-डॉ. श्रीमंत कोकाटे
राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शेनगाव या गावी झाला. त्यांचे मूळ नाव डेबुजी झिंगराजी जानोरकर असे होते. ते लहान असताना त्यांचे वडील वारले. आई सखुबाई यांनी त्यांना मामाच्या गावी घेऊन आल्या व आई आणि मामाच्या छत्रछायेखाली त्यांची जडणघडण झाली. बालपणापासूनच ते अत्यंत बंडखोर होते. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, कर्मकांड, अस्पृश्यता, भेदाभेद या अनिष्ट प्रथा परंपरा त्यांना मान्य नव्हत्या. त्याविरुद्ध ते बालपणापासूनच लढत होते. धर्माच्या नावाखाली चाललेले शोषण त्यांना मान्य नव्हते ,त्याविरुद्ध ते लढले. गरिबांना मदत करणे, कोणी आजारी असेल तर त्याला औषध उपचार करणे, निराधार व्यक्तींना आधार देणे, ही बालपणापासूनच त्यांची वृत्ती होती. त्यांचा विवाह झाला. त्यांना चार मुली आणि एक मुलगा होता. (Gadge Maharaj)
ऐन तारुण्यांमध्ये डेबुजी यांनी गृहत्याग केला. समाज परिवर्तनाच्या उद्देशाने त्यांनी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, गुजरात पादाक्रांत केला. त्यांनी गावोगावी जाऊन समाज प्रबोधन केले. त्यांची मांडणी अत्यंत साध्या सोप्या लोकभाषेत होती. त्यांची पद्धत लोककल्याणकारी होती. गावात जायचे, हातातील खराट्याने प्रथमता गाव स्वच्छ करायचे आणि त्यानंतर त्याच गावात संध्याकाळी कीर्तन करायचे. कीर्तनातून ते शिक्षणाचे महत्त्व पटवून द्यायचे. कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. पंजाबराव देशमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव त्यांनी अनेक कीर्तनातून केला. ते जनतेला सांगायचे सोन्या-चांदीच्या दागिन्यापेक्षा शिक्षण महत्त्वाचे आहे. शिक्षण हाच सगळ्यात महत्त्वाचा दागिना आहे. त्यासाठी मुलांना शाळेत पाठवा. शिक्षणासाठी मदत करा, असेच एकदा त्यांचे शिष्य बंडो गोपाळा मुकादम(कदम) हे गाडगेबाबांना एक लाख रुपये देणगी देण्यासाठी पंढरपूरला गेले, तेव्हा गाडगेबाबा त्यांना म्हणाले “हे पैसे तुम्ही कर्मवीर भाऊराव पाटलांच्या शाळेसाठी द्या” पुढे बंडू गोपाळा मुकादम यांनी आपल्या गावात शाळा सुरू केली. रयत शिक्षण संस्थेला भरघोस मदत केली. ते पुढे रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष झाले. गाडगेबाबांच्या कार्याचे स्मरण म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी कराड या ठिकाणी सद्गुरु गाडगेबाबा महाविद्यालय सुरू केले. मुंबई प्रांताचे तत्कालीन मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांनी आकसाने रयत शिक्षण संस्थेचे अनुदान बंद केले, तेव्हा गाडगेबाबा स्वतः मंत्रालयात गेले आणि बाळासाहेब खेळांना निक्षून सांगितले की रयत शिक्षण संस्थेचे अनुदान सुरू करा. त्यांनी तत्काळ अनुदान सुरू केले, इतका नैतिक दबदबा गाडगेबाबांचा शासन व्यवस्थेवरती होता. (Gadge Maharaj)
संत गाडगेबाबा यांनी भाविकांसाठी आणि रुग्णांसाठी अनेक शहरांमध्ये धर्मशाळा सुरू केल्या. त्यामध्ये पंढरपूर, पुणे, देहू, आळंदी, नाशिक, मुंबई इत्यादी शहरांचा समावेश आहे. मुंबई या ठिकाणी दवाखान्यासाठी येणाऱ्या रुग्णांना राहण्याची सोय व्हावी यासाठी धर्मशाळा सुरू केली. गाडगेबाबा नियमित पंढरपूरला जात असत आणि तेथे जाऊन सांगत “देव दगडात नाही माणसात आहे.” पंढरीच्या पांडुरंगाचे ते नितांत भक्त होते, परंतु ते अंधभक्त कधीही नव्हते. त्यांनी वारकरी संप्रदायाचा जो प्रगतिक विचार आहे तो कीर्तनातून मांडला. त्यांची पद्धत अत्यंत सोपी होती. ते कीर्तनातून श्रोत्यांना बोलके करायचे. तेच श्रोत्यांना प्रश्न विचारायचे आणि श्रोत्यांना उत्तर द्यायला भाग पाडायचे. आपण अज्ञान आहोत, आपण भोळे आहोत, असे भासवायचे आणि जनमानसातील वैचारिक चैतन्य ते जागृत करायचे. हीच पद्धत ग्रीक तत्त्वेता सॉक्रेटिस यांची होती. सॉक्रेटिसदेखील अत्यंत साधा, सरळ, प्रांजळ पण तितकाच संवेदनशील आणि महाबुद्धिमान तत्त्वेता होता. तशाच पद्धतीचे महाराष्ट्राला लाभलेले व्यक्तिमत्व म्हणजे गाडगेबाबा आहेत. गाडगेबाबा म्हणजे महाराष्ट्राचा सॉक्रेटिस आहे.
