सुरु होणे हे निश्चितच चांगले लक्षण नव्हे. त्यांना उत्तेजन मिळाले तर आज गृहमंत्र्यांचा राजीनामा मागणारे हे नतद्रष्ट उद्या पंतप्रधानांचा राजीनामा मागतील.
आणि पंतप्रधानांनीच भावनेच्या भरात उद्या-परवा कधीतरी राजीनामा दिला तर नेहरुंना काय वाटेल? त्यांची आठवण कोण काढेल मग? आणि डॉ. आंबेडकरांनाही वाईट वाटेल नाही का?
ह्या सगळ्या गदारोळात
उद्या तुमच्यापैकी कोणी,
‘भारतीय राज्यघटनेचे रक्षण
हॉ. हेगडेवार यांनी केले’,
असे विधान करु नये
अशी अपेक्षा बाळगणारा
आपलाच,
विनम्र बालक
हेही वाचा :
Dr. B R Ambedkar : आंबेडकरांना काँग्रेसने पराभूत केले? : वास्तव आणि विपर्यास
धनंजय मुंडे, वाल्मिकींना वाचवण्याचा मुख्यमंत्र्यांकडून प्रयत्न
हिंदुदुर्ग!
साष्-टांग नमस्कार : पाव-भाजी रेवडीवाले
महाराष्ट्राचे माजी मुमं तथा माजी
केन्द्रीय सूक्ष्मोद्योग मंत्री ना. ता. राणे यांचे
प्रथम चिरंजीव माजी खासदार, विद्यमान आमदार डॉ. निलेश,
द्वितीय सुपुत्र विद्यमान आमदार नितेश, तसेच
आमदार दीपक केसरकर यांचे सेवेशी (Rane-Kesarkar )
साष्-टांग नमस्कार वि.वि.
कालच्या मंगळवारी म्हणजे १० डिसेंबरला बांगलादेशातील हिंदू समाजावर होत असलेला अत्याचार कायमस्वरुपी बंद व्हावा आणि इस्कॉनच्या साधूंची तात्काळ मुक्तता व्हावी म्हणून आपल्या तिघांच्या राजकीय पुढाकाराने सिंधुदुर्ग नगरीत जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मूक मोर्चा काढण्यात आला तो पाहून आमची छाती अक्षरश: ५६ इंचापेक्षा जास्त फुगली आणि अतिरिक्त अभिमानाने अंगावरचा बनियनही टराटरा फाटून गेला. बनियन एक फाटला तर दुसरा घेता येतो; पण हिंदुत्व फाटले तर ते पुन्हा जोडता जोडताना नाकी नऊ येतात, हा मोहनराव भागवतांचा अनुभव असल्याने यापुढे कितीही चड्ड्या आणि बनियन फाटली तरी हिंदुत्वाचा फुगलेला अभिमान आम्हीही कमी करणार नाही, असा शब्द आम्ही आपणांस यानिमित्ताने देत आहोत. (Rane-Kesarkar)
माननीय राणे बंधुजी, पूर्वी आपले पिताश्री आणि गरीब कोकण्यांचे अदानी अर्थात नारायण तातू राणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अभिजात समाज सेवक दीपकभाई केसरकर यांची लुटुपुटुची दशावतारी लढाई पाहण्यासाठी हजारेांची गर्दी कधीही आणि कुठेही जमा होत असे. ‘राणे साहेबांच्या दहशतवादाविरुद्ध माझी लढाई आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मी ती दहशत हद्दपार करणार आहे,’ अशा घोषणा करत दीपकभाई निवडून यायचे. तथापि, आता ते (म्हणजे केसरकर) तुमच्या खांद्याला खांदा लावून बांगलादेश मधल्या दहशतवादाविरुद्ध लढू लागले आहेत, हे एक अभूतपूर्व दृष्य, होय असेच म्हणावं लागेल. मोर्चामध्ये विहिंप, आरएसएस, सनातनवाले वगैरे मंडळीही आता सामील असल्यामुळे, मोर्चाचे निवेदन घेतल्यावर सिंधुदुर्गनगरी ऊर्फ ओरोस येथील जिल्हाधिकारी जिल्ह्याचे नाव आपल्या अधिकारात बदलून हिंदुदुर्ग करतात की काय असे क्षणभर उपस्थित पत्रकारांना वाटून गेले. मोर्चा भव्य होता आणि दिव्य तर होताच होता. या मूक मोर्चाचा आवाज ओरोस पासून बांगलादेशची राजधानी ढाक्यापर्यंत पोहोचायला किती दिवस लागतील माहीत नाही. (Rane-Kesarkar)
बांगलादेशामध्ये हिंदुंवर जो अन्याय आणि अत्याचार होत आहेत, त्याचा तीव्र निषेध भारत सरकारने अधिकृतरित्या केला आहेच. आणि वेळ आलीच तर आरएसएसचे स्वयंसेवकही लाठ्याकाठ्या घेऊन बांगलादेशवर तुटून पडायला कमी करणार नाहीत. असे असताना सिंधुदुर्ग नगरीत हा ॲडिशनल मोर्चा काढून बांगलादेशला इशारे देण्याचे प्रयोजन काय? असा प्रश्न एका मालवण्याने तिरक्या चालीत आम्हांस कालच विचारला. त्याला आम्ही, `सिंधुदुर्गचे मूळ नाव हिंदुदुर्ग होते आणि हे स्पष्ट करणारा एक शिलालेख राणेंच्या फणसवाडी गावात सापडण्याची शक्यता आहे,` असे उत्तर देऊन गप्प बसवले.
‘कोकणची माणसे साधीभोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी..’ हे रमेश अणावकर यांचे गीत कोकणची आणि कोकणी माणसाची बदनामी करणारे आहे, अशी चर्चा या आपल्या मोर्चामुळे सुरु झाली आहे, हा एका दृष्टीने, जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने फायदाच झाला आहे. साधेभोळे राहून विकासही होत नाही आणि प्रगतीही होत नाही. भोळ्या, खुळ्या मतदारांना फसवण्यासाठी सगळेच राजकीय पक्ष नेहमीच आघाडीवर असतात. आजवर कोकणची माणसे साधीभोळी अशी इमेज आणि नॅरेटिव सर्वत्र प्रसारित केले गेले असल्यामुळे कोकण्यांना फसवण्यासाठी जास्त मेहनत कुणाला घ्यावी लागली नाही. आता ही कोकणची इमेज बदलायला सुरुवात केली सन्माननीय नारायण तातू राणे यांनी आणि आतातर त्यांचे दोन चिरंजीव व एके काळचे विरोधक हे पुढे सरसावून, कोकण म्हणजे ‘हिंदू विरोधकांना ठोकण’ अशी नवी इमेज निर्माण करण्यासाठी कार्यरत झाले आहेत. याची दखल कुठंतरी राष्ट्रीय स्तरावर घेतली जाणारच आहे. तसे झाल्यास येत्या २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर कदाचित दोन राणे बंधू व एक केसरकर यांना विभागून एक तृतीयांश समप्रमाणात ‘भारतरत्न’ पुरस्कारही दिला जाऊ शकतो.
