Home » Blog » चीन सीमेवर भारत बनवतोय गतिमान रस्ते

चीन सीमेवर भारत बनवतोय गतिमान रस्ते

अरुणाचलमधील बारा जिल्हे जोडणार

by प्रतिनिधी
0 comments
China border

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) भारत स्वतःला मजबूत करत आहे. भारत सरकार अरुणाचल प्रदेशमध्ये सुमारे ४० हजार कोटी रुपये खर्चून अरुणाचल फ्रंटियर हायवे बनवत आहे. तो राज्यातील सुमारे १२ जिल्ह्यांना जोडण्याचे काम करेल. या महामार्गाची लांबी सुमारे १,६३७ किलोमीटर असेल. अरुणाचल फ्रंटियर हायवे बांधण्यासाठी केंद्र सरकारने २८,२२९ कोटी रुपये मंजूर केले आहेत.

अरुणाचल फ्रंटियर हायवे ४० हजार कोटी रुपये खर्चून पूर्ण केला जाईल. हा प्रकल्प भारत-तिबेट- चीन- म्यानमार सीमेजवळ बांधला जाईल आणि रस्ता प्रकल्प ‘एलएसी’आणि आंतरराष्ट्रीय सीमांपासून २० किलोमीटर अंतरावर असेल. तो बोमडिला येथून सुरू होईल आणि ‘एलएसी’ किंवा मॅकमोहन लाईनच्या जवळ असलेल्या नाफ्रा, हुरी आणि मोनिगॉन्ग शहरांमधून जाईल. तो भारत-म्यानमार सीमेजवळील विजयनगर येथे संपेल. त्याचे बांधकाम सीमा रस्ते बांधणी विभाग करणार आहे. मॅकमोहन लाईनला समांतर बांधण्यात येणारा राष्ट्रीय महामार्ग २०२७ पर्यंत पूर्ण होऊ शकतो.

अरुणाचल फ्रंटियर राष्ट्रीय महामार्ग-९१३ च्या १९८ किलोमीटर लांबीच्या टाटो-टुंटिंगचे बांधकाम वेगाने सुरू आहे. कारण ‘बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन’ सीमेला लागून असलेल्या भागात सतत रस्त्यांचे जाळे विणत आहे. ‘एलएसी’वर भारताची तयारी चीनला अजिबात आवडलेली नाही. त्यामुळेच त्यांनी या बांधकामावर अनेकदा आक्षेप व्यक्त केला आहे. चीन स्वतः ‘एलएसी’जवळील त्याच्या भागात रस्ते आणि पुलांचे जाळे विणत आहे. अशा स्थितीत त्याला त्याच्याच भाषेत उत्तर द्यायचे झाल्यास, भारताने ‘बीआरओ’च्या कामाचे बजेट मागील वर्षांच्या तुलनेत दुप्पट केले आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये ‘बीआरओ’ वेगाने काम करत आहे. ‘बीआरओ’ अरुणाचल प्रदेशातील ब्राह्मणक प्रकल्पांतर्गत प्रकल्पांवर काम करत आहे.

सियांग, अप्पर सियांग, वेस्ट सियांग आणि शि-योमी जिल्ह्यांमध्ये रस्त्यांच्या पायाभूत सुविधांची निर्मिती आणि देखभाल केली जात आहे. याशिवाय आसाममधील धेमाजी जिल्ह्यात चार रस्त्यांची देखभाल केली जात आहे. २०२२-२३ आणि २०२३-२४ मध्ये ब्राह्मणक प्रकल्पाने अलॉन्ग-यिंगकिओंग रस्त्यावर सिओम नदीवर १०० मीटर लांबीचा कमान पूल बांधला आहे. सियोम पुलाचे बांधकाम १८० दिवसांच्या विक्रमी वेळेत पूर्ण झाले आणि वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. ब्राह्मणक प्रकल्पाच्या स्थापनेपासून आतापर्यंत १७ रस्त्यांचे बांधकाम पूर्ण झाले असून त्यांची एकूण लांबी ४९६ किलोमीटर आहे. यासह ४२ कायमस्वरूपी पूल आणि ११ मॉड्युलर पुलांचे बांधकामही पूर्ण झाले आहे. विशेष बाब म्हणजे ‘बीआरओ’ने सर्व हवामानातील रस्ते आणि पुलांचे बांधकाम केले आहे. अनेक बोगदेही बांधले जातील. हा महामार्ग वर्षभर आणि सर्व ऋतूंमध्ये वापरता येईल, अशा पद्धतीने बांधण्यात येणार आहे.

लष्कराची पकड मजबूत होणार

गेल्या काही वर्षांत सरकारने सीमाभागात वेगाने रस्ते बांधून आजुबाजूची गावे जोडली आहेत. महामार्गाच्या बांधकामादरम्यान अनेक बोगदेही बांधण्यात येणार आहेत. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर अरुणाचल प्रदेशातील भारतीय लष्कराची पकड अधिक मजबूत होणार आहे.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00