जकार्ता : सात्विकसाईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी या पुरुष दुहेरीतील भारताच्या आघाडीच्या जोडीला इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्याच फेरीत पराभव पत्करावा लागला. पुरुष एकेरीतही भारताच्या लक्ष्य सेनला पराभवाचा सामना करावा लागला, तर मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला-तनिशा क्रॅस्टो ही भारतीय जोडी पराभूत झाली. Badminton Doubles
जागतिक क्रमवारीत सात्विक-चिराग जोडीला नववे मानांकन आहे. पुरुष दुहेरीत थायलंडच्या कित्तिनपाँग केड्रेन-डेचापॉल पुवारानुक्रोह या जोडीने सात्विक-चिराग यांचा ५० मिनिटे रंगलेल्या लढतीत २२-२०, २३-२१ असा पराभव केला. या लढतीमधील दोन्ही गेम चुरशीचे झाले. सामन्याचे पारडे आलटून-पालटून दोन्ही जोड्यांच्या बाजूने झुकत होते. मात्र, मोक्याच्या क्षणी गुण मिळवण्यात अपयश आल्यामुळे सात्विक-चिराग याना पराभव पत्करावा लागला. (Badminton Doubles )
पुरुष एकेरीमध्ये जपानच्या केंता निशिमोतोने लक्ष्यचा तीन गेमपर्यंत रंगलेल्या लढतीमध्ये २१-१६, १२-२१, २३-२१ असा पराभव केला. हा सामना १ तास १३ मिनिटे रंगला. लक्ष्य हा पुरुष एकेरीत दुसऱ्या फेरीपर्यंत पोहोचलेला भारताचा एकमेव खेळाडू होता. त्यामुळे, त्याच्या पराभवासह या गटातील भारताचे आव्हान संपुष्टात आले. महिला दुहेरीमध्ये सिंगापूरच्या गो पेई की-तिओ मेई शिंग या जोडीने भारताच्या तनिशा क्रॅस्टो-अश्विनी पोनप्पा यांना २१-१३, २२-२४, १८-२१ असे नमवले. १ तास १७ मिनिटे रंगलेल्या या लढतीमध्ये तनिशा-अश्विनी जोडीने चांगली लढत दिली. परंतु, त्यांना विजय मिळवण्यात यश आले नाही. (Badminton Doubles )
मिश्र दुहेरीमध्येही ध्रुव-तनिशा जोडीला दुसऱ्या फेरीत सिंगापूरच्या पँग रॉन हू-सू यिन चेंग या जोडीने २१-१८, १५-२१, १९-२१ असे हरवले. ५७ मिनिटे रंगलेल्या या सामन्यातील सुरुवातीचा गेम जिंकून भारतीय जोडीने आश्वासक सुरुवात केली होती. त्यानंतर, मात्र सिंगापूरच्या जोडीने लागोपाठ दोन गेम जिंकत विजय खेचून आणला. (Badminton Doubles )
हेही वाचा :
भारताचे दिग्गज रणजीमध्येही नापास