दस्तुरखुद्द सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्त्यांवर आणि फळबागांवर आणि पारंपरिक मासेमारी इत्यादींवर बांगलादेशमधील हिंदुंपेक्षा भीषण अत्त्याचार होत आहेत आणि त्याविरुद्ध आवाज उठवल्यास राष्ट्रद्रोहाचा शिक्का आपल्यावर बसेल, अशी सूज्ञ नागरिकांत भीती पसरल्याची अफवा जिल्ह्यामध्ये पसरली आहे. अगदी आमच्यासारख्या जुन्या जाणत्या विनम्र बालकांचा अशा अफवांवर मुळीच विश्वास नसतो, हे आपणांस माहित आहेच. फोंडाघाटहून करुळमार्गे कणकवलीला ईमर्जन्सी डिलीव्हरी बेसीस ऑटोरिक्षाने किंवा स्वत:च्या वाहनाने येत असताना गेल्या महिनाभरात रस्त्यात मध्येच बारा बायका बाळंत झाल्या, अशीही अफवा जोरात आहे. वैभववाडीत रस्त्यांची परिस्थिती उबाठा गटासारखीच म्हणजे अगतिक आणि केविलवाणी झालेली आहे, असे त्या गटाचे नुकतेच भाजपात प्रवेश केलेले नगरसेवक रणजित तावडे यांचे मत आहे. मा. नितेशजी, आपण या तावडेंचे अलिकडेच मोठे वाजत-गाजत स्वागत केले, हे चांगलेच झाले. बांगलादेशची कढी पातळ करण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचा कितपत उपयोग होईल माहीत नाही. पण वैभववाडीच्या रणजित तावडेंचा काही उपयोग करुन घ्यावा, ही विनंती.
माननीय नितेशजी, अहमदनगर जिल्ह्यात अशाच एका प्रसंगी रामगिरी महाराजांचे समर्थन करतांना, ‘मशिदींमधे घुसून एकेकाला वेचून खतम करु’ अशा आशयाचे विधान केल्याबद्दल आपणावर श्रीरामपूर पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल आहे. असे असतांना मंगळवारच्या सकल हिंदु मार्चात सिंधुदुर्गनगरी येथे ‘पोलिसांनी पाच मिनिटे सुट्टी घेऊन घरी बसावे, आम्ही पाच मिनिटांत बांगलादेशींना किड्यासारखे चिरडून टाकू,’ असे विधान आपण केलेत, या आपल्या धाडसाला खरोखरच दाद दिली पाहिजे. समस्त सिंधुदुर्गवासीयांनाच काय पण समस्त बांगलादेशवासीयांना आपल्या शूरपणाबद्दल इतकी खात्री आहे की, रोहिंग्या बांगलादेशींनी भारत सरकारकडे वाय सिक्युरिटी मागितल्याची अफवा सुद्धा वाऱ्याच्या वेगाने पसरली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात हिंदुत्ववादी विचारांचे तीन आमदार आहेत आणि देशात व राज्यात हिंदुत्ववादी सरकार आले आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, राज्यातील व देशातील हिंदुंना सुखासमाधानाचे जीवन जगण्यासाठी बळ मिळेल, अशी आशा बहुसंख्य हिंदुंना वाटते आहे. पण शरद पवारसाहेब, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्यासारख्या हिंदुंना आणि केंद्रात सोनिया, प्रियांका, राहुल गांधीसारख्या आणि केजरीवालांसारख्या हिंदुंना तशी आशा वाटत नाही. ईव्हीएम नावाचे रोहिंगे पोसून भारतातील खोटे हिंदुत्ववादी, खऱ्या हिंदुत्ववाद्यांवर बांगलादेशप्रमाणेच अत्याचार करत आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे.
त्यांना उत्तर देण्यासाठी
पुढील मोर्चा कधी निघतो
याची वाट पाहणारा…
आपला,
विनम्र बालक
-प्रा. अविनाश कोल्हे
अनेक पाश्चात्य अभ्यासक दाखवून देतात की, भारतात जरी लोकशाही रुजत असली, दर पाच वर्षांनी सार्वत्रिक निवडणूका होत असल्या तरी अजूनही भारतात ‘लोकशाही संस्कृती‘ रुजलेली नाही. लोकशाही संस्कृती रुजल्याशिवाय खरी लोकशाही शासनव्यवस्था प्रत्यक्षात येत नाही. याचा ताजा पुरावा म्हणजे लोकसभेचे सध्या सुरू असलेले अधिवेशन आणि त्यात वारंवार येत असलेले अडथळे. मे २०२४ मध्ये अस्त्विात आलेल्या या नव्या लोकसभेचे हे दुसरे अधिवेशन. (Lok Sabha)
संसदेचे हिवाळी अधिवेशन पाच नोव्हेंबर रोजी सुरू झाले आणि हे अधिवेशन २५ नोहेंबरपर्यंत चालणार आहे. आताच्या कामकाजावर वरवर नजर फिरवली तर दिसून येते की पहिल्या दहा दिवसांत फक्त ६४ मिनिटांचे कामकाज झाले ! अन्य वेळी गडबड, गोंधळ, आरोप–प्रत्यारोप आणि सभात्याग वगैरेंमुळे कामकाजाचा बहुमोल वेळ वाया गेला. भारतासारख्या गरीब देशाला संसदेचा असा वेळ जाऊ देणे परवडणारे नाही. लोकप्रतिनिधींनी या गोष्टीचे भान ठेवले पाहिजे की लोकसभा एका तासासाठी चालवण्यासाठी देशाच्या खजिन्यातून सुमारे दोन कोटी रूपये खर्च होतात. तर राज्यसभा चालवण्यासाठी दीड कोटी रूपये खर्च होतात.
जगात शासन व्यवस्थेच्या उपलब्ध असलेल्या अनेक पर्यायांपैकी एक पर्याय म्हणजे लोकशाही शासनव्यवस्था. मात्र जर ही व्यवस्था जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यास असमर्थ ठरत असेल तर जनता नाईलाजाने हुकूमशाहीकडे वळते, असा आधुनिक जगाचा इतिहास आहे. या संदर्भात नेहमी दिले जाणारे उदाहरण म्हणजे पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीत अस्तित्वात आलेले ‘वायमर रिपब्लिक‘ जर्मनीतील वायमर नावाच्या गावात प्रजासत्ताक जर्मनीची राज्यघटना लिहली गेली म्हणून याला ‘वायमार रिपब्लिक‘ म्हणतात. हे १९१९ ते १९३३ दरम्यान जर्मनीत होते. या रिपब्लिकमध्ये एवढा गोंधळ झाला की जर्मन जनतेने हिटलरच्या नाझी पक्षाला १९३३ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणूकांत ३३ टक्के मते दिली व सत्तेवर आणले. हिटलरने सत्ता हाती येताच सर्व विरोधी पक्षांवर, कामगार संघटनांवर बंदी घातली. यातून लोकशाही प्रेमी जगाने घेतलेला धडा म्हणजे केवळ लोकशाही असून चालत नाही तर लोकशाही शासनव्यवस्थेने जनतेचे प्रश्न सोडवले पाहिजेत, सामान्य माणसांचे राहणीमान उंचावले पाहिजे.
