मेलबर्न : सर्बियाचा नोव्हाक जोकोविच, स्पेनचा कार्लोस अल्कारेझ, इटलीचा यानिक सिनर यांनी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेमध्ये सोमवारी विजयी सलामी दिली. महिला एकेरीमध्ये इगा स्वियातेक, कोको गॉफ यांनी पहिल्या फेरीत विजय नोंदवले. (Australian Open)
या स्पर्धेचे विक्रमी दहा वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या जोकोविचला यंदा पुरुष एकेरीमध्ये सातवे मानांकन आहे. पहिल्या फेरीत त्याने अमेरिकेच्या नि:शेष बसवारेड्डीविरुद्ध एका सेटची पिछाडी भरून काढत ४-६, ६-३, ६-४, ६-२ असा विजय मिळवला. तब्बल २ तास ५९ मिनिटे रंगलेल्या या लढतीमध्ये जोकोविचने २३ बिनतोड सर्व्हिस केल्या. पुढील फेरीत त्याचा सामना पोर्तुगालच्या पात्रता फेरीतून आगेकूच करणाऱ्या जेमी फारियाशी होईल. (Australian Open)
इटलीच्या गतविजेत्या यानिक सिनरला यंदा अग्रमानांकन असून पहिल्या फेरीत त्याने चिलीच्या निकोलास जॅरीला ७-६(७-२), ७-६(७-५), ६-१ असे पराभूत केले. हा सामना २ तास ४० मिनिटे रंगला. पुढील फेरीत सिन्नर ऑस्ट्रेलियाच्या ट्रिस्टन स्कूलकेटशी झुंजणार आहे. स्पेनच्या तृतीय मानांकित कार्लोस अल्कारेझने सलामीच्या सामन्यात कझाखस्तानच्या अलेक्झांडर शेव्हचेंकोला ६-१, ७-५, ६-१ असे सरळ सेटमध्ये नमवले. दुसऱ्या फेरीत त्याची लढत जपानच्या योशिहितो निशिओकाशी होईल. दोन वर्षांच्या खंडानंतर पुनरागमन करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या निक किरिओसला मात्र पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. ब्रिटनच्या जेकब फर्नलीने किरिओसवर ७-६(७-३), ६-३, ७-६(७-२) अशी मात केली. (Australian Open)
महिला एकेरीच्या पहिल्या फेरीमध्ये पोलंडच्या द्वितीय मानांकित इगा स्वियातेकने कॅटरिना सिनिआकोवाचा ६-३, ६-४ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. पुढील फेरीत ती स्लोव्हाकियाच्या रेबेका स्राम्कोव्हाविरुद्ध खेळेल. अमेरिकेच्या तृतीय मानांकित कोको गॉफने अमेरिकेच्याच सोफिया केनिनला ६-३, ६-३ असे हरवले. पुढील फेरीत गॉफची लढत ब्रिटनच्या जॉडी बराज हिच्याशी होईल. (Australian Open)
Post victory catch ups 🤗@carlosalcaraz 🤝 @DjokerNole #AO2025 pic.twitter.com/ckiFwRnG0w
— #AusOpen (@AustralianOpen) January 13, 2025
हेही वाचा :
श्रेयस अय्यर बनला पंजाबचा ‘किंग’!