Home » Blog » Afghanistan : अफगाणिस्तान महिला संघ क्रिकेटच्या मैदानावर

Afghanistan : अफगाणिस्तान महिला संघ क्रिकेटच्या मैदानावर

तालिबानचे सरकार आल्यानंतर खेळला पहिलाच सामना

by प्रतिनिधी
0 comments
Afghanistan

मेलबर्न : अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे अधिकृत सरकार आल्यापासून बंदी असलेल्या अफगाणिस्तानच्या महिला क्रिकेट संघाने गुरुवारी ऑस्ट्रेलियामध्ये पहिला सामना खेळला. मागील तीन वर्षांपासून हा संघ ऑस्ट्रेलियामध्ये निर्वासित म्हणून राहत आहे. (Afghanistan)

ऑगस्ट, २०२१ मध्ये तालिबानने अफगाणिस्तानची सूत्रे हाती घेताच महिलांना शिक्षण घेण्यास व खेळण्यास बंदी घातली होती. यानंतर, अफगाणिस्तानच्या शेकडो महिला क्रीडापटूंनी देशातून पलायन करून परदेशामध्ये आश्रय घेतला. यांपैकी, बहुतांश महिला क्रिकेटपटू ऑस्ट्रेलियामध्ये निर्वासित म्हणून राहत होत्या. गुरुवारी, मेलबर्नच्या जंक्शन ओव्हल मैदानावर मदतीसाठी खेळवण्यात आलेल्या सामन्याच्या निमित्ताने त्या पुन्हा एकत्र आल्या. (Afghanistan)

“आम्ही एकत्र येऊन केवळ संघउभारणीच नाही, तर बदल आणि आश्वस्ततेची चळवळही उभारत आहोत,” असे संघाची कर्णधार नहिदा सपन म्हणाली. या सामन्याद्वारे अफगाणिस्तानच्या महिलांसाठी पुन्हा क्रीडा आणि शिक्षणक्षेत्राची कवाडे खुली व्हावीत, अशी आशाही तिने व्यक्त केली. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (एसीबी) नोव्हेंबर २०२०मध्ये २५ महिला क्रिकेटपटूंशी करार करण्याचे ऐतिहासिक पाऊल उचलले होते. परंतु, या संघाला त्यावेळी आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. तालिबानची सत्ता आल्यानंतर तर अफगाणिस्तानमधील महिला क्रिकेट पूर्णपणे बंद झाले. (Afghanistan)

साधारणत: वीस वर्षांपूर्वीपासून अफगाणिस्तानमध्ये महिला क्रिकेटला आकार देण्याबाबत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या डायना बराकझाई यांनी हा ऐतिहासिक क्षण असल्याचे म्हटले आहे. एसीबीने करार केलेल्या २५ पैकी २२ खेळाडू सध्या ऑस्ट्रेलियामध्ये राहतात. आपल्या संघास निर्वासित संघ म्हणून अधिकृत मान्यता मिळावी, अशी मागणी हा संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (आयसीसी) करत आहे. “ऑस्ट्रेलियामध्ये मला हवे तसे आयुष्य मी जगू शकते. परंतु, माझ्या देशामध्ये प्राप्त परिस्थितीत महिलांसाठी जगणे हे खूप अवघड आणि विदारक आहे,” अशी प्रतिक्रिया या संघातील फिरुझा आमिरीने दिली. (Afghanistan)

गुरुवारी या संघाचा सामना क्रिकेट विदाउट बॉर्डर्स इलेव्हन या संघाशी झाला. अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत १०३ धावा केल्या. अफगाणिस्तानकडून शाझिया झाझाईने ४५ चेंडूंत सर्वाधिक ४० धावांची खेळी केली. अफगाणिस्तान संघाचे संघाचे हे आव्हान प्रतिस्पर्ध्यांनी ४ चेंडू राखून पूर्ण केले. दरम्यान, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निक हॉकले यांनी गुरुवारच्या सामन्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. या महिला क्रिकेटपटूंना पाठिंबा देण्यास क्रिकेट ऑस्ट्रेलिया कटिबद्ध असल्याचेही हॉकले म्हणाले. (Afghanistan)

हेही वाचा :

वरुणची क्रमवारीत झेप

ख्वाजा, स्मिथ यांची शतके

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00