संसदेचा वाया जाणारा वेळ बघून भारतीय नागरिकाच्या जर मनांत ‘संसदीय लोकशाही‘ या शासनप्रणालीबद्दल अविश्वास व अनास्था निर्माण झाली तर याची जबाबदारी कोणाची? या प्रश्नाचा विचार करण्याची वेळ आली आहे. संसदीय शासनप्रणाली काय किंवा अमेरिकेसारखी अध्यक्षीय पद्धत काय, या दोन्ही लोकशाही शासनप्रणालीत ‘परमताचा आदर‘ ही महत्वाची पूर्वअट आहे. यातही संसदीय पद्धतीत हा मुद्दा अतिशय महत्वाचा ठरतो. याचे कारण संसदेत सत्तारूढ पक्ष आणि विरोधी पक्ष अधिवेशनादरम्यान अक्षरशः एकमेकांसमोर बसलेले असतात. असा प्रकार अमेरिकन पद्धतीत नसतो. तेथे फ्रेंच राजकीय विचारवंत माँटेस्क्यू यांनी मांडलेल्या ‘सत्तेचे विकेंद्रीकरण‘ या तत्वानुसार शासनपद्धत निर्माण करण्यात आली आहे. त्यामुळे अमेरिकेतील संसदेत सत्तारूढ पक्ष व विरोधी पक्ष एकमेकांसमोर बसलेले असतात पण तेथे सरकार (म्हणजे मंत्रीमंडळ) व विरोधी पक्ष एकमेकांसमोर कधीही येत नाही. (Lok Sabha)
संसदीय शासनपद्धतीत संसदेतील चर्चा, वादविवाद फार महत्त्वाचे असतात. त्यातून सरकारला ते मांडत असलेल्या धोरणांतील त्रुटी लक्षात येऊ शकतात. त्यानुसार धोरणात योग्य ते फेरफार करता येतात. या संदर्भात भाजपचे उत्तर प्रदेशातील जेष्ठ नेते कल्याणसिंग व काँग्रेसच्या अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी यांच्यातील संवाद आठवतो. मनमोहनसिंग सरकारने ग्रामीण भागासाठी रोजगार हमी योजना (म.न.रे. गा.) मांडली. त्यावर चर्चा सुरू होती. या चर्चेदरम्यान ग्रामीण भागातील जनजीवन व लोकव्यवहाराची नीट जाणकारी असलेल्या कल्याणसिंग यांनी काही अत्यंत उपयुक्त सूचना मांडल्या. कल्याणसिंग यांचे भाषण संपल्यानंतर सत्तारूढ पक्षाच्या नेत्या श्रीमती सोनिया गांधी उठून कल्याणसिंगांकडे गेल्या व त्यांनी चांगले भाषण केल्याबद्दल अभिनंदन केले. एवढेच नव्हे तर सोनिया गांधी यांनी कल्याणसिंगांना विनंती केली की, या सर्व सूचना मला लिहून द्या. मी याचा अंतर्भाव या धोरणात करण्यास सांगते. संसदीय लोकशाही कशी चालावी, याचे हे एक उत्तम उदाहरण आहे.
भारतासारख्या विकसनशील देशातील संसदेत अनेकदा टोकाचे वाद होणे स्वाभाविक आहे. मात्र आज वाद होत नाहीत कारण वादविवाद होण्यासाठी संसदेचे कामकाज झाले पाहिजे. तेच होत नाही. भारतासारख्या खंडप्राय देशाचा अर्थसंकल्प कोणतीही चर्चा न होता संमत व्हावा यासारखे दुर्दैव नाही. सर्व मंत्रालयांच्या मिळून २६ लाख कोटी रूपयांच्या खर्चाला चर्चेशिवाय गिलोटिनच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली. गेली दोन दशकं भारतीय संसदेचे कामकाज प्रत्येक अधिवेशनानंतर कमीकमी होतांना दिसते. २००५ साली १६ टक्के वेळ वाया गेला होता तर २०१५ मध्ये ३० टक्के. २०१७ मध्ये ३४ टक्के तर आता २०१८ मध्ये ९४ टक्के वेळ वाया गेलेला आहे. (Lok Sabha)
भारतीय लोकसभेचे कामकाज दरवर्षी किमान १०० दिवस व्हावे असे अपेक्षित आहे. एकेकाळी हे कामकाज १२७ दिवस झालेले दिसून येते. नंतर मात्र हे प्रमाण ३५ दिवसांवर आले आहे. पंडित नेहरूंशी अनेकांचे अनेक मतभेद होते. पण त्यांची लोकशाही शासनव्यवस्थेवर अढळ श्रद्धा होती. एवढेच नव्हे तर लोकशाही म्हणजे केवळ आकड्यांचा खेळ नसून ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, ही भारतासारख्या नव्याने लोकशाही स्वीकारलेल्या देशांत जाणिवपूर्वक रूजवावी लागेल; याचेसुद्धा त्यांना भान होते. त्यामुळे नेहरू कितीही व्यस्त असले तरी जास्तीत जास्त वेळ संसदेत घालवत असत, जास्तीत जास्त वेळा संसदेत होत असलेल्या चर्चात भाग घेत असत. याकाळी तर नेहरूंच्या काँग्रेसकडे संसदेत ज्याला ‘पाशवी बहुमत‘ म्हटले जाते तसे असायचे. तरीही नेहरू जास्तीत जास्त वेळ संसदेत घालवत असत आणि संसदीय परंपरांचा यथायोग्य मान राखत.
काही अभ्यासकांच्या मते संसदीय लोकशाही शासनव्यवस्था म्हणजे किकेटच्या सामन्यासारखे असते. जेव्हा एक संघ फलंदाजी करत असतो तेव्हा दुसरा संघ गोलंदाजी व क्षेत्ररक्षण. नंतर क्षेत्ररक्षण करणारा संघ फलंदाजी करण्यासाठी येतो. दोन्ही संघांना खेळपट्टी खराब न करण्याचे पथ्य पाळावे लागते. आज तसे होतांना दिसत नाही. यावर त्वरीत उपाय शोधला पाहिजे. अन्यथा लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडेल. हा सर्वात मोठा धोका आहे.
या संदर्भात भारताचे माजी उपराष्ट्रपती व्यंकैय्या नायडू यांनी अगदी अलिकडे एका इंग्रजी वृत्तपत्रात लेख लिहिला आहे. त्यात त्यांनी नेमकी हीच भीती व्यक्त केली आहे. ते लिहितात ‘Disruption of proceedings of the two houses only serves to undermine public trust and faith in Parliament. Such behaviour, unfortunately have become the norm. Disruption, disturbance and commotion can never be a substitute for debate and discussion.’
लोकशाही शासनव्यवस्थेत चर्चा, वाद, मतमतांतरे वगैरेंना पर्याय नाही. मात्र यासाठी दोन्ही बाजूंनी समंजस्य दाखवले पाहिजे. (Lok Sabha)
हेही वाचा :
सातारा जिल्हयातील ‘दरे’ या थंड हवेच्या ठिकाणी ऐन थंडीत जाऊन परत आलेले
संभाव्य ‘होम मिनिस्टर’ म्हणून आपले नाव आठवडाभर चर्चेत ठेवणारे
कामाख्या देवी आणि मोदी-शाहांचे परमभक्त,
माजी काळजीवाहू मुख्यमंत्री,
विद्यमान उपमुख्यमंत्री
माननीय श्री. एकनाथ संभाजी शिंदे यांचे चरणी
कोपरापासून हात जोडून
साष्-टांग नमस्कार.
