कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने यावर्षी सुरू केलेल्या वि. स. खांडेकर पुरस्कारासाठी संग्राम गायकवाड यांच्या मनसमझावन या कादंबरीची निवड करण्यात आली आहे. २५ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप असून पुरस्कार प्रदान समारंभ १८ डिसेंबर रोजी कोल्हापुरात होणार आहे. (Sangram Gaikwad )
पाटण (सातारा) येथील कवयित्री प्रा. डॉ . रामकली पावसकर यांनी आपले वडिल मराठीचे ख्यातनाम प्राध्यापक मनोहर कोपर्डे यांच्या स्मरणार्थ दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेकडे काही रक्कम ठेव म्हणून ठेवली आहे. त्या रकमेतून प्रा. मनोहर कोपर्डे यांच्या स्मरणार्थ वि. स. खांडेकर यांच्या नावाने पुरस्कार देण्यात येणार आहे. कादंबरी, कथा, ललित आणि आत्मचरित्र यापैकी कोणत्याही वाड्.मयप्रकारातील त्या वर्षीच्या उत्कृष्ट पुस्तकास हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
यंदा पहिल्या पुरस्कारासाठी संग्राम गायकवाड यांच्या मनसमझावन कादंबरीची निवड करण्यात आली असून रोहन प्रकाशनाने ही कादंबरी प्रकाशित केली आहे. डॉ. विजय चोरमारे, नामदेव माळी आणि प्रा. रामकली पावसकर यांच्या निवड समितीने ही निवड केली. संग्राम गायकवाड यांची यापूर्वी आटपाट देशातल्या गोष्टी ही कादंबरी प्रकाशित असून तिला राज्य शासनाच्या उत्कृष्ट वाड्.मयनिर्मिती पुरस्काराबरोबरच दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा देवदत्त पाटील पुरस्कार मिळाला आहे. (Sangram Gaikwad)
पुरस्कार प्रदान समारंभ बुधवार दि.१८ डिसेंबर,२०२४ रोजी सकाळी दहा वाजता मिनी सभागृह, शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे होणार आहे, अशी माहिती साहित्य सभेचे कार्यवाह डॉ. विनोद कांबळे यांनी दिली.
हेही वाचा :
- बीडचा बिहार झाल्याची विरोधकांची टीका
- एक लाख ७० हजाराची लाच घेणाऱ्या बँक कायदा सल्लागाराला अटक
- दिल्लीत शरद पवार, अजित पवारांची भेट