Home » Blog » संथ गतीचा रेंगाळलेला ‘मोक्षदाह’

संथ गतीचा रेंगाळलेला ‘मोक्षदाह’

संथ गतीचा रेंगाळलेला ‘मोक्षदाह’

by प्रतिनिधी
0 comments
Drama Competition

-प्रा. प्रशांत नागावकर

जगात इच्छामरणासंदर्भात टोकाचे वाद सुरू आहेत. दीर्घकालीन न्यायालयीन प्रक्रियाही सुरू आहे. पण हा वाद केवळ न्यायालयीन निर्णयाने मिटणार नाही. कारण यामध्ये कायदेशीर प्रक्रियेबरोबरच वैद्यकीय आणि सामाजिक नीतीतत्त्वांचे मुद्दे तितकेच महत्त्वाचे आहेत आणि खूपच गुंतागुंतीचे आहेत. ‘इच्छामरण’ हा विषय घेऊन आतापर्यंत अनेक साहित्यकृती आणि नाटक, चित्रपट अशा कलाकृती निर्माण झाल्या आहेत. प्रत्येक कलाकृतीमध्ये इच्छामरणासंदर्भात विविध मतप्रवाह दिसून येतात. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने इच्छामरणाबाबत विविध दृष्टिकोन मांडले आहे. अलीकडच्या व्यस्त जीवनशैलीमुळे इच्छामरण हा कळीचा मुद्दा ठरला आहे. याच संवेदनशील विषयावर ‘रुद्रांश कला अकॅडमी’ने डॉ. सोमनाथ सोनवलकर लिखित ‘मोक्षदाह’ हे नाटक सादर केले. संवेदनशील विषय अतिशय ताकदीने लेखकाने मांडला आहे. संवादात्मकता हे नाटकाचे वैशिष्ट्ये. पण हेच संवाद दीर्घ स्वरूपाचे लांबलचक, तत्त्वज्ञानात्मक असल्याने ते विनाकारण बोजडही वाटतात. याचा सादरीकरणात प्रत्यय आल्यावाचून राहिला नाही.

वासुदेव हे निवृत्त पोस्ट मास्तर. त्यांची पत्नी इरावती निवृत्त मुख्याध्यापिका. या दाम्पत्याला अपत्य नाही. हा निर्णय त्यांनी जाणीवपूर्वक पूर्वीच घेतला होता. आयुष्याच्या उतरत्या टप्प्यात आपले जीवन नकोसे होते आणि दोघेही इच्छामरणाचा मार्ग निवडतात. पण कायदेशीर अडचणी आल्याने अनेक वर्ष ते न्यायालयीन लढाई लढत आहेत, पण यश येत नाही. वासुदेवांना अंथरुणाला खिळून मरणाची वाट पाहणं पसंत नाही. तसेच पेटीत कुजून कुजून आपल्या शरीराची विल्हेवाट होण्याची कल्पना सहन होत नाही. उलट आपल्या शरीरातील अवयवांचा वापर इतरांना व्हावा, ही त्यांची प्रामाणिक इच्छा आहे.

आपल्या पश्चात्त कुठलाही वारस नाही तेव्हा कुणासाठी जगावं? हा प्रश्न असल्याने त्यांना इच्छा मरण हवे आहे. आणि यासाठी त्यांची दीर्घकालीन न्यायालयीन लढाई सुरूच आहे. न्यायालय वासुदेव दाम्पत्याने घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करावा किंवा यापासून परावृत्त करावे, यासाठी झिया नावाच्या कौन्सिलरची नेमणूक करते. ही कौन्सिलर कोणी एकेकाळी वासुदेव यांच्या पत्नीची विद्यार्थिनी असते. आई-बाप विभक्त झाल्याने अनाथ बनलेली ही मुलगी. या मुलीला लहानपणापासून लिव्हरचा त्रास असतो. तिला अवयव दानाची गरज आहे, हे कळाल्यावर वासुदेव यांनी आपल्या लिव्हरमधला एक तुकडा तिच्या रक्षणासाठी दान केलेला असतो. तिच वासुदेवांच्या घरात कौन्सिलर म्हणून येते आणि बघता बघता त्यांच्यात मिसळून जाते. वासुदेव व त्यांच्या पत्नीला इच्छामरणाच्या निर्णयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करते. असे हे नाटकाचे ढोबळ कथानक. कथानक चार व्यक्तिरेखांनी पुढे नेले आहे. वासुदेव, त्यांची पत्नी इरावती, वासुदासचे वकील मित्र आपटे आणि कौन्सिलर झिया.