नको इतके बहुमत महाराष्ट्र विधान निवडणुकीत महायुतीला मिळाल्यानंतर प्रस्तावित मुख्यमंत्रीपदाबाबत बरीच भवती न भवती झाल्यावर या शर्यतीतून माघार घेतल्याबद्दल आपले करावे तेवढे अभिनंदन थोडेच आहे आणि मानावे तेवढे आभार कमीच आहेत. निवडणुकीचे निदान आल्यानंतर प्रकृतीच्या कारणास्तव आपण आपल्या दरे या गावी निघून गेल्याने महायुतीच्या बैठका लांबल्या आणि फडणविसांची काळजी एवढी वाढली की शिंदेंना मुख्यमंत्री करा-मी काळजीवाहू आहेच असं ते आपल्या श्रेष्ठींना सांगतात की काय अशी भीती संघ परिवाराला वाटू लागली. विरोधी पक्ष म्हणजे महाविकास आघाडीला असे निर्विवाद बहुमत मिळाले असते आणि तरीही त्यांनी वेळकाढूपणा केला असता तर सन्माननीय राज्यपाल महोदयांनी दोन-तीन दिवस वाट बघून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली असती. तथापी, ते तर बिचारे हुकूमाचे ताबेदार असल्याने तुम्ही मंडळी सरकार कधी स्थापन करता याची वाट पहात बसले.
शेवटी कसा का होईना पण शपथविधी समारंभ संपन्न झाला. खरे तर‘दिल्या-घेतल्या वचनांची शपथ तुला नाही.. खिशातल्या चोर खिशाची शपथतुला नाही..?’ अशी राजकारण्यांची सार्वत्रिक प्रसिध्दी आहे.
आम्हाला तर पहाट झाली रे झाली की तो पहाटेचा शपथविधी आठवतो. कोंबड्याचं आरवणं कानी येण्याआधी ‘मी अमुक तमुक ढमुक इश्वराला स्मरुन शपथ घेतो की..’ असे शब्द ऐकू येऊ लागतात.
पण त्यावेळी महाराष्ट्राच्या लाडक्या देवाभाऊंचे मुख्यमंत्रीपद आणि महाराष्ट्राच्या लाडक्या अजितदादांचे उपमुख्यमंत्रीपद जेमतेम अडीच दिवस टिकले होते. तेव्हा पहाटेच्या शपथा लाभत नाहीत, असे लक्षात आल्यावर, यावेळी गुरुवार दिनांक ५ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५-३० वाजता शपथविधी समारंभ आयोजित करण्यात आला, हे ठीकच झाले. (Open letter to eknath shinde)
‘अडीच वर्षांपूर्वी देवेंद्रफडणवीस यांनी माझ्या नावाची शिफारस केली होती. आज मला त्यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून शिफारस करताना आनंद होत आहे’, असं आपण म्हणालात खरं, पण त्यांना परत मुख्यमंत्रीपदी येताना पाहून आपणांस किती दु:ख झाले असेल, याची कल्पना केवळ आपले पूर्वाश्रमीचे नेते उद्धव ठाकरे हेच करु शकतात.
खरे म्हणजे राजकारणातल्या पुढारी मंडळींनी आता खालच्या जागेवर काम करणे, ही पदावनती मानता कामा न्ये. क्रिकेटमध्ये कसं जेव्हा गावसकर कॅप्टन होता, तेव्हा कपिलदेव त्याच्या टीममध्ये खेळत होता. नंतर कपिलदेव कॅप्टन झाला आणि गावसकर त्याच्या टीममध्ये होता. म्हणजे एक प्रमुखअसताना दुसरा त्याच्याखाली आणि हा दुसरा प्रमुख होतो तेव्हा पहिलात्याच्या खाली. हे क्रिकेटमध्ये ज्या सहजतेनं स्वाकरलं गेलं आहे, त्याप्रमाणे राजकारणात तुम्ही मंडळी सहज का स्वीकारत नाही? आपणही शिंदेसाहेब यावेळी महायुती प्रचंड बहुमताने निवडून येऊनही आणि त्यात भारतीय जनता पक्षाला आपल्या नवशिवसेनेपेक्षा जास्त जागा मिळूनही देवाभाऊंच्या मुख्यमंत्रीपदी येण्यासाठी अडथळे आणायला नको होते. अशा नाकाबंदीमधून कसं सुटयचं याचा पूर्यानुभव दांडगा आहे हो. ते बिचारे तुमची समजूत काढता काढता अगदी बेसुमार घामाघूम झाले. एकवेळ अमृतावहिनींची समजूत घालणं परवडलं; पण तुमचा रुसवा कसा काढावा हे त्या गरीबांच्या चाणक्यालाही कळेना.
अखेर याहीवेळी मंत्रीपदाचे इच्छुक असलेले आपल्या गटातील काही व्यवहारवादी इसम जसे की उदय सामंत, दादा भुसे, गुलाबराव पाटील वगैरेंनी ‘वर्षा’वर धाव घेऊन महाराष्ट्राच्या हितासाठी आपण सत्तेव असणे कसं आवश्यक आहे याविषयी आपली शाळा घेतली आणि एकंदरीत रागरंग पाहून मिळेल त्यावर समाधान मानून आपण अगदी शेवटच्या अर्ध्या तासात आपणही शपथ घेणार आहात, असे राज्यपाल महोदयांना कळविले हे शहाणपणाचे आहे. (Open letter to eknath shinde)
आपण प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन काम करता, याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. तथापी, फडणवीस आणि अजित पवार हेही थेट लोकांमध्येच जाऊन काम करणारे नेते आहेत. शिवाय ते आपल्या एवढेच लोकप्रिय आहेत. त्यामुळे तिघांपैकी एक कोणीतरी मुख्यमंत्री होणार म्हणजे होणारच, अशी अटकळ आम्ही पत्रकारांनी बांधली होती. पण ‘पायाला भिंगरी लावून काम करणाराच मुख्यमंत्री होतो’ असा निकष लावला तर अनेक नावे मुख्यमंत्रीपदासाठीपुढे येऊ शकतात. मुरलीधर मोहोळ यांचे नांव अचानक पुढे आले आणि मिडियामध्ये त्याचा एवढा प्रचार झाला की शेवटी दस्तुरखुद्द मोहोळ यांनाच खुलासा करुन मुख्यमंत्रीपदाशी आपला काही संबंध नाही, असं जाहीर करावं लागलं. डोंबिवलीतून रविंद्र चव्हाण यांचही नाव काही काळ पुढे येऊनच र्चेत राहीलं. ते खुलासा वगैरे करण्याच्या भानगडीत न पडता मंगळवारी थेट आंगणेवाडीत गेले आणि भराडी देवीला गाऱ्हाणं घालून म्हणाले की ‘देवी भराडी आई, कृपाकरुन जे आहे ते सार्वजनिक बांधकाम खातं माझ्याजवळ राहील अशी व्यवस्था केलीस तरी पुरे. मला मुख्यमंत्री, गृहमंत्री वगैरे व्हायची अजिबात इच्छा नाही.’
