मुंबई : जमीर काझी : बदलापुरातील बालिकेवर अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदेची पोलिसांकडून एन्काउंटरच्या बहाण्याने हत्या केली असल्याचे न्यायालयीन चौकशीत स्पष्ट झाले असताना गुरुवारी या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. अक्षयच्या पालकांनी खटला चालवू नये, आपण याचिका मागे घेत असल्याची भूमिका उच्च न्यायालयासमोर मांडली. आपल्यावर कोणाचाही दबाव नाही, मात्र आता कोर्टात हेलपाटे मारावे असे वाटत नाही, असे शिंदेच्या आई-वडिलांनी न्यायालयात सांगितले. त्यांच्या या पवित्र्यामुळे कोर्टही आश्चर्यचकित झाले. याबाबत शुक्रवारी (दि.७) पुन्हा सुनावणी घेण्यात येणार आहे.(Akshay shinde encounter)
गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात बदलापुरातील बालिकेवर झालेल्या अत्याचार प्रकरणी अटक केलेल्या अक्षय शिंदेचा मुंब्रा येथे पोलिसांनी एन्काउंटर केला होता तो बनावट असून पोलिसांकडून त्याची हत्या केल्याचा अहवाल स्थानिक न्यायालयाने उच्च न्यायालयात सादर केला होता.
त्यानुसार उच्च न्यायालयाने ठाणे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे, सहायक निरीक्षक निलेश मोरे, हवालदार अभिजित मोरे, हरिश तावडे आणि एका पोलीस ड्रायव्हरवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्याबाबत संबंधित दोषी पोलिसांनी हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी झाली. यावेळी अक्षयचे वडील अण्णा शिंदे आणि आई अलका यांनी त्यांच्यासमोर वैयक्तिक काही बाबी सांगण्याची मागणी केली. त्यामुळे खंडपीठाने सर्वांना कोथरूड बाहेर जाण्याचे सांगून ‘इन कॅमेरा’ सुनावणी घेतली. (Akshay shinde encounter)
त्यावेळी त्यांनी आमचा मुलगा पोलीस एन्काउंटरमध्ये मारला गेला. समाजाकडून टॉर्चर केले जात आहे. त्यामुळे आता याप्रकरणात आता यापुढे याविषयीचा खटला चालवायचा नाही. आमच्यावर कुणाचाही दबाव नाही, मात्र आम्हाला ही धावपळ आता जमत नाही. त्यामुळे खटला बंद करावा, अशी विनंती केली. त्यावर कोर्टाने तुमच्यावर कोणाचा दबाव आहे का, असा सवाल केला. त्यावर आमच्यावर कुणाचा दबाव नाही असे त्यांनी सांगितले. याबाबत शुक्रवारी सुनावणी घेण्याचे कोर्टाने जाहीर केले. (Akshay shinde encounter)
पोलिसांवर अद्याप गुन्हा का नोंदवला नाही?; हायकोर्टाचा सवाल
बनावट एन्काउंटरप्रकरणी पोलिसांवर अद्याप गुन्हा का नोंदवला नाही? अशी विचारणा कोर्टाने सरकारला केली. त्यावर या प्रकरणाची सीआयडीकडून स्वतंत्र चौकशी आणि आयोगामार्फत समांतर चौकशीही सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणात तातडीने कारवाई करण्यात कायदेशीर अडचणी आहेत. अशी माहिती विशेष सरकारी वकिलांनी हायकोर्टात दिली. तर अक्षय शिंदेच्या वडिलांचे वकील ॲड. अमित कटारनवरे यांनी र आयोगाच्या अहवालात पोलिसांना दिलासा मिळाला तर, त्यांच्याकडे गुन्हा रद्द करण्यासाठी कायदेशीर पर्याय उपलब्ध होईल अशी शंका उपस्थित केली आहे. शिंदेंच्या पालकांनी खटला मागे घेण्याची भूमिका समजू शकत नसल्याचेही ते म्हणाले.
हेही वाचा :