Home » Blog » देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री

भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड झाल्यामुळे महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.

by प्रतिनिधी
0 comments

मुंबईः भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड झाल्यामुळे महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर गेल्या बारा दिवसांचा सत्तासंघर्षाचा पेच आजच्या बैठकीनंतर संपुष्टात आला. गुरुवारी पाच डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता मुंबईत आझाद मैदान येथे देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी होईल.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतमोजणी २३ नोव्हेंबरला झाली. त्यामध्ये महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. भारतीय जनता पक्षाला १३२, शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला ५७ आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला ४१ जागा मिळाल्या. एवढे प्रचंड बहुमत मिळूनही भाजपला विधिमंडळ गटनेता निवडण्यासाठी बारा दिवस लागले. आधीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधी मुख्यमंत्रीपदासाठी आग्रह धरला आणि त्यानंतर काही खात्यांच्या मागणीसाठी ते अडून बसले. त्यामुळे एवढे मोठे बहुमत मिळूनही सरकार स्थापन होऊ शकले नव्हते. दरम्यानच्या काळात एकनाथ शिंदे यांनी आपण मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून बाजूला होत असल्याचे सांगून टाकले. त्यानंतर दिल्लीत झालेल्या भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या बैठकीवेळी शिंदे यांच्या चेह-यावरील नाराजी उघड झाली होती. तिथून परत आल्यानंतर महायुतीची बैठक रद्द करून एकनाथ शिंदे आपल्या गावी सातारा जिल्ह्यातील दरे येथे निघून गेले. त्यामुळे सत्तास्थापनेचा पेच गंभीर बनला. दरम्यानच्या काळात चर्चा न झाल्यामुळे कोणत्या पक्षाचे किती मंत्री आणि कुणाला कोणती मंत्रीपदे यासंदर्भातील निर्णयही होऊ शकले नाहीत. त्यामुळे पाच तारखेला फक्त मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांचाच शपथविधी होईल, असे सांगितले जाऊ लागले.

भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रासाठी निरीक्षक म्हणून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांची नियुक्ती केली. त्यांच्या उपस्थितीत बुधवारी सकाळी बैठक होईल, असे जाहीर करण्यात आले. त्यानुसार आज भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी निरीक्षक विजय रुपानी आणि मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी निर्मला सीतारामन् यांचे स्वागत केले. माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्याला पंकजा मुंडे, प्रवीण दरेकर, आशिष शेलार आदींनी अनुमोदन दिले.

त्यानंतर विजय रुपानी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा एकच प्रस्ताव असल्यामुळे त्यांची नेतेपदी निवड जाहीर केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना मंचावर बोलावण्यात आले आणि विविध नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

निवडणूक आयोगाला मारकडवाडीची चपराक
Maharashtra Government : भाजप करणार जोरदार शक्तिप्रदर्शन
महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी वाढली की वाढवली?

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00