तुम्ही छगन भुजबळांसारख्या एकेकाळी राज्याचे गृहमंत्री राहिलेल्या गृहस्थांना विचारले असते तर त्या खात्यासाठी हट्ट न धरण्याचा सल्ला त्यांनीही तुंम्हास दिला असता. याचे कारण म्हणजे भुजबळांच्या मते कुठे एकादी कोंबडी चोरीला गेली किंवा रात्री दारु पिऊन श्रीमंतांच्या बाळांनी पोर्शे कारवर निबंध लिहिण्यासाठी म्हणून कुणाला तरी ठोकलं, तरी लोक गृहमंत्र्यांनाच थेट जबाबदार धरतात. आपण सुद्धा गृहमंत्रालयाचे काम अंगावर घेऊन कारणन सताना पायांना भिंगरी लावण्याचे उद्दिष्ट ठेवू नये, अशी विनंती आहे. गृहमंत्रालयासाठी काम करणे म्हणजे या बोटावरची थुंकी त्या बोटावर करणेआणि पोलिसांना एखाद्या गुन्हेगाराचा थेट मर्डर करण्याचा गुप्त आदेश देऊन झटपट न्यायदान करणे होय. आपण तर अतिशय साधे, सरळ, बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारे व्यक्तिमत्व आहात. तेव्हा…
स्वाभिमान वगैरे ठेवून कोणाकडे काही
मागण्याची वेळ
आपल्यावर येऊ नये असे वाटणारा,
आपला,
लाडका विनम्र बालक
-
प्रा. अविनाश कोल्हे
गेल्या बुधवारी पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिराच्या बाहेर पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दल या पक्षाचे ज्येष्ठ नेते सुखबीर सिंह बादल यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. यावेळी ड्युटीवर असलेल्या जसबिर सिंग या पोलीस अधिकाऱ्याने प्रसंगावधान दाखवत आरोपीला तत्काळ पकडले. मारेकऱ्याचा नेम चुकला आणि बादल बचावले. सुखबीर सिंह बादल मंदिराच्या बाहेर ‘सेवादार’ म्हणून भक्तांची सेवा करत होते. त्यांच्या २००७ ते २०१७ दरम्यानच्या कारकिर्दीत राज्य सरकारने केलेल्या चुकांबद्दल त्यांना धर्मपीठाने शिक्षा सुनावली होती. ही शिक्षा म्हणजे सुवर्ण मंदिराच्या बाहेर ‘सेवादार’ म्हणून सेवा बजावणे. (Sukhbir Singh Badal)
पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आणि उपलब्ध माहितीनुसार त्याचे नाव नारायण सिंग चौरा असून ही व्यक्ती डेरा बाब नानक येथील रहिवासी आहे. चौरा खलिस्तानवादी दहशतवादी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आजकालच्या आपल्या देशातील राजकीय संस्कृतीनुसार या घटनेलासुद्धा राजकीय रंग देण्यात येत आहेत. आज पंजाबात आम आदमी पक्षाचे सरकार असून भगवंत मान मुख्यमंत्री आहेत. त्यांनी तत्परतेबद्दल पोलिसांचे अभिनंदन केले आहे. मात्र अकाली दलचे वरिष्ठ नेते दलजीत सिंग चिमा यांनी ‘हे सरकारचे अपयश आहे’ वगैरे आरोप केले आहेत. यातील पक्षीय राजकारण बाजूला ठेवत ‘अकाली दल’ हा राजकीय पक्ष आणि ‘अकाल तख्त’ ही शिख समाजासाठी असलेली सर्वोच्च धार्मिक संघटना, यांच्यातील संबंध याची चर्चा करणे गरजेचे आहे.
शिरोमणी दलाची पार्श्वभूमी
देशाच्या राजकारणात पंजाबसारखी काही राज्ये आहेत जेथे प्रादेशिक पक्ष गेले अनेक वर्षे महत्त्वाच्या स्थानावर आहे. असा एक प्रादेशिक पक्ष म्हणजे पंजाबातील शिरोमणी अकाली दल. आज जरी ‘आप’ सारखा पक्ष तेथे सत्तेत असला तरी आपल्या देशांतील बहुतेक प्रमुख पक्षांचे मूळ स्वातंत्र्यपूर्व काळात आढळून येते. अकाली दलाची स्थापना १४ डिसेंबर १९२० रोजी झाली. त्याकाळी हा पक्ष म्हणजे गुरुद्वारांचे व्यवस्थापन आपल्या हाती असावे, यात इंग्रज सरकारची लुडबूड नसावी वगैरेंसाठी चळवळ करणारा पक्ष होता. त्याआधी अनेक गुरुद्वारांचे व्यवस्थापन भ्रष्ट महंतांच्या हाती होते. हा पक्ष कालपरवापर्यंत फक्त पगडीधारी शिखांसाठीच होता. अगदी अलिकडे यात बदल झाले असून आता हिंदू समाजालाही या पक्षाचे दरवाजे उघडे करण्यात आले आहेत. (Sukhbir Singh Badal)
अलिकडे म्हणजे २०२२ साली झालेल्या पंजाब विधानसभा निवडणुकांत काँग्रेस, भाजपा आणि अकाली दल वगैरे प्रस्थापित पक्षांचा पराभव करत केजरीवाल यांच्या ‘आप’ ने सत्ता हस्तगत केली. पंजाब विधानसभेतील एकूण ११७ आमदारांपैकी ‘आप’ने ९२ जागा जिंकल्या.
अकाल तख्त
एका मर्यादित अर्थाने अकाली दल म्हणजे एथ्नो रिलिजस पक्ष आहे. या पक्षाच्या केंद्रस्थानी शिख धर्माचे रक्षण वगैरेसारखे मुद्दे आहेत. शिवाय या पक्षाला राजकीय सत्ता, स्पर्धात्मक राजकारण, निवडणुका लढवणे वगैरे वर्ज्य नाही. १९५० च्या दशकात न्यायमूर्ती फाजल अली आयोगाचा अहवाल आला तेव्हा मराठी भाषिक समाजासाठी जसं स्वतंत्र राज्य दिलं नव्हतं, तसेच पंजाबी भाषिकांसाठीसुद्धा दिले नव्हते. जसं मराठी समाजाने लढा देऊन १९६० साली ‘संयुक्त महाराष्ट्र’ मिळवला तसंच पंजाबी समाजाला करावे लागले. स्वतंत्र पंजाब १९६६ साली अस्तित्वात आला. त्यानंतर अकाली दल पंजाबात कधी सत्तेत होता तर कधी नव्हता. या सर्वांवर ‘अकाल तख्त’ ही शिख धर्मियांची संस्था नजर ठेवून असायची. आजही असते.