संवाद खूपच लांबलचक आहेत. एखादी व्यक्तीरेखा इतकं लांबलचक बोलत असताना दुसऱ्या व्यक्तिरेखेने नेमकं करायचं काय? हा एक प्रश्न संवाद म्हणताना उपस्थित झाल्याचे पाहायला मिळते. सहाजिकच नाटकातील हालचालींना नकळतपणे बंधने आली आहेत. हे दीर्घ स्वरूपाचे संवाद म्हणणे कलाकारांसाठी कसोटीचे ठरले असते पण यातील कलाकारांनी चोख पाठांतर केल्याने ते या कसोटीस पूर्णपणे उतरले, हे मान्य करावे लागेल. अभिनय हा नंतर भाग.

डॉ. प्रमोद कसबे हे या नाटकाचे दिग्दर्शक आणि या नाटकातील प्रमुख वासुदासची भूमिकाही त्यांनी साकारली आहे. दिग्दर्शक असूनही त्यात प्रमुख भूमिका करणे हे खूपच अवघड असते. कारण नाटकातल्या इतर व्यावधानांकडे दिग्दर्शकाला लक्ष देता येत नाही. तरीही डॉ. कसबेकर यांनी अतिरिक्त जबाबदारी स्वीकारली. त्यांच्या अभिनयातील सहजता वाखाणण्यासारखी आहे. अभिनयात कोणत्याही प्रकारचा अभिनिवेश जाणवला नाही. उलट अभिनयात इतकी सहजता होती की ते अभिनय करतात असे क्षणभरही वाटले नाही. वासुदेवची कैफियत त्यांनी प्रामाणिकपणे व्यक्त केली आहे. आशय समजून घेत केलेली अचूक संवादफेक हे त्यांच्या अभिनयाचे प्रमुख वैशिष्ट्य. संवादातील हलकेफुलके उपरोधिक विनोद त्यांनी मोठ्या खुबीने म्हटले आहेत.

शिवसागर शेटे यांनी भूमिका उत्तमपणे साकारली आहे. त्यांचा रंगमंचावरचा वावर सहज होता. त्यांनी उच्चारलेल्या उपरोधिक संवादाने रंगतदारपणा आणला. कौटुंबिक पातळीवर नातेसंबंधातून आलेली हतबलता आणि निराशा त्यांनी तितक्याच ताकदीने व्यक्त केले. ‘वृद्धाश्रमात सर्व काही अलबेल आहे आणि मी खूप सुखी आहे’, असे सांगताना आणलेला भावुकपणा मनाला चटका लावतो.

स्त्री कलाकारांनी मात्र खूप निराशा केली. साक्षी जिरंगे यांनी वासुदेव यांच्या पत्नीची भूमिका साकार केली. त्यांच्या संवादफेकीची शैली एकसुरी होती. तीच गत झिया झालेल्या राजलक्ष्मी कौलकर यांच्याबाबतीत दिसून आली. त्यांचं सातत्याने मान डोलवणे आणि क्षणाक्षणाला प्रेक्षकांकडे बघणे खटकणारे होते. दोन्ही स्त्री कलाकारांनी आपल्या व्यक्तिरेखेचा कोणताही विचार न करता, त्यांचा स्वभाव न समजावून घेता आपला मूळचा स्वभाव आणि सवयीच रंगमंचावर व्यक्त केल्याचे जाणून आले.

डॉ. कसबेकर यांनी दिग्दर्शकाबरोबर अभिनय आणि नेपथ्याचीही बाजूही सांभाळली आहे. त्यांनी नेपथ्याची रचना नाटकाच्या आशयाला साजेशी केली. ती उत्तम झाली आहे. नाटकातील काळ त्यांनी अचूक पकडला. जुनाट वाड्याचा फील हुबेहूब प्रेक्षकांना दिला. पहिल्या अंकातील नेपथ्यातील मोकळ्या जागा दुसऱ्या अंकात आशयाच्या दृष्टीने भरून काढल्या. उदाहरणार्थ, फुलपाखराचे रंगीत चित्र, सुरेख फ्लॉवर पॉट, अंगणातील वाढलेली वेल इत्यादी जगण्यातील सकारात्मक बदल स्पष्ट करायला मदत करतात. पण तरीही काही त्रुटी आढळून येतात. त्यामध्ये रंगमंचावर अनेक अनावश्यक वस्तूंची गर्दी दिसून आली. प्रेक्षकांच्या उजवीकडील गॅलरी ही खटकणारी होती. आपवादात्मक प्रसंगासाठी किंवा व्यक्तिरेखांच्या एन्ट्री-एक्झिटसाठी अनावश्यक अशी विंगेतील जागा नेपथ्याचा तोल बिघडत होती.

