Home » Blog » Australia Win : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी ऑस्ट्रेलियाकडे

Australia Win : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी ऑस्ट्रेलियाकडे

सिडनी कसोटीत भारताचा ६ विकेटनी पराभव

by प्रतिनिधी
0 comments

सिडनी : ऑस्ट्रेलियाने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेतील अखेरच्या सिडनी कसोटीमध्ये रविवारी तिसऱ्या दिवशीच भारताचा ६ विकेटनी पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने पाच कसोटींची ही मालिका ३-१ अशी जिंकली असून तब्बल दहा वर्षांनी बॉर्डर-गावसकर ट्रॉफी भारताकडून पुन्हा मिळवली. त्याचबरोबर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (वर्ल्ड चॅम्पियनशीप) अंतिम फेरीतील स्थानही निश्चित केले. या स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याच्या भारताच्या आशा मात्र या पराभवासह संपुष्टात आल्या. (Australia Win)

शनिवारी, दुसऱ्या दिवसअखेर भारताने दुसऱ्या डावामध्ये ६ बाद १४१ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियासमोर तुल्यबळ आव्हान उभे करण्यासाठी भारताला किमान दोनशे धावांचा टप्पा गाठणे आवश्यक होते. तथापि, भारतीय फलंदाजांना रविवारी धावसंख्येत केवळ १६ धावांची भर घालता आली. दिवसाच्या तिसऱ्याच षटकात पॅट कमिन्सने रवींद्र जडेजाला बाद केले. त्यानंतर, कमिन्सनेच वॉशिंग्टन सुंदरलाही पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. स्कॉट बोलंडने सिराज आणि बुमराहला बाद करून भारताचा डाव १५७ धावांत संपवला. बोलंडने दुसऱ्या डावात ४५ धावांमध्ये ६ विकेट घेण्याबरोबरच कारकिर्दीत पहिल्यांदाच दोन्ही डावांत मिळून १० विकेट घेतल्या. (Australia Win)

भारताकडे पहिल्या डावात ४ धावांची आघाडी असल्यामुळे ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी १६१ धावांचे आव्हान होते. पाठदुखीमुळे भारताचा कर्णधार जसप्रीत बुमराह रविवारी गोलंदाजीस उतरला नव्हता. त्याचा फटका भारतीय संघाला बसला. सॅम कॉन्स्टस आणि उस्मान ख्वाजा यांनी पहिल्या ३ षटकांतच ३५ धावा केल्या. चौथ्या षटकात प्रसिध कृष्णाने कॉन्स्टसला बाद करून भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर, प्रसिधनेच आठव्या षटकात मार्नस लॅबुशेनला, तर दहाव्या षटकात स्टीव्ह स्मिथला बाद केले. स्मिथ कसोटी कारकिर्दीमध्ये १०,००० धावा पूर्ण करण्यापासून केवळ एका धावेने दूर राहिला. उपाहारापर्यंत ऑस्ट्रेलियाने ३ बाद ७१ धावा केल्या होत्या. (Australia Win)

दुसऱ्या सत्रामध्ये ख्वाजा आणि ट्रॅव्हिस हेड यांनी ऑस्ट्रेलियाचे शतक पूर्ण केले. त्यानंतर लगेचच महंमद सिराजने ख्वाजाला बाद करून कसोटी कारकिर्दीतील १०० विकेटचा टप्पा पूर्ण केला. ख्वाजा ४५ चेंडूंमध्ये ४ चौकारांसह ४१ धावा करून बाद झाला. त्यानंतर मात्र हेडने ब्यू वेबस्टरसह नाबाद अर्धशतकी भागीदारी रचत ऑस्ट्रेलियाचा विजय साकारला. २७ व्या षटकात वॉशिंग्टनच्या गोलंदाजीवर चौकार खेचत वेबस्टरने ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. हेड ३८ चेंडूंमध्ये ४ चौकारांसह ३४, तर वेबस्टर ३४ चेंडूंमध्ये ६ चौकारांसह ३९ धावांवर नाबाद राहिला. बोलंड सामनावीर ठरला, तर मालिकेत ३२ विकेट घेणाऱ्या बुमराहला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले. (Australia Win)

धावफलक : भारत पहिला डाव १८५ आणि दुसरा डाव (६ बाद १४१ वरून पुढे) रवींद्र जडेजा झे. कॅरी गो. कमिन्स १३, वॉशिंग्टन सुंदर त्रि. गो. कमिन्स १२, महंमद सिराज झे. ख्वाजा गो. बोलंड ४, जसप्रीत बुमराह त्रि. गो. बोलंड ०, प्रसिध कृष्णा नाबाद १, अवांतर ८, एकूण ३९. षटकांत सर्वबाद १५७.

बाद क्रम ७-१४७, ८-१५६, ९-१५६, १०-१५७.

धावफलक मिचेल स्टार्क ४-०-३६-०, पॅट कमिन्स १५-४-४४-३, स्कॉट बोलंड १६.५-५-४५-६, ब्यू वेबस्टर ४-१-२४-१.

ऑस्ट्रेलिया पहिला डाव १८१ आणि दुसरा डाव – सॅम कॉन्स्टस झे. सुंदर गो. प्रसिध २२, उस्मान ख्वाजा झे. पंत गो. सिराज ४१, मार्नस लॅबुशेन झे. जैस्वाल गो. प्रसिध ६, स्टीव्ह स्मिथ झे. जैस्वाल गो. प्रसिध ४, ट्रॅव्हिस हेड नाबाद ३४, ब्यू वेबस्टर नाबाद ३९, अवांतर १६, एकूण २७ षटकांत ४ बाद १६२.

बाद क्रम १-३९, २-५२, ३-५८, ४-१०४.

गोलंदाजी महंमद सिराज १२-१-६९-१, प्रसिध कृष्णा १२-०-६५-३, नितीश कुमार रेड्डी २-०-१०-०, वॉशिंग्टन सुंदर १-०-११-०.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00