या ‘अकाल तख्त’ या धार्मिक संघटनेची स्थापना इ.स. १६०६ मध्ये शिखांचे सहावे गुरु हरगोविंद यांनी केली होती. त्यांना मोगलांचा सामना करावयाचा होता. येथून त्यांनी शिख धर्मियांसाठी पहिला फतवा जारी केला होता. ‘अकाल तख्त’चा कारभार धर्मगुरू (जाथेदार) बघतात. नंतर या नेमणुकांत राजकारण शिरले. ब्रिटीशधार्जिणे जाथेदार की बंडखोरांबद्दल सहानुभूती असलेले जाथेदार, असा संघर्ष सुरू झाला. इंग्रजांनी १९२५ साली शिख गुरुद्वारा कायदा संमत केला. त्यानुसार जाथेदारांच्या नेमणूका ‘शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती’ ही १९२० साली स्थापन झालेली समिती करू लागली. ही समिती गावोगाव असलेल्या गुरुद्वारांसाठी जाथेदार नेमते. ‘अकाल तख्त’चे जाथेदार यांच्या हाती शिख धर्मांबद्दलचे अनेक अधिकार गठीत झालेले आहेत. कोणत्याही शिख व्यक्तीला ‘अकाल तख्त’ समोर बोलवण्याचा अधिकारसुद्धा आहे. जर व्यक्तीची चूक झाली असेल तर त्या व्यक्तीला शिक्षा देता येते. (Sukhbir Singh Badal)
बादलांना शिक्षा
सुखबिरसिंह बादल यांना अशीच शिक्षा दिली होती. या शिक्षा साधारण गुरुद्वारांमध्ये आलेल्या भक्तांची सेवा करणे, या प्रकारची असते. श्रद्धाळू व्यक्ती ही शिक्षा नाकारू शकते. मात्र नंतर अघोषित बहिष्काराला सामोरे जावे लागते. जून १९८४ मध्ये भारतीय सैन्याने सुवर्णमंदिरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांच्या विरोधात (ऑपरेशन ब्लू स्टार) कारवाई केली होती. तेव्हा भारताच्या राष्ट्रपतीपदावर शिख धर्मिय ग्यानी झैलसिंग होते. भारतीय सैन्याचे सर्वोच्च सेनापती म्हणून या कारवाईची जबाबदारी त्यांच्यावर येते, म्हणत ‘अकाल तख्त’ ने त्यांना सुवर्ण मंदिरात कारसेवा करण्याचा आदेश दिला होता. नंतर तो आदेश त्यांनी पाळला होता. आता सुखबिर सिंह बादल यांनी पाळला, तसा. अशी शिक्षा पंजाबी राज्याचे संस्थापक महाराजा रणजित सिंह यांनासुद्धा भोगावी लागली होती.
सत्तेसाठी कुरघोडी
आजच्या भारतात शिख धर्मियासाठी ‘अकाल तख्त’ आणि ‘अकाली दल’ हा राजकीय पक्ष या दोन संस्था महत्त्वाच्या आहेत. त्यांच्यात नेहमी सत्तेसाठी कुरघोडीचे राजकारण सुरू असते. अकाली दल आपल्या समर्थकांना जाथेदार म्हणून निवडून आणण्याचे प्रयत्न करत असतो. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीच्या एकूण १९१ सभासदांपैकी १७० सभासद निवडून आलेले असतात. यात आपले समर्थक मोठ्या संख्येने असावे यासाठी अकाली दल नेहमी प्रयत्न करत असतो. सुरुवातीची अनेक वर्षे प्रबंधक समितीवर अकाली दलाचा वरचश्मा होता. १९७० च्या दशकापासून हा प्रभाव कमी होत गेला. या समितीच्या निवडणुका दर पाच वर्षांनी व्हाव्या, असे अपेक्षीत असते. पण २०११ पासून या निवडणुका झाल्याच नाहीत. प्रबंधक समिती सारख्या धार्मिक संस्थेवर अकाली दलासारख्या राजकीय पक्षाचा वरचश्मा असावा, हे अनेकांना मान्य नाही.
या वादाला तसा शेवट नाही. अकाली दलाचे नेते सुरुवातीला जरी कुरकूर करत असले तरी नंतर कारसेवा करायला तयार होता, असा आजवरचा अनुभव आहे. सुखबीरसिंह बादल यांच्या प्रकरणात हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
#WATCH | Punjab: Bullets fired at Golden Temple in Amritsar where SAD leaders, including party chief Sukhbir Singh Badal, were offering ‘seva’. The attacker, identified as Narayan Singh Chaura by the Police has been overpowered by the people and caught.
(Second camera angle) pic.twitter.com/c7NslbU3n3
— ANI (@ANI) December 4, 2024
हेही वाचा :
सतीश घाटगे : कोल्हापूर : तासगावमधील अडीच एकर तयार द्राक्षबाग वटवाघळांनी फस्त केल्याचे वृत्त नुकतेच प्रसिद्ध झाले. या बातमीने सर्वांचेच लक्ष वेधले. त्यामुळे वटवाघळांविषयी साहजिकच औत्सुक्य निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर जाणून घेऊ वटवाघळांची जीवनशैली… (Bat)
वटवाघूळ सस्तन प्राणी
वटवाघूळ हवेत उडत प्रवास करतात. त्यामुळे तो पक्षी असल्याचा अनेकांचा समज आहे. पण तो सस्तन प्राणी आहे. तो पिलांना जन्म देतो. मादी एकावेळी एकाच पिलाला जन्म देते. एक महिन्यात त्याला दूध पाजवून त्याचे पालन पोषण करते. एक महिन्यात पिलू हवेत उडायला शिकते. फळे आणि कीटक खाऊन स्वावलंबी होते. वटवाघूळ निशाचर आहे. रात्री खाद्याच्या शोधात ते बाहेर पडतात आणि पहाटे आपल्या वसाहतीत परततात.
१४०० हून अधिक जाती
जगभरात वटवाघळांच्या १४०० पेक्षा जास्त प्रजाती आहेत. भारतात वटवाघळाच्या १२३ जाती आहेत. सर्वांत मोठ्या वटवाघळाला फ्लॉइंग फॉक्सेस म्हणतात. भारतात फ्लाइंग फॉक्सेस मोठ्या संख्येने आढळून येतात. मोठ्या संख्येने वास्तव्य करणाऱ्या ठिकाणाला वटवाघळांची वसाहत म्हणतात. कोल्हापूर शहरातील टाउन हॉल बाग येथे फ्लाइंग फॉक्सेसची वसाहत आहे. येथे दोन हजारावर वटवाघळे आहेत. पूर्वी पद्मा टॉकीजसमोरील शिवाजी तंत्रनिकेतन परिसरातही वटवाघळांची वसाहत होती. पण तेथील उंच झाडे तोडल्यामुळे ती दुसरीकडे स्थलांतरीत झाली. मार्केट यार्ड परिसरातील फळ बाजार मोठा असल्याने तिथेही वीस ते पंचवीस वटवाघळांची छोटी कॉलनी असल्याचे वन्यप्राणी अभ्यासक सुनील करकरे यांनी सांगितले. पडकी घरे आणि गुहा आणि उंच झाडावर त्यांचे वास्तव्य असते. ती झाडाला उलटी लटकलेल्या अवस्थेत असतात. त्यांचे दात तीक्ष्ण धारदार असतात. (Bat)
वटवाघळांचे खाद्य
शाकाहारी आणि मांसाहारी अशा प्रामुख्याने दोन जाती आहेत. तर काही मिश्रआहारी आहेत. पेरु, सीताफळ, आंबा, चिकू आणि पपई ही शाकाहारी वटवाघळांची आवडती फळे आहेत. वटवाघळांच्या वस्तीपासून १५ ते वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या फळझाडांना ते लक्ष्य करतात. फळांचा गर खाऊन चोथा टाकून देतात. त्यांची पचनक्रियाही जलद असते. खाऊन झाल्यानंतर अर्धा तास ते तासाभरात मल:विसर्जन करतात. त्यामुळे उडताना त्यांचे वजन खूप कमी असते.
