मुंबई : विशेष प्रतिनिधी : मराठी माणसाचा अपमान करणे आणि मुंबई महाराष्ट्रापासून तोडणे हाच भाजपाचा छुपा अजेंडा आहे. त्यासाठी एक अनाजी पंत मुंबईत येऊन गोमूत्र शिंपडून गेले. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (६ मार्च) केली. (Bhayyaji Joshi)
आरएसएसचे माजी कार्यवाह भैयाजी जोशी यांनी बुधवारी विद्या विहार येथे झालेल्या एका कार्यक्रमात मुंबईत मराठी भाषा येणे गरजेचे नाही, घाटकोपरची भाषा गुजराती आहे असे वक्तव्य केले होते. त्यावर राज्यभरातून संतप्त पडसाद उमटत आहे. उन्हाळी अधिवेशनात त्याचे तीव्र पडसाद उमटले. दोन्ही सभागृहात विरोधकांनी यावरून मोठा गदारोळ केला. जोशी यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करीत सभागृहातील कामकाज बंद पाडले. (Bhayyaji Joshi)
उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या अस्मितेवर हल्ला करणारे औरंगजेब व अनाजीपंत हे दोघे एकाच माळेचे मणी आहेत. काल एक अनाजीपंत असाच काहीतरी बरळून गेला, पण आम्ही मुंबईला मराठीपासून कधीही वेगळे करू देणार नाही, असे ठणकावले. जोशी यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ सर्व आमदारांनी हुतात्मा स्मारक येथे आंदोलन केले.
जोशींच्या वक्तव्यावर ठाकरे म्हणाले, “ही सगळी वक्तव्ये केवळ मराठी माणसाचा अपमान करण्यासाठी व मुंबई मराठी माणसापासून तोडण्यासाठी चालू आहेत. हाच भाजपाचा छुपा अजेंडा आहे. काल महायुतीच्या आमदारांना छावा चित्रपट दाखवण्यात आला होता आणि दुसऱ्या बाजूला संघाचे एक अण्णाजी पंत आले होते. मुंबईत येऊन ते मराठी विरुद्ध अमराठी असे विष कालवून गेले. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आता पुन्हा जन्माला येऊ शकत नाहीत. मात्र, महाराष्ट्रात, मराठी माणसात फूट पाडणारे औरंगजेब व त्यांना मदत करणारे अण्णाजी पंत या जमान्यातही जन्माला येत आहेत.’’ (Bhayyaji Joshi)
काही लोक असे आहेत जे आम्हीच ब्रह्मदेवाला जन्म दिला, अशा आवेशात फिरत असतात, जगाला ब्रह्मज्ञान शिकवत फिरत असतात. ते भैय्याजी जोशी काल मुंबईत घाटकोपरला आले आणि गोमूत्र शिंपडून गेले. मुंबईत राहायचे असेल तर मराठी आलीच पाहिजे, अशी काही गरज नाही असे गोमूत्र शिंपडून गेले. भारतीय जनता पार्टीचा हा छुपा अजेंडा आहे. त्यांचे खायचे व दात वेगळे आहेत.पण जोपर्यंत मराठी माणसांच्या धमन्यात रक्त आहे तोपर्यंत आम्ही मुंबई वेगळी होऊ देणार नाही, असेही ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. (Bhayyaji Joshi)
तत्पूर्वी अधिवेशनाच्या दोन्ही सभागृहात या विषयावरुन ‘मविआ’ च्या आमदारांनी भाजपा व महायुती सरकारवर कडाडून हल्ला चढवला. भास्कर जाधव, विजय वडेट्टीवार, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, आदित्य ठाकरे यांनी जोशी व भाजपावर कडाडून टीका केली. त्यामुळे सभागृहात गोंधळ उडाला.
मराठी हीच मुंबईची, महाराष्ट्राची भाषा : मुख्यमंत्री
मराठी हीच मुंबईची आणि महाराष्ट्राची भाषा आहे, या ठिकाणी राहणाऱ्या प्रत्येकाने ती शिकलीच पाहिजे, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात स्पष्ट केली.
विधानसभेत लक्षवेधीवेळी ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी भैय्याजी जोशी यांच्या वक्तव्याचा निषेध करत राज्य सरकारने त्याबाबतची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली.त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, भैय्याजी जोशी यांचे वक्तव्य मी ऐकले नाही. ते ऐकून भूमिका स्पष्ट करेल, पण आमची भूमिका ही मुंबईची, महाराष्ट्राची मराठी शासनाची भाषा ही मराठी आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने महाराष्ट्र मराठी शिकले पाहिजे, बोलले पाहिजे, अशी आहे. इतर भाषेचा सन्मान आहे पण जो स्वतःच्या भाषेवर प्रेम करतो तो दुसऱ्याच्या भाषेवर प्रेम करतो. त्यामुळे त्यांच्या सन्मानात शासनाची भूमिका आहे. (Bhayyaji Joshi)
त्यावर आदित्य ठाकरे मुख्यमंत्र्यांचे आभार मानत बाजू मांडत असताना मंत्री नितेश राणे यांनी त्याला आक्षेप घेतला. मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केल्याने हा विषय संपला आहे, त्यामुळे कोणीही बोलू नये, असे ओरडून सांगितले. त्यामुळे सभागृहात गोंधळ वाढला. अखेर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हस्तक्षेप करून दोघांना थांबण्यास सांगितले आणि पुढील लक्षवेधी पुकारली. मात्र गोंधळ कायम राहिल्याने सभागृह ५ मिनिटांसाठी तहकूब केले.
हेही वाचा :
‘जलसंपदा’चा कारभार मोहित कंबोजाकडून सुरू
परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्यावर लंडनमध्ये हल्ल्याचा प्रयत्न