ब्रिस्बेन : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील तिसऱ्या कसोटीचे यजमानपद भूषवणाऱ्या गॅबा स्टेडियमवर भारतीय संघाने गुरुवारी कसून सराव केला. विराट कोहलीसह भारतीय फलंदाजांनी प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली फलंदाजीचा सराव केला. (Team India)
या मालिकेतील पर्थ येथील पहिली कसोटी जिंकून भारताने आघाडी घेतली होती. मात्र, अडलेड येथील कसोटी जिंकून ऑस्ट्रेलियाने मालिकेत पुनरागमन केले. त्यामुळे, ब्रिस्बेन कसोटीपूर्वी दडपण भारतीय संघावर आहे. त्यातच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याच्या दृष्टीनेही भारतासाठी विजय महत्त्वाचा आहे. ब्रिस्बेन येथील खेळपट्टीवर गवत असल्यामुळे येथे वेगवान गोलंदाजांना साहाय्य मिळण्याचे संकेत आहेत. त्या पार्श्वभूमीवर भारतीय फलंदाजांनी थ्रो-डाउन चेंडूंवर फलंदाजी केली. विराट कोहलीने नेट्समध्ये दोन बॅट बदलून फलंदाजी केली. लोकेश राहुल, शुभमन गिल, रिषभ पंत, यशस्वी जैस्वाल, नितीश रेड्डी यांनीही नेट्समध्ये फलंदाजी केली. अडलेडमध्ये मधल्या फळीत अपयशी ठरल्यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्मा ब्रिस्बेन कसोटीत पुन्हा सलामीला फलंदाजीस येण्याची शक्यता आहे. खेळपट्टीवर टिकून राहण्यासाठी रोहितने आपला क्रीझमध्ये उभा राहण्याचा पवित्रा (स्टान्स) बदलावा, असेही काही माजी क्रिकेटपटूंनी सुचवले होते. तथापि, सरावसत्रात रोहितने जुन्याच स्टान्ससह फलंदाजी केली. (Team India)
दरम्यान, जसप्रित बुमराहसह भारताचे गोलंदाजही या सरावसत्रास उपस्थित होते. बुमराहने अन्य वेगवान गोलंदाजांशी चर्चा केली. अडलेड कसोटीत फारशी चमक दाखवू न शकलेला वेगवान गोलंदाज हर्षित राणाच्या जागी आकाशदीपला ब्रिस्बेन कसोटीसाठी संघात स्थान देण्यात येण्याची शक्यता आहे. गुरुवारी आकाशदीपने नेट्समध्ये गोलंदाजी केल्यामुळे या शक्यतेला बळ मिळाले.
हेही वाचा :
- ‘एक राष्ट्र, एक निवडणूक,’ चालू अधिवेशानातच
- आंतरराष्ट्रीय परिषदांत तोंड लपवायची वेळ येते
- कास, महाबळेश्वर, पाचगणीला ‘मे तेरी रानी, तू मेरा…’