मांसाहारी वटवाघळांचा जोर कीटकांवर जास्त असतो. त्यामुळे निसर्गाचा समतोल राखण्यासाठी मोठी मदत होते. वटवाघळांच्या विष्ठेतील बियांपासून तयार झालेली रोपे चांगली वाढतात. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण होते. अनेक इमारतींवर जी वडाची झाडे उगवतात ती वटवाघळांच्या विष्ठेतील बियांतूनच उगवतात. कीटक खात असल्याने पिकांची नासाडी रोखण्यास मदत होते. पाकोळी ही वटवाघळाची छोटी जात आहे. पाकोळीही मोठ्या प्रमाणावर कीटक खाते. डास हे अत्यंत आवडते खाद्य आहे. डास आणि कीटक खात असल्याने काही प्रमाणात साथीचे आजार रोखायला मदत होते. जुन्या वाड्यात, भिंतीच्या पोकळीत पाकोळींचे वास्तव्य असते.
वटवाघळे शिकार कशी करतात?
वटवाघळे शिकार करताना विशिष्ट पद्धत वापरतात. ते आपल्या नाकपुड्यातून हळूवारपणे अतिशय उच्च वारंवारतेचे ध्वनी निर्माण करतात. ते उडत्या कीटकांवर आपटून मागे येतात. या प्रतिध्वनीवरून अचूक अंदाज घेत ते भक्ष्याचा वेध घेतात.
रोग वाहक
वटवाघळे खाद्याचा शोध घेताना ते रोगवाहक बनतात. पिकांवरील किडीच्या प्रादुर्भावाचा प्रसार त्यांच्यामुळे होते. ती ज्या परिसरात जास्त प्रमाणात विष्ठा टाकतात त्या ठिकाणी दम्याच्या आजारात वाढ होत असल्याचा अभ्यास आहे. वटवाघळांमुळे कोविड साथ पसरली असल्याचे निरीक्षणही नोंदवले गेले आहे. कोविड काळात वटवाघळे ज्या परिसरात आहेत त्या ठिकाणी फिरु नका, अशी सूचनाही आरोग्य विभागाने केली होती.
पिकांचे नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न
द्राक्षे पक्व होत असताना वटवाघळे मोठ्या संख्येने बागेकडे आकर्षित होतात. त्यांच्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी अनेक शेतकरी बागेत प्रखर दिवे लावतात. फटाके फोडून वटवाघळांना पळवून लावण्याचे प्रकार केले जातात. वटवाघळांना पिकलेली गोड द्राक्षे आवडतात. त्यामुळे बागेवर मासे मारण्याची जाळी अंथरली जाते. त्यामुळे वटवाघळे बागेजवळ येत नाहीत. (Bat)
वटवाघूळ हे पर्यावरणप्रेमी आहे. ते कीटकभक्षी आहेत. त्यांचा शेती आणि मानवाला चांगला फायदा होतो. ते कीटक खात असल्याने कीड नियंत्रणात येण्यास मदत होते. तसेच साथीचे आजार पसरणारे कीटकही खात असल्याने त्या आजारावर नियंत्रण येते. शाकाहारी वटवाघळांच्य विष्ठेतून पडणाऱ्या बीया चांगल्या रुजतात. त्यामुळे पर्यावरण राखण्यास मदत होते.
सुनील करकरे, प्रक्षी आणि प्राणी अभ्यासक
हेही वाचा :
‘छत्रपतींनी दिलेला मानाचा जरीपटका माझ्या मस्तकी चढविला. त्याचा सदैव मान राखीन…’ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर
कुमार कांबळे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांची पहिली भेट कोल्हापूरचे दत्तोबा पोवार यांनी मुंबईत १९१९ मध्ये घडवून आणली होती. त्याच भेटीत डॉ. आंबेडकरांनी कोल्हापूर संस्थानला लवकरात लवकर भेट द्यावी यासाठी महाराजांनी पावले उचलायला सुरवात केली. आंबेडकरांनीही कोल्हापूर भेटीचे निमंत्रण आनंदाने स्वीकारले होते. (Dr. Ambedkar)
त्यानंतर काही दिवसांतच त्यांनी कोल्हापुरातील स्नेही दत्तोबा पोवार यांना पत्र पाठवले आणि कोल्हापूरला येण्याची तारीख कळवली. महाराजांनी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली. पोवार, त्यांचे मित्र गंगाधर पोळ आणि महाराजांचे खासगी सचिव रा. सा. कुंभोजकर यांनी रेल्वे स्टेशनवर बाबासाहेबांचे स्वागत केले. तेथून रेल्वेस्टेशनसमोरील रेस्ट हाऊसमध्ये म्हणजे जुने शाहूपुरी पोलिस ठाणे येथे त्यांचे चहापान झाले. त्यानंतर कुंभोजकर यांनी त्यांना घोड्यांच्या रथातून नवीन राजवाड्यावर नेले. महाराजांनी मोठ्या उत्साहात बाबासाहेबांचे स्वागत केले. या भेटीतच कोल्हापुरात बहिष्कृत वर्गाच्या लोकांची परिषद घेण्याचे ठरले. परिषदेचे अध्यक्षस्थान स्वीकारण्याचे डॉ. आंबेडकरांनी मान्य केले. कोल्हापूर संस्थानच्यावतीने बाबासाहेबांचा दोन दिवस पाहुणचार करण्यात आला. या दरम्यान महाराज चार घोड्यांच्या रथातून सोनतळी कॅम्पवरून रेस्ट हाउसवर आले. त्यांनी आंबेडकरांना रथात घेतले आणि शहरांतून फेरफटका मारला. महाराजांच्या अशा प्रत्येक कृतीमागे हेतू असे. त्यामुळे बहुजन समाजात एक प्रकारचे कुतूहल निर्माण झाले. परत जाताना त्यांनी सोनतळी कॅम्पवर भोजनासाठी येण्याचे निमंत्रण दिले. तेथे ब्राह्मणेतर आणि सत्यशोधक समाजातील कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोल्हापूरच्या या पहिल्या भेटीच्या शेवटी महाराजांनी रितीरिवाजानुसार डॉ. आंबेडकरांना जरीफेट्याचा आहेर केला आणि त्यांची शहरातून मिरवणूक काढली. (Dr. Ambedkar)
यावेळी बाबासाहेबांनी ‘छत्रपतींनी दिलेला मानाचा जरीपटका माझ्या मस्तकी चढविला त्याचा सदैव मान राखीन…,’ असे भावोद्गार काढले. बाबासाहेबांच्या या पहिल्या भेटीतच त्यांचे कोल्हापूरशी ऋणानुबंध घट्ट बांधले गेले. ते आयुष्याच्या अखेरपर्यंत राहिले.
कोल्हापूर हायकोर्टातील केस
कोल्हापूरला यायचे असेल तेव्हा ते पहिल्यांदा दत्तोबा पोवार यांना पत्राने कळवत. पोवार यांच्यामुळे गंगाधर पोळ हेही बाबासाहेबांशी जोडले गेले. त्यांच्याच बंधूंची केस बाबासाहेबांनी कोल्हापूर हायकोर्टात चालवली. गंगाधर यांचे वडील बंधू रामचंद्र यांच्या पत्नी कृष्णाबाई यांनी २६ मे १९२८ रोजी रावणेश्वर तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. कृष्णाबाईच्या वडिलांनी फिर्याद दिली. त्यामुळे रामचंद्र यांना अटक झाली. त्यांच्यावतीने शंकरराव दाभोळकर यांनी केस लढवली. मात्र रामचंद्र यांना कोर्टाने सात वर्षांची शिक्षा सुनावली.