प्रकाश योजनेतील सेक्शन लाईट्स प्रेक्षकांच्या आस्वादात अडथळा आणत होत्या. नाटकात एकच स्थळ म्हणजे हॉल आहे. असे असले तरी संपूर्ण रंगमंच प्रकाश योजनाकरानी न उजाळता केवळ व्यक्तिरेखांच्या हालचालीनुसार आणि संवादानुसार तेवढाच स्पॉटलाईट वापरणे हेच नाटकाच्या आस्वादात अडथळा आणत होते. प्रकाश योजनेतून काळ वेळेचे भान येत नव्हते. सकाळ, संध्याकाळ, रात्र यांचे कोणतेही सूचन केले गेले नाही. आयुष्यातील अंताची वेळ तसेच मृत्यूनंतरच्या अग्नीसंस्कारची जाणीव करून देणारा लाल पिवळा प्रकाशाचा वापर आशयाच्या दृष्टीने योग्य असला तरी सातत्याने त्याचा वापर नकोसा वाटत होता. मुळात सगळ्याच स्पॉटलाईटची दिशा म्हणजे प्रकाशाच्या स्त्रोताची दिशा चुकीची होती. तसेच व्यक्तिरेखांवर पूर्ण प्रकाश न पडता बहुतांशी त्यांचे चेहरे अंधारात होते. अभिरुप न्यायालयाच्या दरम्यान न्यायाधीशावर टाकलेला लाल प्रकाशाचे प्रयोजन लक्षात आले नाही.

पार्श्वसंगीतामध्ये संगीताच्या तुकड्यांबरोबर ध्वनींचाही वापर केला गेला आहे. पण संवादातील आशयानुसार, त्यातील लयीनुसार वापरलेले संगीताचे तुकडे काहीसे विसंगत वाटत होते. याबरोबर पावसाचे सूचन करणारे ध्वनी पार्श्वभूमीवर सातत्याने असायला हवे होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ब्लॅक आउट पार्श्वसंगीताने भरून निघत नव्हता.

वर उल्लेख केल्याप्रमाणे डॉ. कसबेकरानी नाटकातल्या तिन्ही भूमिकांची जबाबदारी घेतली असल्याने दिग्दर्शनाला ते न्याय देऊ शकले नाहीत. संहितेचे संपादन हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला. नाटकातील संवादामधला तोच तोचपणा कमी करता आला असता तर अनेक प्रसंग रेखीव व ठसठशीत झाले असते. संवादाची लांबी करूनही संवादातील आशय व्यक्त करता आला असता. याबरोबरच संपूर्ण नाटकातील दोन प्रवेशादरम्यानचा ब्लॅकआऊट बराचसा रेंगाळल्याने प्रेक्षकांचे लक्ष विचलित होत होते. पात्रांना वेशभूषा बदलायला कितीसा वेळ लागेल? वेळ लागत असेल तर अन्य काही क्लुप्त्या करून दिग्दर्शकाने वेळ तशी रचना करणे गरजेचे असते पण ते तसे झाले नाही. साहजिकच दोन प्रवेशातील ब्लॅक आऊट बराचसा लांबला. नाटकात दिग्दर्शक भूमिका साकार करत असेल तर पात्रांच्या हालचालींकडे तसेच आशयाच्या दृष्टीने केलेले कंपोझिशन्सकडे दिग्दर्शक लक्ष देऊ शकत नाही, या निमित्ताने याचा पुन:प्रत्यय आला.

एकूणच नाटकाची गती अतिशय संथ होती. सर्वच प्रसंग खूपच रेंगाळल्याने कोणताही प्रसंग उत्कर्ष बिंदू गाठू शकला नाही. लिहिल्या गेलेल्या एका चांगल्या नाटकाला रुद्रांश कला अकॅडमी न्याय देऊ शकली नाही, असेच म्हणावे लागेल.

नाटक : मोक्षदाह
लेखक : डॉ. सोमनाथ सोनवलकर
सादरकर्ते : रूद्रांश अकॅडमी, कोल्हापूर
दिग्दर्शक : डॉ. प्रमोद कसबे

भूमिका आणि कलावंत

इरावती : साक्षी झिरंगे
नाझिया : राजलक्ष्मी कौलवकर
आपटे : शिवसागर शेटे
वासुदास : डॉ. प्रमोद कसबे

तंत्रज्ञ

नेपथ्य : डॉ. प्रमोद कसबे
प्रकाश योजना : तन्मय राऊत, कुणाल शेलार
पार्श्वसंगीत : प्रथमेश सिद्धार्थ
रंगभूषा : साक्षी झिरंगे
वेशभूषा : राजलक्ष्मी कौलवकर
रंगमंच व्यवस्था : अनिल काजवे, शिवसागर शेटे.
कोल्हापूर : रूद्रांश अकॅडमीने सादर केलेल्या ‘मोक्षदाह’ नाटकातील दृश्य. (छाया : अर्जुन टाकळकर)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00