प्रयागराज : तब्बल २७ वर्षांनी ताटातूट झालेल्या पतीची भेट झाली. या दोघांची हृदयस्पर्शी भेट झाली. मात्र पती भेटला तोही अघोरी बाबाच्या वेषात. पत्नी आणि मुलांनी घरी येण्याची विनंती केली. मात्र अघोरी बाबाने धुडकावून लावली. पत्नीला मुलासह कुंभमेळ्यातून घरी परतावे लागले. पतीने घरी येण्यास नकार दिला असला तरी तो जिवंत असल्याचे आणि त्याचा ठावठिकाणा कळाल्याबद्दल तिने समाधान व्यक्त केले. कुंभमेळ्यात ताटातूट होण्याच्या अनेक कथा ऐकिवात येतात, पण येथे पती पत्नीचे मिलन झाल्याची घटना पहायला मिळाली. (Aghori baba)
धनबादमधील भुली टाऊन येथील गंगासागर यादव २७ वर्षापूर्वी अचानक गायब झाले. त्यांच्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक आणि मित्रांनी त्यांचा शोध घेतला. ते सापडले नाहीत. प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यात पवित्र स्नान करण्यासाठी गंगासागरची पत्नी धनवा देवी, दोन मुले कमलेश विमलेश आणि एका भाच्यासह गेले होते. त्यांच्या भाच्याने साधूच्या वेषात काकाला पाहिले. त्यांनी ही माहिती कुटुंबातील सदस्यांना दिली. पहिल्यांदा भाच्याच्या सांगण्यावर कुणाचाच विश्वास बसला नाही. पण ज्यावेळी सर्वांनी गंगासागर यादव यांना पाहिले तेव्हा त्यांच्या आनंद गगनात मावेनासा झाला. पत्नी धनवा देवीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. आपला पती परत मिळेल याची त्यांनी आशा सोडून दिली होती. (Aghori baba)
मुलांचा वडिलांना आग्रह
आईला पती तर मुलांना वडील मिळाल्याने ते खूष होते. अघोरी साधू बनलेल्या वडिलांच्या कानात मुलगा कमलेशने, ‘पापा हे काय सुरू आहे. घराकडे चला. तुमची सर्वजण वाट पहात आहेत. बघा आईही आली आहे,’ अशी विनंती केली. त्यानंतर गंगासागर मुलाला म्हणाले, ‘ मी कुणाचा बापही नाही आणि मला कुणी मुलगाही नाही. माझ्या कानात फक्त भोलेनाथचा आवाज ऐकू येतो’ परिवारातील सर्व सदस्यांनी घरी येण्यासाठी विनवणी केली. घरी नेण्यासाठी आडून बसले पण गंगासागर यांनी घरी परतण्यास स्पष्ट नकार दिला. निराश होऊन सर्व सदस्य धनबादला घरी परतले. (Aghori baba)
गंगासागर यांची पत्नी धनवा देवी म्हणाल्या, गंगासागर यादव १९९८ मध्ये बेपत्ता झाले. त्यानंतर त्याची काहीच माहिती मिळाली नाही. महाकुंभ मेळ्यातही त्यांनी ओळख दाखवण्यास नकार दिला. माझा पती अघोरी साधू बनसला आहे. लोक त्यांना बाबा राजकुमार नावाने ओळखतात. बाबा राजकुमार हे ६५ वर्षाचे आहेत. पती बेपत्ता झाल्यापासून धनवा देवी यांनी आपली दोन्ही मुले कमलेश आणि विमलेश याचे लालनपोषण केले.
गंगासागर यादव यांचे भाऊ मुरली यादव म्हणाले, आम्ही आमच्या भावाची आशा सोडून दिली होती. पण आमच्या नातेवाईकांनी कुंभ मेळ्यात एक साधूला पाहिले. हा साधू गंगासागर सारखा दिसत होता. त्याचे फोटो काढून आम्हाला मोबाईलवर पाठवले. फोटो पाहून धनवा देवी आणि दोन्ही मुले कुंभमेळ्यात पोहोचली. पण गंगासागर याने घरी येण्यास नकार दिला आहे. पण आमच्या कुटुंबाला आशा वाटते की एक ना एक दिवस गंगासागर घराकडे परतेल.
हेही वाचा :