ही बाब गंगाधर पोळ यांनी डॉ. आंबेडकरांना पत्राने कळवली. त्यावर, घाबरू नका, मी केस चालवतो. तुमच्या बंधूला सोडवू, असा धीर बाबासाहेबांनी दिला. त्यानुसार बाबासाहेबांनी कोल्हापूर हायकोर्टात केस चालवली आणि रामचंद्र पोळ यांची निर्दोष मुक्तता केली. या केससाठी जुलै १९२८ आणि सप्टेंबर १९२८ मध्ये जवळपास आठ दिवस बाबासाहेब कोल्हापुरात होते. पोळ यांनी बाबासाहेबांची राहण्याची व्यवस्था सरकारी गेस्ट हाऊसमध्ये केली होती.
बाबासाहेबांमुळे बंधू दोषमुक्त झाला. त्यांच्या ऋणातून अंशत: मुक्त व्हावे म्हणून गंगाधर पोळ यांनी मुंबईला जाऊन बाबासाहेबांची भेट घेतली. लोकरीची तीन जेने आणि रोख शंभर रुपये आंबेडकरांना अर्पण केले.
पैलवानांना सल्ला
बाबासाहेब कोल्हापुरात आले की, सर्व क्षेत्रांतील लोक त्यांची भेट घ्यायला उत्सुक असत. असेच एका कामानिमित्त आले असता सर्किट हाउसवर काही पैलवान त्यांना भेटण्यासाठी आले. त्यावेळी बाबासाहेब त्यांना उद्देशून म्हणाले, ‘सॅण्डो पैलवान कसा बांधेसूद आहे बघा. पण, तुमचे पोट सुटते. याचा अर्थ तुमच्या व्यायामपद्धतीत काहीतरी दोष असला पाहिजे. तुम्ही अत्याधुनिक व शास्त्रोक्त पद्धतीने व्यायाम करत जा.’ तेवढ्यात कुणीतरी त्यांना ‘बाबा, तुम्हीही व्यायाम करता का,’ असे मध्येच विचारले. त्यावर त्यांनी उजव्या बाह्या सरावत उत्तर दिले, ‘मी रोज योगासने करतो.’ (Dr. Ambedkar)
डॉ. माईसाहेब आंबेडकर ही आठवण त्यांच्या ‘डॉ. आंबेडकरांच्या सहवासात,’ या चरित्रग्रंथात दिली आहे.
कांदा नि भाकर
कोल्हापुरातील गुरुवर्य सासणे गुरुजी हे आदरणीय व्यक्तिमत्व. बाबासाहेबांनी ८ मे १९३० रोजी त्यांच्या शाहूपुरीतील घरी भेट दिली. बाबासाहेब आल्याचे समजताच ते एकदम धावत बाहेर आले. त्यांनी बाबासाहेबांना अलिंगन दिले आणि मोठ्या आदराने घरात नेले. सकाळी त्यांची न्याहरीची वेळ होती. बाबासाहेबांना त्यांनी न्याहरीचा आग्रह धरला. सोबत असलेले बी. एच. वराळे यांच्यासह सर्वांच्या हाती कांदा आणि भाकरी दिली. त्यांनी खायला सुरुवात केली आणि इतरांनीही सुरू करावे, अशी सूचना केली. ‘मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मला हेच खाणे आवडते,’ असे ते म्हणाले. बाबासाहेबांसह सर्वांनी ही कांदा-भाकर आनंदाने खाल्ली. बाबासाहेबांचे सर्वस्तरांतील लोकांशी असे जिव्हाळ्याचे संबंध होते.
राजाराम महाराजांनी पन्हाळ्यावर दिली जागा
बाबासाहेब कोर्टाचे काम किंवा इतर कामानिमित्त कोल्हापूरला आले की, त्यांची पन्हाळ्याची भेट हमखास ठरलेली असे. पन्हाळ्यातील वातावरण त्यांना खूपच आवडे. छत्रपती राजाराम महाराजांनी ही बाब माहीत होती. बाबासाहेब आपल्या संस्थानात वारंवार यावेत आणि त्यांचे वास्तव्य आपल्या नगरीत असावे, म्हणून त्यांनी बाबासाहेबांना पन्हाळ्यावर जागाही दिली. त्यात विहीर खोदावी असा विचार बाबासाहेबांच्या मनात आला. काम सुरू केले. पण पाणी लागले नाही. त्यामुळे खोदाईचे काम थांबवण्यात आले. (Dr. Ambedkar )
मसाई पठार, चहाच्या मळ्याला भेट
एकदा पन्हाळ्यावर आले असताना बाबासाहेबांनी मसाई पठारला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार दत्तोबा पोवार, गंगाधर पोळ, तुकाराम गणेशाचार्य यांनी सर्व ती व्यवस्था केली. पन्हाळ्याहून हे सर्वजण पायी निघाले. वाटेत शाहू महाराजांनी केलेली चहाची बाग फिरून पाहिली. तेथून सर्वजण मसाई पठारावरील लेण्याजवळ पोहोचले. लेणी पाहिली. बाबासाहेबांना तेथील डोहात आंघोळ करण्याची इच्छा झाली. क्षणाचाही वेळ न लावता त्यांनी आंघोळ उरकून घेतली. त्यानंतर सहकाऱ्यांनी आणलेल्या जेवणाचा आस्वाद घेतला. संध्याकाळच्या सुमारात ते पन्हाळ्यावर परतले. (Dr. Ambedkar)
कोल्हापुरातून लोकसभा लढवण्याची इच्छा
महानिर्वाणाआधी चार दिवस कोल्हापूरचे शामराव जाधव यांना नवी दिल्लीहून लिहिलेल्या पत्रात बाबासाहेबांनी कोल्हापूरची लोकसभा सर्वसाधारण जागेवरून लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. शामराव जाधव यांनी राखीव जागेवरून निवडणूक लढवावी, असे त्यांनी जाधव यांना पाठवलेल्या पत्रांत म्हटले होते. मात्र सहा डिसेंबर १९५६ ला त्यांचे महानिर्वाण झाले. म्हणजे अखेरच्या क्षणापर्यंत बाबासाहेबांचा कोल्हापूरशी जिव्हाळा होता, असे लक्षात येते.
कोल्हापूर, सावंतवाडी, सांगली, मिरज, निपाणी, धारवाड, हुबळी या परिसरात बाबासाहेबांच्या सभा झाल्या. बाबासाहेबांना सर्व समाजातील कार्यकर्त्यांचे पाठबळही या भागाने दिले. त्यांच्याबद्दलचा जिव्हाळा त्यांनी आयुष्यभर जपला. त्या आठवणी अनेकांनी पुस्तकरुपाने लिहून ठेवल्या आहेत.
संदर्भ साहित्य
- डॉ. आंबेडकरांच्या सहवासात : डॉ. सविता उर्फ माईसाहेब आंबेडकर
- डॉ. आंबेडकरांचे स्नेही दत्तोबा पोवार : सुधीर पोवार
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सांगाती : बळवंतराव वराळे
- बाबासाहेबांच्या सहवासातील शामराव जाधव : संपा. वसंतराव लिंगनूरकर
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेने दादर येथील चैत्यभूमी तसेच छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) परिसरात पुरवलेल्या नागरी सेवा-सुविधा दर्शवणारी चित्रफीत…#MyBMCUpdates pic.twitter.com/RkRaXzEADB
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) December 4, 2024
हेही वाचा :