दुबई : इंग्लंडचा फलंदाज जो रूटने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत अग्रस्थान पटकावले आहे. आयसीसी कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने अव्वलस्थान कायम राखले आहे. (Joe Root)
नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या कसोटीत रूटने वर्षातील सहावे आणि कारकिर्दीतील ३६ वे शतक झळकावले. या कामगिरीच्या आधारे त्याने आपलाच संघसहकारी हॅरी ब्रुकला मागे टाकत अव्वलस्थान काबीज केले. रूटच्या खात्यात ८९५, तर ब्रुकच्या खात्यामध्ये ८७६ गुण आहेत. याच कसोटीमध्ये शतक साजरे करणारा न्यूझीलंडचा फलंदाज केन विल्यमसन ८६७ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. भारताच्या यशस्वी जैस्वालची चौथ्या स्थानावर घसरण झाली असून त्याच्या खात्यात ८११ गुण आहेत. भारताविरुद्ध गॅबा कसोटीत शतक झळकावणारा ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड ७८१ गुणांसह पाचव्या स्थानावर आहेत.
कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत अग्रस्थानी कायम असणाऱ्या बुमराहच्या खात्यात ८९० गुण आहेत. या क्रमवारीमध्ये रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा हे भारताचे गोलंदाज अव्वल दहामध्ये आहेत. नुकतीच निवृत्ती जाहीर केलेला अश्विन ७९७ गुणांसह पाचव्या, तर जडेजा ७८६ गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. अष्टपैलू कसोटीपटूंच्या क्रमवारीत जडेजा ४१५ गुणांसह पहल्या, तर अश्विन २८३ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. (Joe Root)
हेही वाचा :
- मुंबईत बोट बुडाली; दोघा प्रवाशांचा मृत्यू
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अवमानाबद्दल अमित शाहांनी देशाची माफी मागावी
- Russian Cancer Vaccine : रशियाने बनवली कॅन्सरवरील लस