नवी दिल्ली : ऑलिंपिक पदकविजेती नेमबाज मनू भाकेरचे नाव ‘खेल रत्न’ पुरस्कारासाठी वगळण्याच्या वादासंबंधी आता स्वत: मनूने स्पष्टीकरण दिले आहे. पुरस्कारासाठी नामांकन भरण्यात कदाचित माझ्याकडून त्रुटी राहिली असू शकते, असे पॅरिस ऑलिंपिकमध्ये दोन पदके जिंकणारी मनू म्हणाली. (Manu Bhaker)
मनूचे वडील आणि प्रशिक्षकांनी तिचे नाव खेल रत्नच्या नामांकन यादीतून वगळल्यात आल्याबद्दल पुरस्कार समितीवर टीका केली होती. त्यानंतर, क्रीडा मंत्रालयाने याप्रकरणी हस्तक्षेप करत आपल्या अखत्यारित तिचा समावेश नामांकन यादीत करण्याची तयारी दाखवली. या सर्व पार्श्वभूमीवर मनूने मंगळवारी एक्सवर (ट्विटर) पोस्ट लिहून स्वत:ची भूमिका मांडली.
“प्रतिष्ठित खेलरत्न पुरस्कारासाठी माझ्या नामांकनाच्या मुद्द्यावर मी इतकेच म्हणू इच्छिते की एक खेळाडू म्हणून देशासाठी खेळणे हे माझे कर्तव्य आहे. पुरस्कार आणि मानमरातब यांमुळे मला प्रेरणा मिळत असली, तरी ते माझे ध्येय नाही. बहुधा या पुरस्कारासाठी नामांकन भरण्यात माझ्याकडून त्रुटी राहिली असावी व ती आता दुरुस्त करण्यात येत आहे. पुरस्कार मिळो व न मिळो, मी देशासाठी अधिकाधिक पदके जिंकण्याप्रती प्रेरित आहे. याविषयी लोकांनी अधिक तर्कवितर्क लढवू नयेत, अशी मी विनंती करते,” असे मनूने या पोस्टमध्ये म्हटले आहे. मनू ही एकाच ऑलिंपिकमध्ये दोन पदके मिळवणारी भारताची एकमेव क्रीडापटू आहे. तिने पॅरिस ऑलिंपिकमध्ये महिलांच्या १० मी. एअर पिस्तूल आणि मिश्र १० मी. एअर पिस्तूल गटात ब्राँझपदक जिंकले होते. (Manu Bhaker)
— Manu Bhaker🇮🇳 (@realmanubhaker) December 24, 2024
हेही वाचा :
- नवाज शरीफ यांच्या नातवाचे लग्न, पंतप्रधान मोदींना आमंत्रण?
- Sanjay Raut : मुख्यमंत्री बीड,परभणीला केव्हा जाणार?
- वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ जाहीर