आजरा : आजरा तालुक्यात हत्ती, वाघ आणि आता पुन्हा हत्तीचे संकट उभे असल्याचे चित्र आहे. तालुक्यातील यमेकोंड येथे हत्तीने रात्री धुमाकूळ घालत विलास होडगे यांच्या आंब्याच्या कलमी झाडांसह केळी, फणस, ऊस यांचे मोठे नुकसान केले. तसेच बैलगाडी पलटी करून आजूबाजूच्या परिसरातील लाकडी ओंडकेही सर्वत्र पसरून टाकले. ऊस पिकामध्ये हत्तीने मोठे नुकसान केले आहे. लागोपाठच्या वन्यप्राणी संकटाने तालुकावासिय बिथरून गेले आहेत. त्यामुळे नागरिकांनी प्रतिबंधात्मक योजनांची अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. (Kolhapur)
गुरुवारी (दि.१९) रात्रभर धुमाकूळ घातल्यानंतर पहाटेच्या दरम्यान होडगे कुटुंबीयांनी हत्तीला मलीग्रे नजीकच्या डोंगर परिसराच्या दिशेने हुसकावून लावले. पण दिवसभर विश्रांती घेऊन रात्री हत्ती शेती परिसरात वावरत आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. काही दिवसांपूर्वी तालुक्याच्या आंबोली नजीकच्या पश्चिम भागात वाघाच्या वावरण्याने पाळीव जनावरांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आता तालुक्याच्या पूर्व भागदेखील हत्तींच्या नुकसानीचे भयग्रस्त झाला आहे. यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना वनविभागाने करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
हेही वाचा :
- चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाकडून टीम इंडियाला सरप्राईज
- रशियाच्या कजानमध्ये ९/११ सारखा हल्ला
- खारीने सोडला शाकाहार