संत गाडगेबाबा हे कोणत्याही विद्यापीठाचे पदवीधर नव्हते, परंतु आज अमरावती या ठिकाणच्या विद्यापीठाला “संत गाडगेबाबा विद्यापीठ” असे नाव देण्यात आले आहे. गाडगेबाबा महाराष्ट्राचे चालते विद्यापीठ होते. ते सांगायचे की देव दगडात नाही, देव माणसात आहे. माणसांची सेवा हाच खरा परमार्थ आहे. अस्पृश्यता पळू नका, गरिबांना मदत करा, रुग्णांना औषध-उपचार द्या. तहानलेल्याना पाणी द्या, भुकेलेल्या अन्न द्या, गरिबांना शिक्षण द्या, निराश्रितांना आश्रय द्या, बेरोजगारांना रोजगार द्या, मुक्या प्राण्यांना अभय द्या, गरीब तरुण-तरुणींचे लग्न लावून द्या, असे त्यांचे साधे सोपे तत्त्वज्ञान होते. त्यांना लाखो लोकांनी कोट्यावधी रुपये दिले, परंतु तो पैसा त्यांनी स्वतःच्या किंवा मुलांच्या नावावर कधी केला नाही, तर लोककल्याणासाठी त्यातील पै ना पै वापरला. घेणारे हात स्वच्छ असतील तर देणारे कोट्यावधी हात पुढे येतात. गाडगेबाबा स्वच्छ हाताचे, स्वच्छ मनाचे महापुरुष होते. त्यांना कोणी पाचीपक्वानाचे जेवण दिले तर ते गरिबांना द्यायचे व गरीबाची चटणी भाकरी आनंदाने खायचे. असा हे महायोगी आधुनिक भारताचे वैभवशाली आणि अभिमानास्पद संत आहेत. (Gadge Maharaj)
संत गाडगेबाबा यांनी संत तुकाराम महाराजांचा विचार लोकभाषेमध्ये सांगितला. संत गाडगेबाबा म्हणायचे “मी कोणाचाही गुरु नाही आणि मला कोणीही शिष्य नाही” यातून त्यांचा निस्पृहपणा स्पष्टपणे दिसतो. अतिव कर्तृत्वातून येणारा अहंकार त्यांच्या ठायी नव्हता किंवा सर्वसामान्यांना दुय्यम लेखण्याची त्यांची वृत्ती नव्हती. म्हणूनच ते इतक्या प्रांजळपणे म्हणू शकले की मी कोणाचा गुरु नाही आणि मला कोणीही शिष्य नाही, परंतु ते महाराष्ट्राचे लोकविद्यापीठ होते, एवढे मात्र निश्चित! संत गाडगेबाबा परखड होते, तितकेच ते प्रेमळ होते. ते सडेतोड होते, तितकेच ते संवेदनशील होते. ते नि:स्वार्थी होते, त्यांचा स्वार्थ एवढाच होता की लोककल्याणासाठी सर्वस्व समर्पित करणे.
हातात खराटा, डोक्यावरती फुटके गाडगे, खांद्यावरती गोधडी असा त्यांचा साधा पेहराव असायचा. असेच साधेपणाचे जीवन सॉक्रेटीस जगला, पण जनतेचे कल्याण करून गेला. तसेच गाडगेबाबा होते. “गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला!” हे त्यांचे गाजलेले भजन होते. वारकरी संप्रदायाच्या कीर्तनपरंपरेला त्यांनी ऊर्जित केले. मुंबईच्या बांद्रे येथील पोलीस स्टेशनमध्ये झालेले त्यांचे कीर्तन खूप गाजले. त्यांचे आवाजाचे एकमेव रेकॉर्डिंग उपलब्ध आहे. त्यांच्या कार्याचा गौरव आचार्य प्र. के. अत्रे, महात्मा गांधी यांनी मुक्तकंठाने केलेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना गाडगेबाबांच्या प्रति नितांत आदर होता. ते गाडगेबाबांचे कीर्तन ऐकायला आवर्जून जायचे. अशा महापुरुषाचे २० डिसेंबर १९५६ रोजी वयाच्या ७५ व्या वर्षी दुःखद निधन झाले, पण त्यांचे विचार, कार्य आणि तत्त्वज्ञान अजरामर आहे. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन! (Gadge Maharaj)
हेही वाचा :
- पक्ष्यांमध्येही वाढले घटस्फोट
- chautala passes away: हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांचे निधन
- Jaipur Blast; स्फोटांमागे स्फोट; किंकाळ्या नि ज्वाळात लपेटलेले लोक