Home » Blog » Athletics : ज्योती याराजीचे विक्रमासह सुवर्ण

Athletics : ज्योती याराजीचे विक्रमासह सुवर्ण

६० मी. अडथळ्यांच्या शर्यतीत तेजस शिरसेला ब्राँझ

by प्रतिनिधी
0 comments
Athletics

पॅरिस : भारताची आशियाई विजेती धावपटू ज्योती याराजीने एलिट इनडोअर ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये ६० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक पटकावले. अंतिम फेरीत तिने ८.०४ सेकंदांमध्ये ही शर्यत पूर्ण केली. (Athletics)

नॅन्ट्स येथील पिएर-क्विनॉन स्टेडियममध्ये ही शर्यत रंगली. पात्रता फेरीमध्ये तिने ८.०७ सेकंदांमध्ये शर्यत पूर्ण केली. त्यानंतर, अंतिम फेरीत आपली कामगिरी ८.०४ सेकंद अशी सुधारत तिने सुवर्णपदक निश्चित केले. तिची ही कामगिरी नवा राष्ट्रीय विक्रम ठरला. या प्रकारातील ८.१२ सेकंद हा अगोदरचा राष्ट्रीय विक्रमही तिच्याच नावावर होता. २०२४ साली इराणमधील तेहरान येथे आशियाई इनडोअर चॅम्पियनशीप स्पर्धेत तिने ही वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले होते. (Athletics)

तथापि, तिची ही कामगिरी मार्चमध्ये चीनच्या नान्जिंग येथे रंगणाऱ्या वर्ल्ड इनडोअर चॅम्पियनशीप स्पर्धेकरिता पात्र होण्यासाठी पुरेशी ठरली नाही. या स्पर्धेसाठीची पात्रता अट ७.९४ सेकंद अशी आहे. महिलांच्या १०० मी. अडथळ्यांच्या शर्यतीचाही १२.७८ सेकंद हा राष्ट्रीय विक्रमही ज्योतीच्या नावावर आहे. २०२२ च्या हांगझोऊ आशियाई स्पर्धेमध्ये ज्योती १०० मी. अडथळ्यांच्या शर्यतीत रौप्यपदक विजेती ठरली होती. (Athletics)

दरम्यान, ६० मी. अडथळ्यांच्या शर्यतीच्या पुरुष गटात भारताच्या तेजस शिरसेने ब्राँझपदक जिंकले. त्याने ही शर्यत ७.६८ सेकंदांमध्ये पूर्ण केली. आठवड्याभरापूर्वीच लक्झेंबर्ग येथील स्पर्धेत तेजसने ७.६५ सेकंदांमध्ये शर्यत पूर्ण करून नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता. ११० मी. अडथळ्यांच्या शर्यतीतील १३.४१ सेकंदचा राष्ट्रीय विक्रम २२ वर्षीय तेजसच्या नावावर आहे. (Athletics)

हेही वाचा :
बुमराह आयसीसीचा सर्वोत्कृष्ट कसोटीपटू

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00